Category Archives: रत्नागिरी
रत्नागिरी – सह्याद्री रँडोनिअर्स व खेड सायकलिंग क्लबच्या सहकार्याने खेड येथे बीआरएम सायकल स्पर्धा रंगणार आहे. दि. ०६ मे रोजी संध्याकाळी ५:३० वाजता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या शनिवार दिनांक ६ मे रोजी विजय उपहारगृह, खेड येथून मान्यवरांच्या हस्ते झेंडा फडकवून सायकलिंगला सुरुवात होणार असून सर्व सायकलस्वार कोलाड येथे पोचून लगेचच परतीचा प्रवास सुरु करतील व साडेतेरा तासाच्या आत म्हणजेच सकाळी सातच्या आत सायकलने दोनशे किमी अंतर कापून खेड येथे पोचतील. या इव्हेंटसाठी पंचवीसहून अधिक रायडर्स सहभागी झाले असून वेळेत अंतर कापणा-या रायडर्सना ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्स क्लबतर्फे फिनिशर मेडलसह गौरवण्यात येईल. तरी या नवीन क्रीडा प्रकाराच्या शुभारंभावेळी सायकलप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन खेड सायकलिंग क्लबतर्फे करण्यात येत आहे.
बीआरएम Brevets de Randonneurs Modiaux सायकल स्पर्धा प्रकार म्हणजे काय?
सायकल स्पर्धा विश्वातील एक वेगळा क्रीडाप्रकार म्हणजे बीआरएम. कोणाशीही स्पर्धा न करता दिलेल्या वेळेत अंतर कापणं हेच यातील महत्वाचं वैशिष्ट्य. या स्पर्धेत जिंकणे किंवा हरणे याकडे न पाहता दिलेल्या वेळात स्पर्धा पूर्ण करणे याला महत्व दिले जाते मात्र या स्पर्धेचे काही नियम असतात त्याचे पालन करणे आवश्यक आहे.. ही स्पर्धा २०० ते १२०० किलोमीटर साठी घेण्यात येते. हे अंतर पूर्ण करण्याची वेळ सर्व ठिकाणी निश्चित ठरवून देण्यात येते. ऑडाक्स क्लब पर्शियन या एका फ्रेंच सायकलिस्ट टुअरिंग क्लबने या प्रकारची सायकल स्पर्धा उदयास आणली. काही अवधीत लोकप्रिय झालेला सायकल स्पर्धेचा हा प्रकार पूर्ण जगभरात लोकप्रिय झाला. भारतात ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्स क्लब ही स्पर्धा आयोजित करते. स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांना मेडल तसेच एकआंतराष्ट्रीय दर्जाचे सर्टिफिकेट बहाल करते.
रत्नागिरी – रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची ताकद कमी असल्यामुळे बाहेरचे लोक हे वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. दिनांक 6 मे रोजी उद्धव ठाकरे रत्नागिरी येथील बारसू येथे येणार आहेत. येथे जमणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही अनुचित प्रकार या बाहेरच्या लोकांकडून होण्याची शक्यता असल्याने योग्य ती काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी असे त्यांनी पोलिसांना आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी अनेक कामे सुरू असून या ठिकाणी मटेरियल सप्लायचे काम आहे सुरू झाले आहे. हीच संधी साधून जिलेटिन स्टिक सारख्या स्फोटकांचा साठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिलेटिन सारख्या स्फोटकांचा साठा व त्यामागील गटाचा पोलीस व प्रशासनाने शोध घ्यावा याकडे लक्ष वेधण्यासाठी माजी खासदार भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांची सिंधुनगरी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली होती.
यावेळी पुढे बोलताना निलेश राणे म्हणाले बारसू रिफायनरी परिसरात जवळपास 72 ठिकाणी बोरवेल मारण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मटेरियल चे सप्लाय करणारे ठेकेदार बाहेरचे आहेत. व या मटेरियल सप्लाय च्या माध्यमातून व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होण्यापूर्वी जिलेटिन स्टिक या स्फोटकांचा मोठा साठा या परप्रांतीय सप्लायरमार्फत सुरू झाला आहे. त्या ठिकाणी आंदोलकांची गर्दी होऊन काही अनुचित प्रकार घडू नये व आपल्या मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, त्याची झळ बसू नये यासाठी ही माहिती आपण जाहीर करत आहोत, असे निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण तीन लोकसभा निवडणुका या मतदारसंघात लढल्या आहेत. या भागातील नागरिकांचा विरोध असला तरी त्याची तीव्रता कमी आहे या लोकांना भडकवण्याचे काम बाहेरची लोक करीत आहेत. विरोधासाठी गर्दी जमवून त्या ठिकाणी चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडविण्याचा कट सुरू झाल्याचा आपल्याला संशय आहे. याबाबतची काही माहिती काही सूत्राने माझ्यापर्यंत पोहचवली आहे. लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही माहिती त्यांच्याकडे पोहोच करणार आहे. तसेच याबाबत पोलिसांनाही आवश्यकता भासल्यास माझ्याकडे असलेली माहिती देणार आहे. यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ बसू नये एवढी आपली प्रामाणिक अपेक्षा आहे असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील बारसू ग्रामस्थांनी सुरू केलेले रिफायनरीविरोधी आंदोलनामुळे येथील तणावपूर्ण वातावरण आहे. हा तणाव अजून वाढण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच दिवशी दि.६ मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
उद्धव ठाकरे बारसू ग्रामस्थांना भेटण्यासाठी येत असल्याने प्रशासनाकडून सुरू असलेल्या चर्चेला खीळ बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोणी अडवल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा ठाकरे शिवसेना गटाकडून दिला आहे.
