Category Archives: कोकण

Konkan Tourism: येरवडा कारागृहाच्या धर्तीवर कोकणातही सुरू होणार ‘कारागृह पर्यटन’

   Follow us on        

सावंतवाडी : संपूर्ण महाराष्ट्रात फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन जिल्हा कारागृहे आहेत. पैकी एक ब्रिटिशकालीन सर्वात जुने जिल्हा कारागृह सावंतवाडी येथे असून दुसरे सिंधुदुर्गनगरी येथे अलीकडेच उभारण्यात आले आहे. जिल्ह्यातील गुन्ह्यांची संख्या पाहता सिंधुदुर्गनगरी येथील कारागृह पुरेसे आहे, त्यामुळे सावंतवाडीतील ब्रिटीशकालीन कारागृह पर्यटनासाठी वापरून त्याठिकाणी ‘कारागृह पर्यटन’ ही संकल्पना राबवता येऊ शकते, त्याने जिल्ह्याच्या पर्यटनला एक नवी दिशा मिळेल, असे मत रविवारी आ. दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ. केसरकर यांनी ‘कारागृह पर्यटन’ या संकल्पनेवर विशेष भर दिला. कोणत्याही जिल्ह्यात दोन कारागृह नाहीत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुन्हेगारी दर पाहता, सिंधुदुर्गनगरी येथील कारागृह पुरेसे आहे. सावंतवाडी येथील कारागृह सुमारे 150 वर्षांपूर्वीचे असून ते आता रिकामे झाले आहे.

काही दिवसांपूर्वी या कारगृहाची संरक्षक भिंत कोसळल्याने येथील सर्व कैद्यांना सिंधुदुर्गनगरीतील कारागृहात हलवण्यात आले आहे. त्यामुळे, या ऐतिहासिक कारागृहाचा उपयोग ‘कारागृह पर्यटन’ साठी करता येईल.यामुळे पर्यटकांना एक वेगळा अनुभव मिळेल. सावंतवाडीला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असल्याने, असे अभिनव पर्यटन उपक्रम सुरू झाल्यास त्याचा जिल्ह्याला निश्चितच फायदा होईल, असे आ. केसरकर म्हणाले.

राज्यातील ऐतिहासिक कारागृहातील ठिकाणे आणि घटनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती होण्यासाठी यापुर्वी येरवडा कारागृहात ‘कारागृह पर्यटन’ सुरुवात केली होती. राज्यातील अनेक कारागृहे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योतर काळातील ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाकडून ऐतिहासिक ठिकाणे आणि संदर्भांचे जतन केले जातात. चित्रपटात दाखविले जाणारी कारागृहे आणि प्रत्यक्षातील कारागृहे पाहण्याची सर्वसामान्य नागरिकांची इच्छा असते. कारागृहे आतून कसे दिसते, कैद्यांना कसे ठेवले जाते, याची नागरिकांमध्ये उत्सुकता असते. मात्र, कारागृहात विविध गुन्ह्यांतील कैदी शिक्षा भोगत असल्याने आणि सुरक्षेच्या दृष्टीने कारागृहात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश दिला जात नाही.

मात्र, आता राज्य सरकारने कारागृहातील ऐतिहासिक स्थळे दाखवून, घटनांचे साक्षीदार होण्यासाठी आणि त्यातून प्रेरणा मिळावी, या हेतूने राज्यातील कारागृहांत ‘कारागृह पर्यटन’ सुरू करण्याची घोषणा त्यावेळी केली होती. 

 

संगमेश्वर स्थानकावरील गैरसोयींकडे लक्ष वेधण्यासाठी निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुपतर्फे पाठपुरावा

   Follow us on        

संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या न्याय हक्कासाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप या रेल्वे प्रवाशी संघटनेने कोकण रेल्वे प्रशासनाला लेखी पत्र देऊन संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकातील अत्यावश्यक सुविधांचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे.

