Category Archives: सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : गावठी बॉम्ब घेत आहेत पाळीव प्राण्यांचे बळी; मळेवाड येथे गावठी बॉम्बमुळे वासराचा मृत्यू

सिंधुदुर्ग: वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी पेरून ठेवलेले गावठी बॉम्ब पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोकादायक ठरत आहेत. असाच एक गावठी बॉम्ब खाल्ल्यामुळे सावंतवाडी माळेवाड येथील प्रवीण दत्ताराम नाईक यांच्या म्हशीच्या वासराचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे संबंधित शेतकऱ्यांसह स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
मळेवाड परिसरात शिकारीसाठी गावठी बॉम्ब ठेवण्यात येत आहे. त्यामुळे गुरांना तसेच पाळीव प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर हा प्रकार घडला. प्रवीण नाईक यांनी गुरे चरावयास सोडली होती. याच भागात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी गावठी बॉम्ब ठेवले होते. ते बॉम्ब खाल्ल्याने वासराचा मृत्यू झाला. याबाबत वनखात्याने सखोल चौकशी करावी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

आंबोली पर्यटनस्थळापेक्षा “मृतदेह विल्हेवाट स्थळ” म्हणुन प्रसिद्ध होत चालले आहे?

सावंतवाडी:  दोन दिवसांपूर्वी म्हापसा येथील तरुणीची हत्या करुन तिचा मत्यूतदेह आंबोली घाटाच्या दरीत टाकण्याचा प्रकार घडला होता. या प्रकारावर सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सिंधुदुर्ग पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. 
खून करून आंबोलीत मृतदेह टाकण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सिंधुदुर्ग पोलिस नेमके काय करताहेत? चेकपोस्ट केवळ मलिदा खाण्यासाठीच आहेत का, असा प्रश्न त्यांनी केला आहे. गोव्यातील युवतीचा मृतदेह आंबोलीपर्यंत कसा नेला? त्यावेळी कोण पोलिस कर्मचारी कर्तव्य बजावत होते? याची पोलिस अधीक्षकांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. आंबोली घाटात दिवसेंदिवस मृतदेह आणून टाकण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे तेथील पर्यटनाची बदनामी होत आहे. याबाबत पोलिसांनी आता आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. आंबोलीच्या प्रवेशद्वारावर तीन चेकपोस्ट उभारली आहेत, तरीही असे प्रकार नेमके का होतात? याचा पोलिसांनी शोध घ्यावा, असे साळगावकर यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले असून, पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे जगभरातील पर्यटकांना वर्षा पर्यटनासाठी भुरळ घालणारं ठिकाण आहे. मात्र, अलीकडे पर्यटनाच्या दृष्टीने कमी मात्र मृतदेह फेकण्याचं ठिकाण म्हणून आंबोलीची ओळख बनू लागली आहे. अशा घटना थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी पर्यटक आणि स्थानिकांमधून जोर धरत आहे. 

Sindhudurg Airport : ऐन हंगामात नियमित सेवा देता येत नसतील तर…..

यश सावंत | सिंधुदुर्ग  : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबरपासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी गेल्याच आठवड्यात दिली होती. मात्र ही घोषणा हवेतच विरून गेल्याचे दिसत आहे. आज दिनांक ०१ सप्टेंबर असूनही अजूनही येथे नियमित सेवा चालू झाली नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे मागील चार दिवस चिपी विमानतळावर विमानच उतरले नाही. 

विमानाची बूकिंग सेवा उपलब्ध करून देणार्‍या क्लीअर ट्रीप तसेच मेक माय ट्रीप या वेबसाईटवर तपासले असता मुंबई ते सिंधुदुर्ग या दरम्यान एक दोन दिवस आड करून विमान फेरी असल्याचे चित्र दिसत आहे. गणेश चतुर्थीच्या जवळील तारखांचे विमान भाडे दहा हजाराच्या वर गेले आहे. त्यामुळे यंदा विमानाने गावी जाण्याचा बेतात असणाऱ्या कोकणवासियांचा हिरमोड झाला आहे.

 

.. तर सिंधुदुर्ग विमानतळाचा उपयोग काय?

