सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी रमाईनगर परिसरात काल काळ्या Black Panther वाघाचे दर्शन घडल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काल येथील ग्रामस्थ गुरू परब आपल्या शेतात जात असताना त्यांना हा दुर्मिळ जातीचा काळा वाघ दिसला.
गेल्या वर्षी कुडाळ तालुक्यातील गोवारी ह्या गावात काळ्या वाघाचा सव्वा वर्षाचा बछडा एका विहिरीत सापडला होता. सावंतवाडी तालुक्यात या आधी पण ब्लॅक पँथर दिसून आल्याने ह्या जातीच्या वाघाचे अस्तित्त्व परिसरात निश्चित झाले आहे.
कुडाळ येथील गोवारी गावात सापडलेला काळ्या वाघाचा बछडा
सिंधुदुर्ग :कुणकेरी येथे कुणकेरी क्रीडा आणि कला विकास मंडळाच्या वतीने आज दिनांक १५ जानेवारीपासून जिल्हास्तरीय निमंत्रित दशावतार नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा ७ दिवस चालणार असून त्याची सांगता शनिवार दिनांक २१ जानेवारीला होणार आहे.
ह्या स्पर्धेत संध्याकाळी ७ ते १० ह्या वेळेत खालील दशावतार नाटक कंपन्या आपले प्रयोग सादर करतील.
Konkan Railway News : राज्यातील वाढणार्या थंडीचा परिमाण आता कोकण रेल्वे वर होऊ लागला आहे. कोकण रेल्वेमार्गावर मडगाव पेण नजीक काल सकाळी रेल्वे रुळाला तडे जाऊन रुळाचा काही भाग थंडीमुळे तुटल्यामुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परीणाम झाला होता. रेल्वे कर्मचार्याच्या सतर्कतेमुळे सुदैवाने अपघात टळला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेणवरून पनवेलला जाणार्या रेल्वे रुळाला जिते ते आपटा या दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रुळाला तडे जाऊन रुळाचा काही भाग तुटला होता. शुक्रवारी पहाटे हा प्रकार निदर्शनास आला. या मार्गावर रेल्वे जाण्यापूर्वी रेल्वे कर्मचारी रुळाची पाहणी करीत असताना त्यांना सदर प्रकार सकाळी 6 वाजून 22 मिनिटांच्या दरम्यान आढळला. याबाबत रेल्वे कर्मचार्यानी रेल्वेच्या अधिकार्यांना तातडीने सूचित केले.
रेल्वे अधिकार्यांनी तातडीने सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी दिवा स्थानकातून सुटणारी रोहा-दिवा या मेमु रेल्वेला जिते रेल्वे स्थानकानजीक थांबविले. यानंतर मडगाव-नागपूर स्पेशल रेल्वे, पेण येथून सकाळी 6.45 ला सुटणारी पेण-दिवा मेमु रेल्वे व मँगलोर-मुंबई रेल्वे या चार गाड्यांना रोखण्यात आले. त्याचप्रमाणे रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. सकाळी 7.30 वाजता रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. 10 ते 30 किलोमीटर प्रतितास या वेगाने सदर रुळावरून रेल्वे पुढे पाठविण्यात आल्या. थंडीमुळे रेल्वे रुळाला तडे जाण्याचे प्रकार घडत असतात, अशी माहिती यावेळी रेल्वे प्रशासनाकडून कडून देण्यात आली.
Mumbai Goa Highway News:जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हातिवली येथील टोलनाक्यावर टोलवसुली केली जाऊ नये असे निर्देश रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित एजन्सीला दिले आहेत. तसेच ह्या टोल नाक्यापासूनच्या १२ किलोमीटर अंतरावरील वाहनांना टोलमाफी देण्यात येईल असे पण त्यांनी जाहीर केले आहे.
मागे ह्या टोलनाक्यावर टोलवसुली चालू झाली होती. ह्या वसुलीस स्थानिक ग्रामस्थानकडून मोठा विरोध झाला होता, स्थानिक ग्रामस्थांनी आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मिळून ह्याविरोधातआंदोलन केले होते, त्यामुळे हि टोलवसुली थांबवली होती. आता पुन्हा ही टोलवसुली चालू करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी हस्तक्षेप करून जोपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलवसुली केली जाऊ नये असे स्पष्ट आदेश त्यांनी संबधीत अधिकाऱ्यांना दिले आहेत
सिंधुदुर्ग:केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी बीएसएनलचे ११० मोबाईल टॉवर मंजूर केले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेलिकम्युनिकेशनचे जाळे अधिक मजबूत होणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांना नोव्हेंबर महिन्यात पत्र दिले होते. त्या पत्रात त्यांनी जिल्ह्यासाठी १०३ टॉवरची मागणी केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता मोबाईल टॉवरची असलेली गरज लक्षात आणून दिली होती. त्यानुसार त्यांनी मागणी केलेल्या १०३ टॉवरला मंजुरी मिळालेली आहे.
Konkan Railway News | 12/01/2023: कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या एर्नाकुलम – निजामुद्दीन-एर्नाकुलम (२२६५५ / २२६५६) या गाडीला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. हि गाडी थ्री टायर एसी श्रेणीच्या दोन अतिरिक्त कोच सहित चालविण्यात येणार आहे. या अतिरिक्त डब्यांमुळे या गाडीच्या एकूण डब्यांची संख्या एकूण २२ झाली आहे.
