Category Archives: सिंधुदुर्ग

कोल्हापूर ते कोकण प्रवास एका तासात शक्य; आंबोली घाटाला छेदून येणार ‘हा’ महामार्ग

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे. कोल्हापूर ते सावंतवाडी दरम्यान लागणाऱ्या आंबोली घाटाखालून हा महामार्ग येणार आहे. आंबोली घाटातून मोठा बोगदा खोदला जाऊन तेथून हा महामार्ग जाणार असल्याने कोल्हापूर ते कोकण अंतर १ तासात गाठणे शक्य होणार आहे. 
सध्या आंबोली घाटातून वाहतूक खूप धीम्या गतीने होते. पावसाळ्यात अनेकदा वाहतूक धोक्याची होते. दरी कोसळल्याने वाहतूक कित्येकदा बंद होते. मात्र शक्तीपीठ महामार्ग झाल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि तळकोकण जवळ येणार आहे. 
समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग बांधण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोडणारा महामार्ग असावा, यातून एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाची संकल्पना पुढे आणली. त्यातही विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना, देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असावा. यातून ‘शक्तिपीठ’ महामार्ग एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सध्या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. येत्या सहा महिन्यात हा आराखडा तयार होण्याची शक्यता आहे. 

सावंतवाडीत रामभक्त नाही आहेत का? ‘आस्था स्पेशल एक्स्प्रेस’ ला थांबा न दिल्याने प्रवाशांचा रेल्वेला प्रश्न..

सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. बांदा, वेंगुर्ला, शिरोडा, रेडी पासून आंबोली चौकुळ अशा विस्तारित क्षेत्रातील प्रवाशांसाठी हे सोयीचे स्थानक आहे. उत्पन्नाच्या बाबतीतही हे कोकण रेल्वे च्या पूर्ण मार्गातील पाहिल्या दहा स्थानकांत मोडते. असे असूनही येथे खूप कमी गाड्यांना थांबे दिले आहेत. प्रवासी संघटनांनी वेळोवेळी मागणी करूनही अजूनही काही मुख्य गाड्यांना थांबे मिळाले नाही आहेत. त्यात भर म्हणजे आता विशेष गाड्यांच्या थांब्यांसाठी सावंतवाडी स्थानकाला वगळण्यात येत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर आताच जाहीर करण्यात आलेल्या अयोध्ये यात्री साठी चालविण्यात येणार्‍या ‘आस्था स्पेशल एक्स्प्रेस’ ला सावंतवाडी स्थानकावर थांबा देण्यात आला नाही आहे. त्यामुळे सावंतवाडीत रामभक्त नाहीत का? असा सवाल प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला विचाराला जात आहे. रेल्वे अभ्यासक आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे श्र. सागर तळवडेकर यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले असून या गाडीला सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी केली आहे. 

विविध मागण्यांसाठी सावंतवाडी येथे आज लाक्षणिक उपोषण. 

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पुर्ण व्हावं, त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे आणि काढून घेतलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून आज २६ जानेवारी रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई व कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीसह सहयोगी २३ संस्थांच्या वतीने लाक्षणिक उपोषण छेडण्यात येत आहे. 

 

 

 

 

 

 

कोकण रेल्वेसंबधी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी २३ संघटना एकत्र; उद्या दिनांक २६ जानेवारीला सावंतवाडी येथे लाक्षणिक उपोषण

