Konkan Railway News:कोकण रेल्वेने ऑनलाइन प्रणालीचा अवलंब करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्वच गाड्यांमधील तिकीट पर्यवेक्षकांना एचएचटी (हॅन्ड हेल्ड टर्मिनल) मशिन देण्यात येणार असल्याची माहिती कोकणरेल्वेने दिली आहे. याआधी मंगलोर, कन्याकुमारी, नेत्रावती, राजधानी एक्स्प्रेस, दुरोतो, एर्नाकुलम या गाड्यांसाठी ही सुविधा वापरली जात होती.
कोकण रेल्वेतील तिकीट परीक्षकांना (टीटीई) कागदावर छापलेला आरक्षण तक्ता बाळगावा लागणार नाही. आरक्षण स्थिती तपासण्यासाठी आणि पुढील आरक्षण स्थितीची माहिती देण्यासाठी, तिकीट तपासण्यासाठी आणि सीट वाटप करण्यासाठी आता कागदी तक्त्याची गरज भासणार नाही. या मशिन रेल्वे सर्व्हरशी जोडल्या जाणार आहेत. ज्यामध्ये एक 4G सिम कार्ड असणार आहे. याद्वारे तिकीट, सीट संदर्भातील प्रत्येक अपडेट कळण्यास मदत होणार आहे.
एचएचटी उपकरण हे रेल्वे प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणारे आहे. एचएचटी उपकरणात फक्त एका क्लिक वर किती रिकाम्या सीट आहेत याची माहिती होणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीच्या आणि RAC च्या प्रवाशांना तिथे सीट मिळणे शक्य होणार आहे.
एचएचटी (हॅन्ड हेल्ड टर्मिनल) मशिनची वैशिष्ट्ये
रेल्वे सुटल्यानंतर, कोणतेही तिकीट रद्द झाल्यास, पर्यवेक्षकांना माहिती मिळेल.
रत्नागिरी– गुहागर समुद्र किनारी स्पोर्ट फिशिंग असोसिएशन, महाराष्ट्र तर्फे ”सर्फ फिशिंग” टूर्नामेंट स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धा गुहागर समुद्र किनाऱ्यावर होणार आहे. या टूर्नामेंटला जिल्ह्याचे पालक मंत्री माननीय उदयजीं सामंत साहेब प्रमुख पाहुणे तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ६.०० वा. होणार असून बक्षीस वितरण सोहळा सायंकाळी ७.०० वा. होणार आहे.
सर्फ फिशिंग म्हणजे काय?
सर्फ मासेमारी किनाऱ्यावर उभे राहून मासे पकडण्याचा किवा सर्फ मध्ये विहार करण्याचा खेळ आहे. सर्फ फिशिंग ही एक सामान्य संज्ञा आहे. आणि त्यात आमिष किवा आमिष टाकणे समाविष्ट असू शकते किवा नसू शकते. सर्व प्रकारच्या किनाऱ्यावरील मासेमारीचा संदर्भ देते. वालुकामय आणि खडकाळ किनारे, रॉक जेटी किवा अगदी मासेमारीच्या घाटांपासून अटी सर्फ कास्टिंग किवा बीच कास्टिंग किनाऱ्यावर किवा त्याच्या जवळ सर्फ मध्ये टाकून समुद्र किनाऱ्यावरून सर्फ करण्यासाठी विशेषतः खारट पाण्यामध्ये सर्फ मासेमारी केली जाते. सर्फ मच्छीमार सहसा १२ ते १६ फुट लांब मासेमारी रॉड वापरतात आणि लांब रॉडणे लांब अंतर टाकण्यासाठी कौशल्य आणि अनुभव आवश्यक असतो.
