मुबई– दिनांक ०१ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग विमानतळावर नियमित सेवा देण्याचे विधान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी केले होते. मात्र आता त्यांनी घुमजाव केले असल्याचे दिसत आहे. नियमित चिपी विमानसेवा पाहणार्या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली असल्याने नियमित सेवा देता येत नसल्याने ही सेवा शक्य नाही असे ते आता म्हणाले आहेत.
नियमित चिपी विमानसेवा पाहणार्या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली आहे. सद्यस्थितीत केवळ 7 विमाने सुरू होती. त्यापैकी आता केवळ 4 विमानेच सुरू आहेत. अजुनही त्या एअर लाईन्सची परिस्थिती नाजुक बनत चालली आहे. चिपी विमानतळावरील सेवा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत यांच्यासह आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करत आहोत असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
कुडाळ एमआयडीसी येथे शनिवारी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बॅकेंचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. संध्या तेरसे, भाई सावंत, राजु राऊळ, दिपक नारकर, श्रीपाद तवटे, चेतन धुरी आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, दि. 1 सप्टेंबर पासून मुंबई ते चिपी सिंधुदुर्ग विमानसेवा सुरळीत होणे गरजेचे होते. यासाठी चिपी विमानतळा प्रश्नी बर्याच बैठका झाल्या. पूर्वी उडाण योजनेअंतर्गत एअरलायन्सची सेवा सुरू झाली होती. ज्या कंपनीला हा ठेका दिला होता. त्या एअरलायन्स कंपनीचा ठेका ऑक्टोबर पर्यंत आहे. मुंबई येथे चिपीसाठी एकच स्लॉट उपलब्ध आहे.