Category Archives: कोकण

महाड: सजावटीच्या आकर्षक दिव्यांनी उजळून निघणार चवदार तळे

रायगड: महाड येथील चवदार तळे व आजूबाजूचा परिसर आता सजावटीच्या आकर्षक दिव्यांनी उजळून निघणार आहे. यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच हे काम पूर्णत्वास येणार असल्‍याचे महाड नगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे.
महाडमध्ये २० मार्च १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून अस्पृश्यतेविरोधात सामाजिक न्यायासाठी लढा दिला होता. या सत्याग्रहानंतर चवदार तळे जगाच्या नकाशावर आले. महाड नगरपालिकेने चवदार तळ्याचा इतिहास जपण्यासाठी १९८७ मध्ये तळ्याचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले होते.
चवदार तळ्याच्या भिंती नव्याने बांधण्यात आल्या असून तळ्याच्या काठी सभागृह बांधण्यात आले आहे. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला होता, त्या पायऱ्यांचे देखील सुशोभीकरण केले आहे. तळ्याच्या मध्यभागी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे व दोन्ही बाजूला उद्याने विकसित करण्यात आली आहेत. चवदार तळ्यावर वर्षभर असंख्य अनुयायी व पर्यटक भेट देतात. शिवाय दरवर्षी चवदार तळे सत्याग्रह स्मृतिदिन, मनुस्मृतिदिन, डॉ. आंबेडकर जयंती व पुण्यतिथी यानिमित्त लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात.
तळ्याच्या सुशोभीकरणांमध्ये आणखीन भर पडावी, या दृष्टीने महाड नगरपालिकेने आता चवदार तळे व परिसरामध्ये सजावटीचे दिवे व आकर्षक दिव्यांचे खांब उभारण्यास सुरुवात केली आहे. तळ्याच्या चारी बाजूने तसेच दोन्ही उद्यानांमध्ये ११० खांब उभारण्यात आले आहेत. खांबांवर नक्षीदार असे सजावटीचे दिवे लावले जाणार आहेत. या दिव्यांमुळे चवदार तळ्याचा परिसर आणखीनच उठून दिसेल. महानगरपालिकेने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून हे दिवे बसवण्यास सुरुवात केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एलसीबीची मोठी कारवाई; १ किलो गांजासह दोन जणांना अटक

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थ सापडण्याचे प्रकार वाढत आहेत. कणकवली शहरात ३८ हजार ८०० रुपये किंमतीचा १ किलो ११० ग्रॅम गांजा सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनधिकृतरित्या गांजा बाळगल्या प्रकरणी निलेश ज्ञानदेव साटम आणि चेतन रामू जाधव या दोघांना अटक करण्यात आली आहे. गांजासह ५० हजार रुपये किंमतीची दुचाकी, रोख रक्कम आणि मोबाईल पोलिसांनी संशयित आरोपींकडून जप्त केला आहे. कणकवली शहरात केलेल्या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. कणकवली शहरात ३८ हजार ८०० रुपये किंमतीचा १ किलो ११० ग्रॅम गांजा सिंधुदुर्ग एलसीबीच्या पथकाने बुधवारी रात्री साडेअकरा वाजता पकडला. हॉटेल अप्पर डेक समोर सर्व्हिस रोडवर एलसीबीने ही कारवाई केली.
या गुन्ह्यात निलेश ज्ञानदेव साटम (४४, रा. जानवली गावठणवाडी), आणि चेतन रामू जाधव (२० वर्षे, रा. कलमठ कुंभारवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल रोख, १८० रुपये आणि ५ हजार रुपयांचा मोबाईल पोलिसांनी आरोपींकडून जप्त केला आहे. ही कारवाई एसपी अग्रवाल यांच्या आदेशानुसार एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मिलिंद घाग, पीएसआय आर बी शेळके, हवालदार राजू जामसंडेकर ,प्रमोद काळसेकर, अनुप खंडे, बसत्याव डिसोझा, आशिष जामदार, प्रकाश कदम, किरण देसाई, पोलीस नाईक अमित तेली, पालकर, जयेश सरमळकर यांच्या पथकाने केली. फिर्याद हवालदार प्रमोद काळसेकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास पीएसआय शरद देठे करत आहेत.

