Category Archives: सिंधुदुर्ग

गणेशोत्सवाआधीच चाकरमान्यांना गाठवा लागणार गाव! कारण काय?

   Follow us on        

सिंधुदुर्ग: नुकतीच उन्हाळी सुट्टी संपवून मुंबईला परतलेल्या चाकरमान्यांपैकी ज्यांना आपले नाव गावाकडील मतदार यादीत कायम ठेवायचे आहे, त्यांना यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा गावाची वारी करावी लागण्याची शक्यता आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम ३० जूनपासून हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत.

​तब्बल २४ वर्षांनंतर म्हणजेच २००२ नंतर पहिल्यांदाच मतदार यादी संपूर्णपणे स्वच्छ आणि अचूक करण्यासाठी ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश एकही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये आणि यादीतील मृत, स्थलांतरित किंवा दुबार नावे वगळून मतदार यादी पूर्णपणे ‘क्लीन’ करणे हा आहे. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकार परिषदेत याविषयी सविस्तर माहिती दिली.

​पुढील तीन महिने चालणाऱ्या या प्रक्रियेसाठी जिल्ह्यात व्यापक प्रशासकीय यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण ९२१ ‘बीएलओ’ कार्यरत असून, त्यांच्यावर देखरेखीसाठी ९३ सुपरवायझर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मॅपिंग करण्याचे काम सध्या जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत ९२.४२ टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे.

​३० जून ते २९ जुलै २०२६ या एक महिन्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात सर्व बीएलओ निवडणूक आयोगाने दिलेले ‘प्रि-प्रिंटेड’ इन्फर्मेशन फॉर्म्स घेऊन प्रत्यक्ष प्रत्येक नागरिकाच्या घरी भेट देतील. मुंबईकर चाकरमान्यांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जरी घरात हजर असेल, तरी ती संपूर्ण कुटुंबाची माहिती देऊन फॉर्म भरू शकते. मात्र, जर एखादे घर पूर्णपणे बंद असेल, तर प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती नोंदवूनच नाव समाविष्ट करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

​हा संपूर्ण कार्यक्रम मुख्य पावसाळ्याच्या दिवसांत येत असल्याने प्रशासनासमोर थोडे आव्हान नक्कीच आहे. परंतु, राष्ट्रीय कार्यक्रम अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविला जात असल्याने जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या बीएलओना अचूक माहिती देऊन प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम; निष्काळजीपणा केल्यास नाव वगळले जाण्याची शक्यता

सिंधुदूर्गनगरी:

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० जून ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मतदार यादी अधिक अचूक, अद्यावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आता थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचणार आहेत. या मोहिमेदरम्यान प्रत्येक मतदाराने आवश्यक माहिती देऊन शुद्धीकरण अर्ज भरून देणे बंधनकारक आहे. जर मतदाराने हा अर्ज भरला नाही, तर त्याचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळी देखील उपस्थित होते. १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक गृहीत धरून मतदार यादीतील मयत व्यक्तींची नावे, दुबार नोंदी तसेच अन्य त्रुटी दूर करून मतदार यादी अधिक विश्वासार्य बनविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ६ लाख ८८ हजार १४ मतदार नोंदणीकृत असून, त्यामध्ये ३ लाख ४० हजार ४५० पुरुष आणि ३ लाख ४७ हजार ५६४ महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच मतदार नोंदणीच्या मॅपिंगचे ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे.

​या मोहिमेच्या नियोजनानुसार, ३० जून ते २९ जुलै या कालावधीत ‘बीएलओ’ घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत आणि शुद्धीकरण अर्ज भरून घेऊन मतदारांची स्वाक्षरी घेतील. मतदार घरी नसल्यास कुटुंबातील प्रमुख व्यक्तीकडून आवश्यक माहिती घेऊन अर्ज भरला जाईल. जर मतदार घरी आढळला नाही, तर बीएलओ संबंधित पत्त्यावर तब्बल तीन वेळा भेट देतील. तरीही आवश्यक माहिती अथवा अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित मतदाराचे नाव यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. नाव वगळले गेले तरी नियमानुसार पुन्हा मतदार नोंदणीची संधी उपलब्ध राहणार असली, तरी त्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याने नागरिकांनी वेळेत अर्ज भरून द्यावेत व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेनंतर ५ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावर प्राप्त होणारे दावे व हरकतींची सुनावणी करून शेवटी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘अंतिम मतदार यादी’ प्रकाशित केली जाणार आहे.

​विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे अधिकृत वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

​२० ते २९ जून: कर्मचारी प्रशिक्षण व पूर्वतयारी

​३० जून ते २९ जुलै: बीएलओंच्या घरोघरी भेटी व अर्ज संकलन

​२९ जुलैपर्यंत: मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण

​५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर: दावे व हरकती दाखल करणे

​५ सप्टेंबर: प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे

​७ ऑक्टोबर: अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे

सिंधुदुर्ग: जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल

सिंधुदुर्ग:

राज्यात सध्या ‘अल निनो’च्या प्रभावामुळे तापमानात कमालीची वाढ झाली असून, पावसानेही ओढ दिली आहे. या बदलत्या तीव्र हवामानाचा आणि वाढत्या उन्हाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसू नये, म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने एक मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला असून, आता या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवार दिनांक १९ जून २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीसाठी हा बदल लागू असेल. या काळात शाळेची वेळ सकाळी ७.०० ते ११.१५ वाजेपर्यंत असणार आहे.

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद मधुकर कामत आणि जिल्हा परिषद सदस्य रुपेश अशोक पावसकर यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खांडेकर (भा.प्र.से.) आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी फारुखी अहमद यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी करण्यात आले आहेत. सर्वच शैक्षणिक संघटनांनी शाळांच्या वेळेत बदल करावा अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने हे परिपत्रक काढले असून आता शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जाणार आहेत.

Sawantwadi: शेतकर्‍याच्या विहिरीत आढळल्या तब्बल १६ मगरी

   Follow us on        

सावंतवाडी:

इन्सुली क्षेत्रफळ डोबवाडी येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत चक्क १५ पिल्लांसह पडलेल्या एका ७ ते ८ फूट लांबीच्या महाकाय मगरीला वन विभागाने सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. इन्सुली येथील रहिवासी संतोष नेवगी यांच्या शेतातील विहिरीत रविवारी एक मोठी मगर आणि तिच्यासोबत लहान पिल्ले असल्याचे निदर्शनास आले होते. विहिरीत एवढ्या मोठ्या प्रमाणात मगरी असल्याच्या वृत्ताने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. नेवगी यांनी तातडीने या घटनेची माहिती वन विभागाला दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून उपवनसंरक्षक मिलिश शर्मा आणि सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सुहास पाटील आणि सावंतवाडी येथील आर. आर. टी. (रॅपिड रेस्क्यू टीम) तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

​विहिरीची खोली आणि मगरीचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता हे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र, वन विभागाच्या पथकाने आधुनिक साधनांचा वापर करून आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून अत्यंत शिताफीने मोहीम राबवली. त्यांनी प्रथम मोठ्या मगरीला आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा तिच्या १५ लहान पिल्लांना विहिरीबाहेर काढले. अशाप्रकारे एकूण १६ मगरींना जीवनदान देण्यात वन विभागाला यश आले आहे. या सर्व मगरींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले आहे. या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

​या धडक मोहिमेत पथक प्रमुख बबन रेडकर, शुभम कळसुलकर, शुभम फाटक, देवेंद्र परब, पुंडलिक राऊळ, वनरक्षक अतुल पाटील, वनरक्षक पवन तारपे आणि वनरक्षक सदाशिव मोहिते यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. वन विभागाच्या या तत्परतेबद्दल आणि धाडसी कामगिरीबद्दल इन्सुली गावकऱ्यांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

आंबोली घाटात दरड कोसळली; मोठी दुर्घटना टळली, धोका मात्र कायम

   Follow us on        

आंबोली: पावसाळी पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वीच पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या प्रसिद्ध आंबोली घाटातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक बातमी समोर आली आहे. आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आंबोली घाटातील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी अचानक दोन भलेमोठे दगड (दरड) कोसळले. मुख्य धबधब्यापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर घाटमाथ्यावरून हे दोन मोठे दगड अचानक खाली आले.

