Category Archives: कोकण

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर मोठे भगदाड; वाहतुकीस धोका निर्माण

   Follow us on        
Mumbai Goa Highway: मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवरील इन्सुली कुड़व टेंब येथे एक भला मोठा भगदाड, असा खड्डा पडल्याने वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे माती खचल्याने हा खड्डा पडल्याची माहिती मिळाली आहे. या खड्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना हा खड्डा दिसणे कठीण असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. या मार्गांवर प्रवास करताना नागरिकांनी सतर्क राहुन आपला प्रवास करावा.
निगुडे येथील माजी सरपंच झेवियर फर्नांडीस यांनी या गंभीर समस्येकडे महामार्ग प्राधिकरणाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी तात्काळ यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दुरुस्ती काम हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून जोर धरू लागली आहे.

फक्त १९९१ रुपयामंध्ये विमान प्रवास! फ्लाय-९१ कंपनीची गोवा, हैद्राबाद, बेंगळुरु आणि सिंधुदुर्ग प्रवासासाठी खास ऑफर

   Follow us on        
Fly-91 Offer: मूळची गोव्याची असणाऱ्या Fly91 या विमान कंपनीने सोमवारी चार शहरांतून उड्डाणासह व्यावसायिक ऑपरेशन्सला सुरूवात केली आहे. कंपनीने गोवा, हैदराबाद, बेंगळुरू आणि सिंधुदुर्ग दरम्यान उड्डाणे सुरू केली आहेत. Fly91 एप्रिलमध्ये आगती, जळगाव आणि पुणे येथे उड्डाणे सुरू करणार आहे. यावेळी कंपनीने 1,991 रुपये विमान भाडे या विशेष ऑफर देखील लॉन्च केली आहे
Fly91 एअरलाइनच्या विमानाने गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 7.55 वाजता बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उड्डाण घेतले. एअरलाइनने बेंगळुरू ते सिंधुदुर्ग हे पहिले उड्डाणही चालवले आहे. गोवा आणि बेंगळुरू दरम्यान सोमवार, शुक्रवार आणि शनिवारी उड्डाणे कार्यरत करण्याची कंपनीची योजना आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कंपनीचे व्यावसायिक उड्डाण सुरू करणे एअरलाइनच्या देशांतर्गत कनेक्टिव्हिटीच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. कंपनीने लॉन्च केलेली 1,991 रुपये विमान भाड्याची विशेष ऑफर सर्व ठिकाणांसाठी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
विमान कंपनी सोमवार, शुक्रवार आणि शनिवारी गोवा आणि बेंगळुरू दरम्यान उड्डाणे चालवेल. त्याचप्रमाणे, बेंगळुरू आणि सिंधुदुर्ग दरम्यान दर आठवड्याला समान संख्येने उड्डाणे चालविली जातील. याशिवाय गोवा ते हैदराबाद आणि सिंधुदुर्ग ते हैदराबाद दरम्यान आठवड्यातून दोनदा विमानसेवा चालणार आहे, असे चाको म्हणाले.
लक्षद्वीप आणि गोवा सारख्या लोकप्रिय स्थळांशी प्रवाशांना जोडणे हा Fly91 चा उद्देश आहे. भारतातील टियर आणि शहरांशी हवाई संपर्क वाढवण्याचा कंपनी प्रयत्न करत आहे, असे चाको म्हणाले.

मुंबई ते तळकोकण प्रवास फक्त ५ तासांत; यंदा गणपतीत कोकणात जाण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध होणार

   Follow us on        
मुंबई: यंदा गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर हाती आली आहे. गणपतीत आता समुद्र मार्गे प्रवास करता येणार आहे. चाकरमान्यांना कमी वेळेत गावी पोहोचवण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरी गाठता येणार आहे. आता मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे.
जलवाहतूक सेवा सुरू झाल्याने चाकरमानी कमी वेळेत कोकणात पोहोचणार आहेत. हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत कोकणात प्रवास करणार आहेत. फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे चाकरमान्यांचा मोठा त्रास कमी होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे.
चाकरमान्यांचा त्रास कमी होणार
गणेशोत्सवात कोकणात जाताना चाकरमान्यांना रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडीने होणारी परवड आणि वेळखाऊ प्रवासाचा त्रास चाकरमान्यांसाठी नेहमीचाच झाला आहे. या त्रासातून दिलासा देण्यासाठी मत्स्य व बंदरे विभागाकडून मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे.
जलवाहतूक सेवेसाठी एम टू एम बोट वापरली जाणार आहे. येत्या २५ मे रोजी ती मुंबईतील भाऊचा धक्का येथे दाखल होणार आहे. फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून परवडणाऱ्या दरात जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. याकरिता एम टू एम ही बोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचे प्रयोजन आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत पुन्हा एकदा जलवाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
मुंबईतील माझगाव डॉक येथून प्रवास सुरू होईल. जवळपास साडेचार तासांत कोकणातील मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरीपर्यंत पोहोचता येईल. लवकरच चाकरमान्यांना परवडतील, असे दर यासाठी निश्चित केले जाणार आहेत.