या पत्रात संगमेश्वर स्थानकाच्या विक्रमी वार्षिक उत्पन्नाचा आढावा देऊन रोज १८००पेक्षा अधिक लोक रेल्वेने प्रवास करतात. या स्थानकात दोन्ही फलाटांना जोडणारा पादचारी पूल हा इतके दिवस आच्छादन विरहित आहे.

उन्हा- तान्हात पावसाळ्यात प्रवाशांच्या संरक्षणसाठी या पुलावर आच्छादन(पत्र्याचे छत) होणे गरजेचे आहे ही बाब ध्यानात आणून दिली आहे.

याशिवाय रत्नागिरीच्या दिशेला फलाट क्रमांक एक आणि दोन यांना जोडणारा पूल होणे अत्यावश्यक आहे. फलाट क्रमांक दोन वर उतरलेल्या प्रवाशांना पायपीट करत फलाटावरील अर्धे अंतर उलट दिशेने पायपीट करावी लागते. वृध्द व्यक्ती, महिला,बालके , आजारी व्यक्ती यांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे.

तरी या गोष्टीचे गांभीर्य ध्यानात घेऊन उपाययोजना कराव्यात असा उल्लेख या पत्रात केला आहे.

फलाट क्रमांक एक वरील काही‌ कौलारु प्रवाशी निवारा शेड नादुरुस्त आहेत, त्या़ची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. पावसाच्या दिवसात अच्छादन नसलेल्या फलाटावर सामानसुमान घेऊन ठिबकणाऱ्या प्रवाशी निवारा शेड मध्ये प्रवाशी बसलेले असतात. या दुरुस्ती कामाला वेग यावा,अशा आशयाचे विनंती पत्र दिले आहे.

संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाचे ऐतिहासिक महत्त्व ध्यानात घेऊन पर्यटकांच्या पसंतीला संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक उतरले आहे. पण रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुविधेसाठी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात मडगाव, जामनगर, पोरबंदर या एक्स्प्रेसना थांबा मिळावा म्हणून मागण्यांचा पाठपुरावा केला होता. इतके विक्रमी उत्पन्न या रेल्वे स्थानकातून मिळत असताना प्रवाशांच्या सुविधेकडे कोकण रेल्वे प्रशासन काना डोळा का करते आहे? असा परखड सवाल या संघटनेचे प्रमुख पत्रकार संदेश जिमन यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे. परंतु या प्रश्नाचे उत्तर अनाकलनीय आहे!

श्री. रुपेश मनोहर कदम/ सायले

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on         Konkan Railway: उन्हाळी हंगामासाठी विशेष गाडी म्हणून धावणाऱ्या गाडी  क्रमांक ०७३११/०७३१२ वास्को द गामा – मुझफ्फरपूर – वास्को द गामा  या गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी या आधी धावत असलेल्या वेळापत्रकानुसार आणि डब्यांच्या संरचनेनुसार धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर साप्ताहिक विशेष गाडीची मुदत दिनांक २३/०६/२०२५ पर्यंत होती तिला मुदतवाढ देण्यात आली असून ती दिनांक २५/०८/२०२५ पर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर – वास्को द गामा साप्ताहिक विशेष गाडीची मुदत दिनांक २५/०६/२०२५ पर्यंत होती तिला मुदतवाढ देण्यात आली असून ती दिनांक २८/०८/२०२५ पर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल ३०/०६/२०२५ ते २५/०८/२०२५ पर्यंत दर सोमवारी वास्को द गामा येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १२:३० वाजता मुझफ्फरपूर जंक्शनला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर जंक्शन – वास्को द गामा साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल. ०३/०७/२०२५ ते २८/०६/२०२५ पर्यंत दर गुरुवारी १४:४५ वाजता मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १४:५५ वाजता वास्को द गामाला पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज, छे इथं थांबेल. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर जंक्शन या स्थानकांवर थांबेल
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच = टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

 

Railway Updates:रेल्वे तिकीट आरक्षण नियमात मोठे बदल; उद्यापासून अंमलबजावणी

   Follow us on        

Railway Updates:भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल करत आता तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे. 1 जुलै 2025 पासून हे नवीन नियम लागू होणार असून यामुळे तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता येईल व फसवणूक टाळली जाईल, असा रेल्वे मंत्रालयाचा उद्देश आहे.

