Category Archives: कोकण
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. महामार्गाच्या अपूर्णावस्थेतील कामांमुळे चाकरमान्यांना प्रत्येक सणात जीवघेणा प्रवास करत गाव गाठावे लागत आहे. महामार्ग काम रखडल्याच्या निषेधार्थ मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती १३ मार्च रोजी सायंकाळी ६ वा. माणगाव-बायपास व संगमेश्वर एसटी आगारासमोर सरकारच्या ‘डेडलाईन’ची होळी पेटवणार आहे. महामार्गावरील पळस्पेपासून सिंधुदुर्गपर्यंत एकाच दिवशी आंदोलन छेडून प्रशासनाच्या नावाने ‘शिमगा’ करणार आहे.
मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वाच्या आजवर देण्यात आलेल्या सर्व ‘डेडलाईन’ हवेत विरल्या आहेत. महामार्गाच्या अपूर्णावस्थेतील कामासह ठिकठिकाणी निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामामुळे कोकणवासियांची कसरत अजूनही कायम आहे. प्रत्येक सणांपूर्वी महामार्गाचे काम पूर्ण होईल, अशी हमी दिली जाते. मात्र सण संपल्यानंतर त्याकडे कानाडोळा करत महामार्गाचे संथगतीने काम सुरू असून १४ वर्षे लोटून अजूनही कोकणवासियांचा वनवास संपलेला नाही. महामार्गप्रश्नी महामार्ग जनआक्रोश समितीने सातत्याने महामार्गावर आंदोलने, मोर्चे काढून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, वेळोवेळी समितीच्या शिष्टमंडळाला देण्यात आलेल्या ‘डेडलाईन’ आजमितीसही पूर्ण झालेल्या नाहीत. या निषेधार्थ शिमगोत्सवात जनआक्रोश समितीने सरकारसह प्रशासनाच्या नावाने शिमगा करण्याचे अस्त्र उगारले आहे. या निषेध आंदोलनात कोकणवासियांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गणशेळवाडी येथील 26 वर्षीय निलेश न्हानु सावंत या युवकाने घराच्या अंगणातील लोखंडी छप्पराला गळफास लावत आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेने कलंबिस्त गावात हळहळ व्यक्त होत आहे. मयत निलेश सावंत याचे काका राजन सावंत यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस हवालदार प्रसाद कदम, लक्ष्मण काळे यांनी जाऊन पंचनामा केला. निलेश हा शांत व मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याचा मित्रपरिवार ही मोठा होता. निलेश याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, काका असा मोठा परिवार आहे.
मागील २ महिन्यांची प्रवासी संख्या
| मार्ग | जानेवारी | फेब्रुवारी | एकूण |
| सीएसएमटी-मडगाव | १३,१९६ | ११,६१४ | २४,८१० |
| मडगाव-सीएसएमटी | १३,२४५ | १२,६८४ | २५,९२९ |
सावंतवाडी: सावंतवाडीतील कलंबीस्त गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे आलेल्या एका फिरत्या विक्रेत्याच्या कुल्फीमध्ये किडे सापडले आहेत. हा प्रकार समजल्यानंतर येथील जागृत ग्रामस्थांनी त्या विक्रेत्याला धारेवर धरले आहे.
याबद्दल जाब विचारल्यानंतर विक्रेत्याने यात आपली काही चूक नसून या खाद्यपदार्थांची मी फक्त विक्री करत आहे असे सांगितले. त्याने जेथून हे खाद्यपदार्थ विकत घेतो त्या व्यावसायिकाचे नावही सांगितले.
या प्रकारामुळे या विक्रेत्यांकडून हे पदार्थ विकत घेणार्या लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे पदार्थ बनवताना योग्य ती स्वच्छता राखली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा व्यावसायिकांवर योग्य वेळी कारवाई केली गेली नाही तर पुढे या निष्काळजीपणामुळे जीव गमावण्यांची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र सरकारने अन्नसुरक्षेसाठी FSSAI या संस्थेची नियुक्ती स्थापना केली आहे. या संस्थेने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Video: लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ; फिरत्या विक्रेत्याच्या कुल्फीमध्ये आढळल्या अळ्या – Kokanai
सविस्तर वृत्त – https://t.co/eVBM0j7pqV#sawantwadi pic.twitter.com/7nQMd294hd
— Kokanai Digital News Channel (@kokanai21) March 11, 2025
Konkan Railway: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि कोकण यांना जोडणारी थेट विशेष रेल्वे गाडी चालविण्यात यावी अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे. पुणे ते सावंतवाडी दरम्यान कल्याण मार्गे विशेष रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवरील ताण कमी होऊन पुणे आणि कोकण दरम्यानची कनेक्टिव्हिटी वाढेल, असे कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी ईमेल द्वारे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पुणे आणि कोकण दरम्यान थेट रेल्वे गाडी नसल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते, त्यामुळे प्रवासाचा अनुभव खूपच त्रासदायक होतो. या मार्गावर विशेष रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि कोकणच्या विकासाला चालना मिळेल, असे दरेकर यांनी म्हटले आहे.
यापूर्वी या मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या, ज्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा या मार्गावर विशेष गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे.
या गाडीला खालील थांबे देण्यात यावेत
पुणे – चिंचवड – तळेगाव – लोणावळा – कर्जत – कल्याण – पनवेल – पेण – रोहा – माणगाव – वीर – सापे वामने – करंजाडी – खेड – चिपळूण – सावर्डा – अरावली रोड – संगमेश्वर रोड – रत्नागिरी – आडवली – विलावडे – राजापूर रोड – वैभववाडी रोड – नांदगाव रोड – कणकवली – सिंधुदुर्ग – कुडाळ – झारप – सावंतवाडी रोड
रेल्वे प्रशासन या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर विशेष रेल्वे गाडी सुरू करेल, अशी अपेक्षा कोकण विकास समितीने व्यक्त केली आहे.