Amboli: सिंधुदुर्ग-चौकुळ येथील पाणवठ्यात पट्टेरी वाघाचे दर्शन

   Follow us on        
आंबोली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ गावात एका पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. या गावातील जांभळ्याचे कोंड नदीतील एका पाणवठ्यात हा वाघ खडकावर बसून पाणी पिताना आढळून आला. याचे फोटो आणि व्हिडिओ स्थानिक युवकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
आंबोली वनविभागाशी या घटनेबाबत  संपर्क साधला असता त्यांनी या परिसरात पट्टेरी वाघांचे अस्तित्व मान्य केले. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो याच वाघाचे आहेत की नाही? याबाबत निश्चितपणे सांगता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वनखात्याकडे उपलब्ध असलेल्या अधिकृत नोंदीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पट्टयात एकूण आठ पट्टेरी वाघ आहेत. यामध्ये पाच मादी आणि तीन नर वाघांचा समावेश आहे. इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची अधिकृत नोंद वनविभागाच्या दप्तरी झाली आहे. वनविभागाने यापूर्वीच वाघांचे अस्तित्व मान्य केले होते आणि त्यानंतर बऱ्याचदा आंबोली-चौकुळ भागात वाघ दिसून आला होता. काही महिन्यांपूर्वी दोडामार्ग तालुक्यातील भेकुर्ली येथे दिवसाढवळ्या वाघ आढळला होता.
वनविभागाच्या नोंदीनुसार आंबोली ते मांगेली हा वाघांचा प्रमुख भ्रमणमार्ग आहे. काही दिवसांपूर्वी दाभिळमधील जंगल भागातील विहिरीत मृत पट्टेरी वाघीण आढळून आली होती. जी वनविभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाली होती. आणि आता पुन्हा चौकुळ येथे पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याने या पट्टयातील वाघांचे अस्तित्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Yetav App: आता ‘ओला’, ‘उबेर’ प्रमाणे घरबसल्या रिक्षा आणि कार बुकिंग करता येणे शक्य; ‘येतंव अ‍ॅप’ कसे वापरावे?

   Follow us on        
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता रिक्षा प्रवाशांना महानगरातील ‘ओला’, ‘उबेर’ प्रमाणेच प्रवासासाठी घरबसल्या रिक्षा बुकिंग करता येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने ‘येतंव’ हे प्रवासी रिक्षा अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. ‘येतंव’ अ‍ॅप रिक्षा चालक व प्रवाशांसाठी मोफत आहे.सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने व कणकवली तालुका व्यापारी संघाच्या समन्वयाने सोल्युशन प्रा.लि.यांच्या सहकार्याने हे अ‍ॅप विकसित केले आहे. कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते या अ‍ॅपचे रविवारी लोकार्पण झाले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, माजी जिल्हाध्यक्ष विजय वळंजू, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, रिक्षा संघटना कोकण विभागाचे अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष नागेश ओरोसकर, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, झॅपअ‍ॅप सोल्यूशन प्रा.लि. कंपनीचे सुबोध मेस्त्री, आनंद वामनसे आदी उपस्थित होते.
ऱिक्षा चालकांनी असे वापरावे अ‍ॅप
रिक्षाचालकांनी या अ‍ॅपवर प्रथम लोकेशन टाकावे. यामुळे प्रवाशांना सर्च केल्यावर त्यांचे नाव व मोबाईल नंबर दिसणार आहेत. या अ‍ॅपद्वारे प्रवाशी रिक्षा कोठेही बोलवू शकतात. रेल्वे स्थानकावर थेट रिक्षाचालकांशी संपर्क साधता येणार आहे.
5300 जणांनी डाऊनलोड केले अ‍ॅप
गेल्या सव्वा महिन्यात 5300 जणांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले असून 220 रिक्षाचालकांनी नोंदणी केली आहे. पैकी रिक्षाचालकांना या अ‍ॅपवर 1914 कॉल आले आहेत.
‘येतंव’ कसे वापरावे
प्रवाशांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर या अ‍ॅपच्या माध्यमातून त्यांना जवळच्या दोन कि.मी. परिसरातील रिक्षा किंवा चारचाकी गाडी हवी असल्यास त्याची उपलब्धता व संपर्क क्रमांक मिळू शकेल. यामध्ये भाडे ठरवण्याची पद्धत पूर्वीप्रमाणेच असून प्रवासी व रिक्षाचालक परस्पर संवादाद्वारे किंवा व्हॉटस् अ‍ॅप मॅसेजवरून भाडे निश्चित करू शकतात. त्यात अ‍ॅप कोणताही हस्तक्षेप करणार नाही. स्मार्ट फोन नसलेल्या रिक्षाचालक कोणत्याही फोनवरून महासंघाने दिलेल्या 9082408882 क्रमांकावर व्हॉटस् अ‍ॅपद्वारे नोंदणी करू शकतात.
हे अ‍ॅप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक

Konkan Railway Merger: “कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे; मात्र ‘कोकण रेल्वे’ हे नाव…..” मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र

   Follow us on        
Konkan Railway Merger:कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे यासाठी महाराष्ट्र सरकारने अलीकडेच संमती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची संमती कळविण्यासाठी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी हे विलीनीकरण करताना ‘कोकण रेल्वे’ चे स्वत्रंत अस्तित्व टिकवण्यासाठी विलीनीकरणानंतर भारतीय रेल्वेला हस्तांतरित केलेल्या रेल्वे मार्गांसाठी “कोकण रेल्वे” हे नाव कायम ठेवण्यात यावे अशी विनंती केली आहे.
या  पत्राचा मजकूर  खालीलप्रमाणे 
प्रिय श्री. अश्विनी वैष्णव जी,
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना १९९० मध्ये पश्चिम घाटाच्या आव्हानात्मक भूभागावर रेल्वे प्रकल्प राबविण्यासाठी करण्यात आली. महाराष्ट्रातील रोहा ते केरळमधील मंगलोर पर्यंत पसरलेल्या प्रदेशात रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण आणि बांधकाम आणि रेल्वे सेवांचे संचालन करण्याची जबाबदारी या कॉर्पोरेशनवर सोपवण्यात आली होती. सुरुवातीला, त्याच्या भागधारक रचनेत भारत सरकार (५१%), महाराष्ट्र (२२%), कर्नाटक (१५%), गोवा आणि केरळ (प्रत्येकी ६%) राज्यांचा समावेश होता. नंतर ९ नोव्हेंबर २०११ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्याच्या भांडवल रचनेची पुनर्रचना करण्यात आली. महामंडळाने महाराष्ट्रातील रोहा आणि केरळमधील मंगलोर दरम्यान रेल्वे मार्गाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण केले. सध्या ते या मार्गावर विशेष रेल्वे सेवा चालवत आहे, तर इतर विभागीय रेल्वे सेवा देखील या मार्गाचा फायदा घेत आहेत, ज्यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांना सेवा मिळत आहेत.
माझ्या माहितीप्रमाणे उत्पन्नाच्या मर्यादित स्रोतांमुळे, महामंडळ त्यांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यास किंवा वाढत्या मागण्या पूर्ण करण्यास असमर्थ आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर भागधारक राज्यांनी देखील या विलीनीकरणासाठी त्यांची संमती दिली आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची संमती कळवताना मला आनंद होत आहे, ज्यासाठी महाराष्ट्राला ३९६.५४२४ कोटी रुपये परतफेड करावी लागेल, जे पूर्वी राज्याच्या या प्रकल्पामधील वाटा म्हणून महामंडळाला पाठवले गेले होते. याव्यतिरिक्त, विलीनीकरणानंतर भारतीय रेल्वेला हस्तांतरित केलेल्या रेल्वे मार्गांसाठी “कोकण रेल्वे” हे नाव कायम ठेवण्यात यावे, कारण त्यांच्या महत्त्वपूर्ण प्रादेशिक वारशाची दखल घेतली जाईल.
वर उल्लेख केल्याप्रमाणे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाला सूचना द्याव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो.

