वसई:
वसई पूर्वेतील मेढे ग्रामपंचायत हद्दीतून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. शनिवारी दुपारी वडघर गावाकडे जाणारा मुख्य पूल अचानक पत्त्यासारखा कोसळल्याची दुर्घटना घडली. या भीषण अपघाताच्या वेळी पुलावरून जात असलेली एक कार आणि एक ट्रक थेट खाली कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुलाची क्षमता अवजड वाहनांची वाहतूक पेलण्याइतकी नव्हती. असे असतानाही या मार्गावरून दररोज सुमारे ४० ते ५० क्षमतेपेक्षा जास्त वजन असलेली अवजड वाहने बेकायदेशीरपणे ये-जा करत होती. या सततच्या अतिरिक्त भारामुळे पुलाची वास्तू कमकुवत झाली होती आणि अखेर शनिवारी दुपारी हा पूल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कोसळल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
या पूल दुर्घटनेमुळे वडघर, काळभोन, आणि लेंडी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या गावांचा मुख्य संपर्क तुटला आहे. हा मार्ग पूर्णपणे बंद झाल्याने स्थानिक नागरिकांचे मोठे हाल होत असून, त्यांना ये-जा करण्यासाठी आता पर्यायी रस्ता शोधावा लागत आहे. पूल कोसळल्याचे समजताच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत घटनास्थळाची पाहणी सुरू केली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि दुर्घटनाग्रस्त वाहने बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच, या पुलाच्या पडण्यामागचे नेमके तांत्रिक कारण शोधण्यासाठी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत
वसईत भर रहदारीच्या वेळेत पूल कोसळला; कार आणि ट्रक खाली कोसळले#Palghar #accident pic.twitter.com/YH5bQSfmfd
— Kokanai Digital News Channel (@kokanai21) July 18, 2026