रेल्वे मंत्रालयाने 10 जून रोजी एक अधिकृत परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार, “01.07.2025 पासून, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ (IRCTC) च्या वेबसाईट किंवा अ‍ॅपद्वारे तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी युजर्सचे खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे. त्यानंतर 15.07.2025 पासून बुकिंग करताना आधार-आधारित ओटीपी व्हेरिफिकेशनदेखील बंधनकारक करण्यात आले आहे.”

हे नवे नियम केवळ ऑनलाइन बुकिंगपुरते मर्यादित नसून काउंटर बुकिंगवरसुद्धा लागू होतील. पीआरएस काउंटर किंवा अधिकृत एजंटमार्फत तत्काळ तिकीट बुकिंग करतानाही वापरकर्त्याला सिस्टम-जनरेटेड ओटीपी प्रमाणीकरण करणे आवश्यक असेल, जो बुकिंग वेळी नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर पाठवला जाईल. याची अंमलबजावणी 15 जुलैपासून होणार आहे.

या नवीन नियमामुळे अधिकृत तिकीट एजंटसाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांमध्ये एजंट तत्काळ तिकीट बुक करू शकणार नाहीत. याचा अर्थ, एसी क्लाससाठी सकाळी 10 ते 10.30 या वेळेत व नॉन-एसी क्लाससाठी सकाळी 11 ते 11.30 या वेळेत एजंटना बुकिंगची परवानगी दिली जाणार नाही.

रेल्वे सूचना प्रणाली केंद्र (CRIS) व IRCTC यांना याबाबत सर्व झोनल रेल्वेला माहिती देण्यात आली असून, सिस्टममध्ये आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.

रेल्वे मंत्रालयानुसार, हे बदल तिकीट बुकिंग प्रणालीतील अनियमितता व दलाली रोखण्यासाठी आवश्यक आहेत. अनेकदा दलाल तंत्रज्ञानाचा गैरवापर करून काही सेकंदात हजारो तिकीट बुक करतात, यामुळे सामान्य प्रवाशांना तत्काळ योजना अंतर्गत तिकीट मिळणे अवघड होते. या नवीन नियमांमुळे ही समस्या बर्‍याच अंशी कमी होईल, असा मंत्रालयाचा विश्वास आहे.

 

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांना १ कोटीचे विमा संरक्षण मिळणे गरजेचे

   Follow us on        

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या दीड दशकाहून अधिक काळ सुरु आहे. पळस्पे – इंदापूर विभाग, चिपळूण – आरवली – संगमेश्वर – हातखंबा अशा कित्येक भागातील रास्ता गेल्या अनेक वर्षांपासून बिकट अवस्थेत आहे. इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण रस्त्यांचे, पळस्पे – इंदापूर पट्ट्यातील पूल, लोणेरे पूल, चिपळूण पूल अशा कित्येक ठिकाणी कामच अद्याप सुरु न झाल्यामुळे तेथे कित्येक तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. पेण, नागोठणे, सुकेळी येथील रस्त्यांची चाळण झाली आहे. ते टाळण्यासाठी प्रवासी पर्यायी मार्गांचा अवलंब करतात. त्यामुळे काहीही केले तरी वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय होतोच.