Ratnagiri: कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी आता थेट नवा मार्ग; मुंबईतील ‘सीलिंक’ च्या धर्तीवर केबल स्टे ब्रिजही उभारला जाणार

   Follow us on        
रत्नागिरी:कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी आता थेट नवा मार्ग होणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन प्रांताना जोडण्यासाठी केबल स्टे ब्रिज उभारण्यात येत आहे. या ब्रिजमुळं सातारा आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे जोडले जाणार आहेत. तसंच, या ब्रिजवर पर्यटकांसाठी व्ह्यूविंग गॅलरीदेखील उभारण्यात येणार आहे. त्यामुळं सह्याद्रीतील कोयनेचे बॅकवॉटर आणि सनराइज व सनसेटही पर्यटकांना पाहता येणार आहे.
या नवीन मार्गामुळं कोयना खोऱ्यातील दुर्गम भागांना जोडणारा आहे. हा पूल साताऱ्यातील तापोळा ते पलीकडेल गाढवली आहिरपर्यंत होणार आहे. त्याच्याजवळच घाटमार्ग असून या पुलामुळं रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरचे अंतर सुमारे 50 किमीने कमी होणार आहे. खेड तालुक्यातील रघुवीर घाटमार्गे या पुलावरुन सातारा व महाबळेश्वर असा प्रवास करता येणार आहे.
मुंबईतील सीलिंकप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकाराचा ब्रिज होणार आहे. हा ब्रिज 540 मीटर लांब आणि 14 मीटर रुंदीचा पूल असणार आहे. मध्यवर्ती भागात 43 मीटर उंचीची पर्यटकांसाठी व्ह्यू गॅलरी उभारली जाणार आहे. त्यामुळं आता रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी पोलादपूरचा आंबेनळी घाटमार्गाऐवजी नवा मार्ग प्रवाशांना खुला होईल. खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या रघुवीर घाटमार्गाने नव्या ब्रिजवरुन पलीकडे तापोळामार्गे महाबळेश्वर व थेट तापोळा कासमार्गे सातारा असा प्रवास करता येणार आहे. याच मार्गावर बामणोली ते आपटी हा आणखी एक पूल उभारला जात आहे. त्यामुळं तापोळा ते सातारा हे अंतर 10 ते 15 किमीने कमी होईल.

Konkan Railway: मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक विस्कळित

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर वेरवली स्थानका नजीक दरड कोसळून या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाल्याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास ही दरड कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या वेळेस कोणतीही गाडी या ठिकाणावरून जात नव्हती त्यामुळे धोका टळला आहे.

ही दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. वाहतुक ठप्प झाल्याने अनेक गाड्या रखडल्या होत्या . मात्र आताच आलेल्या माहितीनुसार दरड बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले आहे. दोन्ही बाजूने वाहतुक सुरू करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले असून या मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ गाडीच्या नेहमीच्या ‘लेटमार्क’ मुळे प्रवासी नाराज

