Category Archives: कोकण
Konkan Railway: पनवेल रेल्वेस्थानक हे मध्य रेल्वेचे एक महत्वाचे स्थानक आहे. कोकणात जाणार्या पाश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या सर्व गाड्या येथूनच कोकणात जातात. मात्र या रेल्वे स्थानकाच्या भोंगळ कारभारामुळे आणि अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
पनवेल रेल्वे स्थानक प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा त्रास सहन कराव्या लागलेल्या नरेश नाईक यांनी काल रेल्वे च्या तक्रार निवारण पोर्टल वर एक तक्रार केली आहे.
नरेश नाईक यांच्याकडे मुंबई सेंट्रल येथून सुटणार्या विशेष गाडीचे आरक्षण होते. ही गाडी पकडण्यासाठी ते काल दुपारी 3 वाजता पनवेल स्थानकावर आले होते. गाडी वेळेवर पनवेल स्थानकावर आली मात्र गाडीच्या डब्यांचा क्रम बदललेला होता. पनवेल स्थानक प्रशासनाने याबाबत कोणतीच घोषणा announcement केली नाही. त्यामुळे सगळ्याच प्रवाशांचा गोंधळ उडाला. एवढेच नाही तर अवघ्या तीन मिनिटांत ही गाडी निघाली. त्यामुळे अनेक प्रवाशांना या गाडीत चढायला भेटले नाही. अनेक प्रवासी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होते. नरेश नाईक यांच्या पत्नी सुद्धा प्लॅटफॉर्मवरून गाडी पकडण्यासाठी धावत होत्या. प्रवाशांनी आरडा ओरडा केल्याने सुदैवाने गाडीतील प्रवाशांनी चैन आणि खेचली आणि गाडी थांबवली गेली.
हा अनुभव नरेश नाईक आणि इतर प्रवाशांसाठी खूपच भयानक ठरला. गाडी पकडल्यावर सुद्धा प्रवाशांना आपआपली सीट गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
पनवेल स्थानकावर अनेक सुविधांची वानवा आहे. मेल आणि एक्सप्रेस गाड्या 5,6 आणि 7 नंबर प्लॅटफॉर्मवरून सोडण्यात येतात. मात्र येथील इंडिकेटर्स योग्य माहिती पुरविण्यात येत नसल्याने त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे. कालच्या घटनेमुळे अपघात होऊन जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
मुंबई :गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. मुंबई – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 आणि सार्वजनिक बांधकाम विभागांच्या इतर रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत 01 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे
अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशभक्तांना टोलमाफी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज दिनांक 15 सप्टेंबरला सार्वजनिक बांधकाम विभागानं शासन निर्णय काढला आहे. त्यानुसार उद्या 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत गणेशभक्तांना पथकरातून सूट मिळेल.
असे मिळतील पास
टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव 2023′ , ‘कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास दिले जाणार आहेत. त्यावर वाहन क्रमांक, चालकाचं नाव असेल. हे पास गणेशभक्तांना पोलीस ठाण्यात, वाहतूक पोलीस चौकी व आरटीओ कार्यालयात मिळतील. संबंधित ठिकाणी हे पास पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावेत याची काळजी परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभागानं घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठी देखील हाच पास ग्राह्य धरण्यात येईल.
पोलीस व परिवहन विभागानं गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना द्यावी, अशा सूचना सरकारनं केल्या आहेत.
Rain Alert : भारतीय हवामान खात्याने आज राज्यात पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. पुढील चार दिवस म्हणजे दिनांक 15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीत कोकणातील जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उद्या दिनांक 15 सप्टेंबर रोजी संपूर्ण कोकणातील जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. मात्र 16 आणि 17 या तारखेस कोकणातील जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 18 तारखेस कोकणातील जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.
आजपासून चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात गावाला जायला सुरू झाले आहेत. मुसळधार पाऊस लागल्यास चाकरमान्यांची प्रवास करताना गैरसोय होऊ शकते. खासकरून मुंबई गोवा महामार्गाने जाणार्या गाड्यांना रस्त्यांच्या अपूर्ण कामामुळे प्रवास करणे त्रासदायक ठरू शकते.
Kokan Railway News : गणेशोत्सवासाठी दिवा सावंतवाडी एक्सप्रेसने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेल्वे प्रशासनाने या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत महिन्याभरासाठी बदल केला आहे. या गाडीला दोन जनरल डब्यांच्या जागी इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायरचे दोन डबे जोडले जाणार आहेत. या बदलामुळे या गाडीच्या जनरल डब्यांची संख्या 14 वरुन 12 होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार
1)गाडी क्रमांक 50108 मडगाव – सावंतवाडी आणि त्याच रेकसह पुढे जाणारी गाडी क्रमांक 10106 सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस या गाड्यांना दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते 14 ऑक्टोबर 2023 अशा महिन्याभराच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दोन जनरल डब्यांच्या जागी इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायर एसीचे दोन डबे जोडले जाणार आहेत.
