Maharashtra Budget 2024:आज उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात ४ लाख ९८ हजार ७५८ कोटी रुपयांची महसूली जमा आणि ५ लाख ८ हजार ४९२ कोटी महसूली खर्च दाखवण्यात आला आहे. तसेच राज्याची महसुली तूट ९ हजार ७३४ रुपयांची तर राजकोषीय तूट ९९ हजार २८८ कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजूरीसाठी ठेवण्यात आले आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास ९ हजार १९३ कोटी, रोजगार हमी योजनेसाठी २ हजार २०५ कोटी, मराठी विभागासाठी ७१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १८ हजार १६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची वार्षिक योजना १ लाख ९२ हजार कोटी रुपयांची आहे. यासोबतच अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १५ हजार ८९३ कोटी रुपये, अदिवासी विकास उपयोजनेसाठी १५ हजार ३६९ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे.
या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने दिलेल्या दिशादर्शक अहवालानुसार आवश्यक धोरणांची अंमलबजावणीही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांकरिता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विकास योजनांच्या अंमलबजावणीचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.
अर्थसंकल्पातील ठळक बाबी
मौजे वडज, तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय
युवक, महिला, गरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी
स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत, विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत
विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गाकरीता भूसंपादनासाठी २२ हजार २२५ कोटी
पुणे चक्राकार वळण मार्गाकरीता भूसंपादनासाठी १० हजार ५१९ कोटी
जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी २ हजार ८८६ कोटी रुपये
सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता नगरविकास विभागाला १० हजार ६२९ कोटी रुपये
सार्वजनिक बांधकाम (रस्ते) विभागाला १९ हजार ९३६ कोटी रुपये नियतव्यय
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ॲन्युईटी योजना भाग-२ अंतर्गत ७ हजार ५०० किलोमीटर रस्त्यांची कामे
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ मधील ७ हजार ६०० कोटी रुपये खर्चून ७ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती
कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक आणि सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरु
फलटण-पंढरपूर, कांपा-चिमूर-वरोरा, जालना-जळगाव आणि नांदेड-बिदर या नवीन रेल्वे मार्गांकरिता ५० टक्के आर्थिक सहभाग
जालना-खामगाव, आदिलाबाद-माहूर-वाशिम, नांदेड-हिंगोली, मूर्तिजापूर-यवतमाळ शकुंतला रेल्वे आणि पुणे-लोणावळा मार्गिका ३ व ४ या रेल्वे मार्गांकरिता ५० टक्के आर्थिक सहभाग
वाढवण बंदर विकास प्रकल्पात महाराष्ट्र सागरी मंडळाचा २६ टक्के सहभाग- एकूण किंमत ७६ हजार २२० कोटी रुपये
सागरमाला योजनेअंतर्गत मुंबईत गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब सुसज्ज जेट्टीचे, २२९ कोटी २७ लाख रुपये किंमतीचे बांधकाम
भगवती बंदर, रत्नागिरी-३०० कोटी रुपये, सागरी दुर्ग जंजिरा, रायगड-१११ कोटी रुपये, एलिफंटा, मुंबई-८८ कोटी रुपये बंदर विकासाची कामे
मिरकरवाडा, रत्नागिरी बंदराचे आधुनिकीकरण-२ हजार ७०० मच्छीमारांना फायदा
छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्ताराकरिता भूसंपादनासाठी ५७८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी
सन २०२४ – २५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता ग्रामविकास विभागाला ९ हजार २८० कोटी रुपये
गृह-परिवहन, बंदरे विभागाला ४ हजार ९४ कोटी रुपये
उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी सुधारित औद्योगिक, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण उत्पादनाचे सुधारित धोरण तसेच नवीन सुक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम धोरण
१८ लघु-वस्त्रोद्योग संकुले स्थापन करुन सुमारे ३६ हजार रोजगार निर्मिती
“एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८” जाहीर-अंत्योदय शिधापत्रिकेवर एका कुटुंबास एका साडीचे मोफत वाटप
निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमात ४५० कोटी
निर्यातक्षम घटकांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी ४०० कोटी रुपये
निर्यात वाढीसाठी पाच इंडस्ट्रीयल पार्क
सामूहिक प्रोत्साहन योजनेतून आगामी वर्षात सुमारे सात हजार कोटी रकमेचा प्रोत्साहन निधी
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून २५ हजार उद्योग घटक -३० टक्के महिला उद्योजक -सुमारे ५० हजार नवीन रोजगार
थ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक व चार हजार रोजगार निर्मिती करणाऱ्या १० अतिविशाल उद्योग घटकांना प्रणेता उद्योगाचा दर्जा- १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व २० हजार रोजगार निर्मिती
सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता उद्योग विभागाला १ हजार २१ कोटी रुपये
सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाला १ हजार ९५२ कोटी रुपये
अमृत २.० अभियानांतर्गत १४५ शहरांमधील २८ हजार ३१५ कोटीचे ३१२ प्रकल्प मंजूर
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान सन २०३० पर्यंत राबविण्यात येणार
महाअभियानात सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असून त्यांच्या वर्गीकरणानुसार शासनाकडून प्रकल्प किंमतीच्या ५० ते ९५ टक्के निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता
सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला ३ हजार ८७५ कोटी रुपये नियतव्यय
दरवर्षी सुमारे २५ हजार किलोमीटर राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना वृक्षलागवड
अटल बांबू समृध्दी योजना- १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड
जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत ५ हजार ७०० गावांमधील १ लाख ५९ हजार ८८६ कामांना मंजूरी
सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाला २४५ कोटी रुपये
वन विभागास २ हजार ५०७ कोटी रुपये
मृद व जलसंधारण विभागास ४ हजार २४७ कोटी रुपये
शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा -मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजनेअंतर्गत ७ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट
शेतकऱ्यांसाठी “मागेल त्याला सौर कृषि पंप” ही नवीन योजना- ८ लाख ५० हजार नवीन सौरकृषी पंप
Krishi News: बोंडू Cashew Fruit पासून काजू वेगळे करणे तसे कंटाळवाणे काम. शेतकऱ्यांचा बराच वेळ या कामात वाया जातो. मात्र आता यावर सुद्धा उपाय आला आहे. बोंडूपासून काजू वेगळे करणारे एक यंत्र बाजारात आले आहे. या यंत्राने अवघ्या सव्वा मिनिटांत १० किलो काजू बोंडूपासून वेगळा होतो असा दावा करण्यात येत आहे. या दावा खराही आहे; कारण तसे प्रात्यक्षिक गोव्यातील वितरकाने एका व्हिडिओद्वारे दाखवले आहे.
चाके असल्याने हे यंत्र कोठेही नेता येते. हे यंत्र केरोसीन किंवा पेट्रोल या इंधने कार्यन्वित होते. नुसते काजू बोंडूपासून वेगळे होत नाही तर बोंडूपासून उप उत्पादन सुद्धा याद्वारे घेता येते.
फोंड्यातील राजेश देसाई या वितरकाने हा विडिओ बनवला आहे. आमच्या त्यांच्याशी प्रतिनिधीने संपर्क साधला असता या यंत्राची किंमत २ लाख रुपये असल्याचे समजले. किंमत ऐकून निराश होऊ नका; कारण याच वर्षी शेतकऱ्यांना परवडणारे लहान यंत्र बाजारात येणार असलयाचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर,दि. २१ फेब्रु. : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग पूर्ण करणे हे सरकारच्या दृष्टीने मोठे आव्हान असणार आहे. कारण या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध करण्यास सुरवात केल्याची बातमी समोर येत आहे.
नागपूर गोवा महामार्गाचे सर्वेक्षण कोल्हापूर जल्ह्यातील कागल तालुक्यात सुरु झाले आहे. या महामार्ग एकोंडी आणि बामणी या दोन गावातून जाणार असून या गावातील शेतकऱ्यांनी याविषयी एक बैठक घेऊन या महामार्गास विरोध करण्याचा पावित्रा घेतला आहे.