   Follow us on        
Konkan Railway: एलटीटी – मडगाव दरम्यान चालविण्यात येणारी ११०९९/ १११०० एलटीटी मडगाव एक्सप्रेस नेहमीच उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मध्यरात्री १२:४५ वाजता एलटीटी येथून सुटणारी मडगाव एक्सप्रेस मुळातच दोन तास उशिराने सुटते. त्यानंतर पुढे ढकलत ढकलत चालते. परिणामी दररोज चार ते पाच तास विलंबाने धावते. गावी जायची ओढ असल्यामुळे कोकणी माणूस निमूटपणे हा त्रास सहन करत आहे. या गाडीच्या नेहमीच्या लेटमार्क मुळे ८/१० तासांचा प्रवास १४ ते १६ तासांवर जातो. ही गाडी नेहमीच उशिराने चालवली जात असल्याने या गाडीची विश्वासहर्तता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. काहीच पर्याय नसल्याने कोकणकरांना या गाडीने प्रवास करावा लागत आहे.
या गाडीच्या लेटमार्कबद्दल अनेक चाकरमान्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केल्या. पण फारसे गांभीयनि घेतले जात नाही. कोकणवासीयांना होणाऱ्या या त्रासाबद्दल सिंधुदुर्ग रत्नागिरीमधील राजकीय नेत्यांनीच नाही तर मुंबईत विविध पक्षात कार्यरत असलेल्या नेत्यांनीही कोकण रेल्वेसह मध्य रेल्वे प्रशासनाचे कोकणवासीयांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.  हे असे सुरू राहिले तर मग मात्र कोकणी माणूस रस्त्यावर उतरून रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्याची चिन्हे आहेत.
मुंबई LTT मडगाव (अप आणि डाऊन) रेल्वेगाडी गेले आठवडाभर 5 ते 10 तास उशिराने धावत आहे. Where is my train app वर गेल्या 8 दिवसांचे वेळापत्रक आपण तपासून पाहू शकता. प्रवाशांना याचे मेसेज गाडी सुटायच्या वेळेवर येतात. त्यामुळे लोक सामान, बोजा आणि परिवारासोबत प्लॅटफॉर्मवर पोहोचलेले असतात व रात्रंदिवस ताटकळत गाडीची वाट पाहत राहतात. याठिकाणी प्रवाशांच्या वेळेचे मोल शून्य गृहीत धरले जातेय. रेल्वे प्रशासन कधी जागे होणार? विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करणारे रेल्वे प्रशासन मात्र स्वतःच्या चुकीवर प्रायश्चित्त घ्यायला किंवा शिक्षा भोगायला तयार आहे का? कोणत्याही वर्तमानपत्रात किंवा टीव्ही माध्यमांवर याविषयी बातमी नाही, याचेही मोठे आश्चर्य वाटते. या विलंबाचे कारण काय? यार्गावरील अन्य गाड्या मात्र थोड्या विलंबाने का होईना धावत आहेत.  याकरिता कोकणवासीयांसाठी सावंतवाडी टर्मिनस होणे फार गरजेचे आहे. कोकणी माणूस संयमी, समजूतदार व सहनशील असल्याने त्याचा हा छळ होत असेल तर जनआंदोलन उभे राहिल्यास आश्चर्य वाटायला नको.
– गणेश चमणकर, वेंगुर्ले   
मध्य रेल्वेची कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात बेभरवशाची १११०० मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आज (१८ मे, २०२५) मडगावहून तब्बल ९ तास ५६ मिनिटे उशिराने सुटली. मध्य रेल्वेने आता या गाडीला स्वतंत्र रेक उपलब्ध करावा. अन्यथा ही गाडी वेळेत चालणे शक्य नाही.
– अक्षय महापदी, कळवा  
मध्य आणि कोकण रेल्वे ११०९९/१११०० ही सेवा गेली दोन वर्षे नीट चालवत नाही. त्यांनी ही गाडी पश्चिम रेल्वेला चालविण्यास द्यावी १०११५/१०११६ व ११०९९/१११०० या दोन्ही गाड्या एकत्र करून एक नियमित गाडी संध्याकाळी ६ तें १० या वेळेत वांद्रे किंवा नवीन होणाऱ्या जोगेश्वरी टर्मिनस येथून सोडण्याबाबत विचार व्हावा.
– केशव नाईक, सावंतवाडी 

Kudal: डंपरची एसटी बसला जोरदार धडक बसून अपघात

   Follow us on        
चौके: कुडाळ येथून मालवणच्या दिशेने दुपारी 12.30 वाजता सुटणारी कुडाळ मालवण एसटी बस आणि चौके वरून धामापूरच्या दिशेने जाणाऱ्या डंपर यांच्यात चौके नारायण वाडी या ठिकाणी मंगळवारी दुपारी समोरासमोर जोरदार धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात एसटी बसचा चालक व प्रवासी सुदैवाने बचावले मात्र एसटी बसच्या चालकाच्या बाजूने दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
मालवण डेपोची एसटी बस (MH-14 BT-3063) मंगळवारी दुपारी कुडाळ वरून मालवणच्या दिशेला येत असताना चौके नारायण वाडी येथे एसटी बस आणि चौके वरून धमापुरच्या दिशेने जाणाऱ्या डंपर (MH-07- AJ-2810) यांच्यामध्ये एसटी चालकाच्या बाजूने जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एसटी बसचा चालक किरकोळ जखमी होऊन सुदैवाने बचावला. बसमधील प्रवाशांनाही किरकोळ दुखापती झाल्या.. मात्र झालेल्या अपघातात एसटी बसचे मोठे नुकसान झाले. चालक वाहक आणि किरकोळ जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. बसचालक आणि वाहक यांनी अपघाताची खबर मालवण एसटी आगारात दिली असून एसटी प्रशासनाकडून पुढील कार्यवाही करण्याची प्रक्रिया चालू आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search