Konkan Railway: जलद, आरामदायी आणि अनेक आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेली वंदेभारत एक्सप्रेस प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. भारत सरकारने देशातील बहुतेक महत्त्वाच्या शहरांदरम्यान या गाड्या सुरू केल्या असून काही अपवाद वगळता सर्व गाड्या यशस्वी ठरल्या आहेत. मुंबई मडगाव मार्गावर सुरू करण्यात आलेली गाडी क्रमांक 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदेभारत एक्सप्रेसची या यशस्वी गाडय़ांमध्ये गणना होत आहे. या गाडीचा मंगळुरू पर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी आता होताना दिसत आहे.
सध्या कोकण रेल्वे मार्गावर दोन वंदे भारत एक्सप्रेस चालत आहेत. गाडी क्रमांक 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मुंबई मडगाव दरम्यान तर 20645/46 मडगाव – मंगळुरू सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मडगाव मंगळुरू दरम्यान चालविण्यात येत आहेत. मुंबई मडगाव दरम्यान धावणारी वंदेभारत एक्सप्रेस यशस्वी ठरत असताना मडगाव – मंगळुरू दरम्यान धावणारी वंदेभारत तितकीशी यशस्वी ठरलेली दिसत नाही आहे.
मुंबई ते मंगळुरू अशी अखंड वंदेभारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी अशी मागणी कर्नाटक राज्यातून होत आहे. मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (22229/30) हीच गाडी पुढे मंगळुरू पर्यंत विस्तारित करावी. ही गाडी विस्तारित केल्यास तिला सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे धावण्यासाठी जो अतिरिक्त रेक लागेल तो गाडी क्रमांक 20645/46 मडगाव – मंगळुरू सेंट्रल ही गाडी बंद करून तिचा रेक वापरण्यात यावा. असे केल्याने अतिरिक्त रेक न वापरता आहे त्या गाड्यांमध्ये हा बदल करून कर्नाटकातील प्रवाशांना मुंबई साठी जलद प्रवासाचा एक पर्याय उपलब्ध होईल असा युक्तिवाद करण्यात आला आहे. कर्नाटक राज्यातील प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधींनी विविध माध्यमांतून ही मागणी जोर लावून धरल्याची बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्रातील प्रवासी संघटनांचा विरोध.
सध्या मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आपल्या पूर्ण क्षमतेने धावत आहे. मुंबई कर्नाटक दरम्यान गरज पडल्यास नवीन गाडी मागावी. –अखंड कोकण रेल्वे प्रवासी समिती
आम्ही तुम्हाला कर्नाटकसाठी नवीन रेकची मागणी करण्याची विनंती करतो. सध्याची सीएसएमटी-मडगाव वंदे भारत आधीच १०० टक्के पूर्ण क्षमतेने धावत आहे, नवीन ट्रेन सुरू झाल्यास महाराष्ट्र, गोवा कर्नाटकातील प्रवाशांना अधिक फायदा होईल. सध्या आम्ही या विस्ताराच्या विरोधात आहोत. –रोहा रेल्वे प्रवासी समिती
मुंबई गोवा वंदे भारत मंगळुरूपर्यंत नेण्याची मागणी कर्नाटकातून होत आहे. तेथील खासदारांनी तसे प्रयत्नही सुरू केले आहेत. आपण जोरदार विरोध करणे आवश्यक आहे. अन्यथा कोकणकन्याचा भार कमी व्हावा म्हणून सुरू केलेल्या १२१३३/१२१३४ मुंबई कारवार एक्सप्रेसप्रमाणे आपल्याला वंदे भारतलाही मुकावे लागेल. मंगळुरूच्या नवीन गाडीला विरोध नाही. परंतु आपली गाडी पुढे वाढवून नाही, तर स्वतंत्र गाडी सुरू व्हावी. तसेच, त्या गाडीला सर्व स्थानाकांना समान कोटा मिळावा व महाराष्ट्रात पुरेसे थांबे मिळावेत.-श्री. अक्षय म्हापदी, रेल्वे अभ्यासक