जास्तीत जास्त स्पर्धकांनी या मध्ये सहभाग नोंदवावा तसेच जास्तीत जास्त पर्यटकांनी या सुवर्णसंधीचा गुहागर किनारी फिशिंग स्पर्धा पाहण्यासाठी अवश्य भेट द्या असे आव्हान पर्यटन व्यवसायिक महासंघ गुहागर तालुका अध्यक्ष श्री संतोष घुमे व उपाध्यक्ष श्री संजय भागवत यांनी केले आहे
रत्नागिरी| मुंबई – गोवा महामार्ग अपूर्ण असताना सरकारद्वारे पुन्हा पुन्हा या मार्गावर टोल वसुलीसाठी प्रयत्न केला जात आहे. दिनांक 11 एप्रिल 2023 ला सुद्धा राजापूर तालुक्यातील हातीवले टोलनाका सुरू करून टोल वसुली चालू झाली होती. महामार्ग अपूर्ण असताना टोल वसुली का असा प्रश्न प्रसारमाध्यमांतून पत्रकारांननी उठवला होता. पत्रकारांच्या दबावापुढे अखेर सरकारला नमावे लागले. मंगळवारी सुरू केला गेलेला राजापूर – हातिवले टोल नाका एका दिवसातच म्हणजे काल बुधवारी सायंकाळी बंद केला गेला.
हातीवले येथील टोलवसुली पूर्णपणे थांबवण्यात आल्याची माहिती काल पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. जोवर तेथील स्थानिकांचे समाधान होणार नाही तोपर्यंत तेथील टोल वसुली सुरू केली जाणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली.
कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटीच्या व्यवस्थापनाखाली हातीवले येथील टोल नाका मंगळवारी सकाळपासून सुरू करण्यात आला होता. मात्र मुंबई गोवा हाय-वे चे काम अपूर्ण अवस्थेत असतानाही हा टोलनाका सुरू करण्यात आला. याला पत्रकारांनी प्रसारमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. येथील स्थानिकांचा विरोधही होता, या सगळ्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सावंत यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मुंबई : काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी ला योग्य दर मिळत नाही आहे. लॉकडाऊन च्या आधी 150 रुपये किलो असा काजूला भाव होता. लॉकडाऊन नंतर तो उतरुन 90 रुपये किलो असा झाला. पण त्यानंतर हा भाव 150 च्या आसपास गेला नाही. यंदा सुरुवातीला 135 रुपये किलो असलेला भाव दिवसेंदिवस उतरून 100 रुपये किलो वर येवुन ठेपला आहे. बाजारातील व्यापारी हा भाव पडताना दिसत आहेत. काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार पुढे सरसावले आहेत. कच्च्या काजूला किमान 160 रुपये प्रति किलो भाव द्यावा अशी मागणी त्यांनी पत्राव्दारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
त्यांनी या पत्रात म्हटले आहे, तळ कोकणातील बहुतांश शेतकरी काजू उत्पादक शेतकरी आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत काजू बीचे दर सुमारे 25 ते 30 टक्के खाली घसरले आहेत. काजू गराचे दर वाढत असताना काजू बी चे दर कमी होत आहेत. गेल्या वर्षी मिळालेला 135 ते 140 रुपयांचा दर या वर्षी 100 ते 105 रुपयांवर आला आहे. काजू बी खरेदीचे व्यापाऱ्यांचे धोरण हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. वातावरणातील बदल, मजुरीचे वाढलेले दर, खतांचे वाढलेले दर, कीड रोगासाठी करावा लागणारा खर्च, वन्य प्राण्यांसह आग व चोरांपासून होणारे नुकसान ही आव्हाने पेलत काजू उत्पादक काजूचे उत्पादन घेत असतात. परंतु, मनमानीपणे काजू बी चे दर व्यापारी पाडत असल्यामुळे काजू उत्पादकांना उत्पानाची शाश्वती देण्यासाठी सरकारने 160 रुपयांचा हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी कोकणतील काजू उत्पादक शेतकऱ्यांची आहे. तरी शासनाने काजू उत्पादकांचे शोष थांबवण्यासाठी तातडीने काजू बी साठी हमीभाव जाहीर करावा अशी मागणी पत्राव्दारे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी च्या कोंकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना आज भेटून याबद्दल लक्ष वेधले होते. त्यांच्या भेटीनंतर ताबडतोब अजित पवार यांनी हे पत्र लिहिले आहे.
