Category Archives: सिंधुदुर्ग

तळकोकणात मुंबई-गोवा महामार्गावर साकारले गेले आधुनिक दर्जाचे सिनेमागृह; येत्या शुक्रवारी उदघाटन

सिंधुदुर्ग:सावंतवाडी येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसाय उदय पारळे यांच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथे आराध्य सिनेमा नावाचे आधुनिक दर्जाचे सिनेमागृह साकारण्यात आले आहे. प्रकल्पात एकाच ठिकाणी सिनेमा पाहण्यासोबत हॉटेल, थिएटर आणि ओपन लॉनचा आनंद घेता येणार आहे. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला तालुक्यासह बांदा, शिरोडा या महत्त्वाच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाला लागून झाराप झिरो पॉईंट येथे बांधकाम व्यवसायिक उदय पारळे व त्यांच्या पत्नी स्मिता पारळे यांनी हा प्रकल्प उभारला आहे. आराध्य सिनेमा सोबतच याठिकाणी दर्जेदार असा सुसज्ज हॉल, हॉटेल, राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी सिनेमा पाहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना जेवणासह राहण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकाच ठिकाणी सर्व सोयी असल्याने सिनेमा पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार आहे. 
येत्या शुक्रवारी १ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता आराध्य सिनेमाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त्या रेणु गावसकर व सावंतवाडीचे उद्योजक शैलेश पै यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुळात सावंतवाडी, वेंगुर्ला व कुडाळ तालुक्याचा विचार करता दर्जेदार अश्या सिनेमा थिएटरची कमतरता श्री. पारळे यांनी ओळखून येथील जनतेसाठी ते उपलब्ध करुन दिले आहे. याठिकाणी नवनवीन सिनेमा उपलब्ध करुन देण्यात येणार असून अन्य आवश्यकत्या सर्व सोयी सुद्धा ठेवण्यात येणार.

Loading

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून भजन मंडळांना साहित्य वाटप; अर्ज करण्यासाठी उद्याचा अखेरचा दिवस

सिंधुदुर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भजन परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे बजेट करताना भजनी मंडळांना साहित्य पुरविण्याकरिता २५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. अशी तरतूद पहिल्यांदाच करण्यात आली आहे. एका भजन मंडळाला १० ते १२ हजार रुपयांचे साहित्य पुरविले जाणार आहे. या निर्णयाचे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भजनप्रेमी मंडळींकडून जोरदार स्वागत होत आहे. 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात घरोघरी साजरा केला जातो. त्याप्रमाणे वाडीवाडीत भजन मंडळे सक्रिय होऊन या कालावधीत घरोघरी जाऊन गणपती समोर आरती, भजने सादर करीत असतात. जिल्ह्यात प्रत्येक वाडीचे स्वतंत्र भजन मंडळ आहे. काही वाड्यांमध्ये तर एकापेक्षा अनेक भजन मंडळे कार्यरत आहेत. अलीकडे महिला भजन मंडळ, लहान मुलांचे भजन मंडळ हा सुद्धा ट्रेंड मोठ्या स्वरुपात सुरू झाला आहे. एवढी रसिकता व लोकप्रियता भजन या पारंपरिक कलेची जिल्ह्यात आढळून येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद या मूलभूत विषयाला प्राधान्य देताना अन्य नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी तजवीज करीत असते; मात्र यावर्षी यात वेगळीकता जिल्हा परिषदेने दाखविली आहे. जिल्हा परिषदेत प्रशासक असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी यावर्षी भजनी मंडळांना साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेचे विद्यमान ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या धर्तीवर ही संकल्पना मांडली आहे. पुणे जिल्ह्यातील वारकऱ्यांना जिल्हा परिषद वाद्य साहित्य पुरविते. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने भजनी मंडळांना साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने यासाठी मंडळ रजिस्टर असण्याची अट ठेवलेली नाही. 
सध्या यासाठी प्रस्ताव घेण्याचे काम सुरू आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी ग्रामीण भागातील भजन मंडळांची झुंबड उडालेली दिसत आहे. जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायती असल्या, तरी भजन मंडळांची संख्या हजारोंच्या संख्येने आहे. त्यामुळे कोणाला प्राधान्य दिले जाईल, हे निश्चित समजलेले नाही; मात्र ”पहिला प्रस्ताव, पहिले प्राधान्य” असा निकष असण्याची शक्यता आहे. उपलब्ध प्रस्तावांतून लॉटरी काढून लाभ दिला जाण्याचीही शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी २५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. एका मंडळाला दहा ते बारा हजार रुपयांचे साहित्य पुरविले जाणार आहे. यामध्ये एक मृदंग, पाच ते सहा टाळ, एक झांज या साहित्य संचाचा समावेश आहे. 
प्रस्ताव सादर करताना ग्रामसभा, मासिक सभेचा ठराव आवश्यक आहे. मंडळाची कार्यकारिणी यादी जोडणे गरजेचे आहे. मंडळ गावात कार्यरत असल्याबाबत ग्रामपंचायतीचा दाखला आवश्यक असून, पुरविण्यात येणारे साहित्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध असल्याबाबत मंडळाचा दाखला जोडणे गरजेचे आहे. पुरविण्यात येणाऱ्या साहित्याची देखभाल दुरुस्ती करण्यास तयार असल्याचा भजन मंडळाने दाखला जोडायचा असून, यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची शिफारस आवश्यक आहे. मंडळाचे किमान १० ते १५ सदस्य असल्याची कार्यकारिणी यादी जोडायची आहे. यासाठी ३० ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत आहे.

