Category Archives: सिंधुदुर्ग




रत्नागिरी, दि. १२ जुलै:भाजपचे खासदार नारायण राणे हे आपल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बारसु रिफायनरी आंदोलकांनी पोलीस महासंचालक ,महाराष्ट्र राज्य यांना एका पत्राद्वारे भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यापासून जीवास धोका असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
मंगळवारी (ता. ९) खासदार नारायण राणे यांनी राजापूर येथे केलेल्या या वक्तव्यानुसार ‘’बारसू रिफायनरी विरोधकांना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येवू दिले जाणार नाही आणि आले तर बाकीची जबाबदारी आमची, पोलिसांची नाही” , अशी गंभीर धमकी दिली आहे. या धमकीची आपण गांभीर्याने दखल घ्यावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून आम्हा सर्वांच्या जीविताचे रक्षण करावे, असे या पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नारायण राणे यांची गुन्हेगारी वृत्तीचा पूर्वइतिहास पाहता रिफायनरीला विरोध करणार्या स्थानिक ग्रामस्थांचे प्रतिनिधी यांच्या जीवितास धोका आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. रिफायनरीला विरोध करणाऱ्या आम्हा सर्वांच्या जीविताचे रक्षण करावे, असेही या निवेदनात म्हंटले आहे.
खळबळजनक: खासदार नारायण राणे यांच्यापासून जीवितास धोका, पोलीस महासंचालकांकडे कारवाईची मागणी – Kokanai https://t.co/qhqKz7PJtu#मराठीबातम्या #कोकणातीलबातम्या #कोकण #narayanrane #barsurefinery pic.twitter.com/WDEphuLyHS
— को – बातम्या मराठीत (@kokanai21) July 12, 2024




सावंतवाडी, दि. ११ जुलै |सावंतवाडी टर्मिनसच्या प्रवेशद्वारावर रेल्वे प्रशासनाने चुकीचा फलक लावल्याने येथील प्रवासी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी आपला निषेध विविध मार्गांनी नोंदवायला सुरवात केली आहे. सुशोभीकरण करण्यात आलेल्या सावंतवाडी टर्मिनसच्या त्या चुकीच्या फलका समोरच कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, सावंतवाडी च्या कार्यकर्त्यांनी निषेधाचे बॅनर लावून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
सावंतवाडी स्थानकाचे टर्मिनस म्हणुन भूमिपूजन ९ वर्षापूर्वीच झाले होते. त्यामुळे सावंतवाडी स्थानकाच्या नावापुढे टर्मिनस लावणे अपेक्षित होते. एकीकडे टर्मिनसचे काम रखडवले जात आहे तर दुसरीकडे स्थानकाच्या नावातून टर्मिनस हा शब्द गायब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानकाच्या सुशोभीकरणादरम्यान नवीन फलकावरही टर्मिनस हा शब्द न आल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
Follow us on








सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुवांधार कोसळत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून आंबोलीत धबधब्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. वाढत्या प्रवाहामुळे आज येथील आलेल्या पर्यटकांना खबरदारी म्हणून खाली उतरविण्यात आले आणि प्रवेश बंद करण्यात आला. वेंगुर्ला बेळगाव मार्गावर माडखोल बाजारात चार फूट पाणी आल्याने येथील रस्ताही काही कालावधी साठी बंद होता.
हवामान खात्याने आज सिंधदुर्गला दक्षतेचा ‘रेड’ अलर्ट दिला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला आहे. सिंधुदुर्गात आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असून अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि तसेच बाजारात पाणी साचल्याने येथील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे. सावंतवाडी शहरातही मुसळधार पाऊस झाल्याने बाजारपेठ तसेच रस्ते पाण्याने भरले आहेत. खारबारदारी म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्ह्यात उद्याही पावसाचा जोर कायम
हवामान खात्याने पुढील चार दिवसांचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असून त्यानंतर पावसाचा जोर ओसरणार आहे.