कुडाळ तालुक्यात दूध डेअरी आगीत भस्मासात; ३५ लाखांचे नुकसान

कुडाळ:साळगाव- वरची धुरीवाडी येथील अभिषेक सत्यवान धुरी यांच्या मालकीच्या गोपाळ गंगा दूध डेअरीला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत आतील मशिनरी व दुग्धजन्य पदार्थ तसेच अन्य साहित्य . मिळून सुमारे ३५ लाख रु. चे नुकसान झाले. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेची नोंद कुडाळ पोलीस ठाण्यात गुरुवारी करण्यात आली. अभिषेक धुरी यांनी तीन वर्षांपूर्वी साळगाव- वरची धुरीवाडी येथे ‘गोपाळ गंगा’ नावाने दूध डेअरी सुरू केली. २४ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास यातील मशिनरीच्या भागातून धूर येऊन आग लागली असल्याचे तेथीलच संजय धुरी यांनी पाहिले. त्यांनी लागलीच अभिषेक धुरी यांना त्याबाबत कल्पना दिली. त्यानंतर मालक धुरी यांच्यासह संजय धुरी, शशी धुरी, प्रसाद परुळेकर, जेरॉन फर्नांडिस व अन्य ग्रामस्थांनी धाव घेत डेअरीमध्ये असलेल्या पाण्याचा वापर करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सतत पाण्याचा मारा करून ही आग मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आणण्यात यश आले. तोपर्यंत आतील किमती मशिनरी व साठवून ठेपलेले दुग्धजन्य पदार्थ जळून खाक झाले. यामध्ये सुमारे ३५ लाख रु. चे नुकसान झाल्याचे कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत धुरी यांनी म्हटले आहे.
घटनेच्या दिवशी दसरा सण असल्याने डेअरी बंद होती. रात्रीच्या वेळी घटना घडली. शेजारच्या व्यक्तींनी डेअरीला आग लागली असल्याचे सांगितले. या घटनेत २ हजार ७०० किलोचा तुपाचा साठा, मिल्क टेस्टिंग मशीन, मिल्क पॅकिंग मशीन, पॅकेजिंग मटेरिअल, होमोनायझर, मिल्क पाऊच पॅकिंग मशीन, मशीनच्या मोटर्स आदी सुमारे ३५ लाखांचे साहित्य आगीत जळून खाक झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता धुरी यांनी व्यक्त केली. कुडाळचे पोलीस हवालदार सचिन गवस व अमोल महाडिक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबतचा अधिक तपास हवालदार ममता जाधव करीत आहेत.

बांदा : दसरा सणाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर दिले व्यसनमुक्तीचे संदेश

बांदा : शालेय वयातच विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे महाराष्ट्र शासनामार्फत बालवयातच देण्यात येत असून विद्यार्थ्यांकरवी अनेक अनेक कुटुंबे व्यसनमुक्तीही बनविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दसरा सणाच्या निमित्ताने बांदा शाळेतील विद्यार्थ्यांनी आपट्याच्या पानावर ‘व्यसनमुक्त भारत ,सदृढ भारत’ “तंबाखू सोडा, कर्करोग टाळा” “तंबाखूचा घास, जीवनाचा नाश” अशा प्रकारच्या घोषणा लिहून व्यसनमुक्ती बाबत जनजागृती केली.या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक व पालक यांचे मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्र शासनामार्फत तंबाखूमुक्त शाळा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी शाळा महाविद्यालये यामध्ये चालू आहे.या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक शाळा तंबाखू मुक्त शाळा जाहीर झाल्या आहेत .

कोकण रेल्वेच्या ‘या’ स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची अजूनही कमीच; कोकण विकास समितीने वेधले लक्ष..

