Category Archives: कोकण
रत्नागिरी | प्रतिनिधी – राज ठाकरे यांची आज संध्याकाळी रत्नागिरी येथे सभा होती. बारसू रिफायनरी वरून जिल्ह्यातीलच नाही तर पूर्ण राज्यात वातावरण तापले असताना राज ठाकरे या संबधी कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांच्या पूर्ण भाषणात त्यांनी या प्रकल्पाला विरोध केल्याचे स्पष्ट झाले.
जमीन म्हणजे अस्तित्व; आपले अस्तित्व सांभाळा
भूमिपुत्राकडून मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या जमिनींबाबत त्यांनी रोष व्यक्त केला. जमीन असेल तर आपले अस्तित्व आहे; एकदा का जमीन गेली कि आपले कोकणातील अस्तिव संपले. पूर्वीपासून हेच सूत्र चालू आहे. भूगोल आणि इतिहास यांचा खूप मोठा संबंध आहे. ज्यांनी जमिनी (राज्य) पादाक्रांत केले त्यांनी इतिहास घडवला. मराठ्यांनी अगदी अटकेपार झेंडा रोवला होता. पण कोकणात खूप वाईट चित्र पाहावयास मिळते.जमिनी कवडीमोलाने विकल्या जातात, या जमिनी परप्रांतीय विकत घेऊन आपले राज्य निर्माण करत आहेत. काही दिवसांनी कोकणची भाषा आणि संस्कृती पण बदललेली असेल. कारण इथल्या स्थानिकांचे येथे अस्तित्वच नसेल. त्यामुळे आपल्या जमिनी विकू नका असे आवाहन राज ठाकरे यांनी या सभेत केले.
कोकणी जनतेला नेहमी गृहीत धरले जाते.
कोकणातील राजकारणात बदल दिसत नाही. नेहमी तेच तेच उमेदवार आणि पक्ष निवडून येताना दिसतात. भले त्यांनी येथील जनतेचे कल्याण करो व ना करो. त्यामुळे येथील राजकारणी येथील प्रश्नाबाबत गंभीर दिसत नाही. समृद्धी महामार्ग ४ वर्षात होतो पण मुंबई गोवा महामार्ग गेली १६ वर्ष रखडला आहे. यावरून येथील राजकारण्यांची उदासीनता दिसून येते. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी कोकणवासीयांची या गोष्टी लक्षात घेऊनच नवा बदल घडवून आणला पाहिजे असे ते म्हणालेत,
कोकणचे लोक प्रतिभावंत
महाराष्ट्र राज्याला मिळालेल्या एकूण ८ भारतरत्न पुरस्कारापैकी ६ पुरस्कार कोकणातील लोकांना मिळाले आहे. कोकणात प्रतिभावंत लोक आहेत त्यांच्याकडून जमिनी विकून आपलेच नुकसान करून घेण्याची वृत्तीची अपेक्षा नाही असे ते पुढे म्हणाले.
कोकणातील पर्यटन
कोकणात पर्यटनाला भरपूर वाव आहे, केरळ आणि कोकण या दोन्ही भागातील निसर्गात समानता आहे. केरळ राज्याचा विकासाचा कणा पर्यटन होऊ शकते तर कोकणात पर्यटन सोडून अशा प्रकल्पाची काय गरज आहे? कोकणातील पर्यटनाचा विकास केला तर ते पूर्ण महाराष्ट्र पोसू शकते एवढा त्याला वाव आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कातळशिल्प आणि प्रकल्प
बारसू येथे कातळशिल्पे मोठ्या प्रमाणावर आहेत. यातील काही कातळशिल्पाची नोंदणी युनिस्को ने केली आहे . या कातळशिल्पावर पुढे युनिस्को संशोधन पण करणार आहे. युनेस्कोने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्याठिकाणी कातळशिल्पे आहेत त्या ठिकाणच्या ३ किलोमीटर परिघाच्या भागात कोणतीही विकासकामे किंवा प्रकल्प उभारला जाऊ शकत नाही मग रिफायनरी प्रकल्प कसा काय उभारला जात आहे असा प्रश्न त्यांनी केला.