तर राज ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा पंधरा दिवस आधीच जाहीर झाला होता. ”जागा राखल्या नाहीत तर तुमचे अस्तित्व काय?” या शिर्षकाखाली त्यांची रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे सायंकाळी जाहीर सभा होणार आहे.
या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यामुळे वातावरण तापाण्याची शक्यता आहे. ग्रामस्थ, प्रकल्पविरोधी संघटनांचे नेते चर्चेऐवजी पुन्हा संघर्ष हाती घेतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच या दौऱ्याबाबत प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दोन्ही नेत्यांचे दौरे होणार असल्याचे पोलिस यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जमावबंदी आदेश (३७/३) लागू केला आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील पर्यटनावर होण्याच्या चर्चा चालू असताना रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या बंदी बद्दल खुलासा केला आहे. जमावबंदी आदेश (३७/३) लागु केला किंवा ईतर कडक निर्बंध घातले असले तरीही पर्यटनावर निर्बंध घातलेले नाहीत, असा खुलासा त्यांनी केला आहे.
बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्पाच्या दृष्टीने माती परीक्षणासाठी ड्रिलिंगचे काम सध्या चालू आहे. या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या २४ एप्रिलपासून आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे पोलिसांनी बारसूसह आजूबाजूच्या आठ गावांमध्ये संचारबंदी ( कलम १४४), तर अन्य ठिकाणी जमावबंदी आदेश लागू केला आहे. अर्थात त्याचाही मुख्य उद्देश आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अन्य भागातून येऊ पाहणाऱ्या समर्थकांना रोखणे, हा आहे. मात्र बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे प्रवासी किंवा पर्यटकांना रोखलेले नाही, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
मुंबई – तुरुंगातून सुटका झाल्यानंतर बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे सत्यजित चव्हाण आणि बारसू पंचक्रोशीतील काही कार्यकर्ते यांनी आज बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे भेट घेतली.यावेळी या कार्यकर्त्यांनी त्यांची बाजू मांडत संबंधित विषयावर साधकबाधक चर्चा केली. ही चर्चा तब्बल तासभर चालली. यावेळी राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. यासंदर्भात शरद पवार यांनी ट्विट करत माहिती दिली.
काय म्हणाले शरद पवार?
“बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे सत्यजीत चव्हाण आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.”, असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे. दरम्यान, या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाही.”
बारसू रीफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे सत्यजीत चव्हाण आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान माजी मंत्री आ. जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. pic.twitter.com/iihotJPEds
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 30, 2023
मुंबई – बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा होणारा विरोध हा तीव्र वळण घेत आहे. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. विकासाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध असण्याचे कारण नाही मात्र विकास होत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची खबरदारी आपण घ्यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
बारसू रिफायनरी प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाविषयी मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. एखाद्या प्रकल्पातून परिसरात कायमचे नुकसान होणार असेल किंवा भावी पिढी बरबाद होणार असेल तर जरूर त्या गोष्टीला विरोध करायला हवा परंतु त्यातून फायदा होणार असेल तर त्या दृष्टीकोनातूनही विचार केला पाहिजे, असे अजितदादा म्हणाले.
रत्नागिरी – एकीकडे सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये बारसू रिफायनरी प्रकल्पावरून जुंपली असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी बारसूची जागा केंद्र सरकारला लिहिलेल्या एका पत्राद्वारे सुचवली असल्याचे समोर आले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहाल होतं. 12 जानेवारी 2022 रोजी ही पत्र लिहण्यात आलं होतं. बारसूमध्ये 13 हजार एकर जमीन राज्य सरकार उपलब्ध करून देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी दर्शवली होती. त्याचबरोबर याठिकाणची बहुतांश जमीन ही ओसाड असल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न येणार नाही असंही या पत्रात नमूद करण्यात आलं. या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहण्यात आलं होतं की ही जागा ओसाड आहे.
यामुळे आता ठाकरे गटाचीही कोंडी झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहताना बारसूमधील लोकांना विश्वासात घेतलं होतं का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.


