Konkan Railway News: प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन आता मध्य रेल्वेने सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेसला आणखी एक व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक १४ एप्रिलपासून अतिरिक्त व्हिस्टाडोम डबा जोडण्यात येणार आहे.
कोकणात जाताना लागणारे धबधबे , नद्या, दऱ्या, बोगदे, हिरवीगार शेतं यांचे विहंगम दृश्य व्हिस्टाडोममधून बघत प्रवास करणे लोकांच्या जास्त पसंतीस उतरले आहेत. त्यामुळेच तेजसला व्हिस्टाडोमचा अतिरिक्त डबा लावण्याची मागणी वाढली होती.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला होता. या बदलानंतरतेजस एक्स्प्रेसमध्ये दोन विस्टाडोम कोच, ११ एसी चेअर कार, एक एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कार कोच आणि दोन लगेज कोच आणि एक जनरेटर-कम-ब्रेक व्हॅन अशी रचना असेल.
मध्य रेल्वेने २०१८ मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये पहिल्यांदा विस्टाडोम कोच जोडला . प्रवाशांची प्रचंड मागणी लक्षात घेऊन १५ सप्टेंबर २०२२ रोजी मध्य रेल्वेने मुंबई-मडगाव मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये दुसरा विस्टाडोम जोडला. विस्टाडोम डब्यांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये हा डबा जोडण्यात आला. त्यानंतर डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस ,पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच सुरू करण्यात आला.
व्हिस्टाडोम कोचमध्ये एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट आणि पुशबॅक खुर्च्या, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, विद्युतीयरित्या चालणारे स्वयंचलित स्लाइडिंग कंपार्टमेंट दरवाजे, विशेष दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे आणि सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली शौचालये हि वैशिष्ट्ये आहेत. तीन बाजूंना मोठ्या काचेच्या खिडक्या असलेली व्ह्यूइंग गॅलरी हे या डब्यांचे सर्वात मोठे आकर्षण आहे, रेल्वे अधिकार्यांच्या मते, आणि प्रवाशांना त्यातून छायाचित्रे आणि सेल्फी काढणे आवडते.
रत्नागिरी | विजय सावंत : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग बॉर्डरवरील हातिवले येथील टोलनाका आजपासून सुरू करण्यात आला आहे. सकाळ सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी टोलवसुली सुरू झाली असून NHAI ने या टोलवसुलीला परवानगी दिली आहे.
या टप्प्यातील जवळपास 98.02 टक्के काम पूर्ण झाल्याने हा टोल नाका सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे असे NHAI म्हणने आहे. कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटी इंडिया या व्यवस्थापनाखाली राजापूर हातिवले येथील टोल नाका सुरू होणार आहे.या टोलनाक्यावर कारसाठी वन वे 90 रुपये भरावे लागतील. तर ट्रक बससाठी 295 रुपये आकारले जात आहेत.
याआधी पण येथील टोल नाका सुरू करून टोल वसुली चालू केली होती. मात्र स्थानिकांचा त्याला मोठा विरोध झाला. माजी खासदार नीलेश राणे यांनी या ठिकाणी आंदोलन केले होते. त्यामुळे येथील टोल वसुली बंद करण्यात आली होती.