सिंधुदुर्ग: जेएसडब्लू कंपनीने तळकोकणातील आजगाव ग्रामपंचायतीला पत्र देऊन खनिज उत्खननाच्या सोमवारपासून गावातील ८४० हेक्टर भागात सोमवार पासून ड्रोन ने मायनींग विषयक सर्व्हे -तपासणी करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे येथील स्थानिक ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आजगाव ग्रामपंचायत कडे गुरुवार दिनांक ४ जुलै २०२४ सायंकाळी सहा वाजता JSW (जिंदाल कंपनी )चे अधिकारी मायनींग संदर्भात पत्र घेऊन ग्रामपंचायत ऑफिस मध्ये आले होते. त्यांनी आपण सोमवार पासून सर्व्हे सुरू करीत आहोत याची माहिती ग्रामपंचायत ला कळवीत आहोत असे सांगितले. सदरील पत्रात ८४० हेक्टर एवढी आजगाव ब्लॉक मधील जमीन महाराष्ट्र सरकार कंपनी ला मायनींग साठी देणार आहे ,त्यासाठी खनिज साठा किती आहे याची तपासणी करण्याबाबत चे हे पत्र आहे. त्या पत्रात असे नमूद आहे की, मायनींग साठी ड्रोन ने सर्व्हे करायची परवानगी कंपनी ला महाराष्ट्र सरकार ने तसेच जिल्हाधिकारी (कलेक्टर )सिंधुदुर्ग यांनी दिली आहे .आणि ते सोमवार दिनांक ८ जुलै ते ३० जुलै या कालावधीत ड्रोन ने मायनींग विषयक सर्व्हे -तपासणी करणार आहेत. मात्र या सर्व्हे साठी ग्रामपंचायतीने परवानगी दिली नसल्याची माहिती आहे.
याआधीही येथे मायनींग विषयक चाचणी करण्याचे प्रयत्न झाले होते मात्र येथील स्थानिक ग्रामस्थांकडून त्याला विरोध केला गेला होता. मायनिंग मुळे या क्षेत्रातील जमिनीचे तसेच परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. कारण संभाव्य खनिज क्षेत्रामध्ये ड्रिलिंग होणार असून भविष्यात याचे परिणाम धोकादायक असल्याचं सांगत ग्रामस्थांकडून विरोध केला जात आहे. प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता जर संबंधित खनिज प्रकल्पाला मान्यता दिल्यास तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल. तसेच कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास करणारा प्रकल्प होऊ देणार नाही. परिणामी आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला त्यावेळी होता. आता पुन्हा मायनिंगसाठी प्रयत्न चालू झाल्याने येथील वातावरण तापण्याची शक्यता आहे.




मालवण: तालुक्यातील बांदिवडे ते त्रिंबक रस्त्याची अवस्था खूपच वाईट झाली आहे. येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. पाऊस अजून सुरू झाला नसताना रस्त्याची ही अवस्था असेल तर पुढील दोन महिन्यांत रस्ता खूपच धोकादायक बनणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याची त्वरित दखल घेण्याची विनंती बांदिवडे ग्रामस्थांनी केली आहे.
बांदिवडे गावातील शाळेतील मुलांना तसेच ग्रामस्थांना रस्ता खराब असल्याने त्याचा खुपच त्रास सहन करावा लागत आहे. आजारी व्यक्तिंना आचरा किंवा मालवण येथे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व लोक नेत्यांनी लक्ष द्यावे अशी विनंती येथील बांदिवडे, पालयेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते श्री. रमाकांत घाडीगावकर यांनी केली आहे.




सावंतवाडी : सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानकावर टर्मिनस गेले 9 वर्ष प्रतीक्षेत आहे. टर्मिनस झाल्यास त्याठिकाणी मुबलक पाणी असणे अत्यंत गरजचे आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन येथे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करण्यासाठी असलेल्या शक्यतांवर विचार करून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी गेल्या डिसेंबर मध्ये एक योजना सुचवली होती. तसेच ही योजना मंजूर करून घेऊन योजनेस अर्थपुरवठा करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र ही योजना गेल्या 6 महिन्यांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पावर आधारित मणेरी ते वेंगुर्ले या नळपाणी पुरवठा योजनेवर दांडेली ते मळगाव कोकण रेल्वेसह 3 गावांना पुरक नळपाणी योजना 8 कोटी 50 लाख रुपयांचा आराखडा तयार करून मंजूरीसाठी पाठवला गेला आहे.
रेल्वे मंत्रालय आणि पर्यटन विकास अंतर्गत निधी अपेक्षित धरण्यात आला आहे. मात्र शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी कोकण रेल्वे महामंडळाच्या अधिकार्यांनी योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्याची तयारी दर्शवली नाही तर आपण सिंधुरत्न योजनेतून आर्थिक तरतूद करण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन दिले होते. दरम्यान डिसेंबर महिन्यापासून या योजनेचा आराखडा मंजूरीच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी कोकण रेल्वे मार्गावरील मळगाव रेल्वे स्थानकावर पाणी पुरवठा होईल आणि सर्व गाड्या पाणी भरण्यासाठी या ठिकाणी लवकरात लवकर थांबतील यासाठी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे असे प्रवासी संघटनेने म्हटले आहे.