Category Archives: रत्नागिरी

आपल्या जमिनी हेच आपले अस्तित्व; त्या विकून आपले अस्तित्व गमावू नका – राज ठाकरे

रत्नागिरी | प्रतिनिधी – राज ठाकरे यांची आज संध्याकाळी रत्नागिरी येथे सभा होती. बारसू रिफायनरी वरून जिल्ह्यातीलच नाही तर पूर्ण राज्यात वातावरण तापले असताना राज ठाकरे या संबधी कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांच्या पूर्ण भाषणात त्यांनी या प्रकल्पाला विरोध केल्याचे स्पष्ट झाले.

जमीन म्हणजे अस्तित्व; आपले अस्तित्व सांभाळा
भूमिपुत्राकडून मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या जमिनींबाबत त्यांनी रोष व्यक्त केला. जमीन असेल तर आपले अस्तित्व आहे; एकदा का जमीन गेली कि आपले कोकणातील अस्तिव संपले. पूर्वीपासून हेच सूत्र चालू आहे. भूगोल आणि इतिहास यांचा खूप मोठा संबंध आहे. ज्यांनी जमिनी (राज्य) पादाक्रांत केले त्यांनी इतिहास घडवला. मराठ्यांनी अगदी अटकेपार झेंडा रोवला होता. पण कोकणात खूप वाईट चित्र पाहावयास मिळते.जमिनी कवडीमोलाने विकल्या जातात, या जमिनी परप्रांतीय विकत घेऊन आपले राज्य निर्माण करत आहेत. काही दिवसांनी कोकणची भाषा आणि संस्कृती पण बदललेली असेल. कारण इथल्या स्थानिकांचे येथे अस्तित्वच नसेल. त्यामुळे आपल्या जमिनी विकू नका असे आवाहन राज ठाकरे यांनी या सभेत केले.

कोकणी जनतेला नेहमी गृहीत धरले जाते.
कोकणातील राजकारणात बदल दिसत नाही. नेहमी तेच तेच उमेदवार आणि पक्ष निवडून येताना दिसतात. भले त्यांनी येथील जनतेचे कल्याण करो व ना करो. त्यामुळे येथील राजकारणी येथील प्रश्नाबाबत गंभीर दिसत नाही. समृद्धी महामार्ग ४ वर्षात होतो पण मुंबई गोवा महामार्ग गेली १६ वर्ष रखडला आहे. यावरून येथील राजकारण्यांची उदासीनता दिसून येते. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी कोकणवासीयांची या गोष्टी लक्षात घेऊनच नवा बदल घडवून आणला पाहिजे असे ते म्हणालेत,

कोकणचे लोक प्रतिभावंत
महाराष्ट्र राज्याला मिळालेल्या एकूण ८ भारतरत्न पुरस्कारापैकी ६ पुरस्कार कोकणातील लोकांना मिळाले आहे. कोकणात प्रतिभावंत लोक आहेत त्यांच्याकडून जमिनी विकून आपलेच नुकसान करून घेण्याची वृत्तीची अपेक्षा नाही असे ते पुढे म्हणाले.

कोकणातील पर्यटन
कोकणात पर्यटनाला भरपूर वाव आहे, केरळ आणि कोकण या दोन्ही भागातील निसर्गात समानता आहे. केरळ राज्याचा विकासाचा कणा पर्यटन होऊ शकते तर कोकणात पर्यटन सोडून अशा प्रकल्पाची काय गरज आहे? कोकणातील पर्यटनाचा विकास केला तर ते पूर्ण महाराष्ट्र पोसू शकते एवढा त्याला वाव आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कातळशिल्प आणि प्रकल्प
बारसू येथे कातळशिल्पे मोठ्या प्रमाणावर आहेत. यातील काही कातळशिल्पाची नोंदणी युनिस्को ने केली आहे . या कातळशिल्पावर पुढे युनिस्को संशोधन पण करणार आहे. युनेस्कोने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्याठिकाणी कातळशिल्पे आहेत त्या ठिकाणच्या ३ किलोमीटर परिघाच्या भागात कोणतीही विकासकामे किंवा प्रकल्प उभारला जाऊ शकत नाही मग रिफायनरी प्रकल्प कसा काय उभारला जात आहे असा प्रश्न त्यांनी केला.

