



ठाणे, दि.23:-
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वीय सहाय्यक या पदावर कार्यरत असणाऱ्या सौ. पल्लवी सरोदे (वय 37 वर्ष) यांचे आज सकाळी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर अपघाती निधन झाले. कार्यालयीन मैत्रिणींसह त्या हरिहरेश्वर या ठिकाणी सहली निमित्त गेल्या होत्या. तेथील समुद्रकिनारी त्या लाटेत अचानक ओढल्या गेल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्वांच्याच मनाला चटक लावून गेली.
सौ.पल्लवी सरोदे या ठाणे जिल्हा प्रशासनात 2012 रोजी लिपिक या पदावर रुजू झाल्या होत्या. मार्च 2024 मध्ये त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली होती. त्या सध्या जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या.
ठाणे जिल्हा प्रशासनासाठी अत्यंत दुर्दैवी घटना..
ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध असलेल्या, सर्वांना हसतमुखाने सर्व प्रकारची मदत करणाऱ्या, अतिशय सुस्वभावी, मेहनती, प्रामाणिक, कामात तत्पर, चेहऱ्यावर कायम स्मित हास्य असलेल्या पल्लवी सरोदे यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, अशी प्रार्थना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, जिल्ह्यातील इतर महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील आणि ठाणे जिल्हा प्रशासनातील अन्य विविध शासकीय विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
स्व. सरोदे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे पती, सासू- सासरे आणि मुलगा (वय 13 वर्ष) असा त्यांचा परिवार आहे.