यातील एक भलामोठा दगड थेट मुख्य रस्त्यावरून घरंगळत खाली दरीत कोसळला, तर दुसऱ्या मोठ्या दगडाचे तुकडे होऊन ते रस्त्यावरच विखुरले. दगड थेट खाली दरीत गेल्यामुळे घाटातील संरक्षक कठडा आणि रॅलींग पूर्णपणे तुटली आहे. सुदैवाने ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी रस्त्यावरून कोणतेही वाहन जात नव्हते. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरातील वाहनचालक आणि पर्यटकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे.

​दरम्यान, या घटनेनंतरही आंबोली घाटातील धोका अद्याप कायम आहे. घाटाच्या माथ्यावर अजूनही असे अनेक मोठे दगड सैल अवस्थेत अडकलेले आहेत, जे कधीही खाली रस्त्यावर कोसळू शकतात. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यात घडणारा मोठा अनुचित प्रकार किंवा अपघात टाळण्यासाठी वनविभागाने या घटनेची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. घाटमाथ्यावरील धोकादायक ठरू शकणारे सैल दगड आधीच बाजूला करावेत आणि रस्त्यावरील पडलेले दगड हटवून वाहतूक सुरक्षित करावी, अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरातून केली जात आहे.

नाहीतर हप्ते बंद होणार! ‘पीएम किसान’ साठी ई-केवायसीची अंतिम तारीख जाहीर

   Follow us on        

सिंधुदूर्गनगरी:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा पुढील हप्ता सुरक्षित ठेवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्याचे अंतिम आवाहन कृषी विभागाने केले आहे. निर्धारित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांचा पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘पीएम किसान’ योजनेचे एकूण १ लाख ९१ हजार लाभार्थी असून, त्यापैकी १ हजार ८४३ शेतकरी अद्याप या प्रक्रियेपासून दूर आहेत. योजनेतील पारदर्शकता वाढवणे आणि केवळ पात्र व जिवंत शेतकऱ्यांपर्यंतच शासकीय मदत पोहोचवणे, या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाने ई-केवायसी सक्तीची केली असून यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

​बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशनचे पर्याय

​शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बायोमेट्रिक पडताळणीसाठी लाभार्थी आपल्या जवळच्या सामूहिक सुविधा केंद्रात (CSC) जाऊ शकतात. तसेच, ज्यांना घरबसल्या प्रक्रिया करायची आहे, ते ‘पीएम-किसान’ मोबाईल ॲप डाऊनलोड करून स्वतःच्या मोबाईलद्वारे ‘चेहऱ्याच्या पडताळणी’ (फेस ऑथेंटिकेशन) माध्यमातून ई-केवायसी पूर्ण करू शकतात, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

​वृद्ध व दिव्यांगांसाठी घरपोच सुविधा

​वृद्ध, आजारी अथवा दिव्यांग लाभार्थ्यांना केंद्र किंवा सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नसल्यास प्रशासनाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गावपातळीवरील नोडल अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी संबंधित शेतकऱ्यांच्या घरी जाऊन फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करणार आहेत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी काळजी न करता या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

​’ॲग्रीस्टॅक’ नोंदणीही ठरणार महत्त्वाची

​पीएम किसानसह विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आता ‘ॲग्रीस्टॅक’ (AgriStack) नोंदणी करून ‘युनिक फार्मर आयडी’ प्राप्त करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. ही शेतकऱ्यांची डिजिटल ओळख असून, भविष्यात पीक विमा, अनुदान, कर्जमाफी तसेच थेट बँक खात्यात जमा होणाऱ्या विविध लाभांसाठी ती अनिवार्य असेल. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी ३० जूनपूर्वी ई-केवायसीसोबतच ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणीही तातडीने पूर्ण करावी आणि शासकीय योजनांचा लाभ अखंडित ठेवावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

आता शाळांत घुमणार ‘मालवणी’; बालभारतीचे कौतुकास्पद पाऊल

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

महाराष्ट्रातील मातीची अस्मिता आणि संस्कृतीचे प्रतिबिंब असणाऱ्या प्रांतिक बोलीभाषांना शिक्षण क्षेत्रात मानाचे स्थान देण्याचा यशस्वी पायंडा ‘बालभारती’ने चालू ठेवला आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) नव्या शैक्षणिक वर्षाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये राज्यातील समृद्ध बोलीभाषांचा समावेश केला आहे. यामध्ये प्रामुख्याने इयत्ता सहावीच्या नव्या पुस्तकात कोकणची शान असणारी ‘मालवणी’ आणि विदर्भाचे वैभव असणारी ‘वऱ्हाडी’ या बोलीभाषांना स्थान देण्यात आले असून, आगामी काळात याचा विस्तार उच्च माध्यमिक (११ वी व १२ वी) स्तरावरही करण्याचा महत्त्वपूर्ण विचार बालभारती करत आहे.