Loading

कुडाळ व कणकवली आगाराच्या ताफ्यात ‘शयनयान’ बसेस दाखल

सिंधुदुर्ग: कुडाळ आगारासाठी प्रथमच सहा शयनयान (स्लीपर) एसटी बसेस दाखल होणार आहेत. माजी खासदार निलेश राणे यांनी तशी मागणी केली होती; त्यांचा मागणीला यश आले आहे. या बस पैकी एक बस कणकवली आगारात दाखल झाली आहे.
या बसेस एसटीच्या कुडाळ आगारातून पणजी-पुणे-निगडी, पणजी-लातूर आणि पणजी-बोरिवली या मार्गावर चालविल्या जाणाऱ्या आहेत. . यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर होणार आहे. एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजली जाते. आता एसटीने देखील आधुनिकरणाची कास धरली असून, जिल्ह्यातील बसस्थानकांची नूतनीकरणाची कामे पूर्णत्वास जात आहेत. नवीन बसेस देखील प्रवाश्यांच्या सेवेसाठी दाखल होत आहेत. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सिंधुदुर्ग एसटी विभागाचे प्रमुख अभिजीत पाटील आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली होती.या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांना चांगली आणि आधुनिक सेवा देण्यासाठी माजी खासदार तथा कुडाळ मालवण विधानसभेचे प्रभारी निलेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही सतत प्रयत्नशील राहू, असे तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी म्हटले आहे.

Loading

सिंधुदुर्गात कॅश्यु फॅक्टरी फोडून ५६ हजार रुपयांचा ऐवज लंपास

सिंधुदुर्ग : इन्सुली खामदेव नाका येथील शिवदुर्ग कॅश्यु फॅक्टरी अज्ञात चोरट्याने आज पहाटेच्या सुमारास फोडली. यात ४८ हजार रुपयांची रोकड व ८ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ५६ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. याबाबतची फिर्याद मालक दिगंबर सदाशिव बोंद्रे यांनी बांदा पोलीसात दाखल केली आहे. ही घटना पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली असावी असा पोलीसांचा अंदाज आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली खामदेव नाक्यावर श्री गणेश मंदिर समोरील शिवदुर्ग कॅश्यु फॅक्टरी फोडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. चोरट्याने खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला. कपाटातील तीन काऊंटरमध्ये ठेवलेली सुमारे ४८ हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. तसेच सुमारे ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरुन नेला.

