Category Archives: सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग : वंचितांची दिवाळी तेजोमय करण्यासाठी “उमेद फौंडेशन,सिंधुदुर्ग” कडून “एक पणती वंचितांच्या दारी “या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंबे आणि वृद्धाश्रम, अनाथ आश्रम मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी तेजोमय गोड व्हावी यासाठी उमेद फाउंडेशनने विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे.
त्यासाठी उमेद फाउंडेशनच्या वतीने या वंचित घटकांना पणत्या,आकाश कंदील, दिवाळी फराळ, देऊन त्यांची दिवाळी आनंदमय करण्यात येणार आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांना आवाहन करण्यात येते की आपणही या उपक्रमात सहभागी होऊन मोलाचा हातभार लावावा.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी स्वतः कडील तयार केलेला दिवाळी फराळ/ पणत्या/ आकाशकंदील असे दिवाळी उपयुक्त साहित्य द्यावयाचे असल्यास आपण उमेद फाउंडेशनकडे दि. 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत पोहोच करावे.तसेच फराळासाठी आर्थिक मदत द्यावयाची असल्यास ऑनलाईन स्वरूपात/ रोख स्वरूपात उमेद फाउंडेशनकडे खालील अकाउंटवरती जमा करता येईल.यासाठी आर्थिक मदत पाठवण्याकरिता बँक अकाउंट माहिती
A/C name =UMED FOUNDATION,
A/C Number- 636701000890 ,बँकेचे नाव -ICICI BANK
IFSC Code =ICIC0006367
Google pay/Phone pay – 7972395675
तसेच वस्तू स्वरूपात मदत देणाऱ्यांनी स्वतः कडील तयार केलेला दिवाळी फराळ देणार असल्यास देतांना त्याचे व्यवस्थित पॅकेट करून द्यावेत.तसेच आर्थिक मदत एका कुटुंबासाठी फराळ – 300 रू. , दोन कुटुंबासाठी फराळ – 600 रू.या टप्प्यात रक्कम स्वीकारली येईल. आपण दिलेल्या 300 रु. मदतीतून खालील प्रकारे एका गरजू कुटूंबासाठी दिवाळी किट बनविण्यात येईल. अंघोळीचा मोती साबण, सुगंधी तेल, उटणे, आकाश कंदील, पणत्या, लाडू (250 ग्रॅम), चिवडा (500 ग्रॅम) चकली (250 ग्रॅम), शंकरपाळी ( 250 ग्रॅम ) इ.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब, वंचित कुटुंबे तसेच जिल्ह्यातील वृद्धाश्रम आणि आश्रम व गरजू कुटुंबे यांचा समावेश असेल.वंचितांच्या जीवनात थोडासा प्रकाश आणून त्यांची दिवाळी तेजोमय करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी योगदान द्यावे असे मत राजेंद्र एस.पाटील- प्रमुख, सामाजिक दिवाळी मोहिम,सिंधुदुर्ग 8888650077 यांनी व्यक्त केले आहे.
सावंतवाडी: निपुण भारत अंतर्गत माडखोल केंद्रातील चार शाळांनी गुणवत्तेची प्रमुख तीन ध्येय पूर्ण केल्याने या शाळांना ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित करण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रथमच या चार शाळा ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित झाल्या असून आता माडखोल केंद्रातील सर्व प्राथमिक शाळा घोषित करण्यात येणार असल्याची माहिती माडखोल केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांनी दिली.
