दोडामार्ग : निसर्गसंपन्नतेचे वरदान असलेल्या तळकोकणातील तिलारी परिसरात काल एक दुर्मिळ ‘तारा’ GEOCHELONE ELEGANS प्रजातीचा कासव सापडला आहे. कासवांची ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून वन्यजीव कायद्याखाली संरक्षित आहे. सध्या हे कासव दोडामार्ग वन विभागाच्या ताब्यात असून लवकरच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
दोडामार्ग तालुक्यातील पाळये येथील उद्योजक सुभाष दळवी यांना हे कासव आढळून आले. त्यांनी दोडामार्गचे वनक्षेत्रपाल अरुफ कन्नमवार यांच्याकडे ते सुपूर्द केले. या कासवाच्या पृष्ठभागावर तारे व कुबड्यासारखे फुगीर भाग असतात. त्यामुळे हा कासव इतर कासवांपेक्षा वेगळा आहे. पंचनामा व अन्य प्रक्रिया पूर्ण करून या कासवाला नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे वनाधिकारी कन्नमवार यांनी सांगितले आहे.
या प्रजातीबद्दल अधिक माहिती
भारत आणि श्रीलंकेत हे तारा कासव आढळते. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्, केरळ, तामिळनाडू, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये त्याचा अधिवास आहे. मात्र यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे ते दुर्मिळ प्रजाती असल्याची माहिती प्राणीमित्रानी दिली. या कासवाबद्दल गैरसमज आणि अंधश्रद्धा आहे. हा कासव घरात ठेवल्यास घरात भरभराट अन् नोकरीधंद्यात प्रगती होते, अशी अंधश्रद्धा आहे. यामुळे या कासवांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. त्यामुळेच ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
प्रजातीच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायद्याच्या तरतुदी
इंडियन स्टार कासवे ही वन्यजीव संरक्षण अधिनयानुसार संरक्षित असून त्यांची खरेदी विक्री करण्यास बंदी आहे. तसेच ती जवळ बाळगण्यास बंदी आहे. त्यामुळे तारा कासव वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 च्या अनुसूची अंतर्गत संरक्षित आहे. तेथे प्रजाती ताब्यात आढळल्यास त्याला सहा महिन्यांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. विशेष म्हणजे या कासावाच्या पृष्ठभागावर तारे आणि कुबड्यासारखे फुगीर भाग असतात. त्यामुळे हा कासव इतर कासवांपेक्षा विशेष आहे.
सावंतवाडी : पावसाळी पर्यटनासाठी नावाजलेल्या तळकोकणातील आंबोली येथील प्रसिद्ध धबधब्याला भेट देण्यासाठी पर्यटकांकडून शुल्क घेण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही शुल्क आकारणी स्थगित केली जावी असे आदेश दिले आहेत. सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आठवडाभरा पूर्वी धबधबा पाहण्यासाठी 14 वर्षावरील पर्यटकांना 20 रुपये तर 14 वर्षाखालील मुलांना 10 रुपये असे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत असे एस. नवकिशोर रेड्डी यांनी जाहीर केले होते. मात्र दीपक केसरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार या निर्णयाला स्थगिती दिली गेली आहे.
सावंतवाडी | प्रतिनिधी :पावसाळी पर्यटनासाठी नावाजलेल्या तळकोकणातील आंबोली येथील प्रसिद्ध धबधब्याला भेट देण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. हा धबधबा पाहण्यासाठी 14 वर्षावरील पर्यटकांना 20 रुपये तर 14 वर्षाखालील मुलांना 10 रुपये असे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत. तर 5 वर्षापर्यंतच्या मुलांना कोणतेही शुल्क नसणार आहे.
कोरोना पूर्व काळात या धबधब्याला भेट देणार्या सर्व पर्यटकांना सरसकट 10 रुपये असे तिकीट दर अस्तित्वात होते. त्यानंतर ही तिकीट पद्धत बंद झाली होती. आता ती पुन्हा सुरू करण्यात येणार असून ही रक्कम जमा करण्याचा अधिकार वनव्यवस्थापन समितीला दिला असून मिळणार्या पैशाचा वापर धबधबा आणि आजूबाजूचा परिसरातील वनविकास करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी दिली आहे. येत्या शनिवार पासून हे पैसे आकारले जातील.