आज सकाळी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी सहकार्‍यां समवेत घटनास्थळाची पाहणी केली. मालक दिगंबर बोंद्रे व फॅक्टरीमधील कामगार यांच्याकडून आवश्यक माहिती घेतली. तसेच कॅश्यु फॅक्टरीमध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज तपासण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले. एलसीबी तसेच श्वान पथक व ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आल्याची माहिती एपीआय शामराव काळे यांनी दिली.

Loading

सिंधुदुर्ग: आंबोलीच्या जंगलात ‘ब्लॅक पँथर’ चा वावर..

आंबोली :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमध्ये गुरुवार दि. २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:४५ वाजता काळ्या बिबट्याचे दर्शन झाले. मिलिंद गडकरी यांना संध्याकाळी फेरफटका मारत असताना या काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यांनी तात्काळ वन विभागाला या नोंदीबद्दल कळवले आहे.

यापूर्वीही अशा काळ्या बिबट्याच्या आंबोलीमधून नोंदी झाल्या आहेत. २०१४ साली आजऱ्यामध्ये काळ्या बिबट्याची नोंद झाली होती. तसेच २०१६ मध्ये तिलारीमधूनही काळ्या बिबट्याची नोंद करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी कुडाळ तालुक्यात काळ्या बिबट्याच्या बछड्याला पकडण्यात आले होते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काळ्या बिबटय़ाचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. काळा बिबट्या हा सामान्य बिबट्यांसारखाच असतो मात्र त्यात मेलानिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेचा रंग काळा झालेला पहायला मिळतो. सह्याद्रीमध्ये ब्लॅक पँथर आहेत ही एक सकारात्मक गोष्ट असल्याचे तज्ञ सांगतात. मेलानिस्टीक बिबटे साधारणतः घनदाट जंगलांमध्ये आढळतात.

Loading

”…. म्हणुन सावंतवाडीला राजधानी एक्सप्रेस आणि अन्य प्रीमियम गाड्यांना थांबा नाही.” रेल्वे अधिकाऱ्याचे संतापजनक वक्तव्य

  • सावंतवाडी स्थानकात राजधानी एक्सप्रेसला पुन्हा थांबा मिळू शकत नाही
  • सावंतवाडीकरांना राजधानी चे तिकीट परवडणारे नाही
  • प्रीमियम /वंदेभारत या गाड्या सावंतवाडीसाठी नाहीत 

पनवेल | सागर तळवडेकर : कोकणात रेल्वे यावी यासाठी बापजाद्यांनी राखून ठेवण्यात आलेल्या आपल्या जमिनींचा त्याग करून कोकणवासीयांनी खूप मोलाचे योगदान दिले आहे. मात्र येथील अनेक स्थानकावर थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न करूनही, प्रवासी संख्या असूनही अनेक गाड्यांना येथे थांबा देण्यात आला नाही आहे. एवढे कमी होते म्हणुन की काय आता तर रेल्वे अधिकारी चक्क संतापजनक वक्तव्ये करताना दिसत आहेत.

सावंतवाडी स्थानकात अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा आणि येथील टर्मिनसचे रेंगाळलेले काम पूर्ण करावे यासाठी काल दिनांक २४ ऑगस्ट ला ठरल्या प्रमाणे मिहिर मठकर आणि सुरेंद्र नेमळेकर यांनी कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या बेलापूर ऑफिस मधे चीफ ऑपरेटिंग मॅनेजर श्री वी.स. सिन्हा यांची भेट घेतली.

