Category Archives: महाराष्ट्र

HSC Result 2025: मोठी बातमी! १२ वीच्या निकालाची तारीख जाहीर; निकाल येथे पाहता येईल.

   Follow us on        
12th Result date: यंदा १२ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांचा पालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या इ. १२ वीच्या परीक्षेचा निकाल ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता जाहीर करणार आहे. विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर (website) निकाल पाहू शकतील. तसेच, Digilocker ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका (marksheet) उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सोय मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इ. १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी मंडळाने काही अधिकृत संकेतस्थळे (official websites) जाहीर केली आहेत. या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना विषयवार गुण पाहता येतील. तसेच, निकालाची प्रिंट (print out) काढण्याची सोय देखील उपलब्ध आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांचा एकत्रित निकाल (overall result) कॉलेज लॉगिनमध्ये पाहता येईल.
निकाल पाहण्यासाठी लिंक :

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला विरोध करण्यासारखे- दीपक केसरकर

   Follow us on        
शक्तिपीठ महामार्गाला होणारा विरोध म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला विरोध करण्यासारखे असे मत माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना  व्यक्त केले.
ते म्हणालेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपली हिरवळ जपली आहे. इथला हापूस आंबा नागपूर आणि दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरेल. हा महामार्ग रेडी बंदराला जोडला गेल्यास जिल्ह्याला मोठा फायदा होईल, ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे. केवळ विरोधाला विरोध करणे योग्य नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याने ६० टक्क्यांहून अधिक जंगले जपली आहेत. आमच्या पूर्वजांनी आणि आम्ही ही जंगले राखली म्हणून आमचा विकास थांबवायचा का? लोकांनी उपाशी मरायचे का? शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणे हा कोणता न्याय आहे? ते पुढे म्हणाले, नागपूरमध्ये वाघ दिसतात, तर आमच्या जंगलात काळा बिबट्या पाहायला मिळतो. येथे समुद्रही आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. नागपूरहून सुरू होणारा महामार्ग वाढवण बंदराला जोडला जातो, तसाच शक्तिपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडला जावा. रेडी बंदरातून आयात-निर्यात सुरू झाल्यास नागपूरची संत्री परदेशात जाईल आणि सिंधुदुर्गचा आंबा दिल्ली-नागपूरला पोहोचेल. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढेल.

Monsoon 2025: मान्सूनची चाहुल! पावसाची वर्दी देणारा ‘नवरंग’ कोकणात दाखल

   Follow us on        

रत्नागिरी: पावसाची वर्दी घेऊन येणारा पक्षी म्हणून ओळख असलेला नवरंग म्हणजेच ‘इंडियन पिट्टा’ कोकणात दाखल झाला आहे (indian pitta migration). पावसाची जशी चाहूल लागते तशी कोकणामध्ये नवरंग पक्षाचं आगमन होत. हा अतिशय दुर्मिळ पक्षी असून वर्षभरातील फक्त चारच महिने आपल्याला पाहायला मिळतो. पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं की नवरंग पक्षी कोकणात दाखल होतो. हवामान विभागानेदेखील यंदा पाऊस लवकर असल्याची माहिती दिली आहे. त्यातच आता नवरंग पक्षाच्या आगमनाने पावसाच्या आगमनाची चाहूल दिली आहे. नवरंग पक्षी हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधला जातो. पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच आपल्या विशिष्ट आवाजाने शेतकऱ्यांना हा पक्षी जणू पावसाला लवकर सुरू होणार असल्याची वर्दी0 देतो. नवरंग पक्षाच्या आगमनाने पक्षी प्रेमींही सुखावले असून त्याची छबी टिपण्याचा मोह आवरत नाही.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी या पक्ष्याची मधुर शीळ कानी पडू लागली आहे (indian pitta migration). पावसाळ्याच्या तोंडावर हा पक्षी स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर करत असला तरी, कोकणात या पक्ष्याची काही संख्या घरटी देखील बांधते. (indian pitta migration)