सिंधुदुर्ग : वर्षा पर्यटनासाठी पहिली पसंती असलेल्या आंबोली येथे धबधब्याच्या ठिकाणी सायंकाळी धबधब्याचा प्रवाह वाढल्याने दगड त्याबरोबर खाली येवून पर्यटकांना धोका निर्माण झाला होता. या वेळी काही पर्यटक आनंद लुटत असताना अचानक धबधब्याच्या प्रवाहातून दोन- तीन दगड खाली आले. यामुळे तेथे असलेल्या सगळ्यांचीच धावपळ उडाली. त्यातील एक दगड एका पर्यटकाच्या पायावर आदळल्याने दुखापत झाली.
काल आंबोली येथील मुख्य धबधब्यकडे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटताना अचानक धबधब्याच्या प्रवाहातून दगड कोसळू लागल्याने पर्यटकांची तारांबळ उडाली. यात बेळगाव येथील युवक किरकोळ जखमी झाला. ही बाब तेथे बंदोबस्तासाठी असलेले पोलिस दीपक शिंदे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी प्रसंगावधान राखत पर्यटकांना धबधब्याकडे जाण्यास मनाई केली.
दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात काल वाघाने म्हशीवर हल्ला केल्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की काल सोमवारी तेरवण मेढे येथील शेतकरी लक्ष्मण घाटू काळे हे आपली गुरे चरवण्यासाठी सायंकाळी मेढे येथे माळरानावर गेले होते. सुमारे 4.30 च्या सुमारास अचानक एका पट्टेरी वाघाने एका म्हशीवर हल्ला चढविला. म्हशीच्या केलेल्या मोठ्या ओरड्याने जवळपास असणारे गुराखी लक्ष्मण यांनी तेथे धाव घेतली. समोरचे चित्र पाहून त्यांची भीतीने गाळण उडाली. एक पट्टेरी वाघाने एका म्हशीची मान आपल्या जबड्यात पकडली होती आणि म्हैस जिवाच्या आकांताने सुटकेचा प्रयत्न करत होती. हा प्रकार पाहून लक्ष्मण यांनी मोठ मोठ्याने ओरडा केल्याने वाघाने म्हशीला सोडून धूम ठोकली.
म्हशीच्या मानेत वाघाचे दात घुसल्याने रक्तस्त्राव झाला होता. मात्र आता उपचार केल्याने तिच्या जिवावरचा धोका टळला आहे. या प्रकारामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंधुदुर्ग : तळकोकणातील सातुळी तिठा येथे काल उशिरा वाहतूक शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करून बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दारू सह ११ लाख २ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील संशयित दोघे आपल्या ताब्यातील महेंद्रा बोलेरो पिकअप घेवून सावंतवाडीहून कोल्हापुरच्या दिशेने चालले होते. यावेळी त्या ठिकाणी ड्यूटी बजावत असलेल्या वाहतूक पोलिस प्रविण सापळे यांना त्यांची हालचाल संशयास्पद दिसली. यावेळी त्यांनी त्या दोघांना थांबवून गाडीची तपासणी केली असता गाडीत मोठ्या प्रमाणात दारू आढळून आली. या प्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान आनंद व्हनमाने (२१), बिरुदेव उर्फ बिरुजानू खरात (२४, दोघेही रा.सांगोला) अशी त्यांची नावे आहेत .
Alphanso GI Tag | कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांसाठी २००८ मध्ये विविध पाच संस्थांनी ‘अलफॉन्सो’ (हापूस) या इंग्रजी नावाने भौगोलिक निर्देशांक Geographical Indication मिळविला आहे. त्यामुळे इतर भागातील आंबा हापूस किंवा अलफॉन्सो या नावाने विकण्याच्या प्रयत्न झाल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरणार आहे. मात्र आपल्या भागात पिकणाऱ्या आंब्यांना पण हापूस म्हणुन ओळख मिळावी म्हणुन काही भागातील आंबा उत्पादक पुढे आले आहेत.