सावंतवाडी: सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पुर्ण व्हावं, त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे आणि काढून घेतलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी अ अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई व कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीसह सहयोगी २३ संस्थांच्या वतीने लाक्षणिक उपोषण छेडण्यात येत आहे. 
संघटनेमार्फत खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत 
१) सावंतवाडी टर्मिनस परिपूर्ण करून त्याला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे.
२) कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे
३)ZBTT अंतर्गत काढलेले थांबे पूर्ववत करणे.
४)सावंतवाडी स्थानकावर प्रवासी सुविधांचा विस्तार करणे(पूर्णवेळ PRS,अमृत भारत स्थानक योजना,एक स्थानक एक उत्पाद, आदी.
५) प्रा. मधु दंडवते यांचा प्रत्येक स्थानकावर तैल चित्र लावणे.
६)चिपळूण – कराड, वैभववाडी – कोल्हापूर, सावंतवाडी – बेळगाव या रेल्वे मार्गांना चालना देणे.
७)सावंतवाडी स्थानकावर मंगलोर, मंगला सहित अतिरिक्त सुपरफास्ट गाड्यांना थांबा देणे.
८. याच बरोबर पश्चिम रेल्वेवरुन कोकण रेल्वेमार्गावर नेहमीसाठी बांद्रा – वसई – सावंतवाडी नवीन एक्सप्रेस किंवा मधू दंडवते एक्सप्रेस व मध्य रेल्वेवरून पुणे – कल्याण – सावंतवाडी एक्सप्रेस तसेच दादर-चिपळूण मेमू व मुंबई-रत्नागिरी एक्सप्रेस सुरू करावी.
९. येथील भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाव्यात व न्याय मिळावा.
सामाजिक आणि राजकीय पक्षांचा पाठिंबा
या उपोषणास कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीसह एकूण २३ संस्था एकत्र आल्या आहेत. सिंधुदुर्ग प्रतिष्ठान-मुंबई, संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था-मुंबई, पागवाडी मुळीक प्रतिष्ठान- इन्सुली सिंधुदुर्ग, घे भरारी फाऊंडेशन-चर्चगेट, जनजागृती सेवा संस्था-ठाणे , ऑटो रिक्षा चालक मालक संघटना-सावंतवाडी, मुस्लिम हेल्थ अँड वेलफेअर फाऊंडेशन- सावंतवाडी इत्यादी संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. याचप्रमाणे अनेक राजकीय नेत्यांनी आपले समर्थन दिले आहे. मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.   
  
ईमेल अभियान 
आपल्या रेल्वे प्रशासन,केन्द्र सरकार व राज्य सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी संघटनेतर्फे ‘ई-मेल करा’ अभियान राबविण्यात येत आहे. आपल्या हक्कासाठी, कोकणकरांच्या सुखकर व निर्विघ्न प्रवासासाठी,न्यायासाठी सांवतवाडी येथे रेल्वे टर्मिनस  व्हावे जेणेकरून आम्हा कोकणवासियांना हक्काच्या गाड्या मिळतील यासाठी रेल्वे प्रशासन,केन्द्र सरकार व राज्य सरकारला जाग येण्यासाठी शेकडोच्या संख्येने ईमेल पाठवण्याचे आवाहन संघटनेमार्फत करण्यात आले आहे. त्यासाठी  खाली लिंकवर  ई-मेल चा मायना दिला आहे त्यात स्व:ताचे नाव व मोबाईल नंबर टाकुन आपल्या ईमेल ने सन्माननीय पंतप्रधान तसेच रेल्वे मंत्री, रेल्वेराज्यमंत्री, रेल्वे बोर्ड व कोकण रेल्वेचा व्यवस्थापकीय संचालक यांना आणि महाराष्ट्र शासनाचे मंत्री यांना पाठवायचे आहेत.

कोकणात रुजतोय ‘डेस्टिनेशन बीच वेडिंग’ चा ट्रेंड; निर्माण करतोय रोजगाराच्या नवीन संधी

सिंधुदुर्ग : हल्ली वेगवेगळ्या लग्नाचे वेगवेगळे ट्रेंड पहायला मिळतात. त्यातीलच एक ट्रेन्ड म्हणजे बीच वेडिंग. भारतात बीच वेडिंगसाठी गोवा हे सगळ्यांचे आवडते डेस्टिनेशन आहे. मात्र आता कोकणातील समुद्र किनाऱ्यावर लग्न करण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वच्छ सुंदर आणि जगभरात ब्लु फ्लॅक नामांकन असलेल्या भोगवे समुद्र किनाऱ्यावर असे लग्न करू शकता.