महामार्गावर अनेक ठिकाणी कामे चालू आहेत. त्यामुळे वाहतूकीस अडथळे येत आहेत. या ठिकाणावरून गाड्या खूप कमी वेगाने आणि सांभाळून चालवाव्या लागत आहेत. काही ठिकाणी काम पूर्ण झाले असले तरी अनेक बाबीत कमतरता असल्याने अपघात होत आहेत. आमचा टोल वसुली करिता विरोध नाही पण महामार्गाचे काम अपूर्ण असताना आणि फक्त काही भागाचे काम पूर्ण झाले असा दावा करून टोल वसुली करणे पूर्णपणे चुकीचे आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
एकीकडे या महामार्गाला 12 वर्ष रखडवून येथील जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहिला; त्यात भर म्हणुन या अपुऱ्या महामार्गावर टोल वसुली करून प्रशासन त्यांचा रोष ओढवून घेणार आहे.
रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गाने गाडी ड्राईव्ह करताना महामार्गाच्या बाजूला असलेल्या फलकांवर दिलेल्या वेगमर्यादेचे पालन न केल्यास तुम्ही आता तुम्ही सहज पकडले जाणार आहात. कारण या महामार्गावर आता स्पीड गन बसवण्यात येत आहेत.
सध्या खानु मठ दरम्यान येथे स्पीड गन कॅमेरा लावला आहे. या भागात 75 किलोमीटर पेक्षा अधिक वेगमर्यादा ओलांडून जाणाऱ्या वाहन चालकांकडून 2 हजार रुपये दंड आरटीओ कडून वसूल केले जात आहे. महामार्ग जसा जसा पूर्ण होईल तसे अपघातप्रवण क्षेत्रात असे अजुन स्पीड गन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
वेगाने गाड्या चालवून होणारे अपघात टाळण्यासाठी स्पीड गन कॅमेरे बसविण्यात येतात. या गन वाहनाची दिशा, वेग, कोणत्या लेनने वाहन मार्गस्थ झाले, कॅमेरा कुठे लावला आहे, तारीख, वेळ आदी सर्व माहिती देतात. त्यामुळे आरटीओ कर्मचार्यांना कारवाई करणे सोपे जाते. दंडाची पध्दतही ऑनलाईन असल्याने तो भरण्याशिवाय गत्यंतर नाही. दंडात्मक कारवाई होत असल्याने वाहनचालक वेगमर्यादेचे पालन करतात आणि अपघात कमी होतात.
रत्नागिरी – कार्तिकेयाची महाराष्ट्रातील सर्वात सुंदर मूर्ती चिपळूणच्या श्रीविंध्यवासिनी मंदिरात आहे असे प्रतिपादन लेखक,अभ्यासक आशुतोष बापट यानी केले. ”सफर चिपळूण गुहागर परिसराची” या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात (२ एप्रिल) बोलताना त्यांनी हे कौतुकोद्गार काढले. या वेळी व्यासपिठावर मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्राचे अभ्यासक लेखक आशुतोष बापट, ज्येष्ठ दुर्गतज्ञ प्र.के. घाणेकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, ज्येष्ठ शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव उपस्थित होते.
मंदिर आणि मूर्ती हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. (व्यवच्छेदक लक्षण म्हणजे काहीतरी आगळे वेगळे अद्वितीय असे लक्षण) त्याकडे आपण अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्या मूर्ती कशाही, भंगलेल्या वगैरे असल्या, तरी त्या आपल्याला काहीतरी सांगून जात असतात. आपल्या संस्कृतीला दोन अंगे आहेत, आधिभौतिक म्हणजे ऐहिक जीवन समृद्ध करणे आणि दुसरी बाजू आधिदैविक अर्थात् तत्त्वज्ञान, अध्यात्म, मंदिर, मूर्ती, कला आदींची असून माणसाचे जीवन समृद्ध होण्याकरता ते आवश्यक आहे. कोकणातील मूर्तीवर लेखन होतेय ही चांगली गोष्ट आहे. कोकण किती समृद्ध आहे ? हे यातून लोकांना कळेल. लोकांचा ओघ कोकणाकडे वाढेल, अशी भावना ज्येष्ठ मूर्तीतज्ञ डॉ. गो. बं. देगलुरकर यांनी व्यक्त केली.