हा महामार्ग झाल्यास येथील अनेक शेतकरी भूमिहीन होतील, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या महामार्गास विरोध करावा असे या बैठकीत ठरले आहे. सरकारने या महामार्गाकरिता पर्यायी जागेचा विचार करावा अशी मागणी या सभेत करण्यात आली आहे. तसे न झाल्यास आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे यावेळी एकमताने ठरविण्यात आले आहे.
नवी मुंबई : रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत अशा एकूण दहा तासांसाठी न्हावा – शिवडी सागरी अटल सेतूवरून अत्यावश्यक वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक विभागाने अधिसूचना काढून दिली आहे.
त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातून द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरून मुंबईकडे येणारी वाहने गव्हाण फाटा मार्गे बेलापूर- वाशी मुंबई अशी तर जेएनपीटी आणि उरणहून मुंबईत जाणारी वाहनेही गव्हाण फाटामार्गे वाशी या मार्गाने वळविण्यात आली आहेत.
या वर्षीची मॅरेथॉन ही पहिल्यांदाच नागरिकांचे आकर्षण ठरलेल्या अटल सेतूवर आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई ते चिर्लेदरम्यान मॅरेथॉन होणार आहे. यासाठी ‘एमएमआरडीए’कडून वाहतूक विभागाकडे हा मार्ग बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही प्रवेशबंदी जाहीर करणारी सूचना नवी मुंबई वाहतूक पोलीस आयुक्त तिरुपती काकडे यांनी काढली असल्याची माहिती न्हावाशेवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. बी. मुजावर यांनी दिली आहे.
विशाळगड : आंबा विशाळगड मार्गावरील रात्रीची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यटक, भाविक, प्रवासीवगनि या मार्गावरून रात्रीचा प्रवास करू नये, अन्य मार्गाचा वापर करावा असा आशयाचा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे. मात्र मानोली, विशाळगड, गजापूर, केंबुर्णेवाडी, आंबा या गावांसाठी मार्ग खुला राहील, अशी माहिती मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी दिली.
कारण काय?
आंबा-विशाळगड हा मार्ग सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून जातो. राधानगरी आणि चांदोली अभयारण्यांना जोडणारा हा घनदाट वनराजीचा भाग आहे. विविध पक्षी, प्राणी, वनौषधी यांनी संपन्न जंगल असल्याने या मार्गावर जंगली पशू-पक्ष्यांचा वावर असतो. दुर्मीळ अशा जैविक जातीही येथे आढळतात. राज्य प्राणी शेखरू, गवा, लांडगा, कोल्हा, मोर, रानकोंबडे, मलबार पायबर पीठ, हॉर्नबिल यासारखे दुर्मीळ पक्षी-प्राण्यांच्या जाती येथे पाहावयास मिळतात. यांची सुरक्षितता तसेच निसर्ग सांभाळणारा प्रमुख घटक म्हणून त्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी हा मार्ग रात्रीचा बंद ठेवणे गरजेचे आहे.
मानोली येथील चेक पोस्ट येथे वन विभागाच्या वतीने प्रवाशांची तपासणी केली जाते. रात्रीची वाहतूक बंद केल्याने वनौषधींची तस्करी, चोरटी वृक्षतोड व गुन्हेगारीलाही पायबंद बसणार आहे.
वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने संयुक्त वन व्यवस्थापन समिती मानोली, मानोली ग्राम व वन विभाग करत असलेली उपाययोजना म्हणून रस्ता रात्रीच्या वेळी बंद राहील, असे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी सांगितले.
