Category Archives: कोकण रेल्वे

कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या एक्स्प्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता, तिरुनेलवेली – दादर – तिरुनेलवेली साप्ताहिक एक्स्प्रेसला एक अतिरिक्त डबा (कोच) कायमस्वरूपी जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

​या निर्णयामुळे या गाडीची एकूण क्षमता आता १५ कोचवरून वाढून १६ एलएचबी (LHB) कोच इतकी झाली आहे. नव्या बदलांनुसार गाडीमध्ये आता ‘३ टायर एसी’ (3 Tier AC) चा एक अतिरिक्त डबा वाढवण्यात आला आहे.

​सुधारित कोच रचना खालीलप्रमाणे असेल:

​२ टायर एसी: ०१ कोच

​३ टायर एसी: ०२ कोच (आधी १ होता)

​३ टायर इकॉनॉमी: ०१ कोच

​स्लीपर क्लास: ०६ कोच

​जनरल डबे: ०४ कोच

​जनरेटर कार: ०१

​SLR कोच: ०१

​नवीन बदल कधीपासून लागू होणार?

​रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही नवीन हा बदल खालील तारखांपासून अंमलात आणण्यात येणार आहे.

१. गाडी क्र. २२६२९ (तिरुनेलवेली ते दादर): २४ डिसेंबर २०२५ पासून.

२. गाडी क्र. २२६३० (दादर ते तिरुनेलवेली): २५ डिसेंबर २०२५ पासून.

​दक्षिण रेल्वेच्या या निर्णयामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना, विशेषतः वातानुकूलित श्रेणीतून प्रवास करणाऱ्यांना अधिक जागा उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.enquiry.indianrail.gov.in) भेट द्यावी, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.

संगमेश्वर रेल्वे स्थानकावर ‘जामनगर’ आणि ‘पोरबंदर’ एक्सप्रेसचे होणार जंगी स्वागत

   Follow us on        

संगमेश्वर: संगमेश्वर रेल्वे स्थानकावर नव्याने थांबे मिळालेल्या दोन गाड्यांचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील जनतेच्या अडीच वर्षांच्या सातत्यपूर्ण संघर्षाला मोठे यश आले आहे. कोकण रेल्वेच्या पोरबंदर एक्स्प्रेस आणि जामनगर एक्स्प्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्यांना आता संगमेश्वर रोड स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, शुक्रवारी आणि शनिवारी या गाड्यांचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

​गुजरातकडे जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक व्यापारी, विद्यार्थी आणि चाकरमान्यांची मोठी अडचण दूर झाली आहे. आता थेट प्रवासाची सोय झाल्याने वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होणार आहे.

​जंगी स्वागताची तयारी

​या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी स्थानिकांनी जय्यत तयारी केली आहे. पोरबंदर एक्सप्रेसचे शुक्रवारी तर जामनगर एक्स्प्रेसचे शनिवारी स्वागत करण्यात येणार आहे. ​या दोन्ही दिवशी रेल्वे स्थानकावर घोषणाबाजी, ढोल-ताशांचा गजरात आणि फुलांच्या हारांनी गाड्यांचे स्वागत केले जाणार आहे. या सोहळ्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि रेल्वेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

​फेसबुक ग्रुपचे जाहीर आवाहन

​’निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे)’ फेसबुक ग्रुपच्या वतीने या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, शुक्रवार दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १:३० वाजता सर्व नागरिकांनी संगमेश्वर रोड स्थानकावर उपस्थित राहून या आनंदोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

Konkan Railway: कोकण रेल्वेच्या स्थानकांवर आता २४x७ ‘डिजी लॉकर’ सुविधा उपलब्ध

   Follow us on        

मुंबई: ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला गती देत आणि प्रवाशांच्या सोयीत भर घालत मध्य रेल्वेने आता रत्नागिरी (महाराष्ट्र), थिविम (गोवा) आणि उडुपी (कर्नाटक) स्थानकांवर २४ तास ‘डिजी लॉकर’ (डिजिटल स्मार्ट क्लॉक रूम) सुविधा सुरू केली आहे. सुरक्षित आणि स्वयंचलित असलेल्या या सुविधेमुळे प्रवाशांना आपले सामान रेल्वे स्थानकावर सुरक्षित ठेवणे अधिक सोपे झाले आहे.

​काय आहे ही ‘डिजी लॉकर’ सुविधा?

​मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे ही योजना यशस्वी झाल्यानंतर आता तिचा विस्तार करण्यात आला आहे. सध्या मध्य रेल्वेकडे एकूण ५६० डिजी लॉकर आहेत (CSMT-३००, दादर-१६०, LTT-१००).

​सामान ठेवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे:

१. स्क्रीनवर ‘Start-Store’ वर क्लिक करा.

२. आपले नाव, PNR क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका.

३. लॉकरचा आकार आणि बॅगांची संख्या निवडा.

४. प्रति बॅग ३० रुपये याप्रमाणे मशीनमध्ये पैसे जमा करा.

५. लॉकर उघडेल, त्यात सामान ठेवून दरवाजा बंद करा.

​सामान परत मिळवण्यासाठी:

१. स्क्रीनवर ‘Start-Retrieve’ वर क्लिक करा.

२. पावतीवरील बारकोड स्कॅनरला दाखवा.

३. लॉकर उघडेल, आपले सामान घेऊन दरवाजा पुन्हा बंद करा.

​प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

​ही सुविधा प्रवाशांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ च्या माहितीनुसार या काळात डिजी लॉकर्सच्या माध्यमातून रेल्वेला ३१.६ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता.

पर्यटकांची सोय 

आता ही सुविधा कोकणात सुरू केल्याने येथे पर्यटनास येणार्‍या प्रवाशांची खूप चांगली सोय होईल. जास्त सामान घेऊन फिरणे गैरसोयीचे असल्याने ते डिजी लॉकर मध्ये ठेवता येणार आहे. अशी सुविधा कोकण रेल्वे मार्गावरील ईतर स्थानकावर सुरू करणे गरजचे आहे.

 

Konkan Railway: कोकणकन्या, तुतारी गाड्यांच्या आरक्षणासाठी आता आधार OTP अनिवार्य

   Follow us on        

मुंबई:

रेल्वे प्रशासनाने तिकीट प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. २३ डिसेंबर २०२५ पासून निवडक १०० गाड्यांच्या तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकिटांसाठी आधार OTP (Aadhaar OTP) पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे. या यादीमध्ये कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे.

​पत्रात दिलेल्या माहितीनुसार, कोकण मार्गावरील खालील गाड्यांसाठी हा नियम लागू झाला आहे:

​कोकण कन्या एक्सप्रेस (२०१११): मुंबई ते मडगाव दरम्यान धावणारी ही अत्यंत लोकप्रिय गाडी आता आधार OTP प्रणालीच्या कक्षेत आली आहे.

​तुतारी एक्सप्रेस (११००३): दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणाऱ्या या गाडीसाठीही प्रवाशांना आता ओटीपी पडताळणी करावी लागेल.

​मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस (१२६१८): हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम या लांब पल्ल्याच्या आणि कोकण मार्गावरून जाणाऱ्या गाडीचाही या यादीत समावेश आहे.

​प्रवाशांना आवाहन:

ज्या प्रवाशांना या गाड्यांचे तत्काळ तिकीट काढायचे आहे, त्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करावी. यामुळे तिकीट आरक्षणाच्या वेळी होणारी गैरसोय टाळता येईल.

परराज्यातील गाड्या मुंबईपर्यंत; महाराष्ट्रातील गाड्यांना ‘मार्गच’ नाही- मध्यरेल्वेचा दुजाभाव

   Follow us on        

मुंबई: जिथे परराज्यात जाणार्‍या गाड्यांना मध्य रेल्वे मुंबई भागात हिरवा कंदील देत आहे तिथे कोरोना काळापासून बंद झालेली आणि कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याची असलेली ‘रत्नागिरी-दादर पॅसेंजर’ रेल्वे प्रशासनाने दिवा स्टेशनवर मर्यादित केल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अन्यायाविरोधात अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने आता थेट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून या प्रश्नात आक्रमकपणे लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

​रेल्वेचा दुटप्पी कारभार: परराज्यातील गाड्यांना रेड कार्पेट, महाराष्ट्राच्या गाड्यांना बाहेरचा रस्ता!

​समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी पत्रात रेल्वेच्या कार्यपद्धतीवर गंभीर बोट ठेवले आहे. मध्य रेल्वेने ‘मार्गाची क्षमता नाही’ (Line Capacity) असे तांत्रिक कारण देऊन रत्नागिरी पॅसेंजर दादरऐवजी दिव्यातून चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे त्याच मार्गावरून दादर-गोरखपूर आणि दादर-बालिया यांसारख्या परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना रेल्वेने हिरवा कंदील दिला आहे. एवढेच नाही तर अलीकडेच नव्याने घोषणा करण्यात आलेली एलटीटी बंगळुरू एक्सप्रेस एलटीटी वरून सुटणार आहे. मग महाराष्ट्रातील अंतर्गत गाड्यांसाठीच रेल्वेकडे मार्ग उपलब्ध का नाही? असा संतप्त सवाल कोकणवासीयांनी विचारला आहे.