सध्या प्री विडिंग फोटोशूट समुद्र किनाऱ्यावर होतात. मात्र आता लग्न सोहळे देखील कोकणातील समुद्र किनाऱ्यावर होत आहेत. लग्नाच्या आठवणी जपून राहाव्यात यासाठी प्रत्येक जण आपलं लग्न खास व्हावे यासाठी धडपडत असतो. हल्ली वेगवेगळ्या लग्नाचे वेगवेगळे ट्रेंड पहायला मिळतात. त्यातीलच एक ट्रेन्ड म्हणजे बीच वेडिंग मुंबई, पुणे सारख्या शहरातील युवा पिढी कोकणातील निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावर लग्न करत आहेत. हल्लीच सोलापूर येथील डॉ. चिराग होरा आणि स्नेहल शिंपी ठाणे यांनी आपलं लग्न अविस्मरणीय व्हावा यासाठी भोगवे समुद्र किनारी लग्न केलं.

नवा ट्रेंड नेमका काय?
सध्या लग्नसोहळे हे ट्रेंडनुसार केले जातात. काही जणं मोकळ्या मैदानात, काही जणं आलिशान जागेत लग्न सोहळा आयोजित करतात. त्यातच आता समुद्र किनारी लग्न सोहळे आयोजित करणं हा एक नवा ट्रेंड सुरु झालाय. यामुळे बऱ्याचदा अस्ताला जाणाऱ्या सुर्याचा मुहूर्त निवडला जातो. निळाशार समुद्र हा नव्या नात्यांचा साक्षीदार देखील होतोय. यामुळे तो लग्नसोहळा हा फक्त लग्न करणाऱ्या दोन व्यक्तींच्याच नाही तर कुटुंबाताली प्रत्येक जणाच्या लक्षात राहण्यासारखा केला जातोय.

रोजगाराच्या संधी उपलब्ध
कोकणात जर ट्रेंडमुळे रोजगाराच्या संधी कोकण वासीयांना उपलब्ध होणार आहेत. या नव्या ट्रेंड मूळे हॉटेल आणि कॅटरिंग व्यवसायाला चांगले दिवस येणार येवू शकतील. तसेच लग्नसोहळा संबधित व्यावसायिकांना त्याचा फायदा होऊ शकतो.

सिंधुदुर्गात १६२६ ‘आदिम’ लोकसंख्येचा पीएम जनमन योजनेअंतर्गत होणार विकास

सिधुदुर्ग: केंद्राने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान तथा पीएम जनमन अभियान सुरू केले असून त्यामध्ये जिल्ह्याचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत १६२६ आदिम समाजाचे नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. २० वाड्यांमध्ये या समाजाचे वास्तव्य असल्याचेही पुढे आले आहे. आता या समाजाला रस्ते, पाणी, वीज, प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र, नळपाणी पुरवठा योजना आदी महत्त्वाच्या सुविधा या अभियान अंतर्गत देण्यात येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम जनमन) अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (पीएमएवाय – जी) च्या 1 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी केला आहे 
दुर्लक्षित घटकातील अगदी शेवटच्या व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधानांच्या अंत्योदयाच्या दृष्टिकोनातून होत असलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगाने, 15 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने, विशेषत: दुर्लक्षित आदिवासी समूहाच्या (पीव्हीटीजीएस) सामाजिक-आर्थिक कल्याणासाठी पीएम जनमन अभियान सुरू करण्यात आले.
सुमारे  24,000 कोटी रुपयांची पीएम जनमन योजना  9 मंत्रालयांच्या माध्यमातून 11 प्रमुख उपक्रमांवर लक्ष केंद्रित करते.विशेषत: दुर्लक्षित आदिवासी समूहातील (पीव्हीटीजीएस) कुटुंबे आणि  लोकवस्त्यांना सुरक्षित घरे, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पोषण, वीज, रस्ते आणि दूरसंचार  यासारख्या मूलभूत सुविधा आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी प्रदान करून या घटकांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.