चिपळूणच्या रावतळे परिसरात विंध्यवासिनीचे मंदिर आहे. नंद-यशोदेची ही मुलगी जी कृष्णाच्या ऐवजी वासुदेव–देवकीच्या कोठडीत पोहोचली आणि तिला कंसाने ठार मारण्यासाठी उचलले असता ती त्याच्या हातातून निसटून विंध्यपर्वतावर जाऊन राहिली अशी पुराणकथा आहे
विंध्यवासिनी देवीचे हे मंदिर बहुधा यादवकालीन असून देवी पुरातन काळापासून शाक्तपंथीयांना पूजनिय असावी. परकीयांच्या आक्रमणात येथील मूळ रहिवासी असलेल्या बाराराव या कोळी जमातीने आपल्या कुलदेवतेचं रक्षण करण्यासाठी तिचं संपूर्ण मंदिर डोंगर तोडून व दगड मातीचा ढीग रचून त्यात गाडून टाकलं. कालांतराने छत्रपती संभाजीमहाराजांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला. त्याकाळापासून आजापर्यंत देवीची नित्य पूजाअर्चा चालू आहे.
१९७६ साली देवीच्या स्थापनेचा ३०० वा वर्धापनदिन साजरा झाला. देवीची मूर्ती होयसाळ शैलीची असून ती ८०० ते १००० वर्षे जुनी असावी. त्याचप्रमाणे मूर्ती अष्टभूजा असून महिषासुरमर्दिनी या आक्रमक रूपांत उभी आहे. तिच्या आठही हातांत आयुधे असून तिने पायाखाली रेड्याला दाबून धरले आहे. नवरात्रात इथे देवीचा मोठा उत्सव असतो. तिच्या गाभाऱ्यातील मयूर हे वाहन असलेल्या कार्तिकेयाची मूर्तीही अत्यंत देखणी आहे. या दोन्ही मूर्ती अतिशय सुंदर असून त्यावरील सुबकता, कोरीव काम व काळ्या पाषाणाची आजही टिकून असलेली तकाकी पाहून त्या कारागिरांच्या कामगिरीचे कौतुक वाटते.
साभार – FB (Chiplun Cha Balya)
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
सिंधुदुर्ग-कोकणात पर्यटन वृद्धीस मोठा वाव आहे; त्याचबरोबर काही मोठ्या प्रकल्पाच्या घोषणा केल्या गेल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात येथील गुंतवणूक कित्येक पटीने परतावा देणारी असल्याचे लक्षात आल्याने अनेक परप्रांतीय येथे मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अनेकदा बळजबरीने, गैरमार्गाने जमिनी बळकावण्याचे प्रकारसुद्धा घडताना दिसत आहेत.
गोव्यात हल्लीच उघडकीस आलेल्या जमीन घोटाळ्याच्या भूमाफियांनी सिंधदुर्ग जिल्ह्यात सुद्धा आपले पाय पसरवण्यास सुरवात आहे. त्यांनी या जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात शिरकाव केला असून कायद्यातील पळवाटा, आर्थिक ताकद याचा वापर करत यंत्रणेला हाताशी धरून सोन्याच्या किमतीच्या जमिनी कवडीमोल दाम देवून आपल्या विळख्यात आणायला सुरूवात केली आहे. गोव्यात या भूमाफियांना ‘दिल्ली लॉबी’ असे बोलले जात आहे. मुळात दिल्ली लॉबी म्हणजे दिल्ली प्रांतातून येणारे गुंतवणूकदार आहेत.
या दिल्ली लॉबीने गोव्यात नक्की काय केले ?