गणेश चतुर्थी आणि इतर हंगामाच्या दिवसांत सुद्धा अशा अनियमित फेर्‍या असतील तर सिंधुदुर्ग जिल्हय़ातील विमान सेवेचा उपयोग तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  विमानसेवेच्या तिकीट बूकिंग साठी Dynamic Pricing Strategy चा अवलंब करण्यात येत असतो. तरीपण मुंबई ते गोवा विमानसेवा तिकीट भाडे सर्व चार्जेस पकडून साधारणपणे 1800 ते 2000 रुपये एवढे आहे. हंगाम असल्याने एवढे भाडे देवून कोकणात गावी जाण्यासाठी किती तरी कोकणवासिय उत्सुक आहेत. प्रवासी असूनही विमानसेवा अनियमित असल्याने प्रशासनाला हंगामाचा फायदा घेणे जमत नसल्याचे दिसत आहे. येथील राजकिय पक्ष पण यामध्ये लक्ष घालताना दिसत नाही आहेत. अनियमित सेवेमुळे पर्यटकांनी सुद्धा या सेवेकडे पाठ फिरवली आहे. असेच चित्र राहिले तर एक दिवस हे विमानतळ बंद होईल असे बोलले तर नवल वाटायला  नको.

 

सिंधुदुर्ग: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी

सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघाची मागणी

सिंधुदुर्ग :प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे पर्यावरणास हानी पोचत आहे.त्यामुळे अशा मूर्ती बनवणे, त्यांची आयात करणे आणि साठवणूक करणे यांवर बंदी घालावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघाने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघाचे अध्यक्ष नारायण उपाख्य बापू सावंत, संचालक अरुण पालकर, विलास मळगावकर आदींनी हे निवेदन दिले आहे. पूर्वीपासून श्री गणेमूर्ती मातीच्या बनवल्या जात असत; परंतु गेल्या ८ ते १० वर्षांपासून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्ती जिल्ह्यात आयात केल्या जात आहेत. या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने विसर्जनानंतर त्या बरेच महिने भग्नावस्थेत दिसतात. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे. 

Konkan Tourism: सिंधुदुर्ग किल्ला उद्यापासून पर्यटकांसाठी खुला

सिंधुदुर्ग : या महिन्यात मालवणला भेट देणार्‍या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. जिल्हय़ातील पर्यटन स्थळांच्या अग्रस्थानी असलेला सिंधुदुर्ग किल्ला उद्यापासून पर्यटकांसाठी खुला होणार आहे. समुद्र किनारा ते किल्ला वाहतुक होडी सेवा उद्यापासून चालू होणार आहे. 

पावसाळी हंगामात सुरक्षेच्या दृष्टीने या किल्यापर्यंत होणारी प्रवासी होडी सेवा बंद ठेवण्यात येते. ही प्रवासी वाहतूक होडी सेवा आता १ सप्टेंबरपासून नव्या पर्यटन हंगामास सुरुवात होत आहे. ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग दर्शन प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार असल्यामुळे पर्यटकांची प्रतीक्षा संपणार आहे. 

दरम्यान सिंधुदुर्ग किल्याच्या डागडुजीचे काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतले आहे. किल्याचा महादरवाजा, दिंडी दरवाजा, ढासळलेली तटबंदी आणि त्यावरील पायवाट, किल्ल्यावरील पायवाटा आदी कामांची प्रामुख्याने दुरुस्ती होणार आहे. तटबंदीवरील झाडी सफाईचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. अशी माहिती पुरातत्व विभाग अधिकारी वैभव बेटकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग किल्याचा महा दरवाजा कालौघात जीर्ण झाला आहे. हा दरवाजा बदलून नवीन दरवाजा बसविण्याची प्रस्ताव पुरातत्त्व विभागा समोर आहे. यानुसार किल्याचा महादरवाजा, त्यामधील दिंडी दरवाजा पूर्णतः बदलून नवीन दरवाजा बसविण्यात येणार आहे. नवीन दरवाजा तयार करताना जुन्या दरवाजाची हुबेहूब प्रतिकृती असेल याची काळजी घेतली जाणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

१ सप्टेंबर पासून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या परवानगीने तसेच सागरी हवामानाचा अंदाज घेऊन किल्ले प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार आहे. प्रवासी होडी वाहतूक डागडुजी कामानाही वेग आला आहे. मालवणात पर्यटन सफरीवर येणाऱ्या पर्यटकांचे किल्ले सिंधुदुर्ग हे खास आकर्षण आहे. समुद्रातील होडी प्रवास स्मरणीय असतो. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक किल्ले सिंधुदुर्गला भेट देतात. त्यामुळे सागरी पर्यटनास अर्थात स्कुबा डायव्हीग, पॅरासेलिंग, वॉटर स्पोर्ट्स बोटिंग सफर आदी जल पर्यटनाला ही १ सप्टेंबर पासून परवानगी प्राप्त होते. परवानगी व सागरी हवामान याचा अंदाज घेत मालवणचे पर्यटन बहरणार आहे.