काही पर्यायी मार्ग अरुंद असल्यामुळे तेथेही वाहतूक कोंडी होऊन वाहने घासून नुकसान होते. तर मुख्य मार्गावर काही भागांत चांगला रस्ता असला तरी अचानक मध्ये खड्डे येतात. काही ठिकाणी रस्ताच अस्तित्वात नसल्यामुळे चिखल मातीतून वाहनचालकांना गाडी हाकावी लागते. या सर्वांत गाडी आपटून टायर फुटणे, गाडीचे काही महत्वाचे भाग तुटणे, गाडी रस्त्यात बंद पडणे असे प्रकार हमखास घडतात. यामुळे सर्वांना या मार्गावरून प्रवास करून झाल्यावर गाडीच्या देखभाल दुरुस्तीचा मोठा खर्च सहन करावा लागतो. तसेच, गेल्या काही वर्षांत हजारो नागरिकांना अपघाती मरण आले तर काहींना कायमचे अपंगत्व आहे. एकूणच, या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे एक दिव्य व जीवघेणे आव्हान आहे. मुळात या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग न म्हणता महाराष्ट्रातील दुर्लक्षित व भारतातील सर्वाधिक काळ रखडलेला महामार्ग म्हणून घोषित केले पाहिजे.

ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गांसारख्या चांगल्या व सुस्थितीत असलेल्या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांकडून टोल घेतला जातो त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मुंबई गोवा मार्गावरून (पळस्पे ते इंदापूर व पुढे इंदापूर ते पत्रादेवी मार्गावरून) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाडीची नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक फेरीला काही विशिष्ट रक्कम द्यावी (टोल द्यावा). तसेच, अपघात होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे सर्व प्रवाशांना अपघात झाल्यास वैद्यकीय उपचारांसाठी किमान ५० लाखांचा व मृत्यू झाल्यास किमान १ कोटी रुपयांचा विमा उपलब्ध करून द्यावा व त्याचा खर्चही शासनाने करावा. अशी मागणी कोकण विकास समितीने निवेदनाद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे.

वाहनांची नोंदणी करण्यासाठी महामार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच बांधून तयार असलेल्या टोल नाक्यांचा उपयोग करता येईल असेही त्यांनी या निवेदनात सुचवले आहे.

Konkan Railway: गणेशभक्तांसाठी खुशखबर! तब्बल १५ स्लीपर कोच असलेल्या विशेष गाडीला मुदतवाढ; आरक्षण ‘या’ तारखेपासून सुरु होणार

   Follow us on         Konkan Railway: पश्चिम रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष गाडीला दिनांक २८ सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या गाडीचे आरक्षण उद्या दिनांक २९ जून पासून सुरू होणार आहे.
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. ही  द्वि-साप्ताहिक स्पेशल दिनांक २८ सप्टेंबर पर्यंत उधना जंक्शन येथून दिनांक दर बुधवार आणि रविवारी रात्री ८ वाजता निघेल ती  मंगळुरू जंक्शनला  दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४५  वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक स्पेशल ही गाडी दिनांक २९ डिसेंबरपर्यंत मंगळुरु जंक्शन येथून गुरुवार आणि सोमवारी रात्री १० वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २१:०५ वाजता पोहोचेल.गुरुवार आणि सोमवारी रात्री २२:१०  वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २३ :०५ वाजता पोहोचेल.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
रचना : एकूण 23 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 03 कोच, स्लीपर – 15 कोच, जनरल – 02 डबे, एसएलआर – 02.

Amboli: धक्कादायक! वर्षा पर्यटनासाठी आलेला पर्यटक ३०० फूट दरीत पडला; शोधमोहीम सुरु

   Follow us on        

सिंधुदुर्ग : प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली घाटाजवळील कावळेसाद पॉईंटवर वर्षा पर्यटनासाठी आलेला कोल्हापूर येथील युवक खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी हा युवक गेला असता, पाय घसरून पडल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरीत पडलेल्या युवकाचा शोध घेतला जात आहे. वाऱ्यांच्या वेगामुळे उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्यापाशी हा युवक कोसळल्याची माहिती आहे.
कोल्हापूरमधून मित्राचा ग्रुप वर्षा पर्यटनासाठी कोकणात आला होता. त्यावेळी, आंबोली घाटाता या पर्यटकांनी आपला गाडी थांबवून निसर्स सौंदर्याचा आनंद लुटला. मात्र, दुर्दैवाने यावेळी एक युवका रोलिंगच्या पलिकडे जाऊन दरीत कोसळल्याची दु:खद घटना घडली. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून या युवकाच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रांची चौकशी करण्यात येत आहे. युवक नेमकं दरीत कोसळला कसा याबाबत माहिती घेतली जात आहे, पण रोलिंग पलिकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असता हा अपघात झाल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी दाट धुके आणि मोबाईल टॉवरला रेंज नसल्यामुळे मदतकार्य करताना पोलिसांना अडचणी येत आहेत.