कोकणातील हापूस आंब्याची महाराष्ट्राच्या विविध प्रांताबरोबरच देशाच्या आणि परदेशात व्यावसायिक लागवड करण्यात आली होती. त्यामुळे या लागवडीतून उत्पादित होणारा आंबा हापूस आहे असा दावा आता त्या त्या भागातील आंबा उत्पादकांकडून होऊ लागला आहे. यामध्ये कर्नाटक हापूस, पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील गावरान हापूस आणि जुन्नर हापूस तर दक्षिण आफ्रिकेतील मालावी प्रांतात उत्पादित होणारा मालावी हापूस यांचा समावेश आहे. या भागातील उत्पादकांनी आपल्या भागातील आंबा हापूसच असल्याचा दावा केला आहे. तसेच ‘हापूस’ म्हणुन भौगोलिक निर्देशांक Geographical Indication मिळविण्यासाठी अर्ज पण केले गेले आहेत.
जीआय मानांकनासाठी होणार्या दाव्या बद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपली मते व्यक्त केलीत.
ॲड. गणेश हिंगमिरे, भौगोलिक निर्देशांक तज्ज्ञ म्हणतात की ज्या भागाच्या नावाने त्या भागातील पदार्थ, वस्तूची चव आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना असते. जसे पुणेरी – पगडी, वाडा – कोलम, कोल्हापुरी – चप्पल आहे. प्रत्येक भागाच्या भौगोलिक आणि वातावरणानुसार त्या भागातील शेती उत्पादनांना चव, गंध, रंग आणि आकार असतो. त्यामुळे त्या त्या भागासाठी स्वतंत्र ‘जीआय’असू शकतो. त्यामुळे विविध भागात उत्पादित होणाऱ्या हापूस आंब्याला केवळ हापूस या नावाने जीआय मिळू शकतो. तसा प्रयत्न जुन्नरच्या शेतकऱ्यांनी सुरु केला आहे. या आंब्याचा इतिहास आणि वेगळेपण सिद्ध झाल्यास त्याची जीआय नोंद विचाराधीन होऊ शकते.
कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्री सहकारी संस्था, रत्नागिरी या संस्थेचे विवेक भिडे यांच्या मते एकदा एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील उत्पादनासाठी जीआय घेतले तर ते दुसऱ्या भागासाठी घेता येत नाही. कारण त्या भूभागावरील शेतकऱ्यांची मालकी त्या नावाची झाली आहे. यानुसार हापूस नाव आता कोकण वगळता इतर भागातील हापूस उत्पादनांना घेता येणार नाही. बासमती तांदळाच्या बाबतीतही हा वाद सुरु आहे. टेक्सास येथील बासमतीला टेक्समती असा जीआय घ्यावा लागला आहे.
आता जीआय मानांकन नक्की कोणाकोणाला मिळणार की हापूस न्यायालयीन लढाईत अडकणार, याकडे आंबा उत्पादकांचे लक्ष आहे.
दुसरी बाजू | अलीकडेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि गोवा राज्यात दारूच्या दरात असलेली तफावत कमी करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात दारूच्या किमतीत शिथिलथा आणावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. गोव्यातून कमी किमतीत दारू खरेदी करून चोरीच्या मार्गाने जिल्ह्यात विकून चांगले पैसे मिळत असल्याने जिल्हयातील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी करताना दिसत आहे. परिणामी जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. मद्याच्या दरातील ही तफावत दूर केल्यास या प्रवृत्तीला आळा घालता येणे शक्य होईल. याबरोबरच दारूचे दर कमी केल्याने जिल्ह्याच्या पर्यटनाचा विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्याच्या हितासाठी ही मागणी केली असली तरी त्याचा इतर बाजूने पण विचार होणे गरजेचे आहे. सर्वात प्रथम गोवा राज्यात दारू स्वस्त का आहे याचा इतिहास पाहू.
