सावंतवाडी : बहुचर्चित संकेश्वर-बांदा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की सातोळी बावळाट मार्गे बांदा शहरात जाणार याबद्दल शासनाने काही निश्चित माहिती दिली नसल्याने येथील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र शासनाच्या कार्यालयां दरम्यान होणार्या पत्र व्यवहारांत हा मार्गच्या नावात माडखोल-सावंतवाडी-इन्सुली असे नमूद केल्याने हा मार्ग सावंतवाडीहून बांदा शहरात जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
कोल्हापुर राष्ट्रीय महामार्ग विभागाने सावंतवाडी बांधकाम विभागाला एक पत्र पाठवले आहे. संकेश्वर ते आंबोली फाट्या पर्यंत रस्त्याच्या रुंदीरकण व मजबूती करणाचे काम सुरू आहे. तो भाग आपल्या विभागाकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी या पत्राद्वारे कोल्हापुर राष्ट्रीय महामार्ग विभागाने सावंतवाडी बांधकाम विभागाकडे केली आहे.
नियोजित संकेश्वर-बांदा क्रमांक ५४८ हा महामार्ग नेमका दाणेली-बावळाट मार्गे बांद्यात जाणार की सावंतवाडी शहरातून जाणार? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत अधिकृत रेकॉर्ड कोणाचकडे नाही. अद्याप पर्यत आंबोलीच्या पुढे या रस्त्याचे सर्व्हे केला गेला नाही आहे. मात्र आज बांधकाम विभागाला रस्ता व त्या संबंधी असलेले रेकॉर्ड वर्ग करण्याबाबत पत्र झाले आहे. त्यात हा महामार्ग माडखोल, सावंतवाडी, इन्सुली येथून जाणार असल्याचे घोषित केल्याचा उल्लेख आहे. मात्र पत्रव्यवहारात असा उल्लेख केला असला तरी शासनाकडून या महामार्गाचा अंतिम आराखडा जाहीर केल्याशिवाय हा महामार्ग नक्की कुठून जाणार हे १००% खात्रीने सांगणे चुकीचे ठरेल.
सावंतवाडीकरांची मागणी..
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरा बाहेरून नेण्यात आला आहे. पूर्वीचा जुना मुंबई गोवा महामार्ग सावंतवाडी शहरातून जात होता. मात्र वेगवान प्रवासाच्या नावाखाली तो बाहेरून नेण्यात आला. त्याचा शहराच्या विकासावर तसेच पर्यटनावर खूप मोठा परिणाम झाला. त्यात संकेश्वर-बांदा महामार्ग सातोळी बावळाट मार्गे बांदा शहरात नेणार असल्याची चर्चा चालू झाली. मात्र या गोष्टीला सावंतवाडीस्थित नागरिकांकडून विरोध होत आहे. निदान हा महामार्ग तरी सावंतवाडी शहरातूनच नेण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शक्तिपीठ महामार्गाचे काय?
समृद्धी महामार्गा पेक्षाही लांबीला मोठा असलेला नागपूर – गोवा महामार्ग तळकोकणातून जाणार आहे. या महामार्गाच्या आरंभीक तथा कच्च्या आराखड्यानुसार हा महामार्गसुद्धा आंबोली मार्गे गोव्याला जाणार आहे. मात्र हा मार्ग आंबोली ते गोवा कोणत्या गावातून /शहरातून जाणार याबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह आहे.