 

तळकोकणात मुंबई-गोवा महामार्गावर साकारले गेले आधुनिक दर्जाचे सिनेमागृह; येत्या शुक्रवारी उदघाटन

सिंधुदुर्ग:सावंतवाडी येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसाय उदय पारळे यांच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथे आराध्य सिनेमा नावाचे आधुनिक दर्जाचे सिनेमागृह साकारण्यात आले आहे. प्रकल्पात एकाच ठिकाणी सिनेमा पाहण्यासोबत हॉटेल, थिएटर आणि ओपन लॉनचा आनंद घेता येणार आहे. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला तालुक्यासह बांदा, शिरोडा या महत्त्वाच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाला लागून झाराप झिरो पॉईंट येथे बांधकाम व्यवसायिक उदय पारळे व त्यांच्या पत्नी स्मिता पारळे यांनी हा प्रकल्प उभारला आहे. आराध्य सिनेमा सोबतच याठिकाणी दर्जेदार असा सुसज्ज हॉल, हॉटेल, राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी सिनेमा पाहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना जेवणासह राहण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकाच ठिकाणी सर्व सोयी असल्याने सिनेमा पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार आहे. 
येत्या शुक्रवारी १ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता आराध्य सिनेमाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त्या रेणु गावसकर व सावंतवाडीचे उद्योजक शैलेश पै यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुळात सावंतवाडी, वेंगुर्ला व कुडाळ तालुक्याचा विचार करता दर्जेदार अश्या सिनेमा थिएटरची कमतरता श्री. पारळे यांनी ओळखून येथील जनतेसाठी ते उपलब्ध करुन दिले आहे. याठिकाणी नवनवीन सिनेमा उपलब्ध करुन देण्यात येणार असून अन्य आवश्यकत्या सर्व सोयी सुद्धा ठेवण्यात येणार.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून भजन मंडळांना साहित्य वाटप; अर्ज करण्यासाठी उद्याचा अखेरचा दिवस

सिंधुदुर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भजन परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे बजेट करताना भजनी मंडळांना साहित्य पुरविण्याकरिता २५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. अशी तरतूद पहिल्यांदाच करण्यात आली आहे. एका भजन मंडळाला १० ते १२ हजार रुपयांचे साहित्य पुरविले जाणार आहे. या निर्णयाचे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भजनप्रेमी मंडळींकडून जोरदार स्वागत होत आहे. 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात घरोघरी साजरा केला जातो. त्याप्रमाणे वाडीवाडीत भजन मंडळे सक्रिय होऊन या कालावधीत घरोघरी जाऊन गणपती समोर आरती, भजने सादर करीत असतात. जिल्ह्यात प्रत्येक वाडीचे स्वतंत्र भजन मंडळ आहे. काही वाड्यांमध्ये तर एकापेक्षा अनेक भजन मंडळे कार्यरत आहेत. अलीकडे महिला भजन मंडळ, लहान मुलांचे भजन मंडळ हा सुद्धा ट्रेंड मोठ्या स्वरुपात सुरू झाला आहे. एवढी रसिकता व लोकप्रियता भजन या पारंपरिक कलेची जिल्ह्यात आढळून येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद या मूलभूत विषयाला प्राधान्य देताना अन्य नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी तजवीज करीत असते; मात्र यावर्षी यात वेगळीकता जिल्हा परिषदेने दाखविली आहे. जिल्हा परिषदेत प्रशासक असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी यावर्षी भजनी मंडळांना साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेचे विद्यमान ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या धर्तीवर ही संकल्पना मांडली आहे. पुणे जिल्ह्यातील वारकऱ्यांना जिल्हा परिषद वाद्य साहित्य पुरविते. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने भजनी मंडळांना साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने यासाठी मंडळ रजिस्टर असण्याची अट ठेवलेली नाही. 
सध्या यासाठी प्रस्ताव घेण्याचे काम सुरू आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी ग्रामीण भागातील भजन मंडळांची झुंबड उडालेली दिसत आहे. जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायती असल्या, तरी भजन मंडळांची संख्या हजारोंच्या संख्येने आहे. त्यामुळे कोणाला प्राधान्य दिले जाईल, हे निश्चित समजलेले नाही; मात्र ”पहिला प्रस्ताव, पहिले प्राधान्य” असा निकष असण्याची शक्यता आहे. उपलब्ध प्रस्तावांतून लॉटरी काढून लाभ दिला जाण्याचीही शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी २५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. एका मंडळाला दहा ते बारा हजार रुपयांचे साहित्य पुरविले जाणार आहे. यामध्ये एक मृदंग, पाच ते सहा टाळ, एक झांज या साहित्य संचाचा समावेश आहे. 
प्रस्ताव सादर करताना ग्रामसभा, मासिक सभेचा ठराव आवश्यक आहे. मंडळाची कार्यकारिणी यादी जोडणे गरजेचे आहे. मंडळ गावात कार्यरत असल्याबाबत ग्रामपंचायतीचा दाखला आवश्यक असून, पुरविण्यात येणारे साहित्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध असल्याबाबत मंडळाचा दाखला जोडणे गरजेचे आहे. पुरविण्यात येणाऱ्या साहित्याची देखभाल दुरुस्ती करण्यास तयार असल्याचा भजन मंडळाने दाखला जोडायचा असून, यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची शिफारस आवश्यक आहे. मंडळाचे किमान १० ते १५ सदस्य असल्याची कार्यकारिणी यादी जोडायची आहे. यासाठी ३० ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत आहे.