गोवा मुक्ती संग्रामाच्या तीव्र लढ्यानंतर अखेर १९६१ साली गोवा राज्याचे भारतात विलीनीकरण झाले. त्यानंतर गोव्यातून पोर्तुगीज गेले खरे पण ते गोव्याला अनेक गोष्टी देऊन गेले. त्यातील एक म्हणजे त्यांची जिवनशैली आणि संस्कृती.पोर्तुगीजांनी आपल्या वास्तुशास्त्रानुसार अनेक इमारती गोव्यात बांधल्या, युरोपियन अन्नपदार्थ त्यांनी गोव्यात आणले. एवढच नाही दिवसभराच्या दगदगीनंतर संध्याकाळी वाईनबरोबर शांत निवांत लाईफ एन्जॉय करायची सवय देखील पोर्तुगीजांनी गोव्याला लावली. त्यांची ही संस्कृती पर्यटकांना पण भावली आणि पर्यटक येथे आकर्षित झाला. पुढे या वाईनची जागा बिअर, रम आणि व्हिस्की या मद्यांनी घेतली
नंतर गोव्याला ३० मे १९८७ ला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. नवीन राज्य तयार झाले खरे पण ते इतके लहान होते की त्यात फक्त दोनच जिल्हे आहेत. आत्ता राज्य चालवण्यासाठी लागणारा पुरेसा महसूल फक्त या दोनच जिल्ह्यातून मिळणार नव्हता. तत्कालीन राज्यकर्त्यांच्या एव्हाना एक लक्षात आले होते की गोवा हे एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकते. त्यासाठी पोर्तुगीजांनी आणलेल्या संस्कृतीचा पर्यटनासाठी वापर करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार रणनीती आखली गेली आणि त्याचाच एक भाग म्हणुन सरकारने दारूवरील अतिरिक्त कर कमी करून दारू स्वस्त करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून गोव्यात दारू स्वस्त झाली.गोव्यात सरकारने दारू स्वस्त केली पण बाकीच्या गोष्टींवरचा कर मात्र वाढवला आणि समतोल साधला.
साहजिकच पर्यटकांची संख्या वाढण्यामध्ये येथील कमी दारूचे दर हे एक महत्वाचे कारण ठरले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मद्याच्या दरात शिथिलता आणल्यास जिल्ह्याला कोणते फायदे होणार आहेत?
गोवा आणि सिंधुदुर्ग येथील भौगोलिक स्थिती जवळपास समान आहे. गोव्यात समुद्रकिनाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात. हे पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर वळविता येणे शक्य आहे. जिल्ह्यातील दारूचे हे दर कमी झाल्यास हे शक्य होणार आहे. दरातील तफावत कमी झाल्यास जिल्हातील तरुणांकडून होणारी तस्करी पण बंद होणार आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांची ही मागणी मान्य झाल्यास असा दुहेरी फायदा जिल्ह्याला होऊ शकतो.
प्रत्येक गोष्टीची सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन बाजू असतात. सकारात्मक बाजू बघितली आता नकारात्मक बाजू बघू
जिल्ह्यात दारूचे दर कमी झाल्यास तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याची शक्यता आहे. दर कमी असल्याने अधून मधून मद्यपान करणारा तरुण दररोज मद्यपान करायला लागण्याची शक्यता आहे. हे पटवून घेण्यासाठी आपण गेल्यावर्षी झालेला नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेचा NFHS संदर्भ घेऊया. या सर्व्हेक्षणातून मिळालेल्या आकडेवारी नुसार मद्यपानात गोवा राज्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो तर गोव्यातील महिला याबाबतीत देशात पाचव्या क्रमांकावर आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे ही मागणी मान्य झाल्यास सिंधुदुर्ग जिल्हय़ातून दारू खरेदी करून त्यांची त्याच्या लगतच्या जिल्ह्यात तस्करी करण्याच्या प्रयत्न होणार आहे हे नक्की. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण कमी प्रमाणात असला तरी ईतर जिल्ह्यातील तरुण असणार आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर आज जसा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तरुण कमी किंमतीत दारू खरेदी करून आपल्या भागात विकतो आहे तसेच राजापूर तालुक्यातील काही तरुण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दारू खरेदी करून आपल्या भागात विकण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा कि आज जो मद्य तस्करीचा प्रश्न सिंधदुर्ग जिल्ह्यात निर्माण झाला तोच प्रश्न उद्या लगतच्या जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच राज्यातील फक्त एका जिल्हय़ात वेगळा दर आणि ईतर जिल्ह्यात वेगळा दर ठेवण्यास काही तांत्रिक अडचणी येणार असून हा निर्णय घेताना त्याचा विचार प्रशासनाला करावा लागणार आहे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नेहमीच जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी प्रयत्नशील राहिले आहे. त्यामुळेच त्यांनी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्र मद्य दरात शिथिलता आणल्या नंतर होणारे दुष्परिणाम कसे हाताळले जातील यावर या प्रयोगाचे यश अवलंबून आहे.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
Mumbai Goa Highway | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओसरगाव येथील टोल नाका आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. मात्र या टोलवसुली वरून येथील वातावरण तापून तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना टोल माफी मिळाल्याखेरीज ओसरगाव टोल नाका सुरू होऊ देणार नाही, असा इशारा सर्वपक्षीय त्यांनी दिला होता. ही मागणी पूर्णपणे मान्य न करता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना 50% सुट मिळणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं सकाळी 10 वाजता टोलनाक्यावर आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटणार आहेत. टोलविरोधी कृती समिती सुद्धा या निर्णयाविरुद्ध आक्रमक झाली आहे, त्यामुळे आज ओसरगाव टोलनाक्यावर तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली ते पत्रादेवी या 60 किमी लांबीच्या मार्गासाठी टोल वसूल केला जाणार आहे. आता, सिंधुदुर्गवासियांसाठी संपूर्ण टोल माफी करण्याच्या मागणीवर टोलविरोधी कृती समिती आक्रमक असताना दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं टोल वसुली करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे मंगळवारी ओसरगावमध्ये तणावाची स्थिती असण्याची शक्यता आहे. ओसरगाव टोल नाका येथील वसुलीचे कंत्राट कोरल असोसिएट या राजस्थानमधील कंपनीला देण्यात आलं आहे. आतापर्यंत तीन वेळा टोल नाका सुरू करण्याचे आदेश दिले होते.
सिंधुदुर्ग | मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल नाका उद्या दिनांक १४ जूनपासून सुरू होणार आहे अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे.
ओसरगाव टोल नाका येथील वसुलीचे कंत्राट कोरल असोसिएट या कंपनीला देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग पासिंगच्या नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी शुल्कात ५० टक्के सवलत तर अवाणिज्य वाहनांना महिन्यासाठी ३३० रुपयांचा पास असणार आहे.
एकवेळ प्रवासासाठी असे असणार आहेत टोल वसुलीचे नवे दर
मोटार, जीप, व्हॅन आणि इतर हलकी वाहने : ९५ रुपये मिनी
बस आणि हलकी व्यावसायिक वाहने : १५५ रुपये
ट्रक आणि बस (२ अक्सेल) : ३२० रुपये
व्यावसायिक वाहने ३ अक्सेलसाठी : ३५० रुपये
मल्टी अक्सेल ४ ते ६ अक्सेल वाहनांसाठी : ५०५ रुपये.
सात किंवा त्याहून जास्त अक्सेल वाहनांसाठी : ६१५ रुपये
अवाणिज्य प्रकारच्या वाहनांसाठी ३३० रुपये मासिक पास शुल्क राहील.
या आधी पण येथे टोल नका सुरु करण्यात आला होता. मात्र महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने टोल वसुली करण्यात येऊ नये तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना पूर्ण टोल माफी मिळावी असा आग्रह धरून या वसुलीला विरोध झाला होता. त्यामुळे उद्यापासून टोल नाका सुरू होणार असल्याने टोल विरोधकांची कोणती भूमिका असेल याबाबत उत्सुकता आहे.