मुंबई – पवईतील आर.ए. स्टुडिओजवळ गुरुवारी रात्री एका तरुणाने १७ अल्पवयीन मुले व दोन प्रौढ असे १९ जणांना ओलीस ठेवले. रोहित आर्या (वय अंदाजे ३०) असे या तरुणाचे नाव असून, “माझी शाळा सुंदर शाळा” योजनेअंतर्गत थकलेली दोन कोटी रुपयांची रक्कम मिळाली नाही, या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जाते.
पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक अमोल वाघमारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तीन तास चर्चा केल्यानंतर रोहितने पोलिसांवर हल्ला केला. प्रतिहल्ल्यात तो गंभीर जखमी झाला व रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. सर्व १९ ओलीस सुखरूप सोडले गेले.
रोहितने यापूर्वी माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर उपोषण केले होते. केसरकर यांनी “रोहितची थकबाकी पूर्ण दिली होती; तो मानसिक तणावात होता,” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र कुटुंबीयांचा दावा आहे की रक्कम अद्याप बाकी आहे.
पोलिसांनी ओलीस ठेवणे व हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, थकबाकीच्या दाव्यांची चौकशी सुरू आहे.
Liquor Smuggling: रेल्वेच्या एसी कोचमध्ये एसी डक्टमध्ये दारूची तस्करी होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. लखनौ – लखनौ–बरौनी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या ”एसी व्यवस्थित थंडावा देत नाही” तक्रारीनंतर रेल्वे तंत्रज्ञांनी तपासणी केली असता गाडीच्या एसी कोचमध्ये अवैध दारूच्या तस्करीचा मोठा प्रकार उघड झाला आहे. एसी डक्टमध्ये तब्बल ३०० हून अधिक दारूच्या बाटल्या लपवून ठेवण्यात आल्या होत्या.
गाडीतील काही प्रवाशांनी “एसी व्यवस्थित थंडावा देत नाही” अशी तक्रार कर्मचाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर तंत्रज्ञांनी एसीची तपासणी केली असता डक्टच्या आत प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळलेल्या दारूच्या बाटल्या आढळल्या.
संपूर्ण साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत हा साठा अवैध दारू तस्करीसाठी वापरण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
रेल्वे प्रशासनाने या प्रकाराला गांभीर्याने घेतले असून जबाबदारांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेमुळे रेल्वे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रवासी वर्गातही चिंता व्यक्त होत आहे. रेल्वे मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर दारूचा साठा लपविला जातो तर स्फोटके सुद्धा लपवली जाऊ शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
Over 300 liquor bottles found hidden in the train’s AC duct! Passengers complained of low cooling in the AC coach of Lucknow-Barauni Express. When the technicians inspected the AC duct, consignment of an illicit liquor was being hidden there. pic.twitter.com/ouSh8Mx5lU
चिपळूण: मुंबई गोवा महामार्गावर कापसाळ येथे अवैध गुटखा वाहतूक आणि विक्री विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथे तब्बल 16 लाख 94 हजार रुपये किंमतीच्या गुटख्याची वाहतूक करणारा बोलेरो टेम्पो चिपळूण पोलिसांनी सापळा रचत पकडल्याची घटना गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली हा गुटखा चिपळूण येथे आणला जात असल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणी टेम्पोचालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर टेम्पोचालक सावंतवाडी येथे राहणारा आहे.. गुरुवारी परजिह्यातून बोलेरो टेम्पो भरुन तब्बल 16 लाख 94 हजार किंमतीचा गुटखा चिपळूण येथे आणला जात असल्याची गोपनीय माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंग, पोलीस हेडकॉन्स्टेबल वृषाल शेटकर, संदीप माणके, रोशन पवार, प्रमोद कदम, कृष्णा दराडे आदींच्या पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथे सापळा रचला. यावेळी महामार्गावरुन आलेला बोलेरो टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याने भरलेली मोठ-मोठी पोती असल्याचे आढळले. त्यात 16 लाख 94 हजार रुपये किंमतीच्या विविध प्रकारच्या गुटख्याचा समावेश आहे. या प्रकरणी सज्जन निवेगी याला पोलिसांनी अटक केली तसेच गुटख्यासह लाखाचा टेम्पो असा 23 लाख 94 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सज्जन निवेगी पाला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईमुळे पानटपरीवर बिनधास्तपणे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. परजिह्यातून आणलेला हा गुटखा चिपळुणात नेमका कोणाला दिला जाणार होता, शिवाय यामागे अन्य कोणाचा समावेश आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
कोल्हापूरः राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गोवा बनावटीचा मोठा मद्यसाठ जप्त केला आहे. चारचाकीत लपवून मद्याची तस्करीचा प्रयत्न उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी हाणून पाडला. याप्रकरणी सावंतवाडी येथील २१ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. हॉकी मैदान ते सायबर चौक रोडवर शनिवारी (०१ फेब्रुवारी) पहाटे ५.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.