​दिव्यापर्यंत गाडी मर्यादित केल्याने प्रवाशांचे हाल:

​वेळेचा अपव्यय: दादरला गाडीत पाणी भरण्याची सोय होती. आता दिव्यात सोय नसल्याने पनवेलला गाडी थांबवून पाणी भरावे लागते, ज्यात ३० ते ४० मिनिटे वाया जात आहेत.

​क्षमता असूनही प्रवासी वंचित: दिवा स्थानकातील फलाट आखूड असल्याने या गाड्यांना १७ पेक्षा जास्त डबे लावता येत नाहीत. हीच गाडी दादर किंवा CSMT वरून सुटल्यास २२-२४ डबे लावता येतील, ज्यामुळे दररोज ३ ते ४ हजार अतिरिक्त प्रवाशांना प्रवास करता येईल.

​कनेक्टिव्हिटी तुटली: दक्षिण मुंबई, वसई-विरार आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी दादर हे सर्वात सोयीचे स्थानक होते, जे आता हिरावले गेले आहे.

यापूर्वी माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि गोपाळ शेट्टी यांसारख्या अनेक नेत्यांनी पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासनाने याला केराची टोपली दाखवली आहे. संसदेत आणि विधिमंडळात विषय मांडूनही तो निकाली निघत नसल्याने आता या प्रश्नावर राजकीय लढा उभारण्याची गरज पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

​आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वळण

​”कोकण रेल्वे प्रकल्पात महाराष्ट्राचा २२% आर्थिक सहभाग आहे. तरीही मराठी प्रवाशांना त्यांच्या हक्काच्या गाडीसाठी झगडावे लागत आहे,” असा आरोप समितीने केला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर, मुंबईतील मोठा मतदार असलेल्या कोकणवासीयांचा हा प्रश्न उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे केंद्र सरकारकडे लावून धरतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​ ५०१०४/५०१०३ रत्नागिरी दादर पॅसेंजर कोरोनापूर्वीप्रमाणे पूर्ववत दादर स्थानकावरूनच सुरू करावी आणि डब्यांची संख्या वाढवून कोकणवासीयांना दिलासा द्यावा अशी प्रमुख मागणी समितीने केली आहे.

सावंतवाडी टर्मिनस रेल्वे प्रकल्प MITRA च्या नियंत्रणाखाली आणा – रेल्वे प्रवासी समिती

   Follow us on        

सावंतवाडी:

गेल्या दहा वर्षांपासून रेंगाळलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या कामाबाबत कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, ‘कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी’ यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून हा प्रकल्प राज्य शासनाच्या ‘मित्रा’ Maharashtra Institution for Transformation (MITRA) संस्थेच्या नियंत्रणाखाली घेण्याची आग्रही मागणी केली आहे.

​रेल्वे प्रशासनाची उदासीनता आणि ‘वे-साइड’ स्टेशनचा वाद

​पत्रात नमूद केल्यानुसार, कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी अलीकडेच “सावंतवाडी हे केवळ एक वे-साइड (Way Side) स्टेशन आहे आणि टर्मिनसचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही” असे विधान केल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट असून, रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप होत आहे.

​प्रवासी आणि चाकरमान्यांचे हाल

​टर्मिनसअभावी कोकणात नवीन गाड्या सुरू करता येत नाहीत. परिणामी, होळी, गणेशोत्सव आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये चाकरमान्यांना तिकीट मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. प्रवाशांचे होणारे हे हाल थांबवण्यासाठी हक्काचे टर्मिनस होणे ही काळाची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे.

​पत्रातील प्रमुख मागण्या आणि मुद्दे:

​प्रकल्प हस्तांतरण: कोकण रेल्वेची अनास्था पाहता, हा प्रकल्प राज्य शासनाच्या ‘मित्रा’ (MITRA) संस्थेकडे किंवा तत्सम सक्षम राज्य अभिकरणाकडे वर्ग करावा.

​टर्मिनस बिल्डिंग व सुविधा: सिंधुरत्न समृद्धी योजनेतून निधी उपलब्ध असतानाही टर्मिनसच्या इमारतीचे काम अद्याप सुरू झालेले नाही, ते तातडीने सुरू करावे.