2)गाडी क्रमांक 10105 दिवा – सावंतवाडी आणि त्याच रेकसह पुढे जाणारी गाडी क्रमांक 50107 सावंतवाडी – मडगाव एक्सप्रेस या गाड्यांना दिनांक 16 सप्टेंबर 2023 ते 15 ऑक्टोबर 2023 अशा महिन्याभराच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दोन जनरल डब्यांच्या जागी इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायर एसीचे दोन डबे जोडले जाणार आहेत.
कोकण विकास समितीने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मडगाव -सावंतवाडी- दिवा एक्सप्रेसला किमान एक एसी डबा जोडण्यात यावा यासाठी कोकण रेल्वेकडे मागणी केली होती. या मागणीची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली आहे.
Mumbai Goa Highway :दिनांक १५ सप्टेंबर पूर्वी मुंबई गोवा महामार्गाच्या सिंगल लेनवरून वाहतूक खुली करण्यात येईल असे आज मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी कशेडी बोगदा उद्घाटन आणि वृक्षारोपण प्रसंगी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दर १५ किमी अंतरावर नागरी सुविधा केंद्र
मुंबई-गोवा महामार्गाच्या सिंगल लेनचे ९०% काम पूर्ण झाले आहे. सध्या काँक्रिटीकरणाच्या या कामातील महत्त्वाचा क्युरिंग पिरियड सुरु आहे.तो येत्या दोन दिवसांत पूर्ण करून वाहतुक सुरू करून देण्यात येणार आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या आणि विशेषतः वाहन चालकांच्या सोयीसाठी महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दर १५ किमी अंतरावर नागरी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहेत. याठिकाणी चहा-पाण्याची व्यवस्था, शौचालय सुविधा, पोलीस मदत कक्ष, वाहनचालकांसाठी आराम कक्ष अशा अत्यावश्यक सोयी-सुविधा पुरवण्यात येत आहेत असे ते म्हणालेत.
कशेडी बोगद्यामुळे वेळेची बचत होणार.
कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला झाला आहे. हा बोगदा एकूण दोन किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग नऊ किलोमीटरचा आहे. अशा या बोगद्यामुळे पोलादपूर ते कशेडी हे अंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत कापता येणार आहे. त्यामुळे वाहनाने जाणाऱ्या प्रवाशांचा जवळपास ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांचा प्रवास सुखाचा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मालवण : चालत्या रिक्षात माकडाने उडी घेतल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना मालवण येथे घडली आहे. या जयराम ऊर्फ बाबजी दिगंबर मसूरकर (वय ५५, रा. खैदा कोळंब) असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
ही काल सकाळी साडेअकराच्या सुमारास मसूरकर रिक्षा (एमएच ०७ एएच १८६०) घेऊन मालवणहून आडारी मार्गे खैदाच्या दिशेने जात होते. चढावाच्या रस्त्यावर मसूरकर यांची रिक्षा पोहोचली. यावेळी बाजूच्या झाडीतून आलेल्या माकडांच्या कळपातील एकाने मसूरकर यांच्या रिक्षामध्ये उडी घेतली.यामुळे मसूरकर यांचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मसूरकर जागीच ठार झाले.
पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, हवालदार हेमंत पेडणेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटना समजताच येथील रिक्षा चालकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. मसूरकर यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
Konkan Railway News :गणेश चतुर्थी सण जवळ येत आहे; चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मध्य रेल्वे आणि पाश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्या सोडून प्रवाशांची सोय केली आहे. तरीही या फेर्या अपुऱ्या पडताना दिसत आहेत. या कारणास्तव या मार्गावर गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणार्या काही विशेष गाड्यांच्या डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.
खालील गाड्या अतिरिक्त डब्यांसहित चालविण्यात येणार आहेत.
1)01155/01156 दिवा-चिपळूण मेमू विशेष गाडी – एकूण 36 फेऱ्या (अप आणि डाऊन)
ही गाडी एकूण 8 डब्यांसह चालविण्यात येणार होती तिचे 4 डबे वाढविले असून ही गाडी आता 12 डब्यांसहित चालविण्यात येणार आहे.
2) 01165/01166 मुंबई आणि मंगळुरू जंक्शन विशेष सेवा – एकूण 16 फेर्या (अप आणि डाऊन)
ही गाडी एकूण 20 डब्यांसहित चालविण्यात येणार होती. मात्र या गाडीला दोन अतिरिक्त स्लीपर कोच जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या 22 होणार आहे.
3) 01167/01168 एलटीटी – कुडाळ विशेष सेवा – एकूण 24 फेर्या (अप आणि डाऊन)
ही गाडी सुद्धा एकूण 20 डब्यांसहित चालविण्यात येणार होती. मात्र या गाडीला दोन अतिरिक्त स्लीपर कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या 22 होणार आहे.
या अतिरिक्त डब्यांमुळे प्रतीक्षा यादीत आरक्षण असणार्या प्रवाशांचा फायदा होणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घेऊन या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे
कोकण विकास समितीच्या मागणीला यश
दिवा-चिपळूण, दिवा-रत्नागिरी या मेमू गाड्यांच्या डब्यांची संख्या 16 करावी अशी मागणी कोकण विकास समितीने रेल्वेकडे केली होती. त्यांची मागणी अंशतः का होईना, ती मान्य करून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा दिला आहे.