भारतीय पिट्टा या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी भारतात स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर करतो. ‘पिट्टा’ हा शब्द तेलुगू भाषेतून आला आहे. ज्याचा अर्थ ‘लहान पक्षी’ असा होतो. याला मराठीत स्थानिक भाषेत नवरंग, बहिरा पाखर, बंदी, पाऊसपेव असेही म्हटले जाते. हा पक्षी हिवाळ्यात दक्षिण भारत आणि श्रीलंकेत स्थलांतर करतो, तर पावसाळ्याच्या तोंंडावर अगदी हिमालयाच्या पायथ्यापर्यंत प्रजननाकरिता जातो. एप्रिल महिन्यात श्रीलंका आणि दक्षिण भारतात स्थलांतर केलेले नवरंग पक्षी पश्चिम घाटाच्या धारेला धरुनच उत्तरेकडे सरकू लागतात. सध्या या पक्ष्यांचे आगमन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यातील पक्षीनिरीक्षक या पक्ष्यांची छायाचित्र टिपत आहेत.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नवरंग पक्षी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात सरकेल आणि तिथून गुजरातमध्ये जाऊन प्रजनन करेल. पश्चिम घाटामार्गे स्थलांतर करणारे ९० टक्के नवरंग पक्षी हे गुजरात किंवा त्यावरील भागात जाऊन प्रजनन करत असले तरी, काही पक्षी हे कोकणात देखील घरटी बांधतात. लहान आकाराचा हा पक्षी आपल्या रंगासाठी ओळखला जातो. त्याचे पाय लाब आणि मजबूत असतात. चोच जाड असते. हा पक्षी सहसा दाट झाडी असलेल्या जंगलात जमिनीवर खाद्य शोधताना दिसतो. पालापाचोळ्यामधील कीटक शोधताना दिसतो. सकाळी आणि सायंकाळी हा पक्षी आवाज देताना दिसतो. यामधील नर आणि मादी हे एकसारखेच दिसतात.

मोठी बातमी! पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय स्थगित

   Follow us on        

मुंबई:राज्य सरकारनं मंगळवारी शाळेत हिंदी भाषा शिकवण्याच्या प्रस्तावावर मोठा निर्णय घेतला होता. राज्यातील शाळेत हिंदी शिकणे अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारनं रद्द केला आहे. पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकण्याचा प्रस्ताव यापूर्वी मान्य करण्यात आला होता. तो निर्णय सरकारनं स्थगित केला आहे.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली. याबाबत यापूर्वी सादर केलेल्या अध्यादेशावर स्थगिती आणल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

जीजीआर-3 भाषा फॉर्म्युल्यानुसार पहिली ते पाचवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकणे अनिवार्य करण्यात आले होते. पण, या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटले. त्यानंतर सरकारनं हा निर्णय स्थगित केला आहे.

यापूर्वी राज्य सरकारने नेमलेल्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध केला होता. तसेच, समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.

Mansoon Updates: यंदाच्या मान्सूनबाबत महत्वाची बातमी…हवामान खात्याने वर्तविली ‘ही’ शक्यता

   Follow us on        

Mansoon Updates: यंदाचा उन्हाळा यंदा फेब्रुवारीपासूनच कडक उन्हाळा राज्यात सुरू झाला आहे. त्यामुळे सुमारे शंभर वर्षातील सर्वांत उष्ण फेब्रुवारी ठरला. वातावरणातील या बदलाचा परीणाम मान्सूनच्या आगमनावर करणारा ठरणार आहे. यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. गेल्या आठवडय़ात वातावरणात मोठे बदल झाले असून, मान्सूनच्या हालचाली अंदमानात दिसण्यास सुरुवात होत आहे.

यंदा फेब्रुवारीपासूनच कडक उन्हाळा राज्यात सुरू झाला. थंडी कमी अन् ऊन जास्त, असे वातावरण होते. त्यामुळे सुमारे शंभर वर्षातील सर्वांत उष्ण फेब्रुवारी ठरला. त्यापाठोपाठ मार्च आणि एप्रिलमध्येही तीच स्थिती आहे. मार्चमध्ये कमाल तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला तसेच सरासरी पाऊस कमीच झाला. त्यामुळे मार्च महिना पूर्ण उष्ण ठरला.एप्रिलची सुरुवातही खूप कडक उष्ण झळांनी झाली. गत अनेक वर्षांतील यंदाचा एप्रिल उष्ण ठरत आहे. हे वातावरण मान्सूनच्या तयारीसाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक असे आहे.

हवामानशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा खूप कडक उन्हाळा आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त आहे. ढगांची निर्मिती वेगाने होते असून, सॅटेलाइट इमेज पाहिल्यावर असे लक्षात येते की, मान्सून आपल्या तयारीला लागला आहे. संपूर्ण देशाला ढगांनी वेढले आहे. बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार होत असून, ते आपल्या देशाकडे येत आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, मान्सूनच्या हालचाली या समुद्रातील पाण्याचे तापमान, वार्‍याची दिशा, हवेचे दाब यावर अवलंबून असतात. सध्या अरबी समुद्रातील तापमान 31, तर हिंदी महासागराचे तापमान 30 अंश सेल्सिअस इतके आहे. पाणी खूप तापल्याने वेगाने बाष्पीभवन होत आहे. हवेचे दाब सध्या समुद्रावर 1005 ते 1010 हेक्टा पास्कल इतके आहेत.

देशात हवेचे दाब 1005 ते 1008 दरम्यान आहेत. देशातील दाब कमी झाले की वारे समुद्राकडून देशाच्या दिशेने वाहू लागतात. अंदमानात मान्सून हा तयारीला यंदा लवकर लागला आहे. काही दिवसांतच त्याच्या हालचाली सॅटेलाइट इमेजवर दिसण्याची शक्यता आहे.