​राज्यात येत्या १५ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू होत आहे. या नव्या वर्षात इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या अभ्यासक्रमावर आधारित आकर्षक पाठ्यपुस्तके लागू केली जाणार आहेत. या नव्या पुस्तकांमध्ये ज्ञानरंजनासोबतच स्थानिक संस्कृतीची ओळख करून देण्यावर भर देण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेल्या इयत्ता सहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात ‘मालवणी’ आणि ‘वऱ्हाडी’ या बोलीभाषांचा मनमोहक सुगंध दरवळणार आहे. विद्यार्थ्यांची बोलीभाषेशी नाळ जोडली जावी, म्हणून या पुस्तकात या भाषांमधील एक विशेष उतारा (पाठ) समाविष्ट करण्यात आला आहे. यासोबतच, त्या बोलीभाषेतील साहित्याची निर्मिती करणाऱ्या लेखकांचा परिचयही विद्यार्थ्यांना करून दिला जाणार आहे.

​बालभारतीच्या नियोजनानुसार, पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्वच इयत्तांच्या नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये टप्प्याटप्प्याने विविध बोलीभाषांचा समावेश केला जाईल. इतकेच नव्हे, तर अकरावी आणि बारावीच्या स्तरावरही या बोलीभाषांचा विस्तार करण्याचे नियोजन सुरू आहे. बालभारतीच्या या निर्णयामुळे शालेय विद्यार्थ्यांना आपल्या मातृबोलीचा सार्थ अभिमान वाटेल, तसेच भाषेतील वैविध्य समजून घेण्यास मदत होईल. ग्रामीण आणि शहरी भागातील दरी मिटवून शिक्षणात अधिक आपुलकी निर्माण करण्यासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास शिक्षण वर्तुळातून व्यक्त होत आहे.

​”जुन्या अभ्यासक्रमातही पहिली ते दहावीच्या पुस्तकांत बोलीभाषांमधील कविता व पाठांचा समावेश होता. या प्रयोगाला शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांकडून अत्यंत सकारात्मक आणि उत्तम प्रतिसाद मिळाला. याच यशामुळे नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांमध्येही बोलीभाषांचा समावेश करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.”

— सविता वायळ (विशेषाधिकारी, मराठी विषय, बालभारती)

Medical Tourism: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य पर्यटनाला वाव! तीन पर्यटनस्थळे चर्चेत

   Follow us on        

सावंतवाडी:

राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा व आंबोली येथे ‘आयुष वेलनेस क्लिनिक’ तसेच रेडी-वेंगुर्ला येथे ‘विशेष आयुष केंद्र’ स्थापन करण्याकरिता मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबत माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे लक्ष वेधले आहे. याशिवाय आपल्या मतदारसंघातील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व इतर रिक्त पदे तातडीने भरण्यासंदर्भातही त्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी केली आहे.

​राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा विचार करता आयुर्वेद, पंचकर्म, योग आणि नॅचरोपॅथी यांसारख्या भारतीय उपचार पद्धतींविषयी परदेशी पर्यटकांमध्ये मोठे आकर्षण निर्माण होत असून, याद्वारे पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी हे महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर वसलेले असून, येथे येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या मोठी आहे. तसेच आचरा हे समुद्रकिनाऱ्यावर वसलेले गाव आहे आणि आंबोली हे वर्षभर पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.

​आयुष मंत्रालयाने सादर केलेल्या वार्षिक अर्थसंकल्पात वैद्यकीय पर्यटनामध्ये (Medical Tourism) आयुष सेवांचा समावेश करण्याबाबत विशेष भर देण्यात आला आहे. याच अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा व आंबोली येथे ‘स्वास्थ्य केंद्र’ सुरू केल्यास वैद्यकीय पर्यटनाविषयी जनजागृती होईल, तसेच भारतीय व परदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होईल. त्यामुळे या महत्त्वपूर्ण कामास त्वरित मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे.