जिल्हा परिषदेचे कर्मचारी राजेंद्र सनगर
राजेंद्र बाळासो सनगर (45 वर्षे) चिले कॉलनी, कोल्हापूर असे दरीत कोसळलेल्या पर्यटकाचे नाव आहे. ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. कोल्हापूर येथील सनगर हे त्यांच्या 14 सहकाऱ्यांच्या टीमसोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. कावळेसाद पॉईंट येथे रेलिंग जवळून असताना पाय घसरला आणि ते दरीत कोसळले. आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. मात्र, रात्रीचा काळोख आणि दाट धुक्यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.

 

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील ११ गाड्या पूर्ण क्षमतेने चालविण्याची गरज

   Follow us on        

Konkan Railway: २५ वर्षांपूर्वी कोकणात रेल्वे आली आणि कोकणवासीयांसाठी एक जलद, परवडणारा आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला. सुरुवातीला प्रवासी संख्या कमी होती, त्यामुळे ज्या गाड्या या मार्गावर धावत होत्या त्या प्रवाशांच्या त्यावेळच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम होत्या. मात्र हळूहळू परिस्थिती बदलत गेली, गर्दी वाढत गेली आणि अधिक गाड्यांची मागणी होण्यास सुरवात झाली रेल्वे प्रशासनानेही गरज लक्षात घेऊन गाड्यांची संख्या वाढवली. मात्र कोकण रेल्वे मार्गाचे एकेरीकरण आणि इतर मर्यादांमुळे त्यात अपेक्षित वाढ झाली नाही आहे. कोकण रेल्वे प्रशासनाच्या मते सध्या कोकण रेल्वे आपल्या पूर्ण क्षमतेने चालत असून आत गाड्यांमध्ये वाढ करणे शक्य नाही आहे. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विलीनीकरण या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच हे शक्य आहे.

कोकण रेल्वे प्रवाशी संघटनांनी याबाबत आवाज उठवल्यामुळे प्रशासनाने सुद्धा यात लक्ष घातले असून त्या दृष्टीने प्रयत्नही चालू झाले आहेत. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे या गोष्टीला काही वर्षे जातील. मात्र तोपर्यंत रेल्वेकडे जी संसाधनाने आहेत त्याचा पूर्णपणे उपयोग करून रेल्वे प्रवाशांचा प्रवास सोयीचा कसा होईल याकडे लक्ष देणे गरजचे आहे. दुर्दैवाने तसे होत नसल्याचे दिसत आहे.

कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या काही गाड्या कमी क्षमतेने धावत आहेत. या गाडयांना डबे जोडून त्याची क्षमता वाढवणे शक्य आहे. मात्र रेल्वे प्रशासन रेकची आणि डब्यांची उपलब्धता नसणे, पिट लाईनची कमी लांबी अशी थातुर मातुर कारणे देऊन हे टाळत आहे. खरेतर काही बदल करून या गाड्या पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये सध्या मोठी गर्दी होत आहे. गर्दीमुळे आत शिरता न आल्याने दरवाजावरून तोल जाऊन प्रवासी खाली पडण्याच्या घटना देखील वाढू लागल्या आहेत. कधी कधी भीती वाटत आहे कि गर्दीमुळे मुंब्रा स्थानकावर घडलेल्या घटनेसारखा अपघात घडेल. अशा घटना घडल्यावर जागे न होता हे अपघात घडू न देणे यासाठी प्रयत्न करणे रेल्वे प्रशासनाकडून अपेक्षित आहे.