मुंबई :कोकण विभागातील प्रवाशांच्या प्रश्नांसाठी आणि प्रवासांदरम्यान सोयी आणि सुविधा मिळविण्यासाठी झटणाऱ्या कोंकण विकास समितीने निवेदनामार्फत काही मागण्या रेल्वे प्रशासनाकडे काल केल्या आहेत. कोकण विभागातील रेल्वे स्थानकावरील फलाटांची उंची वाढविणे, विविध एक्सप्रेस गाड्यांना कोकणातील स्थानकांवर थांबे देणे आणि ईतर काही मागण्यांसाठी काही निवेदने दिली आहेत. 
या मागण्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे 
१. कोंकण रेल्वेवरील इंदापूर, गोरेगाव रोड, सापे-वामणे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, अंजनी, कामथे, कडवई, निवसर, वेरवली, सौन्दळ आणि खारेपाटण रोड स्थानकांवर किमान अत्यावश्यक सुविधांचा भाग असलेले उंच फलाट बांधणे. तसेच काही स्थानकांवर अजूनही फलाट बांधले गेले नाही आहेत अशा स्थानकांवर फलाट बांधणे
२. ११०२६/११०२५ पुणे भुसावळ एक्सप्रेस पूर्ववत करून चौक येथे थांबा देणे
३. वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथे विविध एक्सप्रेस गाड्यांना थांबे
४. पॅसेंजरची एक्सप्रेस झाल्यानंतरही प्रवास वेळेत काहीच फरक न पडल्यामुळे १०१०५/१०१०६ सावंतवाडी दिवा एक्सप्रेसला कोंकण रेल्वे मार्गावर कमी केलेले कोलाड, इंदापूर, दिवाणखवटी, अंजनी, कामथे, उक्षी आणि भोके तर नव्याने निर्माण झालेले कळंबणी बुद्रुक आणि कडवई येथे तर मध्य रेल्वेवर पेण आणि नागोठणे येथे थांबे पूर्ववत करण्यात यावेत. 
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/10/288-5.pdf” title=”288 (5)”] [pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/10/289-1.pdf” title=”289 (1)”] [pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/10/2310-Halts-KRCL_285-1.pdf” title=”2310 Halts KRCL_285 (1)”] [pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/10/2310-Halts-of-DIVA-SWV_287-1.pdf” title=”2310 Halts of DIVA SWV_287 (1)”] [pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/10/2310-Khed-Halts_286-1.pdf” title=”2310 Khed Halts_286 (1)”] [pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/10/2310-Vaibhavwadi-Halts-Reply_284-1.pdf” title=”2310 Vaibhavwadi Halts – Reply_284 (1)”]

कोकण रेल्वे मार्गावर धावणार एलटीटी – थिवी दिवाळी स्पेशल ट्रेन; आरक्षण शुक्रवारपासून खुले..

 

Konkan Railway News: दिवाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या कोकणकरांसाठी  एक महत्वाची बातमी आहे.  कोकण रेल्वे मध्यरेल्वेच्या सहकार्याने दिवाळी हंगामात आठवड्यातुन तीन दिवस धावणारी एक दिवाळी स्पेशल गाडी चालविणार आहे.

Train No. 01129 / 01130 Lokmanya Tilak (T) – Thivim – Lokmanya Tilak (T) Special (Tri-Weekly) :

ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवीम या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे. 

Train No. 01129  Lokmanya Tilak (T) – Thivim –  Special (Tri-Weekly) :

दिनांक 01/11/2023 ते 29/11/2023 शनिवार, सोमवार आणि बुधवार या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री 22:15 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी 10:00 वाजता थीवी या स्थानकावर पोहोचेल.

Train No. 01130 Thivim- Lokmanya Tilak (T) –  Special (Tri-Weekly) :

दिनांक 02/11/2023 ते 30/11/2023 रविवार , मंगळवार आणि गुरुवार या दिवशी ही गाडी थीवी या स्थानकावरुन संध्याकाळी 15:00 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी पहाटे 04:05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल

या गाडीचे थांबे

ठाणे, पनवेल, रोहा,माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे , राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड , कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड.

