सावंतवाडी:
येथील सालईवाडा भागात सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून पळून जाणाऱ्या दोन अट्टल चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने या आरोपींना आधी दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केली होती. तेथील तपासादरम्यान त्यांनी सावंतवाडी येथील गुन्ह्याचीही कबुली दिली. त्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी या आरोपींचा ताबा घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे वैभव नारायणराव अडोळे (वय २६, रा. एरला, ता. मोर्शी, जि. अमरावती, सध्या रा. हिंजवडी, पुणे) आणि करण गोरखनाथ जगधने (वय १९, रा. पिंपळवाडी पिराची, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. विधाते वस्ती, औंध गावठाण, पुणे) अशी आहेत.
सकाळी चालताना घडली होती घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास श्रीमती रंजना ठाकूर (रा. साळईवाडा, सावंतवाडी) या बिल्डिंगखालील रस्त्यावरून चालत जात होत्या. याच वेळी दुचाकीवरून आलेल्या या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचा दागिना हिसकावून नेला आणि तेथून पोबारा केला होता. या घटनेनंतर सावंतवाडी शहरात प्रचंड खळबळ उडाली होती.
कोल्हापूर पोलिसांच्या तपासात उघडकीस आला गुन्हा
सावंतवाडीतील या घटनेनंतर काही दिवसांतच कोल्हापूर भागातही अशाच प्रकारची चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावत वैभव अडोळे आणि करण जगधने यांना जेरबंद केले. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आरोपींनी सावंतवाडीतही रंजना ठाकूर यांच्या गळ्यातील सोन्याचा दागिना चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर चोरांकडून सोन्याचा दागिना हस्तगत करण्यात आला असून संशयितांना २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या सूचनेनुसार, पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रमोद पाटील यांनी आपल्या पथकासह कोल्हापूर कारागृहात जाऊन दोन्ही संशयित आरोपींचा रीतसर ताबा घेतला. संशयित आरोपींची ओळख परेड (टी.आय. परेड) करायची असल्याने, त्यांची ओळख उघड होऊ नये म्हणून त्यांना चेहरा मास्काने झाकूनच वेळोवेळी न्यायालयात हजर करण्यात येत होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