 

Loading

“आता जे गद्दार सुपारी घेऊन फिरतायत त्यांनीच बारसू येथील जागा मला…….” उद्धव ठाकरे यांचा ‘त्या’ पत्राबद्दल खुलासा

रत्नागिरी –आता जे गद्दार सुपारी घेऊन फिरतायत त्यांनी मी मुख्यमंत्री असताना बारसू येथील प्रस्तावित जागा रिफायनरी प्रकल्पासाठी कशी अनुकूल आहे ते पटवल्यानंतरच मी ते पत्र केंद्राला लिहिले अशा शब्दात त्या पत्राबद्दल खुलासा आज उद्धव ठाकरे यांनी राजापुरात पत्रकार परिषद घेताना केला. तसेच सत्ताधाऱ्यांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. या प्रकल्पावरून सरकारने माघार घेतली नाही तरी लवकरच हे सरकार कोसळणार आहे. यांच्या खुर्चीचे पाय डळमळीत होत आहेत,’ अशी टीका त्यांनी केली. बारसू येथील रिफायनरी विरोधात ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी ते आज बारसू – सोलगाव दौऱ्यावर होते. 

आता जे गद्दार सुपारी घेऊन फिरतायत त्यांनी मी मुख्यमंत्री असताना मला सांगितलं की, बारसू येथे हा प्रकल्प झाला तर त्याला विरोध होणार नाही. बरीचशी जमीन निर्मनुष्य आहे. तसंच पर्यावरणाचीही फारशी हानी होणार नाही. त्यानंतर मी या जागेबाबत केंद्राला पत्र लिहिलं. मात्र या प्रकल्पाबाबत माझा असा विचार होता की, मुख्यमंत्री असतानाच बारसूत येऊन या प्रकल्पाचं येथील स्थानिक जनतेला प्रेझेन्टेशन द्यायचं. आता दुर्दैवाने फक्त मी लिहिलेल्या पत्राचं भांडवल केलं जातं, मात्र जी पारदर्शकता हवी ती ठेवली जात नाही.

दरम्यान, मी मुख्यमंत्री असताना राज्यात जे वेदांता फॉक्सकॉन आणि इतर जे चांगले प्रकल्प आणले होते, ते केंद्राने यांच्या नाकाखालून गुजरातला नेले, तेव्हा हे गप्प का बसले, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. तसेच त्यांनी या दौऱ्यात पोलीस अधीक्षकांना बारसूत झालेल्या आंदोलनात केलेल्या लाठीमाराबद्दल चांगले झापले आहे.

Loading

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा आजचा बारसु दौरा रद्द

रत्नागिरी  – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांचा आजचा बारसू येथील दौरा रद्द केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूकिच्या प्रचारासाठी वेळ देता यावा यासाठी हा दौरा रद्द करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.  
केंद्रीय मंत्री नारायण राणे आज बारसु येथे रिफायनरी समर्थनार्थ एक मोर्चा काढणार होते. मात्र त्यांनी आता या कारणासाठी माघार घेतली आहे. पण माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे या मोर्चात सहभागी होणार आहेत.  
पुढच्या आठवड्यात मी रत्नागिरीमध्ये जाऊन जाहीर सभा आणि बैठक घेणार आहे.तारीख येत्या दोन दिवसांत जाहीर करेन असे ते म्हणले आहेत. 

Loading

अंतर – २०० किलोमीटर; वेळ – साडे १३ तास | खेड येथे रंगणार अनोखी नाईट बीआरएम सायकल स्पर्धा

रत्नागिरी – सह्याद्री रँडोनिअर्स व खेड सायकलिंग क्लबच्या सहकार्याने खेड येथे बीआरएम सायकल स्पर्धा रंगणार आहे. दि. ०६ मे रोजी संध्याकाळी ५:३० वाजता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या शनिवार दिनांक ६ मे रोजी विजय उपहारगृह, खेड येथून मान्यवरांच्या हस्ते झेंडा फडकवून सायकलिंगला सुरुवात होणार असून सर्व सायकलस्वार कोलाड येथे पोचून लगेचच परतीचा प्रवास सुरु करतील व साडेतेरा तासाच्या आत म्हणजेच सकाळी सातच्या आत सायकलने दोनशे किमी अंतर कापून खेड येथे पोचतील. या इव्हेंटसाठी पंचवीसहून अधिक रायडर्स सहभागी झाले असून वेळेत अंतर कापणा-या रायडर्सना ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्स क्लबतर्फे फिनिशर मेडलसह गौरवण्यात येईल. तरी या नवीन क्रीडा प्रकाराच्या शुभारंभावेळी सायकलप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन खेड सायकलिंग क्लबतर्फे करण्यात येत आहे.

