Category Archives: महाराष्ट्र

अजून एक महत्वाचे कार्यालय मुंबईतून दिल्लीत जाणार; मुंबईचे महत्व कमी केले जात आहे…

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील मोठे उद्योग इतर राज्यात जात असताना, मुंबईतून पण काही महत्वाची सरकारी प्रधान कार्यालये  बाहेरच्या राज्यात हलविण्याचे प्रकार चालू आहेत. आता तर केंद्र सरकारने १९४३ पासून मुंबईत असणारे टेक्स्टाईल आयुक्तांचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. केंद्र सरकारने वस्त्रोद्योग आयुक्तांना तसे निर्देश दिले आहेत. यापूर्वी मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातच्या अहमदाबादला हलवण्यात आले होते. हाच धागा पकडत मोदी सरकारकडून मुंबई आणि महाराष्ट्राचे जाणीवपूर्वक खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप विरोधकांनी सुरु केला आहे. 

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी या सगळ्या प्रकाराबाबत ट्विट केले आहे. यामध्ये सावंत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राबद्दलचा पूर्वापार असलेला आकस मोदी सरकार आल्यापासून कृतीत उतरला आहे. IFSCसहित अनेक महत्त्वाचे उद्योग, प्रकल्प, राष्ट्रीय संस्थांची महत्त्वाची कार्यालये गुजरात वा इतरत्र नेण्यात आली. आता १९४३ पासून मुंबईत असणारे वस्त्र आयुक्त कार्यालय दिल्लीला हलवण्यात येत आहे. मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असताना महाराष्ट्रातील भाजपा नेते केंद्राला मदत करतात. हा महाराष्ट्र द्रोह नाही का? महाराष्ट्र देशाचे आर्थिक इंजिन आहे. महाराष्ट्राला मागे सारणे हा १२ कोटी मराठी माणसाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहेच पण देशासाठीही घातक आहे, असे सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता यावर भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

Loading

‘देवगड’ च्या बॉक्‍समध्ये कर्नाटकाचा आंबा? ‘हापूस’ म्हणून तुम्ही दुसऱ्या राज्यातील आंबा तर खरेदी करत नाही ना?

नवी मुंबई – कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा तसेच आजूबाजूच्या परिसरातील हापूस आंब्याला जीओग्राफिकल इंडिकेशन टॅगची (GI टॅग) मोहर उठली आहे. यामुळे हापूसचं मूळ कोकणच असल्याचं व तिथे पिकणारा हापूस हाच खरा हापूस असल्यावरही शिक्कामोर्तब झालं आहे. GI टॅग असो वा नसो या भागातील आमचा हाच खरा हापूस म्हणून खूप पूर्वीपासून आंबा प्रेमींकडून कधीच ही मान्यता मिळाली आहे.

पण बाजारपेठेत इतर भागातील खासकरून कर्नाटक आणि आंध्रा राज्यातील आंबे हापूस आंबे म्हणून विकले सर्रास विकले जात आहेत. विक्रेत्यांमध्ये उत्तर भारतीय विक्रेत्यांचा समावेश जास्त असतो. आपल्या कडील आंबा हापूस आंबाच आहे असे बोलून तो विकला जातो. देवगड आंब्याच्या बॉक्स मध्ये पण ‘कर्नाटक आंबा’ भरून विकला जात आहे. यामुळे मूळ हापूस आंब्याच्या उत्पदकांवर अन्याय होतो. ग्राहकांची पण फसवणूक होते.

आंबे खरेदी करताना थोडीशी खबदारी दाखवली तरी आपली फसवणूक टाळता येत येईल.

बाजारभाव – बाजारात आंबे खरेदीसाठी जाताना हापूस आंब्याचा सध्याचा दर काढा. त्यासाठी सोशल माध्यमाचा उपयोग केला जाऊ शकतो. फेसबुक आणि व्हाटसअँप वर अनेक विक्रते हापूस आंबे विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या दरांपेक्षा जर बाजारातील विक्रेता खूपच कमी किमतीत विकत असेल तर तो हापूस आंबा नसू शकेल.

