Konkan Railway: कुडाळ स्थानकावर बेकायदा तिकीट विक्री करणाऱ्या दलालाला अटक

   Follow us on        

कुडाळ: कोकण रेल्वेच्या रत्नागिरी आरपीएफ (रेल्वे सुरक्षा दल) पथकाने ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत कुडाळ रेल्वे स्थानकावर धडक कारवाई करत एका तिकीट दलालाला (टाउट) रंगेहात पकडले आहे. या कारवाईत दलालाकडे ३,५८० रुपये किमतीचे एक अवैध ‘तत्काळ’ तिकीट सापडले असून ते जप्त करण्यात आले आहे. हे तिकीट काळ्या बाजारात चढ्या दराने विकण्याच्या उद्देशाने काढण्यात आले होते. अशा अवैध विक्रीमुळे सामान्य प्रवाशांना हक्काची तिकिटे मिळवण्यात अडचणी येत होत्या.

​स्थानकावर नियमित तपासणी सुरू असताना आरपीएफला या व्यक्तीच्या हालचालींवर संशय आला. प्राथमिक चौकशीत तो बेकायदेशीरपणे तिकीट विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कणकवली आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या कलमांतर्गत रेल्वे तिकिटांची अनधिकृत खरेदी-विक्री करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा मानला जातो.

​रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि दलालांचा सुळसुळाट रोखण्यासाठी ‘ऑपरेशन उपलब्ध’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रवाशांना पारदर्शक पद्धतीने आणि योग्य किमतीत तिकिटे मिळावीत, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. कोकण रेल्वे मार्गावर आरपीएफ पूर्णपणे सतर्क असून, प्रवाशांनीही कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडून तिकीट खरेदी करू नये आणि काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ आरपीएफला कळवावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search