Category Archives: कोकण
Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट तेजस एक्सप्रेसचे इंजिन रत्नागिरी करबुडे दरम्यान बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. या एक्सप्रेसला नवीन इंजिन जोडण्यात आल्याने एका तासाने या रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. मात्र या मार्गावरील काही गाड्या दोन ते तीन तास उशिराने धावत आहेत. तर आज प्रस्थान करणारी गाडी क्रमांक २२१२० मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस आज संध्याकाळी १८.०५ वाजता पुनर्नियोजित Rescheduled करण्यांत आली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणारी सुपरफास्ट तेजस एक्सप्रेस ही रेल्वे गाडी रत्नागिरी करबुडे दरम्याने आली असता या गादीचे इंजिन अचानक बंद पडले. हा प्रकार मंगळवार २१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या काही गाड्या ठीक ठिकाणी थांबवण्यात आल्या. इंजिन नादुरुस्त झाल्याने कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एका तास खोळंबा झाला.
रत्नागिरी रेल्वे स्थानकातून नवीन इंजिन मागवण्यात येऊन तेजस एक्सप्रेस ही गाडी एका तासानंतर मार्गस्थ करण्यात आली. तेजस या गाडीला दुसरे इंजिन जोडल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुर्ववत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या मार्गावरील दिवा – सावंतवाडी, सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस, मडगाव – सीएसएमटी मांडवी, सीएसएमटी – मडगाव मांडवी एक्सप्रेस या गाड्या २ ते ३ तास उशिराने धावत आहेत.
सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्थानकावर परिपूर्ण रेल्वे टर्मिनस व्हावे, या ठिकाणी नवीन टर्मिनस प्लॅटफॉर्म आणि बिल्डिंग व्हावी, या स्थानकाचा समावेश केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेत करावा तसेच सावंतवाडी स्थानकावरून कोरोना काळात काढून घेण्यात आलेला १२४३१/३२ राजधानी एक्सप्रेस व १२२०१/०२ गरीब रथ एक्स्प्रेस चा थांबा पूर्ववत करावा इत्यादी मागण्यांसाठी येत्या २६ जानेवारीला कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ही अराजकीय संघटना रेल रोको आंदोलन करणार आहे. त्याबाबत ची नोटीस संबंधित प्रशासनाला दिलेली होती त्याचाच भाग म्हणून रेल्वे प्रशासनाकडून क्षेत्रीय वाहतूक प्रबंधक श्री शैलेश आंबर्डेकर यांनी आज कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि रेल रोको करू नये असा आशयाचे पत्र संघटनेला सुपूर्द केले.परंतु कोकण रेल्वेने दिलेल्या पत्रात संघटनेच्या मागण्यांसंदर्भात एकही सकारात्मक बाब नसल्याने संघटनेने आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत अशा आशयाचे पत्र क्षेत्रीय वाहतूक प्रबंधक श्री आंबर्डेकर यांना सुपूर्द केले. तसेच आमच्या मागण्यांसंदर्भात बेलापूर येथे व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांचा अध्यक्षतेखाली २३ जानेवारीच्या अगोदर बैठक आयोजित करावी अशी विनंती संघटनेने केली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष ऍड श्री संदीप निंबाळकर, सचिव श्री मिहिर मठकर, सल्लागार श्री सुभाष शिरसाट आदी उपस्थित होते.
मुंबई: रायगड रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी लोकसभा खासदार सुनील तटकरे अध्यक्षतेखाली सोमवार दि. २० जानेवारी, २०२५ सकाळी १०:३० ते १२:३९ या वेळेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार व कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा व इतर अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत आपापल्या समस्या मांडण्यासाठी संबंधित ठिकाणच्या प्रवासी संघटना व प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. आपना सहकारी बँकेचे संचालक तथा रत्नागिरी जिल्हा नियोजन चे सदस्य श्री. अजयशेठ बिरवटकर यांनी जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितिन सखाराम जाधव व अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय मधुकर महापदी यांना निमंत्रित केले होते.