सुगंध – चांगल्या गुणवत्तेच्या हापूस आंब्याला एक नैसर्गिक सुंगध असतो. त्या सुंगधामुळे तो दूरवरुनही पटकन ओळखता येतो. नैसर्गिकरित्या गवताच्या अढीमध्ये पिकवलेल्या आंब्याच्या घमघमाट दूरपर्यंत पसरतो.इतर भागातून येणारे आंबे जे हापूस आंब्यासारखे दिसतात मात्र त्याला अजिबात गंध नसतो किंवा फार क्वचित येतो. हे आंबे रासायनिक पद्धतीचा वापर करुन पिकवलेले असल्याने ते सुगंध देत नाहीत.

साल – पिकलेल्या हापूस आंब्याची साल आपण सहजरित्या हाताने काढू शकतो. तसेच या सालीला आंब्याचा गर लागत नाही.

देठअस्सल हापूस आंब्याचा देठ खोल असतो. 

फळाच्या रंगाकडे लक्षपूर्वक बघितलं तरीही प्रमुख फरक जाणवू शकतो. जर आंबा कृत्रिमरित्या पिकवला असेल तर तो पिवळाधमक आणि एकाच रंगाचा वाटतो.

हापूस आंब्याचा वास आणि त्याचा केशरी गर यावरून सहजरित्या ओळखू शकतो. ड्युपलिकेट हापूस आतून पिवळ्या रंगाचा असतो.

नैसर्गिकरित्या पिकलेला अस्सल हापूस आंबा हा खालच्या टोकाशीसुद्धा गोलाकार आणि वजनदार असतो.

शिवाय जर आपली नजर चांगली असेल तर आंब्याच्या पेटीतील वर्तमानपत्रातूनही त्याची ओळख स्पष्ट होते. त्यात कुठले वर्तमानपत्र वापरले आहे त्यावरून सुद्धा तो आंबा कुठल्या भागातून आला आहे हे कळते.

या फसवणुकीपासून वाचण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे हे आंबे कोकणातील विक्रेत्यांकडून घेणे. हे विक्रेते आपल्या परिसरातील, आपल्या परिचयातील किंवा सोशल मीडिया वर आपला व्यवसाय करत असतात. त्यांच्याकडून आंबे खरेदी केल्यास अशी फसवणूक टाळता येईल.

 

Loading

भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला महाडजवळ जोडणारा लोहमार्ग बनवला जावा – खा. सुप्रिया सुळे

नवी दिल्ली : बेलसर-वाल्हा-लोणंद पासून भोर तालुक्यातून महाड जवळ कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग होऊ शकतो. तसे सर्वेक्षण करुन याबाबत निर्णय घ्यावा, असा एक मोठा पर्याय खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला सुचवला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबत त्यांनी पत्र लिहिले असून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा कोणताही रेल्वेमार्ग सध्या नाही. इतकेच नाही, तर कोकणातील विविध बंदरे आणि सागरी मार्गांवरील मालवाहतूक करण्यासाठी राज्याच्या पूर्व भागाला जोडणारा समर्पित असा रेल्वेमार्गही कोणता नाही. हे पाहता लोणंद पासून भोर मार्गे महाड मध्ये रेल्वे मार्ग झाल्यास या रेल्वेमार्गाचा पश्चिम महाराष्ट्रातील माल आणि प्रवासी वाहतूकीसाठी खूप मोठा फायदा होईल, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. शिवाय ही वाहतूक आर्थिक दृष्ट्याही स्वस्त होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. याचा परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी मोठा फायदा होणार असून यासाठी येथील दळणवळण व्यवस्था मजबूत आणि लोकांच्या सोयीची असणे आवश्यक आहे. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा रेल्वेमार्ग असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
असा मार्ग झाला तर पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी हे तालुके, खडकवासला विधानसभा मतदार संघ तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, वाई, माण आदी भागाबरोबरच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागाच्या औद्योगिक आणि इतर विकासाला चालना मिळू शकेल. हा मार्ग पुणे – मिरज – बंगळूर या मार्गाला देखील जोडता येईल. हा मार्ग अतिशय कमी अंतराचा असून तो जनतेच्या सोयीचा आहे. त्यामुळे या मार्गाचे सर्वेक्षण करुन याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.
या आधीही कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. कराड ते चिपळूण तसेच कोल्हापूर ते वैभववाडी लोहमार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यापैकी कोल्हापूर ते वैभववाडी या लोहमार्गाला मंजुरी मिळाली आहे पण निधीअभावी त्याचे काम अजूनही चालू झाले नाही आहे.