देवगड, कणकवली, कुडाळ, मालवण आणि वेंगुर्ले या पाच तालुक्यांत ही वस्ती आहे. यातील १६ वाड्यांतील आदिम समाजाजवळ कच्चे घर सुद्धा राहण्यासाठी आढळलेले नाही. केवळ एकच वाडी जवळ जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. सहा वाड्यांत प्राथमिक शाळा नाहीत. चार वाड्यांना अंगणवाडी केंद्र नाही. तीन वाड्यांना आरोग्य केंद्र नाही. १९ वाड्यांत कौशल्य विकास केंद्र नाही. १३ वाड्यांत स्वच्छ पाणी नाही. सात वाड्यांत नळपाणी पुरवठा करणारी योजना नाही. १३ वाड्यांत वीज पुरवठा नाही. १५ घरांत सार्वजनिक शौचालय नाही, असे या सर्व्हेक्षणात पुढे आले आहे.
जिल्ह्यात आदिम समाजाचे वास्तव्य आढळलेल्या २० वाड्यांमध्ये केंद्राच्या प्रत्येक योजना अभियानाच्या माध्यमातून राबविल्या जाणार आहेत. ज्या योजना अद्याप पोहोचलेल्या नाहीत, त्याला प्राधान्य दिले जाणार आहे. व्यक्तिगत लाभ मिळालेला नसल्यास तोही दिला जाणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कोकण विभागातून वेंगुर्ला नगरपालिका अव्वल

सिंधुदुर्ग: वेंगुर्ले नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरी नुसार कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. देशामध्ये १ लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरातून पश्चिम विभाग ३७ वा, महाराष्ट्रामध्ये ३९ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच वेंगुर्ले शहरास जीएफसी १ स्टार व ODF ++ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे वेंगुर्ले नगरपरिषदेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

नगरपरिषद मार्फत वर्षभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम, स्वच्छता जनजागृतीपर विविध कार्यक्रम व यामध्ये स्वच्छताप्रेमी वेंगुर्लेवासियांचा मिळणारा उत्स्फूर्त सहभाग या सर्वामुळे वेंगुर्ले नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये घवघवीत यश प्राप्त झाले आहे. आतापर्यंत वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण मध्ये विविध पुरस्कार प्राप्त झाले असून मुख्याधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता दूत, सामाजिक संस्था व नागरिक यांच्या सहकार्यातून हे यश प्राप्त झाले आहे, असे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सांगितले.

 

 

कोकणचा सुपुत्र ठरला गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर; शोधून काढले सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान

Sindhudurg :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे सुपुत्र चंद्रकांत काजरेकर गिनीज बुक रेकॉर्ड होल्ड ठरले आहेत.शेती आणि बागायतदार चंद्रकांत काजरेकर कुडाळ यांच्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान म्हणून रेकॉर्ड झाले आहे.  

 सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात प्रथम प्रशासन अधिकारी आणि नंतर अकाउंटंट व्यवस्थापक म्हणून सुमारे ३२ वर्षे सेवा करून निवृत्त झालेले चंद्रकांत काजरेकर आंबा आणि काजू बागायतीची आवड जोपासत असताना त्यांना आपल्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान खूपच लांब व रुंद असल्याचे आढळले. त्या पानाची लांबी व रुंदी त्यांनी मोजली. गुगलच्या सहाय्याने जगातील रेकॉर्ड पडताळून पाहिले. निरीक्षणानंतर त्यांना आढळले की हे जगातील रेकॉर्ड होऊ शकते. या वैशिष्ट्यपूर्ण पानाला जागतिक रेकॉर्डच्या प्लॅटफॉर्मपर्यंत नेण्यासाठी त्यांनी आपली मुली डॉ. नालंदा आणि डॉ. नुपूर आणि जावई धीरज व डॉ. देवेन यांच्या मदतीने व चिकाटीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड या दोन ठिकाणी रिपोर्ट पाठविला.