Mumbai Goa Highway News : मुंबई-गोवा महामार्गाचे काम बारा वर्षे झाले तरीही रखडलेल्या स्थितीत आहे.न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आदेश तसेच मंत्रीमहोदयांनी दिलेली आश्वासने आणि त्यानुसार प्रशासन व कंत्राटदार यांना दिलेले सूचना इशारे यांना हरताळ फासल्याचे दिसून येते.
म्हणूनच पळस्पे ते झाराप पर्यंतच्या ४५१ किलोमीटरच्या हायवेच्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई-गोवा हायवे जनआक्रोश समिती गठित झाली आणि प्रशासन, राजकीय नेतृत्व,कंत्राटदार आणि स्थानिक आणि मुंबई-ठाण्यातील जनता यांच्याशी समन्वय साधून व्यापक प्रमाणावर पाठपुराव्याचे काम सुरू केले.
त्याचे फलित म्हणून पळस्पे ते कासू या टप्प्याच्या कामाचे कार्यादेश मिळाल्यानंतर कंत्राटदार जे एम म्हात्रे या कंपनीने कामाला सुरुवात तर केली,परंतु दिवसाला चार किलोमीटरचा टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असताना मागील एका महिन्यात केवळ अडीच किलोमीटरचे काम झाले आहे. कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील कामाला तर अजून सुरुवातही झालेली नाही. तसेच परशुराम घाट, संगमेश्वर, लांजा या भागात अजूनही मोठया प्रमाणात काम अपूर्ण आहे.
म्हणूनच,आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी आणि समस्त कोकणकराना या विषयावर पुन्हा एकदा संघटित करून आंदोलन तीव्र करण्याची सुरुवात म्हणून मुंबई-गोवा हायवे जनआंदोलन समितीने त्यांचे पहिलेवहिले त्यावरील आंदोलन म्हणून रविवार दिनांक 7 मे 2023 रोजी दुचाकी रॅली काढण्याचे जाहीर केले आहे.
दुपारी ४ वाजता रॅलीची सुरुवात कामोठे टोल प्लाझा येथून होऊन संध्याकाळी ६.३० च्या सुमारास खारपाडा टोल प्लाझा येथे समारोप होईल . खारपाडा येथे समारोप सभा होऊन पुढची दिशा जाहीर केली जाईल.
समितीच्या या आंदोलनात व उपक्रमात इतर संघटना संस्थांनी देखील सक्रिय सहभागी व्हावे यासाठी आवाहन करण्यात आले.
कोकणातील अनेक संघटनांनी या बाईक रॅलीला पाठिंबा दर्शवला आहे.
त्यामध्ये कोकण कृती समिती, कोकण विकास समिती, कोकण विकास युवा मंच, रायगड मी मराठी प्रतिष्ठान, गवळी समाज सेवा संघ रायगड -रत्नागिरी, रायगड स्वराज्य संघटना, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्हा संघटना , कोकण प्रतिष्ठान- दिवा कोकण युवा संस्था, पनवेल एम आर असोसिएशन आणि पेण एम आर असोसिएशन यांचा समावेश आहे.