Loading

जनमताचा कौल – जुनी निवृत्तीयोजना की नवी निवृत्तीयोजना?

 

या प्रश्नावरील इतरांची मते जाणून घेण्यासाठी सर्वात आधी आपले मत जतन करा

 

या विषयासंदर्भात आपली मते खालील कंमेंट बॉक्स मध्ये नोंदवा.

Loading

कोकणसह पूर्ण राज्यात आजपासुन पुढील चार दिवस विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान खात्याचा ‘येलौ’ अलर्ट जाहीर

पुणे | १५/०३/२०२३ : राज्यात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने पूर्ण राज्यात ‘येलौ’ अलर्ट जाहीर केला आहे. राज्याच्या  विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होईल, असा अंदाज  व्यक्त केला आहे. या पावसामुळे शेतीतील पिकांचं आणि फळांचे नुकसान होणार आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस. होसालीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रात येत्या चार दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यासाठी IMD द्वारे अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचीही शक्यता आहे. 

कोकणात पावसाचा इशारा 

आज १५ मार्च आणि उद्या १६ मार्चला कोकणच्या सर्व जिल्ह्याला ‘येलौ’ अलर्ट दिला गेला आहे. तर परवा दिनांक १७ रोजी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ाला ‘येलौ’ अलर्ट आहे.

हवामान खात्याचे इशारे Alert
रेड अलर्ट – कृतीची वेळ Red Alert
ऑरेंज अलर्ट – तयार रहा Orange Alert
यलो अलर्ट – सतर्क रहा Yellow Alert
ग्रीन अलर्ट – इशारा नाही

 

Loading

महिलांसाठी खास सवलत; एसटीचा प्रवास आता अर्ध्या तिकिटात…

Assembly Budget Session: राज्याचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. याअर्थसंकल्पादरम्यान अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या तिकीट दरामध्ये महिलांना आता 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्क्यांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाचा महिलांना प्रवास करताना फायदा होणार आहे.

 

Loading

१०५ वर्षाचे आजोबा आणि १०३ वर्षाच्या आजी..कोकणातील निसर्ग समृद्ध जीवनशैलीचा परिणाम. 

रत्नागिरी : प्रगतीमुळे विज्ञानामुळे माणसाचं आयुष्य वाढला. असं म्हणतात. पण यामुळे नद्या प्रदूषित झाल्या जंगला उध्वस्त झाले, कारखान्यांनी हवा प्रदूषित केली.

कोकणात असे गाव आहे जेथे स्वातंत्र्यानंतरही गेली 73 वर्ष रस्ता नव्हता. या गावात रुग्णाला डोलीतून खाली सात आठ किलोमीटर डोंगर उतरून दवाखान्यात आणावे लागत होते. अगदी दोन वर्षांपूर्वी या गावात पहिल्यांदा रस्ता आला.

अतिशय साधी मातीची घरे, तथाकथित कोणताही विकास नाही, निसर्ग पूरक जीवनशैली, हायब्रीड आणि केमिकल यांचा रोजच्या जगण्याशी काही संबंध नाही, कोणतेही प्रदूषण नाही, म्हटले तर अविकसीत पण जीवनशैलीच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आणि प्रगत असे हे  रत्नागिरीतील लांजा या तालुक्यातील गाव म्हणजे माचाळ.

या गावात 105 वर्षाचे आजोबा आणि शंभर वर्षाच्या आजी हे दांपत्य राहते. या गावात अनेक वृद्ध माणसे 80/ 90 /95 वर्षाची आपल्याला भेटतील.

समृद्ध जीवनशैली प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी दोन दिवस आपण माचाळला येऊन राहिले पाहिजे. हे कोकणातील पहिले हिल स्टेशन येथील कार्यकर्त्यांनी इको हिल स्टेशन निसर्ग समृद्ध पर्यटन केंद्र म्हणून विकसित करायचं ठरवलं.

