Category Archives: कोकण

सावंतवाडी: दुचाकी अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

सावंतवाडी, ता.०३ –

चराठा-नमसवाडी रस्त्यावर दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृताचे नाव परशुराम प्रकाश पोखरे (वय ३२) असे आहे. हा अपघात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम पोखरे हे म्हापसा येथील एका कंपनीत नोकरी करत होते. रविवारी सुट्टीमुळे ते काही कामानिमित्त गावी आले होते. चराठा येथे चिकन घेऊन ते आपल्या घरी परत जात होते. दरम्यान, ओटवणे रस्त्यावर ग्रामपंचायतीपासून सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या नमसवाडी येथील चढावावर त्यांच्या दुचाकीवरील ताबा सुटला व दुचाकी बाजूच्या दगडाला धडकली. धडक इतकी जोरदार होती की, परशुराम गाडीसह रस्त्यावर आपटले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती खूप गंभीर असल्याने त्यांना तातडीने गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात हलविण्याचा निर्णय झाला. मात्र दुर्दैवाने रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

या अपघाताची नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

वैभववाडी: देव तरी त्याला कोण मारी! करूळ घाटातील अपघातात दोघेजण थोडक्यात वाचले

   Follow us on        

वैभववाडी : घाटातील दाट धुक्यामुळे चालकाला अंदाज न आल्याने एक आयशर टेम्पो कोसळून गंभीर अपघात झाला. कोल्हापूरहून सिमेंटचे पत्रे घेऊन सावंतवाडीच्या दिशेने जाणारा हा टेम्पो बुधवारी रात्री सुमारे ९ वाजता करुळ घाटात पलटी होऊन दरीत पडता पडता वाचला.

अपघातग्रस्त टेम्पो (एमएच ०९-एक्स ४७४७) अभिजित कांबळी चालवत होते . घाटात धुक्यामुळे एका वळणावर नियंत्रण सुटल्याने त्याने ब्रेक मारला पण टेम्पो थेट भिंतीवर आदळला आणि पलटी झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून हा टेम्पो अगदी टोकावर लटकून राहिला आणि मोठी हानी टळली.  टेम्पोचा पुढचा भाग भिंतीवर आदळून निकामी झाला असून काही भाग दरीत विखुरलेला आहे. सिमेंटचे पत्रे दरीत कोसळले आहेत.

   

सुदैवाने या भीषण अपघातातून चालक आणि क्लिनर दोघेही थोडक्यात बचावले असून मोठ्या शिताफीने ते बाहेर पडले.  चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर गगनबावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून टेम्पो हटविण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.

 

Khed: उतारावर बसचा ब्रेक फेल; चालकाच्या सतर्कतेमुळे २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले

   Follow us on        

भोसते, खेड (ता. खेड)

खेड तालुक्यातील भोसते गावातून विद्यार्थ्यांना घेऊन शहराकडे येणाऱ्या एका खासगी शाळेच्या बसचे ब्रेक अचानक फेल झाल्याची घटना घडली. मात्र बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला असून, सुमारे २० ते २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. ही घटना शहरातील जगबुडी नदीच्या किनारी घडली असून नागरिकांमध्ये मोठा हलकल्लोळ उडाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसते गावातून खेडकडे येणारी शाळेची बस अचानक ब्रेक फेल झाल्याने एका उतारावरून वेगात खाली येत होती. या ठिकाणी विद्युत महामंडळाचा मोठा ट्रान्सफॉर्मर असून, शेजारीच भोसते पूल आहे. या पुलावरून नेहमीच दुचाकी, चारचाकी वाहने आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत अपघात घडल्यास मोठ्या जिवितहानीची शक्यता होती.

ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच चालकाने विलक्षण संयम राखत आणि प्रसंगावधान राखत, वाहन एका बाजूला वळवले आणि झाडांमध्ये अडवले. त्यामुळे बसची गती कमी झाली आणि ती थांबली. जर चालकाने योग्य वेळी निर्णय घेतला नसता, तर बस पुलावरून सरळ वाहतुकीतून येणाऱ्या वाहनांना धडकली असती आणि मोठा अपघात झाला असता.

या बसमध्ये सुमारे २० ते २५ विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे त्यांच्या जीवाला धोका टळला आहे. नागरिकांनी “देव तारी त्याला कोण मारी” अशा भावना व्यक्त करत चालकाचे कौतुक केले आहे.

 

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात युवती गंभीर जखमी

   Follow us on        

मुंबई-गोवा महामार्ग | ३० जुलै: मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे एका भरधाव ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दिशा ज्ञानेश्वर नारुजी (वय २६, रा. बांदा पानवळ) या तरुणी गंभीररीत्या जखमी झाली.

संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येत वाहतूक रोखून धरली. अपघातग्रस्त ट्रकला घेराव घालण्यात आला आणि चालकाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. जखमी युवतीला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक गस्त आणि वेगमर्यादा काटेकोरपणे पाळण्याची मागणी केली आहे.

 

Konkan Railway: स्वातंत्र्यदिनाच्या लांब सुट्टीसाठी मुंबई-सावंतवाडी विशेष गाड्या चालविण्यात याव्यात

   Follow us on        

मुंबई, ३० जुलै २०२५: येत्या १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यानच्या लांब सुट्टीच्या पार्श्वभूमीवर, कोकणमार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई ते सावंतवाडी मार्गावर विशेष गाड्या चालवाव्यात, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती कडून करण्यात आली आहे.

मुंबई–कोकण दरम्यान धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस, वंदे भारत, तेजस, जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा, मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस यांसारख्या सर्व गाड्यांचे आरक्षण या काळात प्रचंड गर्दीमुळे प्रतीक्षा यादी अथवा “नो रूम” (REGRET) दाखवत आहेत.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, जर वेळेवर अतिरिक्त गाड्यांची घोषणा झाली नाही, तर पनवेल, ठाणे, दादर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवर गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. याआधीही अशा लांब सुट्ट्यांमध्ये अपुरी रेल्वे व्यवस्था असल्याने रेल्वेरोको, दगडफेक आणि प्रवाशांना आरक्षित तिकीट असूनही चढता न आल्याच्या घटना घडल्या आहेत.

याआधीही प्रवाशांकडून अनेक वेळा विशेष गाड्यांची मागणी करण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे यंदाच्या लांब सुट्टीसाठी सीएसएमटी–सावंतवाडी रोड आणि बांद्रा टर्मिनस–सावंतवाडी रोड दरम्यान विशेष गाड्यांची तातडीने घोषणा करावी, अशी प्रवाशांची आग्रही मागणी आहे.

विशेष गाड्या न सोडल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी ई-मेल निवेदनाद्वारे समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे.

 

कोकण रेल्वेची भरती – २०२५: सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागांतील पदांसाठी थेट मुलाखती

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागात कंत्राटी पद्धतीने भरती जाहीर केली असून, जम्मू-काश्मीरमधील कटरा ते बनिहाल दरम्यानच्या युएसबीआरएल प्रकल्पासाठी ही भरती करण्यात येणार आहे. एकूण २८ पदांसाठी ही भरती असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या पदांमध्ये कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (JTA) साठी ४ जागा आणि टेक्निशियन पदासाठी २४ जागांचा समावेश आहे.

या पदांसाठी उमेदवारांना पाच वर्षांच्या ठराविक कालावधीसाठी नियुक्त करण्यात येणार असून कामकाज समाधानकारक राहिल्यास कालावधी वाढविण्याचा अधिकार कोकण रेल्वेकडे राहील. JTA पदासाठी पात्र उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, IT किंवा संगणक शाखेतील तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच रेल्वेमधील सिग्नल प्रणालीत किमान एक वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. टेक्निशियन पदासाठी ITI, B.Sc. किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा आवश्यक असून अनुभव नसलेल्या उमेदवारांना नियुक्तीनंतर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

JTA पदासाठी मासिक एकूण वेतन ₹४३,३८०/- इतके असेल, तर टेक्निशियनसाठी ₹३७,५००/- इतके वेतन ठरविण्यात आले आहे. त्याशिवाय नियुक्त उमेदवारांना विमा संरक्षण, आरोग्य विमा भत्ता, रेल्वे पास, विश्रांतीगृह, प्रवास भत्ता, सुट्ट्या यांसारख्या विविध सुविधा देण्यात येणार आहेत. उमेदवाराचे वय १ जुलै २०२५ रोजी ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे. अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

JTA पदासाठी मुलाखत ५ ऑगस्ट २०२५ रोजी, तर टेक्निशियन पदासाठी ७ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. दोन्ही मुलाखती सकाळी ९ ते १२ दरम्यान नोंदणीसह जम्मूतील त्रिन्ठा, ग्रानमोर येथील कोकण रेल्वेच्या प्रकल्प कार्यालयात पार पडतील. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहताना सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे आणि स्वमोसताखत प्रतिंसह अर्जाचा नमुना भरून आणणे बंधनकारक आहे.

ही संधी केवळ तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी असून, कंत्राटी स्वरूपाची असल्याने उमेदवारांनी सर्व अटी व नियम समजून घेऊनच अर्ज करावा. या भरतीबाबत अधिक माहिती व अर्ज नमुना कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.konkanrailway.com उपलब्ध आहे.