सदर युकारचे वय २१ असून तो आजगाव, शिरोडा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथील राहणारा आहे. . त्याच्या कारमधून विविध बँडच्या ७५० मिलीचे ४० बॉक्स, १८० मिलीचे ३५ बॉक्स आणि बलेनो कार असा एकूण १० लाख ०६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापैकी केवळ मद्याची किंमत ०५ लाख ०६ हजार ४०० रुपये एवढी आहे.
सिंधुदुर्ग: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करायला गेलेले नायब तहसीलदार प्रतीक आढाव व तलाठी ओंकार केसरकर यांच्यावर डंपर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन डंपर चालकांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्या नेतृत्वाखाली पथक अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी नियुक्त केले आहे. वालावल मंडळ अधिकारी धनंजय चंद्रकांत सिंगनाथ, चेंदवणचे ग्राम महसूल अधिकारी भरत नेरकर, तुळसुली तर्फ माणगावचे ओंकार संजय केसरकर, घाटकरनगरचे नीलेश गौतम कांबळे, माणकादेवीचेच्या स्नेहल जयवंत सागरे, सोनवडे तर्फ कळसुलीचे शिवदास राठोड, पणदूरचे रणजित कदम, शिवापूरचे सूरज भांदिगरे या कर्मचार्यांचा या पथकात समावेश आहे.
दरम्यान अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने आता कंबर कसली आहे. यासाठी नेमलेले अधिकार्यांचे पथक सर्वत्र फिरत असताना शुक्रवार १७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता या पथकाला पिंगुळी गुढीपूर येथील शिक्षक कॉलनी जवळ डंपर लागल्याचे आढळून आले.
या ठिकाणी चार डंपर होते. या डंपरांची तपासणी केली असता यामध्ये अनधिकृत अवैध वाळू भरल्याचे दिसून आले. हे डंपर कोणाचे आहेत किंवा याचे चालक कोण आहेत याची पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी वाट अधिकाऱ्यांनी पाहिली. मात्र उशिरापर्यंत कुणी आले नाही त्यानंतर रात्री १ वाजता डंपर क्रमांक (एमएच- ०७- एक्स- ०२६७) चा चालक येथे उपस्थित झाला. त्याने आपले नाव मिलिंद नाईक असे सांगितले. त्या ठिकाणी पंच यादी केल्यानंतर हा डंपर कुडाळ तहसील कार्यालय येथे तलाठी निलेश कांबळे यांच्यासह पाठवून देण्यात आला.
उर्वरित तीन डंपरचे चालक यांची वाट पाहिल्यानंतर पथकातील काही कर्मचारी गस्तीसाठी गेले. त्यानंतर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणच्या डंपर सुरू झाल्याचा आवाज आल्यामुळे नायब तहसीलदार प्रतीक आढाव हे पाहण्यासाठी गेले (एमएच-०६- एक्यू ७०९७) या डंपरच्या चालकाला आवाज देऊन थांबण्यासाठी सांगितले. मात्र त्यांनी काही न ऐकता डंपर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा नायब तहसीलदार प्रतीक आढाव हे बाजूला गेल्यामुळे वाचले. हा डंपर वेगाने निघून गेला त्याच्या पाठलाग नायब तहसीलदार यांनी केला मात्र तो मिळाला नाही. दरम्यान नायब तहसीलदार आढाव पुन्हा पिंगुळी येथे आले.
तर पकडलेल्या डंपर पैकी (एमएच -०७- सी- ६६३१) या डंपरच्या चालकांनी तलाठी ओंकार केसरकर यांच्या अंगावर डंपर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दुसऱ्या बाजूला उडी मारल्यामुळे ते वाचले. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी तक्रार दाखल केली असून दोन डंपर चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर दोन डंपर महसूल विभागाने कुडाळ तहसील कार्यालय येथे आणले आहेत.
Mumbai Local: मुंबई लोकल मध्ये शुल्लक कारणाने झालेल्या भांडणांमुळे एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला असल्याची घटना घाटकोपर येथे घडली. 15 नोव्हेंबर रोजी घाटकोपर (Ghatkopar) स्थानकावर लोकल ट्रेनमध्ये सीटवरून झालेल्या भांडणात एका मुलाने एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहवालानुसार, टिटवाळ्यातील या 16 वर्षीय मुलाने 35 वर्षीय व्यक्तीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. खुनाच्या एक दिवस अगोदर मयत अंकुश भालेराव आणि त्याच्या साथीदारांचा ट्रेनमध्ये प्रवास करताना या मुलासोबत जोरदार वाद झाला होता. त्यानंतर दुसर्या दिवशी हा मुलगा चाकू घेऊन गेला आणि त्याने कामावर जात असलेल्या भालेराव यांच्यावर हल्ला केला.
गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) अखेर स्टेशनवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा माग काढला आणि खुनाच्या दोन दिवसांनंतर टिटवाळा येथून त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा मोठा भाऊ मोहम्मद सनाउल्ला बैथा (25) याला गोवंडी येथून अटक केली. त्याने आपल्या भावाला चाकू लपवण्यात आणि पकडण्यापासून वाचवण्यात मदत केल्याचा आरोप आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत दोघेही टिटवाळा येथील रहिवासी आहेत. 14 नोव्हेंबरला ट्रेनमधील चौथ्या सीटवरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. बेनाली गावातील रहिवासी भालेराव आणि त्यांच्या इतर दोन मित्रांनी भांडणाच्या वेळी या अल्पवयीन मुलावर हल्ला केल्याचा आरोप आहे. यानंतर मुलाने भालेराव यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी आरोपी टिटवाळ्याहून ट्रेनमध्ये चढला आणि घाटकोपर स्टेशनवर उतरला. तो भालेराव येण्याची वाट पाहू लागला.
सकाळी दहाच्या सुमारास भालेराव खाली उतरले आणि ते आपल्या कामावर जाऊ लागले. त्याचवेळी आरोपीने गुपचूप त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर पाठीमागून वार करून पळ काढला. त्यानंतर भालेराव यांना राजावाडी रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला होता, ज्यामध्ये त्याने पोलिसांना आरोपीने दिलेल्या धमकीबद्दल सांगितले. ट्रेनमध्ये जेव्हा भांडण झाले होते तेव्हा भालेराव यांनी आरोपीचा फोटो काढला होता.
गोवा वार्ता: कुरिअरद्वारे गोव्यातून विदेशी दारु मागवणाऱ्या दोन व्यावसायिकांना बिहार पोलिसांनी अटक केली आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील शेरपूर येथे हा प्रकार उघडकीस आला. कुरिअर करण्यात आलेली दारु स्कॉर्पिओमधून घेऊन जाण्यासाठी व्यावसायिक आले असता पोलिसांनी ही कारवाई ही केली.
एका प्रसिद्ध हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, शेरपूर येथील कुरिअर कंपनीच्या ऑपरेटरच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. विजय कुमार आणि अरविंद कुमार (रा. महेशपूर) अशी अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकांची नावे आहेत.पोलिसांनी व्यावसायिकांकडून पाटणा क्रमांकाची स्कॉर्पिओ जप्त केली आहे. चौकशीनंतर संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.इन्स्पेक्टर ब्यूटी कुमारी यांना एक्सप्रेस सीड कुरिअर कंपनीचा संचालक विशाल प्रताप यांनी याबाबत फोन करुन माहिती दिली. एका अज्ञात कुरिअर कंपनीने शेरपूर येथील कुरिअर कार्यालयात तीन मोठ्या कार्टनमध्ये पॅक केलेली वस्तू आल्याचे त्यांनी सांगितले..
पार्सल घेण्यासाठी दोनजण स्कॉर्पिओमध्ये आले आहेत. संशय आल्याने त्याने दोघांनाही कार्यालयात बसवल्याचे त्यांनी सांगितले. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत चौकशी केली असता त्यांना गोवा बनावटीची विदेशी दारू आढळून आली.पोलिसांनी एकूण 86 लिटर विदेशी दारू जप्त करत दोघांना अटक केली. चौकशीत दोघांनी कुरिअरद्वारे विदेशी दारू मागवल्याचे कबुल केले.
राज्यात महिला आत्याचाराच्या धक्कादायक घटना समोर येत असताताना देवगडात संताप आणि चीड निर्माण करणारी घटना देवगड तालुक्यात घडली आहे. ज्या पोलिसांना आपण रक्षणाची जबाबदारी दिली आहे तेच भक्षक बनल्याचा प्रकार घडला आहे. नांदेडवरून देवगडमध्ये फिरायला आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी येथील एका युवतीला छेडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र देवगडातील जागरूक नागरिकांडी या प्रकारानंतर नागरिकांनी त्यांना चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. सध्या त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे
देवगड एसटी स्टॅण्डमार्गे आपल्या घरी परतणाऱ्या एका युवतीची छेडछाड, विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरिराम मारुती गिते (३३, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड) याच्यासह माधव सुगराव केंद्रे,सटवा केशव केंद्रे,श्याम बालाजी गिते,शंकर संभाजी गिते,प्रवीण विलास रानडे यांच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. या संशयितांमध्ये चारजण पोलीस सेवेत आहेत. ही घटना 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी संशयित आरोपींना देवगड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना शनिवारपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमके काय घडले?