​पाणी पुरवठा: तिलारी धरणातून टर्मिनससाठी पाणी योजनेचा प्रस्ताव राज्य स्तरावर मंजुरीसाठी प्रलंबित आहे, त्याला गती द्यावी.

​गाड्यांचे थांबे: कोरोना काळात रद्द केलेले महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे सावंतवाडी स्टेशनवर पुन्हा पूर्ववत करावेत.

​मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची विनंती

​सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले होते, याची आठवण करून देत संघटनेने या विषयावर तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाला योग्य समज देऊन या प्रकल्पातील अडथळे दूर करावेत, अशी विनंती ॲड. संदीप निंबाळकर आणि संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Konkan Railway: ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी अमृतसर-मडगाव दरम्यान विशेष एक्सप्रेस धावणार

   Follow us on        

रत्नागिरी/सिंधुदुर्ग:ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमधील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने उत्तर रेल्वेच्या समन्वयाने अमृतसर आणि मडगाव (गोवा) दरम्यान विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या आणि सणासुदीला गावी येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​ट्रेनचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:

​१. अमृतसर ते मडगाव जंक्शन (गाडी क्र. ०४६९४):

ही गाडी अमृतसर येथून दिनांक २२/१२/२०२५, २७/१२/२०२५ आणि ०१/०१/२०२६ (सोमवार) रोजी पहाटे ०५:१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २३:५५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.

​२. मडगाव जंक्शन ते अमृतसर (गाडी क्र. ०४६९३):

ही गाडी मडगाव येथून दिनांक २४/१२/२०२५, २९/१२/२०२५ आणि ०३/०१/२०२६ (बुधवार) रोजी सकाळी ०८:०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ०४:३० वाजता अमृतसरला पोहोचेल.

​महत्त्वाचे थांबे:

​ही विशेष ट्रेन प्रवासात बियास, जालंधर सिटी, लुधियाना, अंबाला कॅंट, पानिपत, दिल्ली सफदरजंग, मथुरा, सवाई माधोपूर, कोटा, रतलाम, वडोदरा, सुरत, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी या स्थानकांवर थांबेल.

​गाडीची रचना (Coaches):

​एकूण २१ एलएचबी (LHB) कोच असलेल्या या ट्रेनमध्ये:

​३ टायर एसी: ०२ कोच

​३ टायर एसी इकॉनॉमी: ०२ कोच

​स्लीपर क्लास: ०८ कोच

​जनरल कोच: ०७ कोच

​जनरेटर कार: ०२

​रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. वेळापत्रकाच्या अधिक माहितीसाठी प्रवासी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

​कोकण रेल्वेचे दुहेरीकरण झाल्याशिवाय कोकणचा विकास अपूर्ण; खासदार रवींद्र वायकर यांनी संसदेत वेधले लक्ष

   Follow us on        

नवी दिल्ली:

कोकण रेल्वे हा कोकणच्या विकासाचा कणा आहे, मात्र सध्या हा मार्ग एकेरी असल्याने विकासाला मर्यादा येत आहेत. जोपर्यंत कोकण रेल्वेचे पूर्णतः दुहेरीकरण होत नाही, तोपर्यंत कोकणचा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही, असे प्रतिपादन खासदार रवींद्र वायकर यांनी संसदेत केले.

​रोहा ते मडगाव दुहेरीकरणासाठी निधीची मागणी

संसदेत २०२५-२६ च्या पुरवणी मागण्यांवर बोलताना वायकरांनी रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, “कोकण रेल्वेच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे ही आनंदाची बाब आहे, परंतु केवळ विद्युतीकरणाने प्रश्न सुटणार नाही. रोहा ते मडगाव या संपूर्ण पट्ट्यात रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण (Double Lining) करणे अत्यंत आवश्यक आहे.” यासाठी केंद्र सरकारने रेल्वे अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली.

​प्रवासाचा वेळ वाचणार

कोकण रेल्वेवर गाड्यांची संख्या वाढत असून एकेरी मार्गामुळे गाड्यांना क्रॉसिंगसाठी तासनतास थांबून राहावे लागते. दुहेरीकरणामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि मालवाहतुकीलाही गती मिळेल, ज्याचा थेट फायदा कोकणच्या अर्थव्यवस्थेला होईल असे त्यांचे मत आहे.