निसर्गावर प्रेम करणाऱ्या पर्यटकांनी येथे येऊन राहावं आणि या गावातील निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा यातून ग्रामीण अर्थव्यवस्था विकसित व्हावी अशा स्वरूपाचा हा उपक्रम आहे. याच साठी माचाळ महोत्सव 2023 आयोजित करत आहोत. अकरा व बारा मार्च हा विशेष महोत्सव आयोजित होत आहे

 येथील निसर्ग समृद्ध जीवनशैली लोककला उत्सव यांचा अनुभव निसर्गप्रेमी पर्यटकांनी सहपरिवार घ्यावा अशा स्वरूपाची संकल्पना आहे अर्थात मर्यादित पर्यटकांना या पर्यटन केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. राजापूर लांजा तालुका नागरीक संघ, आणि स्थानिक कार्यकर्त्यांची टीम संपूर्ण नियोजन करत आहे.

संजय यादवराव 

कोकण क्लब /कोकण बिझनेस फोरम

Loading

मराठी भाषेला केंद्राकडून ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळणार?

मुंबई, दि. २७: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य छगन भुजबळ यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेवून लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेईल आणि त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.
  • भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
  • भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
  • भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत
  • प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावे

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?

  • अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
  •  अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं.
  • प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.
भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
मराठी भाषेसाठी प्रयत्न
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून ५०० पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता. त्यावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मंत्रिमंडळ पातळीवर विचाराधीन आहे आणि लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असं उत्तर केंद्राने दिलेलं आहे. त्यामुळे मराठीला कधीपर्यंत अभिजात दर्जा मिळेल हे चित्र अजूनही अस्पष्टच आहे.

Loading

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम – युवकांना शासनासोबत काम करण्याची संधी

मुंबई :महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री फेलोशिप हा कार्यक्रम चालू केला आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 
महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम काय आहे?
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम युवकांना सरकारचा एक भाग बनण्याची संधी देतो. त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांची शासनाला मदत होते. त्यांचा उत्साह व तंत्रज्ञानाची आवड यामुळे प्रशासकीय प्रक्रियांची गती वाढते. या कार्यक्रमामुळे मिळालेले ज्ञान व अनुभव यामुळे युवकांचा दृष्टिकोन विस्तारतो.
पात्रता
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, २०२३ करिता अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत:
1. उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ ते कमाल २६ वर्ष या दरम्यान असावे. म्हणजे जीचा वाढदिवस ०३/०३/१९९७ ते ०३/०३/२००२ दरम्यान येतो अशी व्यक्ती (दोन्ही दिवस अंतर्भूत)
2. उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण) असावा. तथापि, उच्चतम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य दिले जाईल
3. उमेदवाराकडे किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप / आर्टीकलशिप अनुभवाच्या कार्यकाळात गणली जाईल. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल.
4. मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.
स्वरूप
1. फेलोशिपचा कार्यकाळ फेलो म्हणून रुजू झाल्याच्या दिनांकापासून १२ महिने राहील. सर्व फेलोंसाठी रुजू होण्याचा दिवस एकच राहील व त्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे फेलोंवर बंधन असेल.
2. निवड झालेल्या फेलोची शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल. या प्राधिकरणांमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, शासनाचे सचिव, महामंडळांचे कार्यकारी संचालक किंवा इतर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचा समावेश असेल.
3. प्राधिकरणावरील नेमणुकीचा निर्णय अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत घेतला जाईल. फेलोंना प्राधिकरण निवडीचा अधिकार नसेल.
4. नेमणूक केलेल्या कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली, संबंधित प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावी व्हावे यासाठी फेलो काम करतील. यास फिल्ड वर्क असे संबोधले जाईल.
5. फिल्ड वर्क सोबतच आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांनी तयार केलेला विशेष अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन फेलोंवर असेल. प्रत्येक फेलोसाठी यापैकी एका शैक्षणिक संस्थेची निवड करण्याचे अधिकार अर्थ व सांख्यिकी संचालनालयास असतील. फेलोंना शैक्षणिक संस्था निवडीचा अधिकार नसेल.
6. फिल्ड वर्क व अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या फेलोंनाच फेलोशिप पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्र मिळेल.
अधिक माहितीसाठी https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/ या शासनाच्या अधिकृत संकेत स्थळास भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search