बीआरएम Brevets de Randonneurs Modiaux  सायकल स्पर्धा प्रकार म्हणजे काय?

सायकल स्पर्धा विश्वातील एक वेगळा क्रीडाप्रकार म्हणजे बीआरएम. कोणाशीही स्पर्धा न करता दिलेल्या ‌‌वेळेत अंतर कापणं हेच यातील महत्वाचं वैशिष्ट्य. या स्पर्धेत जिंकणे किंवा हरणे याकडे न पाहता दिलेल्या वेळात स्पर्धा पूर्ण करणे याला महत्व दिले जाते मात्र या स्पर्धेचे काही नियम असतात त्याचे पालन करणे आवश्यक आहे.. ही स्पर्धा २०० ते १२०० किलोमीटर साठी घेण्यात येते. हे अंतर पूर्ण करण्याची वेळ सर्व ठिकाणी निश्चित ठरवून देण्यात येते. ऑडाक्स क्लब पर्शियन या एका फ्रेंच सायकलिस्ट टुअरिंग क्लबने या प्रकारची सायकल स्पर्धा उदयास आणली. काही अवधीत लोकप्रिय झालेला सायकल स्पर्धेचा हा प्रकार पूर्ण जगभरात लोकप्रिय झाला. भारतात ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्स क्लब ही स्पर्धा आयोजित करते. स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांना मेडल तसेच एकआंतराष्ट्रीय दर्जाचे सर्टिफिकेट बहाल करते.

Loading

बारसूत बाहेरच्या विरोधकांकडून घातपाताची शक्यता. नीलेश राणे यांचे पोलिसांना सतर्कतेचे आवाहन…

रत्नागिरी – रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची ताकद कमी असल्यामुळे बाहेरचे लोक हे वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. दिनांक 6 मे रोजी उद्धव ठाकरे रत्नागिरी येथील बारसू येथे येणार आहेत. येथे जमणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही अनुचित प्रकार या बाहेरच्या लोकांकडून होण्याची शक्यता असल्याने योग्य ती काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी असे त्यांनी पोलिसांना आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी अनेक कामे सुरू असून या ठिकाणी मटेरियल सप्लायचे काम आहे सुरू झाले आहे. हीच संधी साधून जिलेटिन स्टिक सारख्या स्फोटकांचा साठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिलेटिन सारख्या स्फोटकांचा साठा व त्यामागील गटाचा पोलीस व प्रशासनाने शोध घ्यावा याकडे लक्ष वेधण्यासाठी माजी खासदार भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांची सिंधुनगरी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली होती.

यावेळी पुढे बोलताना निलेश राणे म्हणाले बारसू रिफायनरी परिसरात जवळपास 72 ठिकाणी बोरवेल मारण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मटेरियल चे सप्लाय करणारे ठेकेदार बाहेरचे आहेत. व या मटेरियल सप्लाय च्या माध्यमातून व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होण्यापूर्वी जिलेटिन स्टिक या स्फोटकांचा मोठा साठा या परप्रांतीय सप्लायरमार्फत सुरू झाला आहे. त्या ठिकाणी आंदोलकांची गर्दी होऊन काही अनुचित प्रकार घडू नये व आपल्या मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, त्याची झळ बसू नये यासाठी ही माहिती आपण जाहीर करत आहोत, असे निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण तीन लोकसभा निवडणुका या मतदारसंघात लढल्या आहेत. या भागातील नागरिकांचा विरोध असला तरी त्याची तीव्रता कमी आहे या लोकांना भडकवण्याचे काम बाहेरची लोक करीत आहेत. विरोधासाठी गर्दी जमवून त्या ठिकाणी चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडविण्याचा कट सुरू झाल्याचा आपल्याला संशय आहे. याबाबतची काही माहिती काही सूत्राने माझ्यापर्यंत पोहचवली आहे. लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही माहिती त्यांच्याकडे पोहोच करणार आहे. तसेच याबाबत पोलिसांनाही आवश्यकता भासल्यास माझ्याकडे असलेली माहिती देणार आहे. यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ बसू नये एवढी आपली प्रामाणिक अपेक्षा आहे असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

Loading

दोन मोठे नेते एकाच दिवशी रत्नागिरी दौर्‍यावर; बारसूतील वातावरण पुन्हा तापणार?

रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील बारसू ग्रामस्थांनी सुरू केलेले रिफायनरीविरोधी आंदोलनामुळे येथील तणावपूर्ण वातावरण आहे. हा तणाव अजून वाढण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच दिवशी दि.६ मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 

उद्धव ठाकरे बारसू ग्रामस्थांना भेटण्यासाठी येत असल्याने प्रशासनाकडून सुरू असलेल्या चर्चेला खीळ बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोणी अडवल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा ठाकरे शिवसेना गटाकडून दिला आहे. 

तर राज ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा पंधरा दिवस आधीच जाहीर झाला होता. ”जागा राखल्या नाहीत तर तुमचे अस्तित्व काय?” या शिर्षकाखाली त्यांची रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. 

या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यामुळे वातावरण तापाण्याची शक्यता आहे. ग्रामस्थ, प्रकल्पविरोधी संघटनांचे नेते चर्चेऐवजी पुन्हा संघर्ष हाती घेतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच या दौऱ्याबाबत प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दोन्ही नेत्यांचे दौरे होणार असल्याचे पोलिस यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.

 

Loading

बारसू येथील बंदीचा जिल्ह्याच्या पर्यटनावर परिणाम? वाचा जिल्हा पोलीस अधीक्षकांचा याबाबतचा खुलासा…

रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जमावबंदी आदेश (३७/३) लागू केला आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील पर्यटनावर होण्याच्या चर्चा  चालू असताना रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या बंदी बद्दल खुलासा केला आहे. जमावबंदी आदेश (३७/३) लागु केला किंवा  ईतर कडक निर्बंध घातले असले तरीही पर्यटनावर निर्बंध घातलेले नाहीत, असा खुलासा त्यांनी केला आहे.

बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्पाच्या दृष्टीने माती परीक्षणासाठी ड्रिलिंगचे काम सध्या चालू आहे. या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या २४ एप्रिलपासून आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे पोलिसांनी बारसूसह आजूबाजूच्या आठ गावांमध्ये संचारबंदी ( कलम १४४), तर अन्य ठिकाणी जमावबंदी आदेश लागू केला आहे. अर्थात त्याचाही मुख्य उद्देश आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अन्य भागातून येऊ पाहणाऱ्या समर्थकांना रोखणे, हा आहे. मात्र बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे प्रवासी किंवा पर्यटकांना रोखलेले नाही, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

Loading

सत्यजित चव्हाण आणि शरद पवार यांची भेट; रिफायनरी प्रकल्पासंबधी चर्चा


मुंबई – तुरुंगातून सुटका झाल्यानंतर बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे सत्यजित चव्हाण आणि बारसू पंचक्रोशीतील काही कार्यकर्ते यांनी आज बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे भेट घेतली.यावेळी या कार्यकर्त्यांनी त्यांची बाजू मांडत संबंधित विषयावर साधकबाधक चर्चा केली. ही चर्चा  तब्बल तासभर चालली. यावेळी राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. यासंदर्भात शरद पवार यांनी ट्विट करत माहिती दिली. 

काय म्हणाले शरद पवार? 

“बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे सत्यजीत चव्हाण आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.”, असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे. दरम्यान, या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाही.”