कोकण रेल्वेच्या या भरतीमुळे तांत्रिक क्षेत्रातील तरुणांना उत्तम संधी उपलब्ध होणार असून जम्मू-काश्मीरमधील प्रकल्पावर कार्य करण्याचा अनुभव मिळणार आहे. ही भरती पारदर्शक पद्धतीने थेट मुलाखतीद्वारे पार पडणार असल्यामुळे पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

सावंतवाडी स्थानकात गाड्यांच्या थांब्यांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

   Follow us on        

सिंधुदुर्ग : सावंतवाडी रोड (ZBTT) रेल्वे स्थानकात पुन्हा गाड्यांचे थांबे सुरु करण्यात यावे, तसेच काही नव्या गाड्यांनाही थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. त्यांनी १७ जुलै २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत पत्र पाठवले असून स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्यांवर लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

खासदार सुळे यांनी पत्रात नमूद केले आहे की, कोविड-१९ महामारीपूर्वी १२२०१/१२२०२ (एलटीटी-कोचुवेली गरीब रथ एक्सप्रेस) आणि १२४३४/१२४३१ (ह. निजामुद्दीन-तिरुअनंतपुरम एक्सप्रेस) या गाड्यांचा सावंतवाडी स्थानकात नियमित थांबा होता. या थांब्यांमुळे स्थानिक प्रवासी आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा फायदा होत असे. मात्र, या थांब्यांच्या बंदीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

त्याचबरोबर १२१३३/१२१३४ (मंगलोर एक्सप्रेस) या गाडीला देखील सावंतवाडीत थांबा देण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे मांडली आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात, कोकणात हजारो लोक प्रवास करतात आणि थांबा नसल्यामुळे प्रवासात अडचणी निर्माण होतात, असेही त्या म्हणाल्या.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयाकडे पुढील मागण्या मांडल्या आहेत:

  • गाडी क्र. १२२०१/१२२०२ आणि १२४३४/१२४३१ साठी सावंतवाडी येथे पुन्हा थांबा सुरू करावा

  • गाडी क्र. १२१३३/१२१३४ (मंगलोर एक्सप्रेस) साठी  सावंतवाडी येथे नवीन थांबा मंजूर करावा

या थांब्यामुळे स्थानिक जनतेच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण होतील आणि संपूर्ण कोकण परिसरात रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढेल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘शिवसेना एक्सप्रेस’

   Follow us on        

मुंबई, दि. २९: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेनेच्या वतीने एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘शिवसेना एक्सप्रेस’ नावाने मोफत विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येत असून, या सेवेमुळे अनेक चाकरमान्यांना वेळेवर आणि विनाखर्च आपल्या गावी गणपती साजरा करण्याची संधी मिळणार आहे.

ही विशेष रेल्वे २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकातून कुडाळकडे रवाना होणार आहे. मात्र ही मोफत सेवा फक्त पूर्वनियोजित बुकिंग केलेल्या प्रवाशांसाठीच उपलब्ध असणार आहे. बुकिंगसाठी सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत संपर्क साधता येईल.

 

या उपक्रमाचे आयोजन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९६६५८९६९६६ किंवा ९६६५२७०२३१ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर अजून काही गाड्यांची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: गणेशोत्सव २०२५ दरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढण्याची शक्यता लक्षात घेता, प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाला अधिक सुलभ व आरामदायक करण्यासाठी कोकण रेल्वेने अजून काही अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्या विशेषतः गणेशभक्त, सुट्टीसाठी कोकणात जाणारे प्रवासी आणि गावाकडची वाट धरू इच्छिणाऱ्यांसाठी नियोजित करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल आणि त्यांना सुट्टीचा आनंद अधिक निर्बंधांशिवाय घेता येईल.

या विशेष गाड्यांचे वेळापत्रक, मार्ग व थांबे यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

१) क्रमांक ०११३१ / ०११३२ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष (आठवड्यातून दोनदा): 

गाडी क्रमांक ०११३१ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड विशेष (आठवड्यातून दोनदा) २८/०८/२०२५, ३१/०८/२०२५, ०४/०९/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी सकाळी ८:४५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथून सुटेल. ही ट्रेन त्याच दिवशी २२:२० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३२ सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष (द्वि-साप्ताहिक) सावंतवाडी रोडवरून २८/०८/२०२५, ३१/०८/२०२५, ०४/०९/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी २३:२० वाजता सुटेल. ही गाडी लोकमान्य टिळक (टी) येथे दुसऱ्या दिवशी १२:३० वाजता पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबेल.

रचना : एकूण २२ कोच = ३ टायर एसी – ०२ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरल – ०६ कोच, एसएलआर – ०२.