कुडाळ व कणकवली आगाराच्या ताफ्यात ‘शयनयान’ बसेस दाखल

सिंधुदुर्ग: कुडाळ आगारासाठी प्रथमच सहा शयनयान (स्लीपर) एसटी बसेस दाखल होणार आहेत. माजी खासदार निलेश राणे यांनी तशी मागणी केली होती; त्यांचा मागणीला यश आले आहे. या बस पैकी एक बस कणकवली आगारात दाखल झाली आहे.
या बसेस एसटीच्या कुडाळ आगारातून पणजी-पुणे-निगडी, पणजी-लातूर आणि पणजी-बोरिवली या मार्गावर चालविल्या जाणाऱ्या आहेत. . यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर होणार आहे. एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजली जाते. आता एसटीने देखील आधुनिकरणाची कास धरली असून, जिल्ह्यातील बसस्थानकांची नूतनीकरणाची कामे पूर्णत्वास जात आहेत. नवीन बसेस देखील प्रवाश्यांच्या सेवेसाठी दाखल होत आहेत. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सिंधुदुर्ग एसटी विभागाचे प्रमुख अभिजीत पाटील आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली होती.या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांना चांगली आणि आधुनिक सेवा देण्यासाठी माजी खासदार तथा कुडाळ मालवण विधानसभेचे प्रभारी निलेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही सतत प्रयत्नशील राहू, असे तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्गात कॅश्यु फॅक्टरी फोडून ५६ हजार रुपयांचा ऐवज लंपास

सिंधुदुर्ग : इन्सुली खामदेव नाका येथील शिवदुर्ग कॅश्यु फॅक्टरी अज्ञात चोरट्याने आज पहाटेच्या सुमारास फोडली. यात ४८ हजार रुपयांची रोकड व ८ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ५६ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. याबाबतची फिर्याद मालक दिगंबर सदाशिव बोंद्रे यांनी बांदा पोलीसात दाखल केली आहे. ही घटना पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली असावी असा पोलीसांचा अंदाज आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली खामदेव नाक्यावर श्री गणेश मंदिर समोरील शिवदुर्ग कॅश्यु फॅक्टरी फोडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. चोरट्याने खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला. कपाटातील तीन काऊंटरमध्ये ठेवलेली सुमारे ४८ हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. तसेच सुमारे ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरुन नेला.

आज सकाळी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी सहकार्‍यां समवेत घटनास्थळाची पाहणी केली. मालक दिगंबर बोंद्रे व फॅक्टरीमधील कामगार यांच्याकडून आवश्यक माहिती घेतली. तसेच कॅश्यु फॅक्टरीमध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज तपासण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले. एलसीबी तसेच श्वान पथक व ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आल्याची माहिती एपीआय शामराव काळे यांनी दिली.

सिंधुदुर्ग: आंबोलीच्या जंगलात ‘ब्लॅक पँथर’ चा वावर..

आंबोली :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमध्ये गुरुवार दि. २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:४५ वाजता काळ्या बिबट्याचे दर्शन झाले. मिलिंद गडकरी यांना संध्याकाळी फेरफटका मारत असताना या काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यांनी तात्काळ वन विभागाला या नोंदीबद्दल कळवले आहे.

यापूर्वीही अशा काळ्या बिबट्याच्या आंबोलीमधून नोंदी झाल्या आहेत. २०१४ साली आजऱ्यामध्ये काळ्या बिबट्याची नोंद झाली होती. तसेच २०१६ मध्ये तिलारीमधूनही काळ्या बिबट्याची नोंद करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी कुडाळ तालुक्यात काळ्या बिबट्याच्या बछड्याला पकडण्यात आले होते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काळ्या बिबटय़ाचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. काळा बिबट्या हा सामान्य बिबट्यांसारखाच असतो मात्र त्यात मेलानिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेचा रंग काळा झालेला पहायला मिळतो. सह्याद्रीमध्ये ब्लॅक पँथर आहेत ही एक सकारात्मक गोष्ट असल्याचे तज्ञ सांगतात. मेलानिस्टीक बिबटे साधारणतः घनदाट जंगलांमध्ये आढळतात.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search