या रॅलीची सर्व माहिती वाचकांपर्यंत पोहोचावी प्रसिद्धी व्हावी या हेतूने महामार्गावर आपले फोटोसह बाईक रॅलीचा फलक प्रिंट करून आपापल्या विभागात तर प्रदर्शित करू शकतात.फलकाचे ग्राफिक डिझाइन समितीतर्फे दिले जाईल. यामध्ये आपण स्वतःचे छायाचित्र व नाव किंवा आपल्या संघटनेचे नाव टाकू शकतात आणि फलक प्रदर्शित करू शकतो असे समितीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
रत्नागिरी –आता जे गद्दार सुपारी घेऊन फिरतायत त्यांनी मी मुख्यमंत्री असताना बारसू येथील प्रस्तावित जागा रिफायनरी प्रकल्पासाठी कशी अनुकूल आहे ते पटवल्यानंतरच मी ते पत्र केंद्राला लिहिले अशा शब्दात त्या पत्राबद्दल खुलासा आज उद्धव ठाकरे यांनी राजापुरात पत्रकार परिषद घेताना केला. तसेच सत्ताधाऱ्यांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. या प्रकल्पावरून सरकारने माघार घेतली नाही तरी लवकरच हे सरकार कोसळणार आहे. यांच्या खुर्चीचे पाय डळमळीत होत आहेत,’ अशी टीका त्यांनी केली. बारसू येथील रिफायनरी विरोधात ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी ते आज बारसू – सोलगाव दौऱ्यावर होते.
आता जे गद्दार सुपारी घेऊन फिरतायत त्यांनी मी मुख्यमंत्री असताना मला सांगितलं की, बारसू येथे हा प्रकल्प झाला तर त्याला विरोध होणार नाही. बरीचशी जमीन निर्मनुष्य आहे. तसंच पर्यावरणाचीही फारशी हानी होणार नाही. त्यानंतर मी या जागेबाबत केंद्राला पत्र लिहिलं. मात्र या प्रकल्पाबाबत माझा असा विचार होता की, मुख्यमंत्री असतानाच बारसूत येऊन या प्रकल्पाचं येथील स्थानिक जनतेला प्रेझेन्टेशन द्यायचं. आता दुर्दैवाने फक्त मी लिहिलेल्या पत्राचं भांडवल केलं जातं, मात्र जी पारदर्शकता हवी ती ठेवली जात नाही.
दरम्यान, मी मुख्यमंत्री असताना राज्यात जे वेदांता फॉक्सकॉन आणि इतर जे चांगले प्रकल्प आणले होते, ते केंद्राने यांच्या नाकाखालून गुजरातला नेले, तेव्हा हे गप्प का बसले, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. तसेच त्यांनी या दौऱ्यात पोलीस अधीक्षकांना बारसूत झालेल्या आंदोलनात केलेल्या लाठीमाराबद्दल चांगले झापले आहे.
रत्नागिरी – सह्याद्री रँडोनिअर्स व खेड सायकलिंग क्लबच्या सहकार्याने खेड येथे बीआरएम सायकल स्पर्धा रंगणार आहे. दि. ०६ मे रोजी संध्याकाळी ५:३० वाजता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या शनिवार दिनांक ६ मे रोजी विजय उपहारगृह, खेड येथून मान्यवरांच्या हस्ते झेंडा फडकवून सायकलिंगला सुरुवात होणार असून सर्व सायकलस्वार कोलाड येथे पोचून लगेचच परतीचा प्रवास सुरु करतील व साडेतेरा तासाच्या आत म्हणजेच सकाळी सातच्या आत सायकलने दोनशे किमी अंतर कापून खेड येथे पोचतील. या इव्हेंटसाठी पंचवीसहून अधिक रायडर्स सहभागी झाले असून वेळेत अंतर कापणा-या रायडर्सना ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्स क्लबतर्फे फिनिशर मेडलसह गौरवण्यात येईल. तरी या नवीन क्रीडा प्रकाराच्या शुभारंभावेळी सायकलप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन खेड सायकलिंग क्लबतर्फे करण्यात येत आहे.
बीआरएम Brevets de Randonneurs Modiaux सायकल स्पर्धा प्रकार म्हणजे काय?
