नवी दिल्ली: एलपीजी ग्राहकांसाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने ‘भारत गॅस लाइट झिप’ ही नवीन प्रीमियम सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत ग्राहकांना वजनाने हलके, गंजरोधक आणि पारदर्शक कम्पोझिट एलपीजी सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. यासोबतच नवीन गॅस कनेक्शन आणि एक्सप्रेस डिलिव्हरीची सुविधाही दिली जाणार आहे. मुंबईमध्ये या सेवेची सुरुवात झाली असून, १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत देशातील १०० शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
नवीन कम्पोझिट सिलिंडर हे पारंपरिक स्टील सिलिंडरपेक्षा वजनाने हलके असल्याने ते उचलणे आणि हाताळणे अधिक सोपे आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान कुटुंबांना याचा विशेष फायदा होईल. तसेच, या सिलिंडरला गंज लागत नसल्याने त्याचे आयुष्यही अधिक राहण्याची शक्यता आहे. या सिलिंडरचा पारदर्शक बाह्य भाग हे याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे बाहेरूनच स्पष्ट दिसेल. परिणामी, गॅस संपण्याचा अंदाज आधीच बांधून ग्राहकांना वेळेवर बुकिंग करता येईल.
कंपनीने या सिलिंडरमध्ये अधिक सुरक्षिततेचा दावा केला आहे. आजची वेगवान जीवनशैली लक्षात घेऊन बीपीसीएलने नवीन कनेक्शनची प्रक्रिया सुलभ केली असून, सिलिंडरची एक्सप्रेस डिलिव्हरीही उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ग्राहकांना अत्यंत कमी वेळेत नवीन कनेक्शन आणि गॅस सिलिंडर मिळणे शक्य होणार आहे.
Photo Credit – AI


