मळगाव : कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी वास्को-पटना सुपरफास्ट एक्सप्रेस सध्या कोकणातील स्थानिक प्रवाशांसाठी मोठा मनस्ताप ठरत आहे. ही गाडी दर बुधवारी धावते, परंतु ती गोवा राज्यातील वास्को आणि मडगाव स्थानकावरूनच इतकी तुडुंब भरून येते की, सावंतवाडी रोड स्थानकावर गाडीत पाऊल ठेवणेही अशक्य झाले आहे. रेल्वे प्रशासनाने या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकमेव थांबा दिला असला, तरी त्याचा उपयोग येथील जनतेपेक्षा परप्रांतीयांच्या प्रवासासाठीच अधिक होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
या गाडीतील प्रवासादरम्यान निर्माण होणारी परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. गाडीमध्ये नेहमीच परप्रांतीयांची प्रचंड गर्दी असते, त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणे स्थानिक प्रवाशांसाठी जिकिरीचे झाले आहे. विशेषतः आपल्या कुटुंबाला आणि महिलांना घेऊन या गाडीने प्रवास करणे आता धोकादायक वाटू लागले आहे. सुरक्षित प्रवासाची कोणतीही खात्री रेल्वे प्रशासन देऊ शकत नसल्याने, प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून संतापाची लाट उसळली आहे.
रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे आरक्षित डब्यांची (Reserved Coaches) अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या डब्यांमध्ये घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांमुळे आरक्षित डब्यांचे रूपांतर जनरल डब्यांत झाले आहे. ज्या प्रवाशांनी आधीच आरक्षण केले आहे, त्यांनाही स्वतःच्या जागेवर बसणे कठीण झाले आहे. या गर्दीमुळे सावंतवाडी स्थानकावरून गाडीत चढणे शक्य नसल्याने अनेक प्रवाशांना आपले तिकीट रद्द करावे लागते, परिणामी रेल्वेला दर आठवड्याला हजारो रुपयांचा परतावा द्यावा लागत असून मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
सावंतवाडी स्थानकावरील या गाडीचा थांबा केवळ तांत्रिक किंवा नावापुरताच मर्यादित राहिला आहे. या गाडीमुळे कोकणात परप्रांतीयांची संख्या तर वाढत आहेच, पण स्थानिक कोकणी माणसाला मात्र या सेवेचा कोणताही लाभ मिळत नाही. परप्रांतीयांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानिक प्रवाशांच्या सोयीकडे आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे. आरक्षित डब्यातही नियमांची पायमल्ली होत असल्याने प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
“ज्या गाड्यांचा फायदा कोकणातील जनतेला नाही, त्या गाड्या आमच्या मार्गावर कशासाठी?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. वास्को-पटना सारख्या गाड्यांमुळे स्थानिक प्रवाशांना कोणताही दिलासा मिळत नसून, त्याऐवजी कोकणच्या हक्काच्या गाड्या सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
पुणे आणि कल्याणसाठी हव्यात स्वतंत्र गाड्या
सध्या कोकणातून पुणे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. परंतु, रेल्वे प्रशासन या गरजेकडे डोळेझाक करत आहे. वास्को-पटना सारखी गाडी अव्यवस्थितपणे चालवण्यापेक्षा, पुणे-सावंतवाडी आणि कल्याण-सावंतवाडी या मार्गांवर नियमित गाड्या सुरू केल्यास त्याचा थेट फायदा येथील स्थानिक जनतेला आणि चाकरमान्यांना होईल. पुण्याला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि नोकरदारांची संख्या मोठी असतानाही पुरेशी रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने खासगी ट्रॅव्हल्सचे दर प्रवाशांचे कंबरडे मोडत आहेत.