यंदा एप्रिलमध्ये पारा 43 ते 44 अंशांवर गेल्याने समुद्रातील पाणी वेगाने तापले. परिणामी, बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढल्याने देशाभोवती सर्व बाजूंनी बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार झाल्याचे सॅटेलाइट इमेजमध्ये दिसत आहे.

” यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता जास्त आहे. कारण, सर्व लक्षणे अनुकूल दिसत आहेत. कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने बाष्प वेगाने तयार होऊन मान्सूनपूर्व पावसाची तयारी सुरू झाली आहे. तसेच हवेचा दाब, वार्‍याची दिशा अन् समुद्राचे तापमान, ही मान्सूनसाठी पोषक असणारी लक्षणे यंदा अनुकूल दिसत आहेत. त्यामुळे मान्सून यंदा वेळेआधीच केरळमध्ये दाखल होऊ शकेल, अशी शक्यता आहे.” 

– डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ, पुणे

खेड: विक्रीसाठी आणलेले ताडगोळे चक्क गटाराच्या पाण्याने धुण्याचा विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार

   Follow us on        

खेड: खेड बसस्थानक ते तीनबत्ती नाका दरम्यान तहसीलदार कार्यालयासमोर एका विक्रेत्याने हातगाडीवरील विक्रीसाठी आणलेले ताडगोळे गटाराच्या सांडपाण्यात धुतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. १६) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

ताडगोळे गटारात धूत असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. याबाबत पोलीस शिपाई तुषार रमेश झेंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी आलाउद्दीन कुवुस शेख (वय ६४, रा. बालुग्राम पश्चिमी, ता. उधवा दियारा, जि. साहेबगंज, झारखंड) याने विक्रीसाठी आणलेले ताडगोळे रस्त्यालगत असलेल्या गटाराच्या सांडपाण्यात धुतले. या कृत्यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असून, रोगांचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

चित्रपट अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांना जिवन गौरव पुरस्कार जाहीर

 

   Follow us on        

मुंबई, ता. १७ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केली. यामध्ये चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अशा पाच महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले आहे तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा मान्यवरास चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तसेच या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरास चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार नामवंत अभिनेता, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांर्गत रु.१० लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक दिले जाईल. चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार असून, या पुरस्काराचे स्वरूप रु. ६ लाख, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे आहे.

हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले आहे तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा मान्यवरास स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे. तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार यंदा अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना घोषित झाला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे अनुक्रमे रु. १० लाख व रु. ६ लाख, स्मृतिचिन्ह व मानपत्र, चांदीचे पदक असे स्वरूप आहे.

तसेच, संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जेष्ठ कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात येतो. १९९३ पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझलगायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रु. १० लाख रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे या पुरस्कराचे स्वरुप आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार्थीची निवड करण्याकरिता शासन स्तरावर समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्य मंत्री असून यामध्ये पाच अशासकीय सदस्य आहेत. पं ब्रिजनारायण, अशोक पत्की. सत्यशील देशपांडे, पं उल्हास कशाळकर आणि अंबरीश मिश्र यांचा या समितीमध्ये समावेश होता. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव या समितीचे सदस्य असून सांस्कृतिक कार्य संचालक या समितीचे सदस्य सचिव आहेत.

सर्व पुरस्कारांचे वितरण २५ एप्रिल, २०२५ रोजी एन.एस.सी.आय. डोम, मुंबई येथे एका भव्य समारंभात होणार आहे.

या सोहळ्याशिवाय, संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २० एप्रिल, २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे एक खास सांगितिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, नंदेश उमप आदी कलाकार सहभागी होणार असून, संचालन सुबोध भावे करणार आहेत. कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीतं, नाट्यप्रवेश व नृत्य सादर केले जातील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सन्मानिका प्रवेशपत्रे शिवाजी नाट्य मंदिर व रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर वितरित केली जातील, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

Volvo Bus On Fire: पुणे-सातारा महामार्गावर वॉल्वो बस पेटली

   Follow us on        

Volvo Bus On Fire: पुण्यात बसला आग लागल्याची भीषण घटना घडली आहे. पुणे-सातारा हायवेवर वॉल्वो बसला भररस्त्यात आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. खेडशिवापूर जवळ ही घटना घडली आहे. मुंबई-बेंगळुरू महामार्गावर या खाजगी बसला आग लागली असून, आगीचे कारण हे शॉर्ट सर्किट असण्याची शक्यता आहे.

पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूरजवळ एका एसी व्हॉल्वो बसला आग लागली. बसला आग लागल्यामुळे प्रवाशांनी प्राण वाचवण्यासाठी बसमधून उड्या मारल्या. चालकाच्या चातुर्यामुळे बसमधील सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आगीची ही घटना दुपारी 12 वाजता घडली. बस वेगाने जात असताना खेड शिवापूरजवळ येताच इंजिन क्षेत्रातून धूर निघू लागला. काही क्षणातच गाडीला आग लागली. प्रवाशांना वेळेत बसमधून बाहेर पडण्यात यश आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एसी व्हॉल्वो बसमध्ये साधारणतः 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते. आगीच्या दुर्घटनेमध्ये प्रवाशांचे प्राण वाचले असले तरी काही जण किरकोळ जखमी आहेत. बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मात्र आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे दल येण्यापूर्वीच बस जळून खाक झाली होती. गाडीचा भडका आणि धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. तसेच यामुळे बघ्याची देखील मोठी गर्दी जमली होती.

गाडीतून धूर येऊ लागताच, चालकाने सावध राहून बस थांबवली आणि प्रवाशांना ताबडतोब खाली उतरवले. राजगड पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “संपूर्ण बसने आग लावली, परंतु कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवली.” प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे मानले जात आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

 

 

प्रवाशांना चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेल -मोटेल थांबे रद्द करा ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

   Follow us on        

मुंबईः (१६ एप्रिल, २०२५)-लांब पल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात सध्या सुरु असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसात सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना केल्या आहेत.

लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा-नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्या बाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेल वरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एस टी प्रवासांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या तक्रारी उद्भभवत आहेत.

या तक्रारींची गंभीर दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला याबाबत कडक धोरण स्वीकारण्याची निर्देश दिले आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याची कोणती तडजोड न करता संबंधित हॉटेल-मोटेल थांब्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. तसेच सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्याचे नव्याने सर्वेक्षण करून तेथील प्रवासी सुविधांची चाचपणी करावी. जे थांबे प्रवाशांना योग्य सुविधा देत नसतील त्यांच्यावर कारवाई करावी व नव्या थांब्यांना मंजुरी द्यावी. तसेच याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या १५ दिवसात आपल्याला सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

 

 

ATM in Railway: धावत्या रेल्वेमध्ये देशातील पहिली एटीएम सेवा सुरू

   Follow us on        

Atm in Railway : मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता एटीएमची सुविधा उपलब्ध झाली असून, अशा प्रकारची सुविधा असलेली ही पहिलीच एक्सप्रेस आहे. त्यामुळे आता प्रवासादरम्यानही प्रवाशांना रोख रक्कम काढण्याची सोय होणार असल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे.

रेल्वे गाड्यांमध्ये एटीएम बसवण्याचा विचार प्रथम भुसावळ विभागाने आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल ग्राहक संवाद बैठकीत मांडण्यात आला होता. या कल्पनेला प्रतिसाद देत, बँक ऑफ महाराष्ट्रने “नवीन, नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल कल्पना योजना” (NINFRIS) अंतर्गत औपचारिक प्रस्ताव सादर केला होता. सध्या गाडी क्रमांक 12110 मनमाड-मुंबई सीएसएमटी मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये या सेवेच्या व्यवहार्यता व कार्यक्षमतेची चाचणी सुरू आहे. ही गाडी दररोज मनमाड ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावते. एकूण 22 डब्यांच्या या गाडीची आसन क्षमता 2032 असून दररोज सुमारे 2200 प्रवासी दररोज प्रवास करतात. संपूर्ण गाडी वेस्टिब्यूल कनेक्टेड असल्यामुळे सर्व श्रेणीतील प्रवाशांना या एटीएमचा सहज लाभ घेता येणार आहे.

मध्य रेल्वेच्या मनमाड वर्कशॉपमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करून एक खास कोच तयार करण्यात आला आहे. यामध्ये एटीएम बसवण्यात आले असून, हा कोच आता पंचवटी एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ही एटीएम सेवा असलेली ट्रेन मुंबईत दाखल झाली. हे एटीएम ‘एक्स्प्रेस’ सेवेच्या एसी चेअर कार कोचमध्ये बसवण्यात आले असून, लवकरच ही सेवा प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे. चालत्या ट्रेनमध्ये एटीएम सुरळीतपणे कार्यरत राहावे यासाठी योग्य विद्युत प्रणाली आणि संरचनात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, हा संपूर्ण उपक्रम योजना भारतीय रेल्वेच्या विद्युत व यांत्रिक विभागांच्या समन्वयातून राबवला जात आहे. या ऑनबोर्ड एटीएम सेवेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान सहज आर्थिक व्यवहार करता येणार असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आकस्मिक गरज असलेल्या प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ही एटीएम सेवा मोबाईल नेटवर्कद्वारे सतत जोडलेली राहणार असून, गाडी सुरू असतानाही खऱ्या वेळेत व्यवहार शक्य होणार आहे. एटीएमची सुविधा ही पहिलीच एक्स्प्रेस ठरली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search