आनंदवार्ता! तासाभरात तळकोकणात पोहचता येणार; सिंधुदुर्ग – नवी मुंबई विमानसेवा सुरू होणार

   Follow us on        

मुंबई (प्रतिनिधी):

नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानची बहुप्रतिक्षित विमानसेवा येत्या स्वातंत्र्यदिनापूर्वी, म्हणजेच १५ ऑगस्टपूर्वी प्रत्यक्ष सुरू होणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात ‘फ्लाय-९१’ या विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चॅको यांच्यासोबत घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत या विमानसेवेचा सविस्तर आढावा घेतला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच ही सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असून, यामुळे मुंबई आणि कोकणमधील प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होणार आहे. कोकणाचा सर्वात मोठा सण असलेल्या आगामी गणेशोत्सवासाठी घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना या विमानसेवेमुळे खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

​१०० टक्के ‘व्हीजीएफ’ मंजुरीचा मोठा आधार

​सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून नियमित विमान वाहतूक सुरू राहण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच (१७ मार्च २०२६ च्या मंत्रिमंडळ बैठकीत) १०० टक्के ‘व्हीजीएफ’ (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) सुविधेला मंजुरी दिली आहे. प्रादेशिक विमान वाहतूक अधिक परवडणारी व्हावी आणि विमान कंपन्यांना तोटा होऊ नये, यासाठी सरकारकडून हे फंडिंग दिले जाते. यापूर्वी सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-पुणे मार्गासाठी असा निधी दिला गेला होता. आता चिपी विमानतळालाही ही १०० टक्के सवलत मिळाल्यामुळे ‘फ्लाय-९१’ कंपनीला कोणताही आर्थिक अडथळा न येता आठवड्याचे सातही दिवस नियमित आणि सातत्यपूर्ण सेवा देणे शक्य होणार आहे. तसेच गणेशोत्सवातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कंपनीतर्फे विशेष अतिरिक्त उड्डाणांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

​अवघ्या तासाभरात प्रवास; स्थानिक पर्यटनाला मिळणार चालना

​नवी मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी) हा हवाई प्रवास सुरू झाल्यामुळे दोन्ही ठिकाणांमधील अंतर अवघ्या तासाभराचे राहणार आहे. मंत्रालयातील या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रामुख्याने कोकणच्या पर्यटन विकासाला आणि दळणवळणाला गती देण्यावर भर देण्यात आला. या नव्या विमानसेवेमुळे हवाई कनेक्टिव्हिटी वाढणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढेल. परिणामी, येथील स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि हॉटेल व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. या विमानसेवेच्या यशस्वी संचालनासाठी आणि तांत्रिक पूर्ततेसाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य, परवानग्या आणि आर्थिक पाठबळ देण्याचे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिले आहे.

मान्सूनची दापोलीपर्यंत धडक; सिंधुदुर्गात दमदार पाऊस

   Follow us on        

सावंतवाडी :

राज्यातील शेतकरी आणि जनतेसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने महाराष्ट्रात अधिकृतपणे प्रवेश केला असून, त्याची मजल आता रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील ‘हर्णे’ बंदरापर्यंत पोहोचली आहे. भारतीय हवामान विभागाने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे.

​हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल ८ जून रोजी मान्सूनची उत्तर सीमा महाराष्ट्रातील हर्णे (दापोली, रत्नागिरी) आणि सोलापूर या भागातून जात आहे. देशाचा विचार केला तर ही सीमा हर्णे, सोलापूर, कलबुर्गी, नंदीयाल, चेन्नई, लखीमपूर या भागांमधून जात आहे. मान्सूनने पश्चिम-मध्य आणि पूर्व-मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा आणखी काही भाग व्यापत पुढे कूच केली आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

​हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील २ ते ३ दिवसांत मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अतिशय अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात मान्सून मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग व्यापेल. याशिवाय तामिळनाडू, बंगालचा उपसागर, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही मान्सून वेगाने पुढे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनासोबतच दमदार पाऊस सुरू झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search