सावंतवाडी रेल्वे स्थानक हे सिंधुदुर्गातील एक महत्वाचे स्थानक आहे, येथील स्थानकात नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते परंतु अपेक्षित प्रवासी संख्या आणि उत्पन्न असताना देखील येथे गाड्या मात्र हाताचा बोटं मोजण्या इतक्याच थांबत आहेत.सध्या कोकण रेल्वे मार्गावर ४४ गाड्या धावतात त्यापैकी सावंतवाडी स्थानकात एकूण ५ दैनिक आणि ४ साप्ताहिक अश्या ९ गाड्या थांबतात.तसेच सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न हे २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत तब्बल ४.४ करोड एवढे आहे आणि आता पुढच्याच महिन्यात गणपती चतुर्थी असल्याने दुसऱ्या तिमाहीत देखील हा आकडा वाढण्याची दाट शक्यता देखील आहे असे असून ही सावंतवाडी स्थानकात रेल्वे गाड्यांचे अधिकचे पर्याय उपलब्ध नाहीत. अलीकडेच संगमेश्वर आणि खेड ला अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला, हे सर्व लक्षात घेता रेल्वे अभ्यासक मिहिर मठकर आणि कोंकण रेल्वे समन्वयक समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ रेल्वे अभ्यासक सुरेंद्र नेमळेकर यांनी नियोजन करून श्री सिन्हा यांची भेट घेतली आणि विविध विषयावर चर्चा केली. यावेळी सावंतवाडी टर्मिनस प्रेमी या व्हॉट्सॲप ग्रुप च्या माध्यमातून श्री सिन्हा यांना निवेदन देण्यात आले.

अनुक्रमे सुरेंद्र नेमळेकर, वी एस सिन्हा, मिहिर मठकर

सावंतवाडी टर्मिनस चे उर्वरित टप्पा २ चे काम पूर्ण करणे आणि येथील स्थानकाचा विकास केंद्राचा अमृत भारत स्थानक योजनेतून करावे इत्यादी मागणया यावेळी करण्यात आल्या, येथील स्थानकात प्रवाशांची वर्दळ पाहता मंगलोर,मत्स्यगंधा,वंदे भारत,मंगला,नेत्रावती,गोवा संपर्क क्रांती,एलटीटी दुरोंतो,मरूसागर,त्रिवेंद्रम निजामुद्दीन आदी एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा तसेच कोरोना काळात थांबा काढून घेण्यात आलेल्या राजधानी एक्सप्रेस, गरीब रथ एक्सप्रेस आणि नागपूर-मडगाव या गाड्यांचा थांबा तत्काळ चालू करावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. या विषयाला अनुसरून बोलताना श्री सिन्हा हे सावंतवाडीकरांचा मागण्यांबद्दल अनुत्सुकच दिसले, त्यांनी सावंतवाडी स्थानकात राजधानी एक्सप्रेसला पुन्हा थांबा मिळू शकत नाही असे सांगितले, सावंतवाडीकरांना राजधानी चे तिकीट परवडणारे नाही तसेच प्रीमिअम गाड्या ह्या सावंतवाडी साठी नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येथे राजधानी तर नाहीच पण नव्याने चालू झालेली वंदे भारतचा थांबा देखील येथे मिळण्याचा आशा धूसर झाल्यात.टर्मिनस संदर्भात श्री सिन्हा यांना विचारले असता सावंतवाडी टर्मिनस करिता कोंकण रेल्वे कडे निधीची तरतूद नाही असे स्पष्ट केले त्यामुळे तमाम कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा विषय असणारा सावंतवाडी टर्मिनस चे भविष्य हे अंधातरीतच आहे असे दिसते. अलीकडेच अनेक प्रवासी संघटना आणि संस्था यांनी या संदर्भात निवेदने सादर केली होती परंतु रेल्वे प्रशासन याची दखल घेत नसल्याची खंत मिहिर मठकर आणि सुरेंद्र नेमळेकर यांनी मांडली.

गणेश चतुर्थी ही वीस दिवसांवर येऊन ठेपली असता सोडलेल्या जादाच्या गाड्या ह्या कुडाळ पर्यंतच आणि पुढे मडगाव आणि दक्षिणेकडील आहेत त्यामुळे यावर्षी तरी निदान अजुन गणपती स्पेशल गाड्या सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांकडे होत आहे. सध्यातरी सोडलेल्या गाड्या ह्या अपुऱ्या आहेत अजुन गाड्या सोडून गणेश भक्तांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

कोंकण रेल्वे अधिकाऱ्याकडून मिळालेली तोंडी उत्तरे ही अपेक्षित नसून याबाबत लवकरच सावंतवाडीकरांना घेऊन भूमिका जाहीर करू असे मिहिर मठकर यांनी सांगितले.दिलेल्या निवेदनात मिहिर मठकर, सुरेंद्र नेमळेकर आणि सागर तळवडेकर यांनी सह्या केल्या होत्या.

