कणकवली: कोंडये येथील फांदीचा माळ येथे काजू बागेत सोमवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडले. विशेष म्हणजे बिबट्या अगदी शांत स्थितीत होता. बिबट्या दिसल्याचे कळताच ग्रामस्थांनीही तेथे धाव घेतली. ग्रामस्थ अगदी काही फुटांवर असून देखील बिबट्या शांत होता. याचा फायदा घेत काही ग्रामस्थांनी स्टंटबाजी केली आणि व्हिडीयो बनवलेत. बिबट्याच्या काही फूट जवळ जाऊन फोटो सुद्धा काढले गेलेत. ही स्टंटबाजी जीवघेणी ठरली असती.
मात्र तो बिबट्या एवढा शांत का होता? याचे उत्तर अजूनही भेटले नाही. कदाचित तो जखमी असेल असा अंदाज बांधला जात आहे. जवळपास पंधरा मिनिटे बिबट्या तेथे होता. त्यानंतर तो जंगलच्या दिशेने निघून गेला. घटनेची माहिती समजताच वनविभागाचे वनक्षेत्रपाल अमित कटके आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी कोंडये ग्रामपंचायतीतर्फे वनविभागाकडे करण्यात आली आहे
नोकरी :सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
⇒ पदाचे नाव : लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल.
⇒ एकूण रिक्त पदे: 62 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग.
⇒ वेतन/ मानधन: रु. 15,000/- ते रु. 1,22,800/- पर्यंत.
⇒ वयोमर्यादा: १८ – ३८ वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट).
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 4 डिसेंबर 2023.
सिंधुदुर्ग: मालवणात सध्या नौसेना दिनाची धामधूम सुरू आहे. नौदलाच्या कवायती पाहण्यासाठी तारकर्ली समुद्रकिनारी लोकांची मोठी गर्दी होते आहे. गुरूवारी रात्री ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर लेझर शोला प्रारंभ झाला. लेझर शोमुळे किल्ल्यासमोरील परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता.
कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात आंजिवडे येथे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांचा साडेआठ हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या हायड्रो इलेक्ट्रिक वीजनिर्मिती प्रकल्प आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या भागात काही प्रमाणात यंत्रसामग्री आणण्याचीही तयारी सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, जिल्हा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून या संदर्भात कमालीची गुप्तता पाळली जात असल्याने येथील स्थानिक ग्रामस्थांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
आंजिवडे गावाचाच भाग असलेल्या वाशी येथे हा प्रकल्प होणार असून यासाठी १४० हेक्टर जमीन संपादित करणार असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. पाटगाव (जि. कोल्हापूर) येथील धरणाचे पाणी खाली आंजिवडे येथे आणून यातून २१०० मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती होणार आहे. १४० हेक्टर क्षेत्रांपैकी ७० हेक्टर क्षेत्रात जलसाठा केला जाणार आहे.येत्या पाच वर्षांत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष वीजनिर्मितीस सुरुवात होणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठीही या ठिकाणी प्रयत्न होणार असल्याचे समजते. त्यामुळे प्रकल्पाला कोणतीही आडकाठी आलेली नाही. अदानी समूहाने दिल्लीत आपली ताकद वापरून वनखात्याकडून ७०४ हेक्टर जमीनदेखील मिळवली असून, या प्रकल्पाला लागणारी १४० हेक्टर जमीन पूर्णतः संपादित करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राच्या एका अग्रगण्य वर्तमान पत्राने सुद्धा याबाबत बातमी प्रसिद्ध केली आहे. मात्र इतकी गोपनियता का पाळली जात आहे? याचे कोडे मात्र कायम आहे.