मुंबई : पश्चिम आणि मध्य रेल्वे कडून ३१ मार्च पर्यंत २ टप्प्यात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ही विशेष मोहीम १२ ते २५ फेब्रुवारी आणि १५ ते ३१ मार्च या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट काढून रेल्वे प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मध्य, पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या प्रथम श्रेणीसह द्वितीय श्रेणी डब्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसेच वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांना धक्काबुक्की प्रवास सहन करावी लागते. परिणामी, याबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. धावत्या वातानुकूलित आणि सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात तिकीट तपासणी करण्याची सूचना प्रवाशांकडून करण्यात आली. त्यानंतर, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकात तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. यासह आता भारतीय रेल्वेच्या प्रत्येक विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे. तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसह वाणिज्य अधिकारी आणि विभागीय कार्यालयातील वरिष्ठ पर्यवेक्षकांचे पथक आवश्यकतेनुसार आरपीएफ, दक्षता आणि इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना पाचरण करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाकडून संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
रेल्वे मंडळाकडून भारतीय रेल्वेमधील प्रत्येक विभागाला दिलेल्या सूचना
– आरक्षण केंद्रावर दलालाच्या हालचाली रोखण्यासाठी पथके तयार करून, तपासण्या कराव्यात. तसेच आपत्कालीन कोट्याचा गैरवापर होऊ नये, याबाबत सतर्क राहावे.
– कॅटरिंग कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांकडे योग्य शुल्क घेत आहेत आणि त्यांना योग्य पावती दिली जाते, याची तपासणी करावी. तसेच अनधिकृत विक्रेत्यांना रेल्वेगाड्यांमध्ये बंदी घालावी. खाद्यपदार्थांच्या स्टाॅलवर दराचे फलक आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची विक्री केली जाते का, हे तपासावे.
मुंबई :नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या संरेखनास महाराष्ट्र राज्य सरकारने मान्यता दिली आहे. एकूण ६ लेन असलेला ८०६ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. लवकरच या मार्गासाठी भूसंपादन प्रकियेस सुरवात होणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस महामार्गाशी जोडणी
हा महामार्ग कोल्हापूर येथून आंबोलीमार्गे तळकोकणात येणार आहे. या महामार्गाची समाप्ती बांदा येथील आरटीओ च्या जवळ होणार आहे. येथेच प्रस्तावित ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस महामार्ग या महामार्गाशी जोडण्यात येणार आहे.
नागपूर येथून सुरु होणार हा महामार्ग एकूण ११ जिल्ह्यातून जाणार आहे. यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि पत्रादेवी (उत्तर गोवा) अशी या जिल्ह्यांची नवे आहेत. प्रकल्पाचा अंदाजित एकूण खर्च ८३ हजार ६०० कोटी एवढा आहे. प्रकल्प पूर्ण करण्याची अंतिम तारीख जाहीर केली नसली तरी २०२८-२९ पर्यंत हा महामार्ग पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
MTHL News: नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आणि देशातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणुन ओळखल्या जाणार्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर MHTL (अटल सेतू) वर बेस्ट BEST आता प्रीमियम बस सेवा सुरु करणार आहे.
ही प्रीमियम बस कोकण भवन, बेलापूर ते वर्ल्ड ट्रेड सेंटर दरम्यान चालविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बसला S-145 असा नंबर देण्यात आला असून तिचे साई संगम, तारघर, उल्वे नोड, आई तरुमाता, कामधेनु ओकलैंड्स, एमटीएचएल, ईस्टर्न मोटरवे, सीएसएमटी, चर्चगेट स्टेशन और कफ परेड हे स्टॉप असतिल.चलो अॅपद्वारे (Chalo App) या बसमध्ये आसन आरक्षित केल्या जाऊ शकतील.
सकाळी बेलापूर ते वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि दुपारी दोन वाजता वर्ल्ड ट्रेड सेंटर ते बेलापूर अशा दोन सेवा सुरुवातीला चालविण्यात येतील. ही बस सेवा प्रीमियम बस सेवा असणार आहे. या बसचे तिकीट दर जाहीर केले नाही आहेत.
या प्रीमियम बससेवे नंतर लवकरच सामान्य बस सुद्धा या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. सार्वजनिक वाहनांचा टोल भार सरकार सहन करत असल्याने त्याचा परिणाम तिकिट दरात होणार नसल्याने या सामान्य बस चा तिकीटदर ईतर बस प्रमाणे असतिल असे बेस्ट च्या अधिकार्यांनी सांगितले आहे.
