सिंधुदुर्गनगरी:
राज्यामध्ये सुरू असलेल्या ‘मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ या महत्त्वपूर्ण मोहिमेला भारत निवडणूक आयोगाने ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. कोकणासह राज्यातील अनेक भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती, वाहतूक व्यवस्थेतील अडथळे आणि नागरिकांना तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही मोहीम ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येत होती. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी गृहभेटी व सर्वेक्षणाचे काम अपेक्षित गतीने पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर करत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिस यांनी “एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये,” असे आवाहन केले आहे.
निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे:
बीएलओमार्फत घरोघरी सर्वेक्षण व गृहभेटी : ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत (आता बीएलओ ८ ऑगस्टपर्यंत गृहभेटी घेतील)
मतदान केंद्रांची पुनर्रचना व सुसूत्रीकरण : ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत
मतदार यादीची प्रारूप प्रसिद्धी : १७ ऑगस्ट २०२६ (सोमवार)
दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६
दावे व हरकतींचा निपटारा : १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६
अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : १९ ऑक्टोबर २०२६ (सोमवार)
वाढीव मुदतीचा लाभ घेऊन नागरिकांनी आपल्या परिसरातील मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.