डब्यांची संरचना

फर्स्ट एसी  – 01,  टू टायर एसी + फर्स्ट एसी (एकत्रित) – 01 +थ्री टायर एसी – 04  + सेकंड  स्लीपर – 09 + जनरल –  04+ एसएलआर व अन्य – 02   असे मिळून एकूण 21  डबे

आरक्षण

Trains no. 01130 Thivim – Lokmanya Tilak या गाडीचे आरक्षण परवा दिनांक २७ ऑक्टोबर 2023 पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहेत. 

 

 

 

 

अबब! गरवताना गळाला लागला चक्क २० किलोचा मासा

राजापूर: फावल्या वेळात गरवून मासे पकडणे हा बऱ्याच जणांचा आवडता छंद. तीन ते चार तास गरवून फक्त कालवणापुरते मासे भेटले तरी पुरे असे म्हणून वेळ घालवणारे पण तुम्ही पहिले असतील. पण एक कल्पना करा गरवताना एक दोन किलो नाही तर चक्क २० किलोचा मासा गळाला लागला तर? तुमची प्रतिक्रिया काय असेल?
हो असे झाले आहे.. बाकाळे गावातील राहुल वामन राऊत याला समुद्रकिनारी गरवताना काल चक्क 20 किलो वजनाचा कोकेर मासा गळाला लागला आहे. त्याने तो साखरी नाटे येथील विक्री केंद्रावर नेऊन विकला त्याला 180 रुपये किलोचा दर मिळाला आहे. म्हणजे त्याला एकूण या माशापासून  3600 रुपये इतका फायदा झाला आहे.
मजुरीची कामे करून चा उदरनिर्वाह करणारा राहुल फावल्या वेळात संध्याकाळी कामावरून सुटल्यावर बाकाळे परिसरातील समुद्रा जवळच्या कड्यावर मासे गरवण्यासाठी जात असतो. त्याच्यासारखे बरेच तरुण  युवक लोखंडी रॉड म्हणजेच गरीच्या साह्याने मासेमारी करताना दिसतात. 

वर्षभरात ११ अपघात; ५ कर्मचाऱ्यांचा बळी…महावितरण अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सिंधुदुर्ग : मागील दोन दिवसांत महावितरणमध्ये कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा सावंतवाडी व वेंगुर्ला येथे अपघात घडलेला असून त्यात एक कर्मचारी जीवास मुकला आहे. सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथे झालेल्या  अपघात प्रकरणात पुन्हा एकदा मृत कर्मचाऱ्यांकडे काम करताना संरक्षक साहित्य नसल्याचे दिसून आले आहे.मागील वर्षभरात ११ अपघात होऊन त्यात ५ कर्मचाऱ्यांचा बळी जाऊन देखील महावितरणचे निर्ढावलेले अधिकारी व ठेकेदार सुशेगात असल्याचा आरोप मनसेचे माजी तालुकाध्यक्ष तथा स्वाभिमान कामगार संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केला आहे.कंत्राटदार किंवा महावितरणकडून कामगारांना बूट ,हॅंड ग्लोज ,सेफ्टी बेल्ट, हॅल्मेट आदी संरक्षक साहित्य पुरवले जात नसल्याने कर्मचारी अपघाताचे बळी ठरत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना योग्य तांत्रिक प्रशिक्षण देऊनच विद्युत वाहिन्यांवरील काम देणे नियमाधीन असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणचे अधिकारी व ठेकेदाराची मुजोरी चाललेली आहे.