त्यानंतर पूर्णतपासनीचे रेकॉर्ड तयार करताना संत राहुल महाराज महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. विलास झोडगे यांच्या सहकार्यामुळे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या टीमची मदत मिळाली. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. रवींद्र यशवंत ठाकुर, प्राध्यापक उमेश मिलिंद कामत आणि प्राध्यापक दयानंद विश्वनाथ ठाकूर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक व चिकाटीने काम केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि वल्डे वाईड बुक ऑफ रेकॉर्डच्या नियमानुसार वैशिष्ट्यपूर्ण पानाची मोजणी करणे, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग वर रेकॉर्डिंग तसेच रिपोर्टिंग या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. त्या कामात डॉ. दिपाली काजरेकर, डॉ. नालंदा, डॉ. नुपुर, जावई धीरज, डॉ. देवेंद्र तसेच आशीर्वाद फोटो स्टुडिओचे टीम यांचे सहकार्य लाभले.

जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाच्या पानाचे जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड अशा दोन जागतिक रेकॉर्डची नोंद चंद्रकांत काजरेकर यांच्या नावे झाली. कुडाळ तालुका सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य आणि इंडिया या सर्वांचे नाव जगाच्या नकाशावर नोंदवले गेले आहे. या पानाची लांबी ५५.६ सेमी रुंदी १५.६ से.मी. आहे त्यापूर्वी त्यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून आपल्या शेती बागायतीत प्रयोग केले आहेत. कुडाळ येथील आपल्या राहत्या घराच्या टेरेसवर सुपारी व काजूची रोपे तयार करून नर्सरीचा यशस्वी प्रयोग केला आहे. तसेच तळवडे, सावंतवाडी येथील शेतात आपले बंधू विनोद काजरेकर यांच्या मदतीने भाताची एक काडी लागवड, लावणी, कापणी, मळणी इत्यादी यंत्राच्या साह्याने शेती करणे. दुर्मिळ वनौषधी लागवडी व संवर्धन यांचे यशस्वी प्रयोग केले आहेत.

तळ कोकणातील पहिल्या बीपीओ सेंटरचे सावंतवाडीत उद्घाटन

सावंतवाडी: व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेड या जागतिक दर्जाच्या कंपनीच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन आज सोमवारी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सावंतवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थीतीत झाले. तळकोकणातील हे पहिले पहिल्या बी पी ओ सेंटर ठरले आहे.
सावंतवाडी मध्ये स्थापन झालेल्या व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेडच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या कंपनीच्या माध्यमातून दोनशे जणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली गेली असून अजून तरुण तरुणींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कोकणवासियांसाठी काहीतरी करावं ही व्हरेनिअम क्लाऊड लिमिटेडचे संचालक हर्षवर्धन साबळे साबळे यांची इच्छा होती. या उद्देशानेच त्यांनी मुंबईसारख्या मायानगरीतून सिंधुदुर्ग सारख्या ग्रामीण भागात नेटवर्क उभा करण्याचा मानस तयार केला होता. या त्यांच्या प्रयत्नांना आज खऱ्या अर्थानं यश मिळालं आहे. कोकणात अनेक तरुणांना यापुढ रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. सध्या बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी मुंबई किंवा पुणे गाठावं लागतंय.
व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड ही भारतीय डिजिटल तंत्रज्ञानातील एक नावाजलेली कंपनी आहे. सावंतवाडी मधील जिमखाना मैदाना शेजारील भव्य इमारतीमध्ये व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड या कंपनीचे ऑफिस आहे. सिंधुदुर्गसारख्या ग्रामीण भागात स्थापन झालेले बीपीओ सेंटर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन झालेले पहिल बिपिओ सेंटर ठरलं आहे. सिक्युअर क्रेडेनशियल ,स्ट्रायकर, एफ एस आणि arrise च्या वाढत्या क्लाइंटबेससह डेटा एन्ट्री अकाउंटिं,बॅकग्राऊंड वेरिफिकेशन, डेट रिकवरी यासारख्या सेवांचा समावेश सावंतवाडीतल्या बीपीओ सेंटर मध्ये करण्यात आला आहे. या माध्यमातून बहुउपयोगी फिजिटल पायाभूत सुविधांचा आणि त्याच्या कौशल्य विकासाच्या माध्यमातून व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड या कंपनी ने सिंधुदुर्ग मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात एक उत्तुंग असं पाऊल टाकलं आहे. ग्राहकांसाठी व्हरेनियम क्लाऊड लिमिटेडने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
व्हरेनियम क्लाऊड लिमिटेड प्रधान कार्यालया च्या उदघाटन सोहळ्यास मॕनेजिंग डायरेक्टर -मा.हर्षवर्धन साबळे , हायड्रा ओपरेशन हेड -अनुष्का लोध, टेक्निकल कन्सलटंट- मुकुंदन राघवन, सावंतवाडी हेड-विनायक जाधव, अॕडमीन -संदिप नाटलेकर, प्रोजेक्ट इंजिनियर -लक्ष्मण नाईक, सतीश पाटणकर, साहील नाईक,ओंकार सावंत व कर्मचारीवृंद उपस्थित होते.