नवीन गाड्या येतील तेव्हा येतील. परंतु आताच कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी, तुतारी, मंगळुरू सुपरफास्ट, रत्नागिरी दिवा, सावंतवाडी दिवा, मडगाव वांद्रे, पुणे एर्नाकुलम, तेजस २२ डब्यांनी आणि वंदे भारत २० डब्यांची चालवल्यास दिवसाला एका दिशेला किमान ४० डबे वाढवता येतील. एका डब्यात सरासरी ८० प्रवासी धरल्यास दिवसाला किमान ३००० प्रवासी जास्त नेता येऊ शकतील. ही संख्या दोन नवीन गाड्यांएवढी आहे. रेल्वे उपलब्ध साधनसंपत्तीचा अपव्यय करत आहे.

अक्षय महापदी
सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती

Pic credit – @akshaymahapadi

 

Sawantwadi Terminus: भूमीपूजन दगडाचा प्रतिकात्मक केक कापून अपूर्ण कामाचा वाढदिवस साजरा..

   Follow us on        

Sawantwadi: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज २७ जून रोजी १० वर्षे पूर्ण होऊन देखील ते अदृश्य असल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे स्थानकावर वाढदिवस साजरा केला. सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून हाताला काळ्या फिती बांधून साखर वाटत, भुमिपुजन दगडाचा केक कापून गांधीगिरीने याचा निषेध नोंदविण्यात आला.

सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तत्कालीन पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि इतर लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले होते. यानंतर पहिल्या टप्प्याचे काम झाले. मात्र, दुसऱ्या टप्प्याचे काम अजूनही झालेले नाही. परिणामी, हे महत्त्वाकांक्षी टर्मिनस आजही धूळ खात पडले आहे. रेल्वे प्रवासी संघटनेने या टर्मिनसच्या पूर्णत्वासाठी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र, प्रवाशांची गैरसोय होत असूनही लोकप्रतिनिधी यावर गप्प बसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साखर वाटून, केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. रेल्वे प्रशासन, प्रवाशी यांना साखर वाटून गांधीगिरी मार्गान प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर म्हणाले, १० वर्ष प्रकल्प रखडलेला आहे. तिन्ही सार्वत्रिक निवडणूक एकाच पक्षाची सत्ता राज्यात आलेली आहेत. त्याच सरकारने भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प पूर्ण होत नसेल तरी ती क्षरमेची बाब आहे. सरकारला जाग आणण्यासाठी व अर्धवट कामाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे‌. केवळ रेल्वे मंत्री बदलले म्हणून प्रकल्प अर्धवट ठेवणं योग्य नाही. प्रकल्प पूर्ण करायचा नसेल तर जनतेची फसवणूक केल्याच जाहीर करा असं आवाहन त्यांनी केलं‌. तर ज्या दगडावर नारळ फोडून भुमिपूजन केलं तो दगड केक स्वरूपात आम्ही कापून अर्धवट कामाचा निषेध केला. जन आंदोलन करून देखील सरकार दखल घेत नसल्याने दगडी सरकारला हा दगड होता. त्यामुळे निदान आता तरी सरकारनं कोकणवासीयांना न्याय द्यावा. प्रवाशांची होणारी गैरसोय रोखावी असं मत सचिव मिहिर मठकर यांनी व्यक्त केले. तसेच गणेशोत्सवापूर्वी रेल्वे टर्मिनस पूर्णत्वास आणून चाकरमान्यांचे होणारे हाल, अपेष्टा रोखाव्यात असे मत उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी व्यक्त केले. उपस्थित पोलिस, रेल्वे कर्मचारी, प्रवासी, रिक्षा चालक यांना साखर वाटून अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड.संदीप निंबाळकर, सचिव मिहिर मठकर, सल्लागार सुभाष शिरसाट, सल्लागार अँड सायली दुभाषी ,भूषण बांदिवडेकर,पांडुरंग राऊळ, सागर तळवडेकर,तेजस पोयेकर,पुंडलिक दळवी, अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, विनायक गांवस , नितिन गावडे, सिद्धार्थ निंबाळकर, मंगेश सावंत, चंद्रकांत राघो कोरगावकर, रवी सातवळेकर, पांडुरंग परब, नारायण मसुरकर, प्रमोद खानोलकर,विनायक राऊळ, लवू नाईक, एकनाथ नाटेकर, राजेंद्र वरडे , प्रकाश महादेव भाईंडकर , दिलीप कुलकर्णी, काका पांढरे, रिक्षा व्यावसायिक तसेचं रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Sangameshvar: अंत्रवली ग्रामपंचायत कार्यालयाला आश्वासनाचा विसर, पत्रकार संदेश जिमन यांच्या स्मरणपत्राने कार्यकारी मंडळाला येईल काय जाग?