आंजिवडे येथून पाटगावमार्गे कोल्हापूरला जोडणाऱ्या घाटरस्त्याची अनेक वर्षे मागणी होत आहे. हा रस्ता झाल्यास कोल्हापूर-सिंधुदुर्ग अंतर कमी होणार आहे. फार कमी घाट फोडून हा मार्ग होऊ शकतो; मात्र वनजमिनीच्या प्रश्नामुळे हा घाट रस्ता लोकांची मागणी होऊनही प्रत्यक्षात आला नव्हता; मात्र अदानींच्या या नियोजित प्रकल्पासाठी शेकडो एकर वनजमीन संपादित करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
सावंतवाडी :सावंतवाडी रोड स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देण्यासाठी व नवीन रेल्वे गाड्यांना सावंतवाडी स्थानकात थांबा मिळण्यासाठी पुरेसे माध्यम असताना तसेच या स्थानकावरील अवलंबून प्रवासी वर्गाला, सावंतवाडीतील नागरिकांना, वेंगुर्ले व दोडामार्ग मधील नागरिकांना आणि कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विश्वासात न घेता कोकण रेल्वे प्रशासनाने वारंवार सावंतवाडी टर्मिनस (?) वर जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने सावंतवाडीवासियांनी एकदिलाने व एकजुटीने वेळीच एकत्र येऊन कोकण रेल्वे प्रशासनाविरोधात लढ्यासाठी चर्चा आणि विचार विनिमय करून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, व सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बचाव समिती 2.0 स्थापन करण्यासाठी सावंतवाडी टर्मिनस प्रेमी व समर्थकांची सभा रविवार दिनांक २६/११/२०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री राम वाचन मंदिर सावंतवाडी येथे आयोजित केली असल्याचे सावंतवाडी टर्मिनस प्रेमी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले असून या सभेस सावंतवाडी टर्मिनस प्रेमी व समर्थकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही केले आहे.
अलीकडेच कोकण रेल्वेच्या एका बड्या अधिकाऱ्याने सावंतवाडीकरांना रेल्वेच तिकीट परवडत नाही म्हणून खिल्ली उडवली होती तोच प्रत्यय पुन्हा देखील घडला, ही अपमानास्पद वागणूक न कळतपणे सावंतवाडीकरांची आहे.या साठी सनदशीर तसेच कायदेशीर मार्गाने जाण्याची तयारी केली पाहिजे, या संदर्भात तरी या सभेला आपली उपस्थिती प्रार्थनीय असून या सभेस आपली उपस्थिती नोंदवावी असे आवाहन ॲड, श्री संदीप निंबाळकर, श्री अभिमन्यू लोंढे, श्री मिहिर मठकर आणि भूषण बांदिवडेकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
बांदा: पत्रादेवी चेकनाक्यावरून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याच अनुषंगाने थेट पत्रादेवी-गोव्याच्या हद्दीत ज्या ठिकाणी मोपा हद्दीतला पत्रादेवी पोलिस चेकनाका आहे.
त्या ठिकाणी सिंधुदुर्ग पोलिस मोठ्या प्रमाणात गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी करत असल्याचे चित्र शनिवारी (ता.१८) सायंकाळी दिसून आले.
याविषयी महाराष्ट्र पोलिस निरीक्षक पवार यांच्याशी संपर्क साधला असता गोवा आणि महाराष्ट्र पोलिसांचे चांगले संबंध राहावेत. त्यासाठी संयुकरतीत्या ही मोहीम राबवली जात आहे. वेळप्रसंगी गोव्यातील पोलिस महाराष्ट्र हद्दीमध्ये येऊन महाराष्ट्रातील वाहने गोव्यात जात असतील आणि एखाद्यावेळी संशय असेल तर तेसुद्धा तशा प्रकारची तपासणी करू शकतात, असे सांगितले.
मागच्या काही महिन्यांपासून गोव्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत होती. पत्रादेवी चेकनाक्यावर न सापडणारी वाहने थेट सिंधुदुर्गातील बांदा, इन्सुली, आरोस या भागात अडवली जात होती आणि लाखो रुपयांची दारू हस्तगत करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र पोलिस करत होते.
मात्र, पेडणे अबकारी विभागाकडून तशा प्रकारची कारवाई का होत नव्हती, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांनी गोव्याच्या हद्दीमध्ये येऊन मागच्या तीन दिवसांपासून ही नाकाबंदी सुरू केलेली आहे. केवळ दुचाकी नव्हे तर प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात असल्याचे चित्र पत्रादेवी चेकनाक्यावर प्रत्यक्ष भेट दिली असता दिसून आले.
सिंधुदुर्ग :दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर आणि लोटांगण साठी प्रसिध्द असणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊली वार्षिक जत्रोत्सव येत्या दि. 28 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा व कर्नाटक राज्य आणि महाराष्ट्र राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात तसेच लोटांगण नवसही फेडतात.