Swadesh Darshan 2.0 योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश. पर्यटन व्यावसायिकांना नोंदणी करण्याचे जिल्हाधीकाऱ्यांचे आवाहन; ‘या’ वेबसाईटवर करता येईल नोंदणी

सिंधुदुर्ग : पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन २.० योजनेमध्ये ४८ अधिसूचित पर्यटनस्थळी राज्यातील सिंधुदुर्ग या एकमेव पर्यटनस्थळाचा समावेश झाला आहे. ही कोकणकरांसाठी एक गौरवाची गोष्ट आहे. केंद्राच्या या योजनेमुळे पर्यटनात वाढ होणार असून पायभुत सुविधांचा देखील विकास होणार आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यातील सर्व निवास युनिट्स हॉटेल, ब्रेड आणि ब्रेकफास्ट रिसॉर्ट्, फार्मस्टे, होमस्टे, टूर ऑपरेटर, पर्यटक गाईड्स, ट्रॅव्हल एजंट आणि पर्यटन उद्योगातील इतर भागधारकांनी https://nidhi.tourism.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून ‘ट्रॅव्हल फॉर लाइफ’ प्रमाणपत्र मिळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तावडे यांनी केले आहे. नोंदणी केल्यावर युनिक NIDHI ID (NID) द्वारे विविध सेवा आणि फायदे यांच्या इलेक्ट्रॉनिक वितरणाचा लाभ या व्यावसायिकांना मिळणार आहेत. 
‘स्वदेश दर्शन २.०’ उपक्रमाअंतर्गत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली पर्यटनस्थळ व्यवस्थापन समिती देखील स्थापन केली आहे. विविध पर्यटनस्थळांच्या व्यवस्थापन उपक्रमांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही समिती जबाबदार आहे. पहिली डेस्टिनेशन मॅनेजमेंट समितीची बैठक जिल्हाधिकारी तावडे यांच्या अध्यक्षतेखाली डेस्टिनेशन प्लॅनिंग, डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज या विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केली होती.  यावेळी त्यांनी हे आवाहन केले आहे.
स्वदेश दर्शन २.० योजनेमधील अधिसूचित पर्यटनस्थळांची यादी 

कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाच्या कामाच्या प्रक्रियेस आरंभ…

कोल्हापूर :कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाची प्रकिया सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी ते सोमवारी कोल्हापूर स्थानकावर आले होते.

कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम गती शक्ति योजनेतून केले जाणार आहे. त्याकरिता डीपीआर काढण्याचे काम चालू आहे. डीपीआर मंजूर झाल्यावर निधी उपलब्ध होईल आणि ताबडतोब भूसंपादन प्रक्रियेस सुरवात होईल असे ते यावेळी म्हणालेत.

वैभववाडी-कोल्हापूर मार्गाची पीएम गतीशक्ती अंतर्गत शिफारस करण्यात आली आहे. या मार्गासाठी 3411.17 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सन 2015 मध्ये वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाची घोषणा केली. त्यानंतर आठ वर्षांपासून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे हा रेल्वेमार्गाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते. कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे. कोकणातील मालही मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search