ही लॉबी अवैध मार्गांचा वापर करून पैशाच्या जोरावर मालमत्ता मिळवते. स्थानिकांना सुरूवातीला आमिषे आणि नंतर बळाचा वापर करून बेदखल करतात; मात्र ते कधीच प्रत्यक्ष पडद्यावर येत नाहीत. गोव्यात आयएएस, आयपीएस, आयएफएस हे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने दिल्लीतील असतात. त्यांच्याशी ओळख काढून त्यांचा वापर करत या मालमत्ता मिळवल्या जातात. हे दिल्लीकर मोठमोठ्या हस्तींकडून गुंतवणुकीसाठी पैसे मिळवतात. स्थानिकांना आमिष दाखवून त्यांनाच पुढे करून अवैध मार्गाद्वारे मालमत्ता बळकावल्या जातात. मग त्याची दामदुप्पट व्यावसायिक किमतीत विक्री होते. यात करोडो रूपयांचा घोटाळा केला जातो.जमिनी मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र, मृत व्यक्तींच्या बोगस स्वाक्षरी, बोगस वारस आदी सगळे मार्ग अवलंबले जातात. गोव्यात गेल्या काही वर्षांत या लॉबीने आर्थिक दहशत निर्माण केली आहे.
गोव्यात असलेली पोर्तुगीजकालीन बंद घरे या लोकांच्या दृष्टीस पडली. ही घरे प्रामुख्याने वर्षानुवर्षे बंद असल्याने पडझड झालेल्या स्थितीत असायची. त्याचे वारसदार परदेशात स्थायिक असायचे. या लोकांनी सरकारी यंत्रणेला हाताशी धरून त्याचे वारसदार शोधले. मुळ दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ओळखीमुळे त्यांना हे सहज शक्य झाले. या वारसदारांकडून कवडीमोल किंमतीने मालमत्ता घेतल्या.त्या घरांची दुरूस्ती करून तीन चार पट दराने याची विक्री केली गेली.
त्यानंतर या लॉबीची नजर गोव्यातील हजारो एकर पडीक जमिनीवर पडली. येथे वारस परदेशात असलेल्या, वारसांना मालमत्तांबाबत माहिती नसलेल्या हजारो एकर जमिन होत्या. अधिकाऱ्यांशी साटेलोटे ठेवून असलेल्या या लॉबीने गोव्याच्या पुराभिलेख खात्यामधून अवैध मार्गाने कागदपत्र मिळवत अशा जमिनींचे वारस शोधले. काहीवेळा अशा वारसांना पैसे देवून कवडीमोल किंमतीने जमिनी खरेदी केल्या. या पुढचे पाऊल टाकत वारसांचा पत्ता नसलेल्या जमिनींचे बोगस वारस उभे केले. निधन झालेल्या किंवा ज्ञान नसलेल्या लोकांच्या नावेही बोगस मालक दाखवून खरेदी व्यवहार करण्यत आले. यासाठी पुराभिलेख, महसूल आणि उपनिबंधक कार्यालयाच्या लोकांना लाच देवून बनावट खरेदीखते करण्यात आली. ग्रामिण भागात हजारो एकर जमिनी यातून खरेदी करून त्याची विक्रीही केली.
परदेशातून परत आलेल्या काही नागरिकांनी आपली जमिनीची परस्पर विक्री झाल्याबद्दल ची तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि हा मोठा घोटाळा बाहेर पडला.
सिंधुदुर्गात प्रवेश.
मोपा विमानतळामुळे दोडामार्गमध्ये मालमत्तांना दर येणार याची आधीच कुणकुण असलेल्या या लॉबीने तालुक्यात वैध अवैध मार्गांचा वापर करून मोठ्याप्रमाणात जमिनी घेतल्या आहेत. खरेदीदार कागदावर वेगळे असले तरी यामागे मुळ हीच लॉबी असून बळाचा वापर तेच करत असल्याचे चित्र आहे.