सायकल स्पर्धा विश्वातील एक वेगळा क्रीडाप्रकार म्हणजे बीआरएम. कोणाशीही स्पर्धा न करता दिलेल्या वेळेत अंतर कापणं हेच यातील महत्वाचं वैशिष्ट्य. या स्पर्धेत जिंकणे किंवा हरणे याकडे न पाहता दिलेल्या वेळात स्पर्धा पूर्ण करणे याला महत्व दिले जाते मात्र या स्पर्धेचे काही नियम असतात त्याचे पालन करणे आवश्यक आहे.. ही स्पर्धा २०० ते १२०० किलोमीटर साठी घेण्यात येते. हे अंतर पूर्ण करण्याची वेळ सर्व ठिकाणी निश्चित ठरवून देण्यात येते. ऑडाक्स क्लब पर्शियन या एका फ्रेंच सायकलिस्ट टुअरिंग क्लबने या प्रकारची सायकल स्पर्धा उदयास आणली. काही अवधीत लोकप्रिय झालेला सायकल स्पर्धेचा हा प्रकार पूर्ण जगभरात लोकप्रिय झाला. भारतात ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्स क्लब ही स्पर्धा आयोजित करते. स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांना मेडल तसेच एकआंतराष्ट्रीय दर्जाचे सर्टिफिकेट बहाल करते.
Konkan Railway News: कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या साहाय्याने कोकण रेल्वेमार्गावर काही अतिरिक्त पूर्णपणे अनारक्षित गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या पुणे/पनवेल ते रत्नागिरी या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
1) Train No. 01131 / 01132 Pune Jn. – Ratnagiri – Pune Jn. Unreserved Special (Weekly) :
ही गाडी पुणे ते रत्नागिरी या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे.
Train No. 01131 Pune Jn. – Ratnagiri Unreserved Special (Weekly) :
दिनांक 04/05/2023 ते 25/05/2023 दर गुरुवारी ही गाडी पुणे या स्थानकावरुन रात्री 20:50 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी 07:30 वाजता रत्नागिरी या स्थानकावर पोहोचेल. या गाडीच्या एकूण चार फेऱ्या चालविण्यात येतील.
Train No. 01132 Ratnagiri – Pune Jn. Unreserved Special (Weekly) :
दिनांक 06/05/2023 आणि 27/05/2023 दर शनिवारी ही गाडी रत्नागिरी या स्थानकावरुन दुपारी 13:00 वाजता सुटेल ती त्याच दिवशी रात्री 23:55 वाजता पुणे या स्थानकावर पोहोचेल. या गाडीच्या एकूण चार फेऱ्या चालविण्यात येतील.
या गाडीचे थांबे
लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा,माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड,
डब्यांची संरचना
जनरल – 20 + एसएलआर – 02 + असे मिळून एकूण 22 डबे
2) Train No. 01133 / 01134 Ratnagiri – Panvel – Ratnagiri Unreserved Special (Weekly) :
ही गाडी पनवेल ते रत्नागिरी या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे.
Train No. 01133 Ratnagiri – Panvel Unreserved Special (Weekly) :
दिनांक 05/05/2023 ते 26/05/2023 दर शुक्रवारी ही गाडी रत्नागिरी या स्थानकावरुन दुपारी 13:00 वाजता सुटेल ती त्याच दिवशी रात्री 20:30 वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल. या गाडीच्या एकूण चार फेऱ्या चालविण्यात येतील.
Train No. 01134 Panvel – Ratnagiri Unreserved Special (Weekly) :
दिनांक 05/05/2023 आणि 26/05/2023 दर शुक्रवारी ही गाडी पनवेल या स्थानकावरुन दुपारी 21:30 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी पहाटे 04:30 वाजता रत्नागिरी या स्थानकावर पोहोचेल. या गाडीच्या एकूण चार फेऱ्या चालविण्यात येतील.
