मुंबई/रत्नागिरी:
येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या (२६ जानेवारी) जोडून आलेल्या दीर्घ सुट्ट्यांमुळे कोकण मार्गावर प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, कोकण विकास समितीने रेल्वे प्रशासनाकडे विशेष गाड्या सोडण्याची आग्रही मागणी केली आहे. २३ जानेवारी ते २६ जानेवारी २०२६ या काळात मुंबई आणि पुण्याहून कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण महिनाभर आधीच फुल्ल झाल्याने चाकरमानी आणि पर्यटकांचे हाल होत आहेत.
या पार्श्वभूमीवर, ‘कोकण विकास समिती’चे जयवंत शंकर दरेकर आणि अक्षय मधुकर महापदी यांनी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासनाला सविस्तर पत्र लिहून विशेष गाड्यांचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी या तीन मार्गांवर विशेष ट्रेनची मागणी:
समितीने प्रवाशांच्या मागणीनुसार खालील तीन मार्गांवर विशेष फेऱ्यांचे प्रस्ताव मांडले आहेत:
१. मुंबई CSMT – सावंतवाडी रोड – मुंबई CSMT:
ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबून सिंधुदुर्गपर्यंत धावण्यासाठी अपेक्षित आहे. यात स्लीपर आणि एसी कोचची सोय असावी.
२. पुणे – सावंतवाडी रोड – पुणे:
पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. लोणावळा, कल्याण, पनवेलमार्गे ही गाडी सोडल्यास पुणेकर चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल.
३. मुंबई CSMT – चिपळूण – मुंबई CSMT (दिवसा धावणारी स्पेशल):
कमी अंतराच्या प्रवाशांसाठी ही गाडी फायदेशीर ठरेल. पेण, माणगाव, वीर, खेड यांसारख्या स्थानकांवर थांबा देऊन सेकंड सीटिंग आणि एसी चेअर कारची सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरवर्षी जानेवारीच्या अखेरीस येणाऱ्या लाँग वीकेंडमुळे कोकणात कौटुंबिक भेटी आणि पर्यटनासाठी मोठी गर्दी होते. नियमित गाड्यांमध्ये जागा नसल्याने प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सच्या अव्वाच्या सव्वा भाड्याचा सामना करावा लागतो किंवा असुरक्षित रस्ते प्रवासाचा धोका पत्करावा लागतो.
”जर रेल्वेने वेळेत विशेष गाड्यांचे नियोजन केले आणि बुकिंग सुरू केले, तर प्रवाशांना शेवटच्या क्षणी होणारा मनस्ताप वाचेल. तसेच, यामुळे भारतीय रेल्वेच्या महसुलातही मोठी भर पडेल,” असे कोकण विकास समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.