 

Loading

रिफायनरीविरोधी आंदोलक महिलांचा पोलिसांवरच हल्ला; बंदोबस्ताला उत्तर देण्यासाठी आंदोलकांचे पूर्वनियोजन – पोलिसांचा दावा

Barsu Refinery Protest | राजापूर तालुक्यातील बारसू येथे झालेल्या रिफायनरीविरोधी आंदोलनात पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन दाबण्याचा प्रयन्त केला असा आरोप पण केला जात आहे. मात्र पोलिसांनी या आंदोलनाविरोधात एका धक्कादायक दावा केला आहे. 
महिला आंदोलकांनी महिला पोलिसांच्या  हाताला चावे घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आंदोलनादरम्यान उपविभागिय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांच्यासह सहा महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्या आहेत. इतेकच नाही तर आंदोलकांनी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर केला. काही ठिकाणी त्यांनी गवतालाही आग लावून दिली. सुदैव त्यात कोणी आंदोलक अथवा पोलीस कर्मचारी जखमी झाला नाही. आंदोलनावेळी फक्त एका बाजूचे व्हिडिओ समोर आणले जात होते. मात्र आता पोलिसांनी केलेल्या दाव्यातून आंदोलनातील धक्कादायक वास्तव आणि आंदोलकांचा आक्रमकपणा समोर आला आहे.
आंदोलकांनी नियोजन करून विरोध केला.
आंदोलन होऊ शकते, याची दखल घेऊन पोलिसांनी यावेळी अतिशय मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात ठेवला होता. मात्र आंदोलकांनी पोलिसांच्या या बंदोबस्ताला उत्तर देण्यासाठी नियोजन केले असल्याची माहिती पुढे आली आहे. आंदोलनात सर्व ग्रामस्थ एकाचवेळी उतरले नाहीत. एक एक फळी आंदोलनात येत होती. त्यामुळे पोलिसांना एकाचवेळी कारवाई करता येत नव्हती.
ज्यावेळी महिला आंदोलक प्रतिबंधित क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न करत होत्या, तेव्हा महिला पोलिसांनी आपल्या हातातील लाठ्या आडव्या धरुन त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी महिला पोलिसांच्या हातातील लाठ्या घेण्यापासून ते महिला पोलिसांच्या हाताला चावे घेतल्याचा दावा पोलिसांनी केला.
नाणार आणि जैतापूर येथे झालेल्या आंदोलनात वापरण्यात आलेल्या पद्धतीचा यावेळी पोलीसांनी विशेष अभ्यास केला होता. त्यामुळे यावेळी महिला पोलिसांची कुमक मोठ्या प्रमाणात मागवण्यात आली होती. ज्याप्रमाणे आंदोलकांनी त्यांच्या एक एक फळ्या पुढे आणल्या त्यानुसार पोलिसांनीही आपली कुमक तयार ठेवली होती.
अंगावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पोस्टर्स कशासाठी?
अनेक महिला आंदोलकांच्या अंगावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पोस्टर्स होती. लाठीमार केला जाऊ नये या कारणासाठी, बचावासाठी ही पोस्टर्स आंगावर लावली होती कि वेगळा हेतू होता असा पोलिसांचा प्रश्न आहे. अशा आंदोलकांबाबत पोलिसांकडून काही अनुचित प्रकार घडला असता तर या आंदोलनाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होता का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. आंदोलनाला वेगळे वळण लावण्याचा हा प्रयत्न ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांच्या मनात नेमका कोणी भरवून दिला? याची माहिती आता पोलिसांकडून घेतली जात आहे.

Loading

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग | परशुराम घाटातील कठीण कातळ फोडण्याचे कंत्राटदारापुढे आव्हान

NH-66 Updates: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी दिवसातील पाच तास वाहतूक बंद ठेवली आहे. पण घाटाच्या मध्यभागी असलेल्या कठीण कातळांना फोडण्याचे मोठे आव्हान कंत्राटदारापुढे उभे राहिले आहे. 
कातळ फोडण्याचे काम २४ तास ब्रेकरच्या साहाय्याने सुरू आहे; परंतु अतिशय कठिण असलेले हे कातळ फुटता फुटत नाही  आहेत. या ठिकाणी २२ मिटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्याने कामाचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे  तेथे तात्पुरत्या स्थितीत बायपास तयार करण्याचे नियोजन ठेकेदार कंपनीकडून केले गेले.  
कातळ फोडण्यासाठी सुरूंग लावण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु जवळच लोकवस्ती असल्याने परवानगी मिळालेली नाही. परिणामी, हे कातळ फोडण्यासाठी जास्त कालावधी लागणार आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search