श्री देवी माऊली जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी लाखो भाविक उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतात. जिल्ह्यातील मोठ्या जत्रांना सोनुर्लीच्या जत्रेपासून प्रारंभ होतो.
या जत्रोत्सवाला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तसेच इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविक नवस बोलणे व नवस फेडण्यासाठी येत असतात. या जत्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोनूर्ली माऊली देवस्थानं कमिटी पदाधिकरी यांनी केले आहे
देवगड : देवगड आगाराची वरेरी देवगड या दुपारच्या एसटी प्रवासी फेरीला दुपारी दोनच्या सुमाराला तळवडे खडवी येथे तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी नजीकच्या मांगरावर अडकली अपघातात तळेबाजार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. या एसटी प्रवासी फेरीचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडला. देवगड आगराची वरेरी तळवडे मार्गे देवगडकडे परतीच्या प्रवासाला येत असताना हा अपघात घडला सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या प्रवासी फेरीत सुमारे १५ विद्यार्थी अन्य १ प्रवास करीत होते त्यापैकी तीन विद्यार्थीनीना किरकोळ दुखापत झाली. आहे.
सिंधुदुर्ग : ओसरगाव येथे ज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने काल एक मोठी कारवाई केली आहे. सरपणाच्या आडून कंटेरनमधून बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कऱ्हाड येथील एकाला ओसरगाव येथे ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ७० लाखांच्या दारूसह सरपण व १६ चाकांचा कंटेनर असा तब्बल एक कोटी २६ लाख ३२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने केली. या प्रकरणी लक्ष्मण अर्जुन ढेकळे (वय ३४, रा. बेघरवस्ती-पाडळी ता. कऱ्हाड) याला ताब्यात घेतले. गेल्या चार दिवसांत कोटींचा मुद्देमाल जप्त करण्याची ही दुसरी कारवाई आहे.
याबाबत पथकाने दिलेली माहिती अशी ः दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती कोल्हापूरच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) ओसरगाव येथे आज सकाळी सापळा रचण्यात आला. यावेळी १६ चाकी कंटेनर (एनएल ०१ एजी ३८२०) तपासणीसाठी थांबविण्यात आला. चालकाकडे चौकशी केली असता त्याने आतमध्ये सरपणाच्या गोण्या असल्याचे सांगितले. अधिक तपासणीत गोण्यांमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा साठा आणि बियर बॉक्स आढळून आले.
पुठ्ठ्याच्या खोक्यात विदेशी मद्याच्या ७५० मिलीलिटरच्या नऊ हजार ६६० बाटल्या, १८० मिलीलिटरच्या ११ हजार ४० बाटल्या, ५०० मिलीलिटरच्या बियरच्या २ हजार ८०८ बाटल्या आढळल्या. पथकाने एकूण एक हजार १५२ खोके जप्त केली. ती सर्व सरपण गोण्याच्या मागे लपविली होती. पथकाने ७० लाख ८० हजार ३६० रुपये किमतीची दारू, ५५ लाखांचा कंटेनर आणि इतर साहित्य ५२ हजार ५०० रुपये असा एकूण एक कोटी २६ लाख ३२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर भरारी पथकातील निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, योगेश शेलार, राहुल सकपाळ यांनी कारवाई केली. श्री. येवलुजे तपास करीत आहेत.
मालवण : कर्जबाजारीपणाला कंटाळून सचिन सहदेव डिकवलकर (वय ३८, रा. डिकवल-बौद्धवाडी) यांनी ठासणीच्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी (ता. २७) रात्री आठच्यासुमारास घडला.त्याने गावात खळबळ उडाली. याबाबतची वर्दी त्यांच्या भावाने पोलिस (Police) ठाण्यात दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डिकवलकर मुंबई येथे पत्नी व मोठ्या मुलासह राहात होते. त्यांचा लहान मुलगा डिकवल येथे मूळ घरी राहात होता.
मुंबईहून आपल्या लहान मुलाला नेण्यासाठी काही दिवसांपूर्वी डिकवल येथे आले होते. कर्जबाजारी झाल्याने त्यांच्यात नैराश्य आले होते. त्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.