Loading

कुडाळच्या शिरपेचात मानाचा तुरा; ठरला स्वच्छतेतील पंचतारांकित मानांकन मिळवणारा राज्यातील पहिला तालुका

सिंधुदुर्ग: हागणदारी मुक्त अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यानं बाजी मारली आहे. राज्यातल्या 351 तालुक्यामध्ये सर्वप्रथम स्वच्छतेतील पंचतारांकित मानांकन मिळवणारा कुडाळ हा पहिला तालुका ठरला आहे. याआधीच सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारी मुक्त अभियानात संपूर्ण राज्यात सर्वात प्रथम संपूर्णपणे हागणदारी मुक्त झाला आहे. श्रावण महोत्सवात स्वच्छ्ता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी ही घोषणा केली.

कुडाळ पंचायत समिती आयोजित ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाचा सांगता समारंभ काल संपन्न झाला. तसेच यावेळी श्रावणमेळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या श्रावण महोत्सवाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी कुडाळ तालुक्यातल्या ६० गावांमधली माती दिल्लीला पाठवण्यात येणाऱ्या कलशात एकत्र करुन तो कलश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला.

 

 

Loading

खेड, संगमेश्वरला थांबे; सावंतवाडीच्या पदरी मात्र उपेक्षाच

 

सिंधुदुर्ग | सागर तळवडेकर :रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध मार्गांवर धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना काही थांबे प्रायोगिक तत्त्वावर मंजूर केले आहेत. त्यात कोकण रेल्वे मार्गावरील खेड स्थानकावर मंगला तसेच एलटीटी कोचुवली एक्सप्रेसला तर संगमेश्वरवासियांची दीर्घ काळ मागणी असलेल्या नेत्रावती एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाने प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर केला आहे, या मधे सावंतवाडीकरांची मागणी असलेली मंगला,मंगलोर,वंदे भारत,नागपूर – मडगाव,मत्स्यगंधा,नेत्रावती आणि कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या त्रिवेंद्रम राजधानी आणि गरीब रथ एक्सप्रेस संदर्भात काहीच निर्णय झाले नसल्याचे उघड झाले आहे.एकंदरीत सावंतवाडीकरांचा मागण्यांना केराची टोपली दाखवली असेच दिसते.

कोकण रेल्वेच्या संगमेश्वर स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी चिपळूण संगमेश्वर फेसबुक समूहा च्या माध्यमातून संगमेश्वरवासियांना सोबत घेऊन पत्रकार संदेश जिमन यांनी वेळोवेळी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. संगमेश्वरवासियांच्या या दीर्घ लढ्याला अखेर यश आले आहे. रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध मार्गांवरील गाड्यांना जे काही प्रायोगिक थांबे दिले आहेत त्यात संगमेश्वरवासियांच्या नेत्रावती एक्सप्रेसला थांबा देण्याच्या मागणीचाही समावेश झाला आहे.

याचबरोबर मुंबई ते मडगाव या मार्गावर अलीकडेच वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा मिळालेल्या खेड स्थानकाला रेल्वेने आणखी एक भेट दिली आहे. एर्नाकुलम -हजरत निजामुद्दीन मार्गावर धावणारी मंगला एक्सप्रेस तसेच एलटीटी ते कोचुवेली दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाडीला खेड थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर खेडवासीयांना आणखीन दोन गाड्यांचा पर्याय उपलब्ध झाला आहे या साठी जल फाउंडेशच्या अक्षय महापदी यांनी विशेष प्रयत्न केले होते.