महावितरणचे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांनी एसी केबिनच्या बाहेर पडून कर्मचारी कोणत्या परिस्थितीत काम करत आहेत हे पहावे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या व्यथा समजतील. आणि मर्जीतला ठेकेदार नेमण्यापेक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांना संरक्षक साहित्य देणारा ठेकेदार नेमावा असा टोला देखील गावडेंनी लगावला आहे. जिल्हयाचे विद्युत निरीक्षक झोपले आहेत का ? असा सवाल उपस्थित करत ओरोस येथील विद्युत निरीक्षक कार्यालयाला लॉक  लावण्याचा इशारा मनसेच्या वतीने गावडे यांनी दिला आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुणीही वाली राहिला नसून मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत दिल्याच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे म्हणजे मृतांच्या वारसांनी जणू चेष्टाचं केल्यासारखे आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी मागील वर्षभरातील अपघाती मृत्यू प्रकरणी दोषी असलेला ठेकेदार व महावितरणचे अधिकारी यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश द्यावेत व मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई देऊन अपघाती कर्मचाऱ्यांना व त्यांच्या वारसांना न्याय द्यावा अशी मागणी गावडेंनी केलेली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी मेगाब्लॉक; जनशताब्दी एक्सप्रेससह ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर पुढील आठवड्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या मेगाब्लॉक मुळे मार्गावर धावणाऱ्या ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
A) गुरुवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी चिपळूण – संगमेश्वर रोड दरम्यान सकाळी ०७:३० ते १०:३० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या मेगाब्लॉक मुळे खालील गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१) Train no. 01139 Nagpur – Madgaon Jn. Special
दिनांक २५ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी चिपळूण ते कोलाड दरम्यान १०० मिनिटे उशिराने धावणार आहे.
२)Train no. 12051 Mumbai CSMT – Madgaon Jn. Jan Shatabdi Express
दिनांक २६ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कोलाड ते चिपळूण दरम्यान ४० मिनिटे उशिराने धावणार आहे.
3)Train no. 16346 Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T) Netravati Express
दिनांक २५ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान ४० मिनिटे उशिराने धावणार आहे.
B) दिनांक २६ऑक्टोबर (गुरुवार) रोजी मडगाव – कुमता दरम्यान  ११:००  ते १४:००  या वेळेत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉकमुळे खालील गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१) Train no. 06602 Mangaluru Central – Madgaon Jn. Special / Train no. 06601 Madgaon Jn. – Mangaluru Central Special
दिनांक २६ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणाऱ्या या गाड्या कुमता ते मडगाव दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. 

Mumbai Goa Highway | “माझ्या घरासमोरचा दोन किलोमीटरचा रस्ता तेरा वर्षापासून बांधू शकलो नाही…” केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जाहीर कबुली

नागपूर: मुंबई गोवा हा महामार्ग इतके वर्ष बनू शकला नाही त्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे. मी त्यासाठी कोणालाही जबाबदार धरणार नाही, असं खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं आहे. तसेच या डिसेंबर अखेरपर्यंत मुंबई गोवा महामार्ग बनवून पूर्ण होईल अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपुरात एका वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित ”मनातले गडकरी” या मुलाखतीत मुलाखतकार प्रसिध्द अभिनेता प्रशांत दामले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना नितीन गडकरी बोलत होते.
“मुंबई गोवा मार्ग पहिले महाराष्ट्र सरकारला काम दिलं होतं. त्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या. जागा हस्तांतरित करण्याच्या अजूनही येतात. त्यासाठी कोणाला जबाबदार धरत नाही. या रस्त्यासाठी मी 75 ते 80 म्हणजे सर्वात जास्त बैठका घेतल्या आहेत. तरी पण मला म्हणावं तसं यश मिळालं नाही. यावर यावर्षी डिसेंबर महिन्याच्या आत मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल. मी मुंबई ते दिल्ली 1380 किलोमीटरचा रस्ता जवळपास पूर्ण केला. पण माझ्या घरासमोरचा दोन किलोमीटरचा रस्ता मी तेरा वर्षापासून बांधू शकलो नाही. नागपुरात बाराशे कोटीचा मल्टी मॉडेल हब स्टेशन होतं ते एकदा मी रद्द केलं. पण आता ते स्टेशन रेल्वे बांधत असून 1200 कोटी लॉजिस्टिक कॅपिटल साठी भारत सरकारने दिले. भारतातील सर्वात मोठा लॉजिस्टिक पार्क तयार करत आहे वादाचे मुद्दे सोडवले भारतातील सगळ्यात मोठा प्रोजेक्ट बनवण्याचा ते स्वप्न आहे ते पूर्ण करेल,” असेही नितीन गडकरी म्हणाले.

विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search