Category Archives: कोकण
मुणगे : आचऱ्याहून देवगडला (Devgad) जाणाऱ्या बसचे चाक मातीच्या ढिगाऱ्यावर चढल्याने चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याजवळील घरात घुसली. या अपघातात (Bus Accident) चालक बापू लक्ष्मण काळे (वय ५४, रा. तळेरे) गंभीर जखमी झाले. त्यांना ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अपघात काल (शनिवार) दुपारी अडीचच्या सुमारास पोयरे-गोंदापूर (ता. देवगड) येथे झाला. यात वाहकासह दोन प्रवासीही जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी : आचरा-खुडीमार्गे देवगड बस घेऊन दुपारी चालक बापू काळे निघाले होते. बस दुपारी अडीचच्या सुमारास पोयरे-गोंदापूर येथे आली असता चालक काळे यांचा अचानक बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याजवळ असलेल्या संजय सावंत यांच्या घराला धडकली.
मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ प्रकाश पालव, दीपक अपराज, नितीन जोईल, अमर अपराज, प्रथमेश पालव, किशोर पालव, पोयरे उपसरपंच समीर तावडे, मंगेश पालव यांसह ग्रामस्थांनी धाव घेतली. तत्काळ मदतकार्य सुरू करून बसमध्ये अडकलेल्या चालकाला लोखंडी पाराने दरवाजा तोडून बाहेर काढले. अपघातात चालक काळे यांच्यासह वाहक राजेंद्र मनोहर जाधव व प्रवासी रुही दीनानाथ पडवळ (वय २१) व मिताली प्रवीण मुणगेकर (१९, दोघे रा. कुडोपी) जखमी झाले.
कोल्हापूर :कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाची प्रकिया सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी ते सोमवारी कोल्हापूर स्थानकावर आले होते.
कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम गती शक्ति योजनेतून केले जाणार आहे. त्याकरिता डीपीआर काढण्याचे काम चालू आहे. डीपीआर मंजूर झाल्यावर निधी उपलब्ध होईल आणि ताबडतोब भूसंपादन प्रक्रियेस सुरवात होईल असे ते यावेळी म्हणालेत.
वैभववाडी-कोल्हापूर मार्गाची पीएम गतीशक्ती अंतर्गत शिफारस करण्यात आली आहे. या मार्गासाठी 3411.17 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सन 2015 मध्ये वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाची घोषणा केली. त्यानंतर आठ वर्षांपासून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे हा रेल्वेमार्गाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते. कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे. कोकणातील मालही मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.
सिंधुदुर्ग-मालवण: दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या आंगणेवाडीची जत्रा यंदा शनिवारी दिनांक ०२ मार्च २०२४ या दिवशी संपन्न होणार आहे. नुकतीच या यात्रेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे.
आंगणेवाडीच्या यात्रेसाठी देवीला कौल लावून तारीख निश्चित करण्याची पद्धत आहे. आजही लावलेल्या कौलानुसार शनिवार ०२ मार्च २०२४ हा दिवस यात्रेसाठी ठरवण्यात आला आहे.
दरवर्षी कोकणवासियांना या यात्रेच्या तारखेबद्दल उत्सुकता असते. आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला या जत्रेत दर्शनाला भाविक देशा-परदेशातून येतात.आंगणेवाडीच्या देवीच्या दर्शनाला या जत्रोत्सवामध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय मंडळी आवर्जुन हजेरी लावतात. लाखो भक्त दिवसभरात देवीचं दर्शन घेतात. यासाठी विशेष सोय केली जाते. रेल्वे प्रशासनाकडूनही विशेष रेल्वे फेर्या चालवल्या जातात. एसटी कडूनही भाविकांना खास बससेवा असते.
Akshay Mahapadi
Mumbai Goa Highway: गोव्यात जाणे आता महागणार आहे. गोवा राज्यात जाणाऱ्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पर्यटकांच्या वाहनांना आता टोल देणे बंधनकारक होणार आहे. गोवा राज्याच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर टोलनाके बसवण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना. नितीन गडकरी यांनी पणजी (गोवा) येथे दिले. तीन राज्यांचे प्रमुख मंत्री आणि रस्ते वाहतूक संचालकांच्या बैठकीमध्ये हे निर्देश ना. गडकरी यांनी दिले. त्यामुळे आता गोवा राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या वाहनांसाठी बांदा – पत्रादेवी बॉर्डरवर टोल नाका कार्यान्वित होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
पणजी गोवा येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह तीन राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गोवा राज्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना आता टोल लागणार असून हा टोलनाका गोव्याच्या एन्ट्री पॉईंटवर बसविण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव गोवा शासनाकडून रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आला आहे. ना. नितीन गडकरी यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र – गोवा राज्याच्या सीमेवर बांदा येथे आरटीओ विभागाचा टोलनाका सुमारे ३२ एकर जागा संपादन करून याआधीच उभारण्यात आलेला आहे. मात्र कधीपासून टोल घेण्यास सुरुवात करणार, कोणाला या टोल मधून सवलत असेल, टोलचे दर काय असतिल याची अद्याप निश्चिती झालेली नाही.