मुंबई:
मुंबई लोकलच्या प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण करणारे एक बनावट (फेक) परिपत्रक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हे परिपत्रक हुबेहूब शासकीय निर्णय (GR) असल्यासारखे तयार करण्यात आले असून, यामध्ये मुंबईतील नवीन १५ डब्यांच्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांना दिवा, डोंबिवली आणि कल्याण (तसेच दादर) या स्थानकांवर उतरण्यास बंदी घालण्यात आली असल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वे पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी धमकीवजा चेतावणीही या बनावट नोटीसमध्ये देण्यात आली आहे.
या व्हायरल परिपत्रकाची दखल घेत मध्य रेल्वेने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हे परिपत्रक पूर्णपणे बनावट, दिशाभूल करणारे आणि हेतूपूर्वक चुकीची माहिती पसरवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. रेल्वेने प्रवाशांना अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, हे बनावट परिपत्रक कोणी तयार केले आणि ते सोशल मीडियावर कोणी व्हायरल केले, याचा शोध घेऊन संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची तयारी मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.