सावंतवाडी : धनादेशाद्वारे मी शिवसेनेला (ठाकरे गट) एक कोटी रुपये दिले होते आणि ते दिल्याचा माझ्याकडे पुरावा असल्याचा खळबळजनक दावाही दीपक केसरकर यांनी केला. शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सावंतवाडीतील जनसंवाद यात्रेतून मंत्री केसरकर यांच्यावर टीका केली होती. त्याला मंत्री केसरकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
केसरकर म्हणाले, ‘माझ्या श्रद्धेवर ठाकरे यांनी संशय घेतला. मात्र, मी शिर्डीहून आणलेली साईबाबांची शाल ठाकरे यांना घातल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले, याची कबुली रश्मी ठाकरे यांनी दिली होती. मग आता सावंतवाडीत येऊन खोटे कशाला बोलायचे? मला गद्दार म्हणण्याचा ठाकरे यांना अधिकार नाही. त्यांचे कर्तृत्व काय?
माझ्यात कर्तृत्व असूनही मला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी २०१४ मध्ये राज्यमंत्री केले; पण नंतरच्या काळात सत्ता आल्यानंतर माझ्याकडून कमिटमेंट पूर्ण न झाल्यानेच मला मंत्री करण्यात आले नाही. याची खुद्द आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीच कबुली दिल्याचा दावा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला. मुख्यमंत्री असताना लोकांना सोडा, आमदारांनाही ते भेटत नव्हते. मी तब्बल दोन महिने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर वाट बघत होतो; पण मला कधी भेटही मिळत नव्हती. मग त्यांच्याकडे लोक थांबणार कसे? मी स्वतःहून नाही, तर मला भाजपकडून निमंत्रण असतानाही ठाकरे यांनी सतत निमंत्रण दिले, म्हणून मी शिवसेनेत गेलो.’ असे ते पुढे म्हणालेत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपण पाणबुडी प्रकल्प मंजूर केल्याचा व तो गुजरातला नेण्यात आल्याचे सांगितले; पण वस्तुस्थिती सर्वांनी जाणून घ्यावी. पाणबुडी प्रकल्प मी स्वतः मंजूर केला होता; पण नंतरच्या पर्यटनमंत्र्यांनी तो प्रकल्प पुढे सरकवला नाही. त्यामुळेच तो रद्द झाला; मात्र आताच्या पर्यटनमंत्र्यांनी तो मंजूर केला असल्याचे मंत्री केसरकरांनी यावेळी सांगितले.
मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची मते लाखांच्या आतमध्ये होती; पण मी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हीच मते लाखांच्या बाहेर गेली. त्यामुळेच वैभव नाईक तसेच विनायक राऊत हे निवडून आल्याचा दावाही मंत्री केसरकर यांनी यावेळी केला.
Konkan Railway News: या वर्षापासून कोकण रेल्वेच्या मडगाव रेल्वे स्टेशनवर पॉड हॉटेल ही सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पॉड हॉटेलला कॅप्सूल हॉटेल म्हणूनही ओळखले जाते आणि एक अद्वितीय प्रकारची मूलभूत, परवडणारी निवास व्यवस्था याद्वारे प्रवाशांना दिली जाते. मडगाव रेल्वे स्टेशनच्या इमारतीतच ही सेवा दिली जाणार आहे. प्रत्येक अतिथीसाठी एक कॅप्सूल दिली जाते. मूलत: बेडच्या आकाराचे हे पॉड जे दरवाजा किंवा पडद्याने बंद करता येतात.
याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांसह ज्यांच्या रेल्वेगाडीला बराच विलंब असणार आहे, त्यांना होऊ शकतो. कमी वेळेत हॉटेल रूम शोधणे बऱ्याचदा प्रवाशांसाठी जिकिरीचे असते. अशावेळी प्रवाशांना या पॉड हॉटेलचा फायदा होऊ शकतो.
या सेवेसाठी तासाला नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. प्रवाशांना साह्य करणे हाच यापाठीमागचा हेतू आहे. तथापि, त्यातून कोकण रेल्वेला महसूलही मिळणार आहे.