निपुण शाळा घोषणेची १०० टक्के उद्दिष्ट यशप्राप्ती करणाऱ्या शाळांमध्ये कारिवडे डंगवाडी, कारिवडे आपट्याचे गाळू माडखोल धुरीवाडी, माडखोल बामणादेवी या शाळांचा समावेश आहे. या चारही निपुण शाळांना आयएसओ मानांकित शाळा माडखोल धवडकी शाळा नं. २ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय राऊत, शाळेच्या मुख्याध्यापिका भावना गावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. निपुण शाळा घोषणेची १०० टक्के उद्दिष्टे पूर्ण केल्यानंतर त्या शाळांनी त्याची घोषणा करायची आहे. या शाळेतील शिक्षक एकसमन्वय आणि समाधानाची जाणीव यातून शैक्षणिक कार्य करतात. त्यामुळे निपुण शाळेचे सर्व श्रेय या शाळेतील शिक्षकांचे असून त्यांना गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांचेही मार्गदर्शन मिळत असल्याचे वालावलकर यांनी सांगितले. यावेळी वारंग, शुभदा (डंगवाडी), सतीश राऊळ (आपट्याचे गाळू), प्रशांत कांदे (धुरीवाडी), अमिषा कुंभार (बामणादेवी) या निपुण शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक अरविंद सरनोबत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
सिंधुदुर्ग : आडाळी एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील आणखी १९० भूखंड (एकूण क्षेत्र १२१.१५ हेक्टर) दुसऱ्या टप्प्यात उद्योजकांसाठी खुले झाले आहेत. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आडाळी येथील एमआयडीसी स्थानिक कृती समिती आणि ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संचालित आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समिती यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर डिसेंबर २०२२मध्ये २२० भुखंड पहिल्या टप्प्यात खुले करण्यात आले होते, अशी माहिती ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली आहे.
लळीत यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड खुले व्हावेत, यासाठी आमच्याबरोबरच अनेकांनी आपापल्या परीने प्रयत्न केले होते. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना आता यश आले आहे. आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठ्यासाठी बंधारा, पाण्याची टाकी, पाईपलाईन आदि सर्व कामे पूर्ण झाली आहेत. भूखंड उद्योजकांना तात्काळ उपलब्ध करावेत, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आडाळीतील ग्रामस्थांनी आडाळी एमआयडीसी स्थानिक कृती समिती स्थापन केली.तसेच ‘घुंगुरकाठी’ संस्थेने आडाळी एमआयडीसी स्थानिक लोकाधिकार संरक्षण समिती स्थापन केली. समितीच्या पाठपुराव्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होऊन उद्योजकांनी अर्जाची प्रक्रीया पूर्ण केली. तरीही प्रत्यक्षात भूखंडाचे वितरण दीर्घकाळ होत नव्हते. महामंडळाकडुन या मागणीला प्रतिसाद मिळत नसल्याने अलिकडेच समितीमार्फत आडाळी ते बांदा असा आठ किलोमीटरचा लाँग मार्च काढण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भूखंड वितरणाचे आदेश काढण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात एकुण १२१.१५ हेक्टर क्षेत्र असलेले विविध आकाराचे एकूण १९० भूखंड वितरणासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. हे भूखंड महामंडळाच्या
धोरणाप्रमाणे सामान्य (खुले), अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व राखीवसह आहेत.
या भूखंडासाठी ऑनलाइन अर्ज करावयाचे असून www.midcindia.org या संकेतस्थळावर अर्ज करावयाचे आहेत. अर्ज करण्याची मुदत ५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजेपासून १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५या वेळात फोन केल्यास सविस्तर माहिती मिळू शकेल. आडाळी येथे एकुण ७२० एकर क्षेत्रामध्ये हे नवीन औद्योगिक क्षेत्र निर्माण झाले आहे. महामंडळाच्या या प्रकल्पाला सप्टेंबर २०१३ मध्ये मंजुरी मिळाली. या प्रकल्पासाठी स्थानिकांचे सकारात्मक सहकार्य होते. अवघ्या वर्षभरात ८० टक्केहुन अधिक क्षेत्र स्थानिकांनी महामंडळाकडे हस्तांतरित केले. मात्र आडाळी ग्रामस्थांनी या प्रकल्पाचा प्रस्ताव महाराष्ट्राचे तत्कालिन उद्योगमंत्री व सद्याचे केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे दिला आणि त्यांनी अवघ्या सहा महिन्यात तो मार्गी लावला.
आडाळी ग्रामस्थांनी या प्रकल्पाचे स्वागत करुन आवश्यक असलेली जमीन महामंडळाला दिली. जमीन खरेदीचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर महामंडळाने निविदा प्रक्रीया करुन पायाभूत सुविधांच्या कामांना सुरुवात केली. सुमारे नऊ वर्षे एवढा प्रदीर्घ कालावधी गेल्यानंतर या औद्योगिक क्षेत्राच्या पायाभुत सुविधांची कामे आता पुर्णत्वाकडे वाटचाल करीत आहेत.