Mumbai : नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर प्रस्तावित असणार्या पेण ते पत्रादेवी या ग्रीनफील्ड महामार्गास सरकारकडून मान्यता मिळाली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात एक जीआर गुरुवारी प्रसिद्ध केला आहे. सुमारे ३८८ किलोमीटरच्या या महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून काम करणार आहे.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून कोकण विभाग हा पर्यटन, औद्योगिक व वाणिज्य कामांसाठी समृद्ध आहे. कोकण तसेच गोवा ते कोकणातून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या पर्यटकांची, व्यावसायिकांची मोठी संख्या आहे. मुंबई ते कोकण पुढे गोवा असा द्रुतगती महामार्ग झाल्यास औद्योगिक पर्यटन क्षेत्र व दैनंदिन दळणवळण गतिमान होऊन कोकणची सर्वांगीण प्रगती होऊ शकेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावात म्हटले आहे.
कोकण द्रुतगती महामार्ग झाल्यानंतर मुंबईसाठी सर्वात गतिमान महामार्ग तयार होईल. हा महामार्ग नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाईल. त्यामुळे कोकणातून आंतरराष्ट्रीय प्रवास करणे सोयीचे होईल. कोकण द्रुतगती महामार्ग हा रायगड जिह्यातील पेण, अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा तसेच रत्नागिरी जिह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी असा जाणार आहे.
महामार्ग पेण जिह्यातल्या बलवली गावातून सुरू होईल आणि पुढील टप्प्यात या महामार्गाचे बांधकाम करण्यात येईल.
पेण-बलवली ते रायगड/रत्नागिरी सीमा (रायगड जिल्हा) 94.40 किलोमीटर
रायगड/रत्नागिरी सीमा ते गुहागर चिपळूण (रत्नागिरी जिल्हा) 69.39 किलोमीटर
गुहागर,चिपळूण ते रत्नागिरी/सिंधुदुर्ग जिल्हा सीमा (रत्नागिरी जिल्हा) 122.81 किलोमीटर
रत्नागिरी/सिंधुदुर्ग जिल्हा सीमा ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग जिल्हा) असा 100.84 किलोमीटर
असा एकूण 388.45 किलोमीटरचा हा महामार्ग आहे.
या महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई ते कोकण अगदी कमी वेळामध्ये पार करता येणार आहे. त्याच बरोबर मुंबई गोवा महामार्गावरील ताण कमी होईल.