या गाडीचे थांबे
रोहा,माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड,
डब्यांची संरचना
जनरल – 20 + एसएलआर – 02 + असे मिळून एकूण 22 डबे


Vision Abroad


सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यातील वरवडे संगम पॉईंट येथील गडनदी पात्रात बुडून एका १७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल येथे घडली. मृत युवकाचे नाव हरीकृष्णन टी मनोज (वय – १७, रा.कणकवली, मुळ रा.केरळ) असून नदी पात्रातील एका मोठया खडकावर बसून सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरून नदीत पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की हा तरुण आणि त्याचा मित्र या ठिकाणी फिरायला आले होते. मात्र सेल्फी घेण्याच्या नादात त्याचा पाय घसरला आणि तो बुडाला. ही घटना त्याच्या मित्राने त्या युवकाच्या घरी कळवली. तेव्हा त्या बुडालेला हरीकृष्णन यांचा काका आणि नागरिकांनी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी जात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्र झाल्याने शोध लागला नव्हता. आज कणकवली पोलिसांनी पुन्हा सकाळी भोरपी समाजाच्या लोकांना घेऊन नदीत शोध मोहीम राबवली. वरवडे नदीपत्रात पाण्यात हरीकृष्णन यांचा मृतदेह सकाळी ७ वाजता आढळून आला.पोलिस निरीक्षक अनिल जाधव पथकासह घटनास्थळी उपस्थित होते. तेथील नागरिकांच्या मदतीने त्या युवकाला शोधण्याची मोहीम यशस्वी झाली. हरीकृष्णन याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
KONKAN RAILWAY NEWS : कोंकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. या मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या एका गाडीचा 3 जुलै -२०२३ पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे.
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर शुक्रवारी धावणारी हि गाडी 02/06/2023 पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा 30/06/2023 पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर सोमवारी धावणारी हि गाडी 05/06/2023 पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा 03/07/2023 पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
या गाड्यांचे मडगावपर्यंत कोकणातील थांबे
- पनवेल,रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली,कुडाळ, थिवीम, मडगाव
रत्नागिरी – रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची ताकद कमी असल्यामुळे बाहेरचे लोक हे वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. दिनांक 6 मे रोजी उद्धव ठाकरे रत्नागिरी येथील बारसू येथे येणार आहेत. येथे जमणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही अनुचित प्रकार या बाहेरच्या लोकांकडून होण्याची शक्यता असल्याने योग्य ती काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी असे त्यांनी पोलिसांना आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी अनेक कामे सुरू असून या ठिकाणी मटेरियल सप्लायचे काम आहे सुरू झाले आहे. हीच संधी साधून जिलेटिन स्टिक सारख्या स्फोटकांचा साठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिलेटिन सारख्या स्फोटकांचा साठा व त्यामागील गटाचा पोलीस व प्रशासनाने शोध घ्यावा याकडे लक्ष वेधण्यासाठी माजी खासदार भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांची सिंधुनगरी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली होती.
यावेळी पुढे बोलताना निलेश राणे म्हणाले बारसू रिफायनरी परिसरात जवळपास 72 ठिकाणी बोरवेल मारण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मटेरियल चे सप्लाय करणारे ठेकेदार बाहेरचे आहेत. व या मटेरियल सप्लाय च्या माध्यमातून व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होण्यापूर्वी जिलेटिन स्टिक या स्फोटकांचा मोठा साठा या परप्रांतीय सप्लायरमार्फत सुरू झाला आहे. त्या ठिकाणी आंदोलकांची गर्दी होऊन काही अनुचित प्रकार घडू नये व आपल्या मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, त्याची झळ बसू नये यासाठी ही माहिती आपण जाहीर करत आहोत, असे निलेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण तीन लोकसभा निवडणुका या मतदारसंघात लढल्या आहेत. या भागातील नागरिकांचा विरोध असला तरी त्याची तीव्रता कमी आहे या लोकांना भडकवण्याचे काम बाहेरची लोक करीत आहेत. विरोधासाठी गर्दी जमवून त्या ठिकाणी चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडविण्याचा कट सुरू झाल्याचा आपल्याला संशय आहे. याबाबतची काही माहिती काही सूत्राने माझ्यापर्यंत पोहचवली आहे. लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही माहिती त्यांच्याकडे पोहोच करणार आहे. तसेच याबाबत पोलिसांनाही आवश्यकता भासल्यास माझ्याकडे असलेली माहिती देणार आहे. यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ बसू नये एवढी आपली प्रामाणिक अपेक्षा आहे असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले.