देवगड:दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिर परिसरात एका प्राचीन ‘गंगाकुंडाचा’ शोध लागला आहे. मंदिरापासून साधारण १ ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कुणकेश्वर-खालचीवाडी येथील ओहोळाजवळ हे पुरातन कुंड असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. हे गंगाकुंड सुमारे २५० ते ३०० वर्षांपूर्वीचे किंवा त्याहूनही प्राचीन असावे, असा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
स्थानिक ग्रामस्थ संतोष लब्दे, संतोष लाड आणि शरद वाळके यांनी राबवलेल्या शोधमोहिमेमुळे हे दुर्लक्षित कुंड पुन्हा समोर आले आहे. अनेक वर्षांपासून झाडाझुडपांचा पालापाचोळा आणि गाळ साचल्यामुळे हे कुंड पूर्णतः बुजून गेले होते. या शोधानंतर कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली आणि कोकण इतिहास परिषदेचे रणजीत हिर्लेकर यांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिकांच्या मदतीने या परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.
या कुंडाची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून ते जांभ्या दगडात कोरलेले आहे. हे कुंड साधारण ६ बाय ६ फूट आकाराचे असून, त्यात विहिरीसारखी खोदाई करण्यात आली आहे. त्याच्या आत पुन्हा ३ बाय ३ फुटांचा एक खोल भाग असून त्याची खोली अंदाजे ५ ते ६ फूट आहे. विशेष म्हणजे, या कुंडात एका चौकोनी पारावर जांभ्या दगडात कोरलेले देखणे शिवलिंगही आहे. सध्या या कुंडात सुमारे तीन फूट खोलीपर्यंत काचेसारखे स्वच्छ पाणी साचलेले दिसत आहे.
कोकण इतिहास परिषदेचे रणजीत हिर्लेकर यांनी माहिती दिली की, १९९२ मध्ये श्रीदेव कुणकेश्वर मंदिराच्या ‘वज्रलेपा’साठी याच गंगाकुंडातील पवित्र पाण्याचा वापर करण्यात आला होता. हे गंगाकुंड प्राचीन काळातील उत्कृष्ट पाणी व्यवस्थापनाचे एक उत्तम उदाहरण मानले जात आहे. स्वच्छता केल्यामुळे या ऐतिहासिक वारशाला आता पुन्हा उर्जितावस्था प्राप्त झाली असून, या शोधामुळे कुणकेश्वरच्या इतिहासात मोलाची भर पडली आहे.