देवगड येथे इनोव्हा कार घेऊन पर्यटनासाठी आलेले संशयित हरिनाम गिते, हे मंगळवारी सायंकाळी एसटी स्टॅण्डमार्गे देवगड बाजारपेठेच्या दिशेने जात होते. याचमार्गे पीडित युवती ही आपल्या घरी परतत होती. या रस्त्यावरील आनंदवाडी येथे जाणाऱ्या मार्गावरील वळणाच्या ठिकाणी संशयित आरोपींनी युवतीला पाहून कार थांबवली.कारमधील संशयित हरिनाम गिते याने पीडित युवतीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिचा हात पकडून ‘माझ्यासोबत येतेस का?’तुला वसई फिरवतो’,असे विचारले. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून संशयित माधव केंद्रे, सटवा केशव केंद्रे, श्याम गिते, शंकर गिते,प्रवीण रानडे या संशयितांनी पीडित युवतीकडे पाहून टिंगलटवाळी केली. ‘तिला गाडीत घे,नंतर काय ते बघू’असे बोलून पीडित युवतीला गाडी मधून घेऊन जाण्याच्या इराद्याने व बेकायदेशीर कोंडून ठेवण्याची व गंभीर इजा पोहोविण्याच्या उद्देशाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
याबाबतची फिर्याद पीडित युवतीने देवगड पोतीस स्थानकात दिली असून संशयित हरिनाम गिते,माधव सुगराव केंद्रे, सटवा केशव केंद्रे, श्याम बालाजी गिते,शंकर संभाजी गिते, प्रवीण विलास रानडे या संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम ७४, ७५ (२), १४० (१), १४० (३), १४० (४), ६२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयितांना देवगड पोलिसांनी देवगड न्यायालयासमोर हजर केले.न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपींच्यावतीने अॅड. श्यामसुंदर जोशी यांनी काम पाहिले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण देवकर करीत आहेत. दरम्यान यातील चार जण हे पोलीस कर्मचारी होते त्यामुळे पोलीस खात्याला ही काळीमा फासणारी ही घटना असल्याचे बोलून नागरिक आपला संताप व्यक्त करत आहेत.
आंबोली: पुणे हिंजवडी येथे सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून पळालेले चोरीतील तीन आरोपी आंबोली पोलीसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पकडले असून त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ते गोवा येथून पुणे येथे चालले असल्याची माहिती आहे .त्यांच्याकडून दोन रिव्हॉल्व्हर आणि जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. आंबोली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, हवालदार सुमित पिळणकर,पोलिस दिपक शिंदे, पो . अभिजित कांबळे आणि उत्तम नार्वेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना शिताफीने पकडले
पुणे-हिंजवडी येथील सराफी पेढीवर दरोडा टाकून पसार झालेल्या तीन संशयित आरोपींना आज सावंतवाडी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ६ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्ताफ खान -वय २४, राजस्थान , गोविंद दिनवाणी – वय २२ वर्षे ,राजस्थान , राजुराम बिष्णोई वय – २६ राजस्थान अशी त्यांची नावे आहेत. काल सायंकाळी आंबोली पोलिसांनी आंबोली घाटात पूर्वीचा वस मंदिराजवळ या तीन आरोपींना दोन रिव्हॉल्व्हर ,आठ जिवंत काडतुसांसह जेरबंद केले होते. त्यावेळी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा त्यांनी प्रयत्न करत या संशयित आरोपींनी पोलिसांना चेक पोस्टवर गुंगारा देत चकवा देण्याचा प्रयत्न देखील केला होता. परंतु , पोलिसांनी शिताफीने त्यांना अखेर जेरबंद केले
रत्नागिरी दि. २७ जुलै :रत्नागिरी शहराजवळील टीआरपी येथील एका हॉस्पिटलवर आरोग्य विभागाने छापा टाकला. गर्भपात केंद्राची कोणतीही परवानगी नसताना या हॉस्पिटलमध्ये गर्भपाताच्या गोळ्या, साहित्य सापडले. या गर्भपाताच्या गोळ्या अनधिकृतपणे महिलांना दिल्या जात असल्याचे उघड झाले. हॉस्पिटलच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. त्यांना नोटीस देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या तक्रारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्याकडे आल्या होत्या. सत्य प्रकार जाणण्यासाठी त्यांनी या हॉस्पिटलमध्ये बनावट रुग्ण करून पाठवला. त्यावेळी गर्भपात केंद्राची कोणताही परवानगी नसताना या रुग्णालयात गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचे आढळून आले. गर्भपाताचे साहित्यही मिळाले. त्यामुळे भास्कर जगताप यांनी याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी डॉक्टरविरोधात ‘वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१’चे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. हॉस्पिटलचे मालक डॉ. अनंत नारायण शिगवण (वय ६७, रा. एमआयडीसी प्लॉट नं. २०, टीआरपी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.