दादर-रत्नागिरी गाडी पूर्ववत करण्यासाठी शिवसेनेचा मध्य रेल्वेला १० दिवसांचा ‘अल्टीमेटम’

   Follow us on        

मुंबई:कोविड काळात बंद करण्यात आलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन येत्या दहा दिवसांत पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. जर रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी दिला आहे. मंगळवारी त्यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी मध्य रेल्वेने कोकणच्या प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहू नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

​राज्यांतर्गत रेल्वे गाड्यांकडे लक्ष देण्याची मागणी:

या भेटीदरम्यान खासदार सावंत यांनी केवळ कोकणच नव्हे, तर राज्यातील इतरही बंद असलेल्या गाड्यांचा प्रश्न मांडला. त्यांनी सांगितले की, मुंबई-सावंतवाडी ट्रेन आठवड्यातून फक्त एकदाच चालवली जाते, ती दररोज सुरू करणे आवश्यक आहे तसेच, मराठवाड्यातून सुटणारी नांदेड-पुणे गाडी पुण्याऐवजी हडपसरला थांबवली जाते, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ही गाडी हडपसर ऐवजी थेट पुणे स्टेशनपर्यंत सुरू करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

​रेल्वेच्या ‘मराठीद्वेषा’वर संताप:

खासदार सावंत यांनी रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत ‘मराठीद्वेष’ थांबवण्याचे आवाहन केले. ‘डेक्कन क्वीन’च्या वाढदिवसाच्या वेळी केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करणे आणि ‘रेल वन ॲप’मध्ये मराठी भाषेचा समावेश न करणे, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याशिवाय रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आणि शिवडीतील एंड-टू-एंड पुलाचे रखडलेले काम या प्रश्नांकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या बैठकीला रेल्वेचे अधिकारी आणि भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search