आताही हैदराबाद-पणजी असा मोठा महामार्ग भविष्यात होणार असल्याचे व तो दोडामार्ग तालुक्यातील वझरे गावातून जाणार असल्याची कुणकुण या लॉबीला आहे. याची राज्यस्तरावरच्या प्रशासनाला अधिकृतरित्या कोणतीच माहिती नाही; मात्र ही लॉबी त्या मार्गावरील जमिनी कवडीमोल किंमतीने खरेदी करत आहे. यासाठी यंत्रणेचा वापर आणि स्थानिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जात आहे.
दोडामार्ग तालुक्यातील एका गावात या लॉबीची छुपी गुंतवणूक काही वर्षांपूर्वीपासून आहे. या ठिकाणी स्थानिकांना कवडीमोल किंमत देवून व इतर मार्गाने जमिनी घेण्यात आल्या. त्या ठिकाणी आलीशान घरे, सदनिका तयार करण्यात आल्या. त्या आता विक्रीसाठी सज्ज असून त्यासाठीचे ग्राहकही करोडो रूपये मोजणारे शोधले जात आहेत.
गोव्यात घोटाळा उघडकीस आला तरी या लॉबीचे व्यवहार सिंधुदुर्गात चालूच आहेत. कारण सध्या हा भाग अविकसित असला तरी येथे येणारे भविष्यातील प्रकल्पांमुळे येथे विकासाला मोठा वाव आहे. भविष्यात ही लॉबी राजापूर-रत्नागिरीसुद्धा शिरकाव करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोणती खबरदारी घ्याल?
कोकणातील अनेक लोक नोकरीधंद्याच्या निमित्ताने शहरात वास्तव्यास असतात. त्यांच्या जमिनीवर या भूमाफियांचा डोळा असतो. अशा जमिनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन परस्पर विकल्या जाऊ शकतात. आपल्या गावात-वाडीत जमिनी बद्दल जेवढे फेरफार होतात त्याबद्दल हरकती नोंदविण्यास https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या शासकीय संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध केली जाते. या चावडी वर आपण नजर ठेवणे गरजेचे आहे. तसेच आपला सातबारा वारंवार तपासून त्यामध्ये काही फेरफार झाले आहेत का ते पाहणे महत्वाचे आहे.
सिंधुदुर्ग : घर ते शाळा यांमधील जास्त अंतर, वाहतुकीची सोय नाही या कारणामुळे अनेकदा पालक मुलींना शाळेत पाठवणे टाळतात. अशा मुलींसाठी आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात एक स्तुत्स्य उपक्रम हाती घेतला आहे. आपल्या कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या गरजू मुलींना मोफत सायकल प्रदान करणार असल्याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
पहिल्या टप्यात शाळेतील एकूण ३७९ मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिल रोजी ११० मुलींना मोफत सायकल देऊन शुभारंभ करण्यात येणार आहे. हा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी नसून कायम चालू राहणार आहे असे नितेश राणे म्हणाले आहेत.
कणकवली देवगड आणि वैभववाडी या तालुक्यांमध्ये जेव्हा मुली शाळेकडे जातात.त्यांना शाळेत पोहचण्याची अडचण होते.काही शाळा दूर असल्याने पालक मुलींना लीं पाठवत नाहीत किंवा संध्याकाळी उशिरा होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने याकडे गांभीर्याने पाहून मुलींना शाळेत पाठवले जात नाही .माझ्या मतदार संघातील शिक्षणापासून एकही मुलगी वंचित राहू नये, यासाठीच कणकवली विधानसभा क्षेत्रातील शालेय मुलींनी असे नितेश राणे एका पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
प्राथमिक आणि माध्यमिक शाळांकडून अशा गरजू मुलींची यादी मागवली जाणार आहे. यादीप्रमाणे गरजू मुलींसाठी त्या शाळेला सायकल दिली जाणार आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलींना ही सायकल शाळेकडे पुन्हा द्यावी लागणार आहे. ती सायकल कंडिशन तपासून त्याच शाळेतील इतर गरजू मुलींना दिली जाईल.