​कोकणच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नासह वायकरांनी मुंबईच्या पायाभूत सुविधा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवरही संसदेत प्रभावीपणे बाजू मांडली.

​संगमेश्वर रेल्वे स्थानकात दोन एक्स्प्रेसना थांबे मंजूर; ‘निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर’ ग्रुपच्या पाठपुराव्याला मोठे यश

   Follow us on        

संगमेश्वर:

संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, रेल्वे बोर्डाने संगमेश्वर रोड स्थानकात दोन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मंजूर केला आहे. यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

​या गाड्यांना मिळाला थांबा

​रेल्वे बोर्डाने खालील दोन एक्स्प्रेस गाड्यांना संगमेश्वर येथे थांबण्यास हिरवा कंदील दाखवला आहे:

१. गाडी क्रमांक २०९१०/२०९०९: पोरबंदर – कोचीवेली साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस.

२. गाडी क्रमांक १९५७७/१९५७८: जामनगर – तिरुनलवेली द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस.

​दोन वर्षांचा संघर्ष यशस्वी

​’निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर (रेल्वे)’ या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून या थांब्यांसाठी मागणी केली जात होती. यासाठी संघटनेने केवळ पत्रव्यवहारच केला नाही, तर भेटीगाठी, आंदोलने आणि उपोषणासारखे मार्ग अवलंबून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. तीन वर्षांपूर्वी नेत्रावती एक्स्प्रेसला थांबा मिळवून दिल्यानंतर, आता या दोन गाड्यांच्या थांब्यामुळे संघटनेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

​लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे मानले आभार

​या यशाबद्दल बोलताना संघटनेने केंद्रीय रेल्वे मंत्रालय, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, आमदार शेखर निकम, रेल्वे बोर्ड आणि कोकण रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत. तसेच संघर्षाच्या काळात खंबीरपणे पाठीशी उभे राहणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांचे आणि जनतेचेही संघटनेच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात आले.

​२६ डिसेंबरला होणार जल्लोषात स्वागत

​या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि नवीन गाड्यांचे स्वागत करण्यासाठी २६ डिसेंबर २०२५ रोजी संगमेश्वर रेल्वे स्थानकात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर (रेल्वे)’ फेसबुक ग्रुपतर्फे जल्लोषात स्वागत केले जाणार असून, या कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती संघटनेचे प्रमुख संदेश जिमन यांनी दिली.

​या यशाबद्दल संदेश जिमन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार कोईमतूर – हरिद्वार विशेष एक्सप्रेस

 

   Follow us on        

रत्नागिरी: ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने कोईमतूर – हरिद्वार – कोईमतूर दरम्यान विशेष एक्स्प्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी कोकण रेल्वे मार्गावरून धावणार असल्याने महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रवाशांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.

गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:

गाडी क्र. ०६०४३ कोईमतूर – हरिद्वार विशेष: ही ट्रेन बुधवार, २४ डिसेंबर २०२५ रोजी कोईमतूर येथून सकाळी ११:१५ वाजता सुटेल आणि चौथ्या दिवशी म्हणजेच २७ डिसेंबर (शनिवार) रोजी मध्यरात्री ००:०५ वाजता हरिद्वारला पोहोचेल.

गाडी क्र. ०६०४४ हरिद्वार – कोईमतूर विशेष: ही ट्रेन मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ रोजी हरिद्वार येथून रात्री २२:३० वाजता सुटेल आणि चौथ्या दिवशी म्हणजेच ०२ जानेवारी २०२६ (शुक्रवार) रोजी पहाटे ०४:०० वाजता कोईमतूरला पोहोचेल.

प्रमुख थांबे:

ही गाडी प्रवासादरम्यान पालघाट, शोरनूर, कोझिकोड, कन्नूर, मंगळुरू जंक्शन, उडुपी, कुंदापुरा, मुकांबिका रोड बिंदूर, कारवार, मडगाव जंक्शन, थिवी, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, वसई रोड, उधना, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, मथुरा, हजरत निजामुद्दीन, गाझियाबाद आणि रुरकी या स्थानकांवर थांबेल.

गाडीची संरचना (Composition):

या विशेष ट्रेनला एकूण १८ एलएचबी (LHB) कोच असतील, ज्यामध्ये:

  • ३ टायर एसी: १० डबे
  • ३ टायर एसी इकॉनॉमी: ०२ डबे
  • स्लीपर क्लास: ०४ डबे
  • जनरेटर कार: ०१
  • एसएलआर (SLR/D): ०१

प्रवाशांनी या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search