याप्रसंगी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण, रत्नागिरी दिवा गाडी दादरपर्यंत पूर्ववत करणे, मुंबई चिपळूण नवीन गाडी सुरू करणे, पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस कल्याणमार्गे वळवणे, जबलपूर कोईंबतूर एक्सप्रेसला कल्याण येथे थांबा देणे, खेड येथे विविध गाड्यांना थांबा देणे, गोव्यातून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांमध्ये कोकण रेल्वेने रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांना दिलेला अपुरा कोटा वाढवणे किंवा सर्व स्थानकांना समान कोटा देणे आदी महत्त्वाचे विषय मांडण्यात आले.
त्याचबरोबर पेण, नागोठणे, रोहा, माणगाव आणि वीर येथीलही समस्यांवर चर्चा करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी ज्या ज्या गोष्टी शक्य असतील त्या पुढे रेल्वे बोर्ड व मंत्रालयाकडे मांडण्याचे आश्वस्त केले. तसेच खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.
ही बैठक आयोजित करून सर्वांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याबद्दल खासदार श्री. सुनिल तटकरे व बैठकीला आमंत्रित केल्याबद्दल श्री. अजयशेठ बिरवटकर यांचे जल फाऊंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेच्या वतीने आभार.
सिंधुदुर्ग: २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी नियोजित सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी चे मुंबई प्रतिनिधींनी आज सिंधुदुर्गचे नवनियुक्त पालकमंत्री ना. श्री नितेश राणे यांची भेट घेतली. सावंतवाडी टर्मिनस च्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करावी, सावंतवाडीत रेल्वेचे परिपूर्ण टर्मिनस उभारण्यासाठी आपण राज्यशासनामार्फत निधी उपलब्ध करावा, या ठिकाणी कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या गाडी क्र. १२४३१/३२ राजधानी एक्सप्रेस आणि १२२०१/०२ गरीब रथ एक्स्प्रेस चा थांबा पूर्ववत करावा. नव्याने १२१३३/३४ मंगलोर सुपरफास्ट एक्स्प्रेस ला सावंतवाडी थांबा मिळावा, आणि कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे या विषयावर पालकमंत्री श्री नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले. यावर आपण योग्य कार्यवाही करून येत्या काही महिन्यात ही कामे मार्गी लावू असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्याना दिले. यावेळी पालकमंत्री राणे यांचा संघटनेतर्फे शाल आणि भगवी टोपी घालून सत्कार करण्यात आला.
त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पूर्व च्या आमदार श्रीमती सुलभा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना सावंतवाडी टर्मिनस आणि कोकण रेल्वेचे विलीनीकरण या संदर्भात निवेदन देण्यात आले. आणि सावंतवाडी टर्मिनस का गरजेचे आहे हे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पटवून दिले. त्यावर आमदार श्रीमती गायकवाड मॅडम यांनी या संदर्भात आपण राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा कानावर हा विषय घालते असे संघटनेला आश्र्वासित केले.
यावेळी संघटनेचे मुंबई अध्यक्ष विनोद नाईक, प्रकाश येडगे, प्रशांत परब आदी संघटनेचे मुंबई विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करायला गेलेले नायब तहसीलदार प्रतीक आढाव व तलाठी ओंकार केसरकर यांच्यावर डंपर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन डंपर चालकांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्या नेतृत्वाखाली पथक अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी नियुक्त केले आहे. वालावल मंडळ अधिकारी धनंजय चंद्रकांत सिंगनाथ, चेंदवणचे ग्राम महसूल अधिकारी भरत नेरकर, तुळसुली तर्फ माणगावचे ओंकार संजय केसरकर, घाटकरनगरचे नीलेश गौतम कांबळे, माणकादेवीचेच्या स्नेहल जयवंत सागरे, सोनवडे तर्फ कळसुलीचे शिवदास राठोड, पणदूरचे रणजित कदम, शिवापूरचे सूरज भांदिगरे या कर्मचार्यांचा या पथकात समावेश आहे.
दरम्यान अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने आता कंबर कसली आहे. यासाठी नेमलेले अधिकार्यांचे पथक सर्वत्र फिरत असताना शुक्रवार १७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता या पथकाला पिंगुळी गुढीपूर येथील शिक्षक कॉलनी जवळ डंपर लागल्याचे आढळून आले.