   Follow us on        

गतवर्षी १२ जून २०२३ रोजी पत्रकार संदेश जिमन आणि वाडी ग्रामस्थ यांनी प्रशासनाला धारेवर धरत मागणी नसताना बांधण्यात आलेल्या मालपवाडी येथील साकवाचा मुद्दा उपस्थित केला. त्या साकवाला दोन्ही बाजूला चढणे उतरणे यासाठी योग्य ती सुविधा नसल्याने उपोषण करणार असे पत्र संदेश जिमन यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला दिले होते.

या पत्राची दखल घेत सरपंच महोदयांनी लेखी पत्र संदेश जिमन यांना दिले. त्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला असा की “३१ जानेवारी २०२४ पर्यंत साकवाच्या दोन्ही बाजूचे काम पूर्ण केले जाईल.” हे एक वेळकाढू आश्वासन ठरले. अद्याप ते काम पूर्ण न झाल्याने पत्रकार संदेश जिमन यांनी या समस्येकडे आपला मोर्चा पुन्हा वळवला आहे.

दिनांक २० जून २०२४ रोजी ग्रामपंचायत अंत्रवली येथे ग्रामसेवक महोदयांना स्मरणपत्र देऊन संदेश जिमन यांनी चांगली झाडाझडती घेतली. या पत्रात संदेश जिमन यांनी ग्रामपंचायत अंत्रवली च्या कार्यकारी मंडळाला दिलेल्या आश्वासनाकडे डोळे झाक का केली? उपोषणाला विरोध करण्यासाठीच केवळ हा आश्वासनाचा बनाव होता काय?
असे प्रश्न विचारले आहेत.

ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाने जर कर्तव्यदक्षतेने हा विषय मार्गी लावला असता तर स्थानिक ग्रामस्थांना आणि संदेश जिमन यांना हा खटाटोप करावा लागला नसता. केवळ मोठ्या पदांची लालसा बाळगणे पण प्रत्यक्षात त्या पदांचे महत्त्व ध्यानात न घेता कामात कुचराई करणे हे कितपत योग्य! कोणत्या दबावामुळे हे काम आजवर पुर्ण झाले नाही,याचे उत्तर गुलदस्त्यात आहे.

या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलवावी. प्रश्न निकाली काढावा. जर काहीच शक्य नसेल तर संदेश जिमन यांनी कायदेशीर मार्गाने जाण्यास ग्रामपंचायत कार्यालयाची काही हरकत नसल्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतीने द्यावे असे पत्रात म्हटले आहे.

या विषयाचे गांभीर्य ध्यानात घेऊन संबंधित विभागाने चौकशी आदेश देऊन सत्यता पडताळणे गरजेचे आहे. दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. लाखोंचा निधी कोणाच्या भल्यासाठी? ठेकेदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांसाठी की जनसामान्यांच्या हितासाठी?  ही अनागोंदी कोणाच्या आशिर्वादाने चालते? याला जबाबदार कोण? कारवाई झाली पाहिजे! ही ग्रामस्थांची मागणी आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search