खालील तारखेपासून हा बदल करण्यात येणार आहे.
२२६५५ – एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस
दिनांक : १८/०१/२०२३ बुधवारपासून
२२६५६ – हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस
आधीच मुंबई गोवा महामार्गाच्या अपुऱ्या कामामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होत असताना त्यात कंत्राटदार कंपनीच्या चुकीमुळे होणार्या अपघातांची भर पडताना दिसत आहे.
Mumbai Goa Highway News :आज मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने डोंगर कापत असताना निसटलेला एक भला मोठा दगड चक्क रस्त्यावर आला. सुदैवाने त्यावेळी कोणतेच वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. ह्या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी ह्या प्रकारामुळे धास्तावले आहेत.
मागेच अशा दुर्लक्षामुळे येथे असे दोन प्रकार घडले आहेत. एक असाच मोठा दगड निसटून पायथ्याशी वसलेल्या बौद्धवाडीतील एका घराची भिंत फोडून घुसला. सुदैवाने घरी कोणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये घर मालकांस नुकसान भरपाई कंत्राटदार कंपनीकडून दिली गेली. त्यानंतर घाटात संरक्षक भिंती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान भिंती उभारलेल्या असतानाच गेल्या शनिवारी डोंगर कापत असतानाच निसटलेला दगड एका घराजवळ येवून पडला. यात तेथील साहित्याची मोडतोड होवून नुकसान झाले असले तरी मोठी दुर्घटना मात्र टळली.
ह्या सर्व प्रकारांवरून ह्या कामादरम्यान होणारी सुरक्षेच्या उपयोजनांकडे होणारे दुर्लक्ष समोर आले आहे. कंपनी सुरक्षेकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसत आहे.
कोकण रेल्वे मार्गावर विनातिकिट प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून गेल्या सहा महिन्यांत कोकण रेल्वेच्या तिकिट तपासनीसांनी अशा प्रवाशांकडून सुमारे ५ कोटी १६ लाख रुपये दंडापोटी वसूल केले आहेत.
रत्नागिरी :कोकण रेल्वे मार्गावर विनातिकिट प्रवास करणाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईत गेल्या सहा महिन्यात एकूण ८२,५१२ अशा प्रवाशांवर कारवाई करून कोकण रेल्वेच्या तिकिट तपासनीसांनी ५,१६,३३,१९७ रुपये दंडापोटी वसूल केले आहेत.
ऑनलाईन काढलेले तिकीट कन्फर्म झाले नाही तर ते रद्द होते. अशा वेळी काही प्रवासी विनातिकिट डब्यात चढून प्रवास करत असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन बिनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात कोकण रेल्वेने कारवाईला सुरवात केली आहे.
दरम्यान गैरसोय आणि कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावरुन धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस दिनांक २१ जानेवारी पासून सुपरफास्ट म्हणून धावणार आहे. सुपरफास्ट श्रेणीमध्ये समावेश झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने कोकणकन्या एक्स्प्रेसच्या वेळपत्रक आणि गाडीच्या क्रमांकामध्ये बदल केला आहे.
21 जानेवारीपासून मडगाव जंक्शन-मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन कोकणकन्या सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाईल. याशिवाय कोकणकन्या एक्स्प्रेसचा क्रमांकही बदलला आहे. प्रचलित असलेल्या 10112 आणि 10111 या क्रमांकाऐवजी 20112 आणि 20111 या क्रमांकासह धावणार आहे.
ह्या गाडीचे आरक्षण करताना हा नवीन नंबर लिहून आरक्षण अर्ज भरावा जेणेकरून ऐन वेळी गोंधळ होणार नाही. तसेच गाडीच्या वेळापत्रकामध्ये बदल झाला आहे त्याप्रमाणे आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी एसटी विभागातर्फे वर्षअखेर साजरे करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी चालू केलेली ‘रत्नागिरी दर्शन’ ही विशेष सेवा आठवड्यातून दोन दिवस म्हणजे दर शनिवारी व रविवारी चालू ठेवण्याचा निर्णय रत्नागिरी आगाराने घेतला आहे.
वर्षाअखेरीस सोडलेल्या ह्या पर्यटक बससेवेस पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवण्याची मागणी होत होती.
या फेरीत पर्यटकांना रत्नागिरी,राजापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन स्थळे पाहता येतील. दररोज सकाळी ८ वाजता रत्नागिरी स्थानकातून हि बस सोडण्यात येणार आहे.
खालील पर्यटन स्थळे दाखविण्यात येतील.
1.आडिवरे
2. कशेळी कनकादित्य मंदिर,
3. गणेशगुळे,
4. पावस,
5. कोळंबे कातळशिल्प
6. थिबा राजवाडा,
7. भगवती किल्ला,
8. लोकमान्य टिळक जन्मस्थान,
9. गणपतीपुळे
10. आरेवारे समुद्रकिनारा
टीप: प्रवास येथे अल्पोहार म्हणून खिचडी प्रसाद देण्यात येईल.