२) ट्रेन क्रमांक ०११३३ / ०११३४ दिवा जंक्शन – खेड – दिवा जंक्शन मेमू स्पेशल (दैनिक): 

गाडी क्रमांक ०११३३ दिवा जंक्शन – खेड मेमू स्पेशल (दैनिक) २२/०८/२०२५ ते ०८/०९/२०२५ पर्यंत दररोज दिवा जंक्शन येथून दुपारी १:४० वाजता सुटेल. ही ट्रेन त्याच दिवशी रात्री २०:०० वाजता खेड येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३४ खेड – दिवा जंक्शन मेमू स्पेशल (दैनिक) २३/०८/२०२५ ते ०९/०९/२०२५ पर्यंत दररोज सकाळी ८:०० वाजता खेड येथून निघेल. ही ट्रेन त्याच दिवशी दुपारी १:०० वाजता दिवा जंक्शन येथे पोहोचेल.

गाडी निलजे, तळोजा पंचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे,दिवाणखवती,कळंबणी बुद्रुक,येथे थांबेल.

रचना : एकूण 08 मेमू कोच.

३) गाडी क्रमांक ०१००४ / ०१००३ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष: )

गाडी क्रमांक ०१००४ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष (दैनिक) दर रविवारी म्हणजे २४/०८/२०२५, ३१/०८/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी १६:३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६:०० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून दर सोमवारी म्हणजेच २५/०८/२०२५, ०१/०९/२०२५ आणि ०८/०९/२०२५ रोजी सकाळी ८:२० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री २२:४० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.

थांबे – करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे

डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच = २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०३ कोच, ३ टायर एसी इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

या गाड्यांसाठी आरक्षणाची तारीख जाहीर करण्यात आली नसून लवकरच त्याची ती जाहीर करण्यात येणार आहे.

कोकणातील नागपंचमी: सर्पपूजेचा श्रद्धेचा सण

   Follow us on        

भारताची संस्कृती ही निसर्गपूजेवर आधारित आहे आणि विविध जीवसृष्टीशी सहअस्तित्वाचा संदेश देणारे सण आपण साजरे करतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी, विशेषतः कोकणातील नागपंचमी ही पारंपरिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक श्रद्धेची सुंदर अभिव्यक्ती आहे.

नागपंचमीचा पारंपरिक संदर्भ

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. यामागे प्राचीन आख्यायिका, धार्मिक कथा आणि लोकसाहित्य आहेत. पुराणानुसार, या दिवशी शेषनागाची पूजा केल्यास भय, रोग, संकट टळते आणि सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते. कोकणात नागदेवतेबद्दल विशेष श्रद्धा असून घराघरांतून या दिवशी सर्पपूजा केली जाते.

कोकणातील सण साजरा करण्याची वैशिष्ट्ये

कोकणातील नागपंचमीची पूजा वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केली जाते:

नागपंचमीला घरोघरी नागदेवतेच्या मूर्तीची पूजा केली जाते. पूर्वी घरोघरी स्त्रिया नदीकाठची किंवा विशिष्ट मऊ माती घेऊन नागदेवतेच्या मूर्ती स्वतः तयार करत असत. आता या मूर्ती बाजारात उपलब्ध होत आहेत. या मूर्ती घराच्या पूजास्थानी ठेवून त्यांची विधिपूर्वक पूजा होते. नागदेवतेला दूध, फळे, लाह्या, नारळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. साखर घालून केलेले दूध सर्पांना अर्पण करणे ही श्रद्धेची खूण मानली जाते. काही घरांमध्ये हळद-कुंकवाने किंवा शाडूने भिंतीवर किंवा उंबरठ्यावर नागाचे चित्र रंगवले जाते. हे चित्र संकटांपासून रक्षण करणारे मानले जाते.

कोकणात जंगल आणि शेतीशी नाते असल्याने सर्पांशी अनेक वेळा थेट सामना होतो. त्यामुळे त्यांच्याशी सौहार्दपूर्ण सहअस्तित्व राखण्याचा संदेश या सणातून मिळतो.

सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्टीने महत्त्व

नागपंचमीचा सण हा केवळ धार्मिकच नव्हे, तर पर्यावरणीय जागृतीचा संदेशही देतो. सापांचा परिसंस्थेतील महत्त्वाचा सहभाग असून त्यांचं अस्तित्व शेती आणि निसर्गासाठी आवश्यक आहे. सर्पांना न मारता त्यांना वाचवण्याचा संदेश नागपंचमी देतो.

कोकणातील नागपंचमी हा केवळ एक सण नाही, तर निसर्गाशी नातं जोडणारा, सजीव सृष्टीविषयी आदर निर्माण करणारा आणि पारंपरिक श्रद्धा जपणारा एक संस्कृतिक पर्व आहे. मातीतून मूर्ती बनवणं, नैवेद्य अर्पण करणं, सहअस्तित्वाचा विचार – हे सर्व कोकणातील जीवनपद्धतीचं प्रतिबिंब आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search