रेल्वे बोर्डाने त्या त्या झोनला पाठवलेल्या पत्रात प्रायोगिक थांबा मंजूर केलेल्या गाड्यांना नवीन थांब्यावर थांबवण्याची अंमलबजावणी त्या त्या ठिकाणच्या सोयीनुसार शक्य तितक्या लवकर करण्याबाबत सूचित केले आहे.

सावंतवाडीकरांच्या पदरी मात्र उपेक्षाच.

अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न आणि प्रवासी संख्या असूनही सावंतवाडीकरांवर अन्याय सुरूच आहे. पहिल्यांदा झीरो टाईम टेबलच कारण देऊन त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस आणि एलटीटी कोचुवेली गरीबरथ एक्सप्रेसचे थांबे काढून घेण्यात आले, त्यानंतर नागपूर मडगाव या स्पेशल गाडीचा थांबा देखील या स्थानकातून काढून घेण्यात आला.या स्थानकात दोन महिन्यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा देखील नाकारण्यात आला होता, येथील टर्मिनसच काम देखील ठप्प आहे, या सर्व बाबींवर अलीकडेच काही प्रवासी संघटनांनी देखील पाठपुरावा केला होता परंतु रेल्वे बोर्डाने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधीही याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत असेच चित्र येथे पाहायला मिळते. या स्थानकात स्वर्गीय डी के सावंत यांचा पुढाकाराने मंगला आणि मंगलोर एक्सप्रेसला थांबा कोकण रेल्वे चे संचालक श्री गुप्ता यांनी तत्वतः मान्य केला होता, तसेच येथे वंदे भारत, नेत्रावती, मत्स्यगंधा, नागपूर मडगाव, मंगलोर, मंगला या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा म्हणून सर्वजण प्रयत्नशील आहेत आणि त्यासाठी आवश्यक पाठपुरावा देखील सुरू आहे परंतु प्रवासी आणि प्रवासी संघटनांची उदासीनता देखील या थांब्याना येथे मंजुरी न मिळणे कारणभूत असू शकते असेच दिसते.

Loading

सिंधुदुर्ग जिल्हाच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती

 

कोल्हापुर :सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या  के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. उद्या बुधवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. तर किशोर तावडे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणुन नेमणूक करण्यात आली आहे.

के. मंजूलक्ष्मी हे सध्या सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून ते सिंधुदुर्ग मध्ये सर्वाधिक प्रशासकीय कारभार सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी ठरल्या आहेत. ते सिंधुदुर्ग येथे दोन वर्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व तीन वर्ष जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.के.मंजुलक्ष्मी ह्या ९ फेब्रुवारी २०१८ ला सिंधुदुर्ग मध्ये जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू झाल्या त्यानंतर दोन वर्षानी २० मे २०२० रोजी त्यांची जिल्हाधिकारी पदी शासनाने नियुक्ती केली होती. कोरोना काळात त्यांनी जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट काम केले होते.तर सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ भारतमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आला होता यामुळे त्यांचा दिल्लीत सत्कार ही झाला होता .

Loading

कुणकेश्वर मंदिर : उत्तेजक व तोकडे कपडे घालून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश बंद

सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरामध्ये श्रावणी सोमवारचे औचित्य साधून येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी यांनी दिली.
कुणकेश्वर येथील देवस्थान ट्रस्ट कार्यालय मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे. भारतीय हिंदू संस्कृतीचे नीट पालन होण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. येणारे भाविक अंग प्रदर्शन, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय व तोकडे वस्त्र तसेच अवास्तविक वेशभूषा करून मंदिरात प्रवेश करत होते. परंतु आता अशा वस्त्र परिधान करणाऱ्या व्यक्तींना मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच येणाऱ्या भाविकांसाठी पंचा-उपर्णे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यासाठी भाविकांनी नियमाचे पालन करून मंदिर प्रशासनात सहकार्य करावे आणि संस्कृतीचे पालन करावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी यांनी केले आहे. यावेळी माजी सरपंच गोविंद घाडी, संजय आचरेकर, संतोष लाड गणेश वाळके, व्यवस्थापक रामदास तेजम अजय नाणेरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search