या ठिकाणी चार डंपर होते. या डंपरांची तपासणी केली असता यामध्ये अनधिकृत अवैध वाळू भरल्याचे दिसून आले. हे डंपर कोणाचे आहेत किंवा याचे चालक कोण आहेत याची पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी वाट अधिकाऱ्यांनी पाहिली. मात्र उशिरापर्यंत कुणी आले नाही त्यानंतर रात्री १ वाजता डंपर क्रमांक (एमएच- ०७- एक्स- ०२६७) चा चालक येथे उपस्थित झाला. त्याने आपले नाव मिलिंद नाईक असे सांगितले. त्या ठिकाणी पंच यादी केल्यानंतर हा डंपर कुडाळ तहसील कार्यालय येथे तलाठी निलेश कांबळे यांच्यासह पाठवून देण्यात आला.
उर्वरित तीन डंपरचे चालक यांची वाट पाहिल्यानंतर पथकातील काही कर्मचारी गस्तीसाठी गेले. त्यानंतर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणच्या डंपर सुरू झाल्याचा आवाज आल्यामुळे नायब तहसीलदार प्रतीक आढाव हे पाहण्यासाठी गेले (एमएच-०६- एक्यू ७०९७) या डंपरच्या चालकाला आवाज देऊन थांबण्यासाठी सांगितले. मात्र त्यांनी काही न ऐकता डंपर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा नायब तहसीलदार प्रतीक आढाव हे बाजूला गेल्यामुळे वाचले. हा डंपर वेगाने निघून गेला त्याच्या पाठलाग नायब तहसीलदार यांनी केला मात्र तो मिळाला नाही. दरम्यान नायब तहसीलदार आढाव पुन्हा पिंगुळी येथे आले.
तर पकडलेल्या डंपर पैकी (एमएच -०७- सी- ६६३१) या डंपरच्या चालकांनी तलाठी ओंकार केसरकर यांच्या अंगावर डंपर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दुसऱ्या बाजूला उडी मारल्यामुळे ते वाचले. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी तक्रार दाखल केली असून दोन डंपर चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर दोन डंपर महसूल विभागाने कुडाळ तहसील कार्यालय येथे आणले आहेत.
मुंबई: प्रशासन सुलभ होण्याच्या दृष्टीने आणि स्थानिक विकासाला गती मिळण्यासाठी महाराष्ट्रातील सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांतून नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. येत्या २६ जानेवारी रोजी या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे अशा आशयाची बातमी समाज माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र ही बातमी खरी नसून अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती समोर येत आहे.
या बातमी नुसार राज्यात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी या २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मंडणगड हा स्वतंत्र जिल्हा घोषित होण्याची शक्यता आहे. तर रायगड जिल्हय़ाचे विभाजन होऊन महाड हा जिल्हा अस्तित्वात येणार आहे. २६ जानेवारीला या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मात्र या बातमीला कोणताही आधार नसून जुन्या संदर्भाचा वापर करून ही फेक बातमी पसरविण्यात येत आहे.
पालघर:- रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी स्वराज्य जननी, राजमाता जिजाबाई भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त “बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट” च्या वतीने “एकलव्य आश्रम शाळा” हिरडपाडा, ता. जव्हार, जि. पालघर या आदिवासी शाळेस सदिच्छा भेट देण्यात आली. सदर प्रसंगी “बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट” कडून या शाळेस राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत तुकाराम महाराज, राजश्री शाहू महाराज, स्वामी विवेकानंद अशा अनेक थोर व्यक्तींचे फ्लेक्स फोटो व नकाशे वेगवेगळ्या वर्गात लावण्यासाठी भेट देण्यात आले. शिवाय शाळेतील सर्व मुलांना खाऊचे वाटप सुद्धा करण्यात आले….
सदर कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नंदकुमार राणे, सचिव श्री. नारायण चव्हाण, उपाध्यक्ष श्री. ओमप्रकाश सिंह, खजिनदार श्री. सूरज सिंह, तसेच विश्वस्त श्री. सतिश राणे व सुनिल सिंह उपस्थित होते. शाळेतर्फे शाळेचे संचालक श्री . दिलिप पटेकर, मुख्याध्यापक श्री. मेदगे, शिक्षक श्री. राजेश विंचूरकर, श्री. नागरगोजे, श्री.जरे, श्री. पाटील , श्री. इंगळे, श्री. बडगुजर उपस्थित होते.
ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नंदकुमार राणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व ट्रस्ट तर्फे केली जाणारी मदत योग्य ठिकाणी पोहचत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले आणि उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना शूभेच्छा दिल्या……











