मुंबई (प्रतिनिधी):
नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानची बहुप्रतिक्षित विमानसेवा येत्या स्वातंत्र्यदिनापूर्वी, म्हणजेच १५ ऑगस्टपूर्वी प्रत्यक्ष सुरू होणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात ‘फ्लाय-९१’ या विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चॅको यांच्यासोबत घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत या विमानसेवेचा सविस्तर आढावा घेतला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच ही सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असून, यामुळे मुंबई आणि कोकणमधील प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होणार आहे. कोकणाचा सर्वात मोठा सण असलेल्या आगामी गणेशोत्सवासाठी घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना या विमानसेवेमुळे खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
१०० टक्के ‘व्हीजीएफ’ मंजुरीचा मोठा आधार
सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून नियमित विमान वाहतूक सुरू राहण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच (१७ मार्च २०२६ च्या मंत्रिमंडळ बैठकीत) १०० टक्के ‘व्हीजीएफ’ (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) सुविधेला मंजुरी दिली आहे. प्रादेशिक विमान वाहतूक अधिक परवडणारी व्हावी आणि विमान कंपन्यांना तोटा होऊ नये, यासाठी सरकारकडून हे फंडिंग दिले जाते. यापूर्वी सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-पुणे मार्गासाठी असा निधी दिला गेला होता. आता चिपी विमानतळालाही ही १०० टक्के सवलत मिळाल्यामुळे ‘फ्लाय-९१’ कंपनीला कोणताही आर्थिक अडथळा न येता आठवड्याचे सातही दिवस नियमित आणि सातत्यपूर्ण सेवा देणे शक्य होणार आहे. तसेच गणेशोत्सवातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कंपनीतर्फे विशेष अतिरिक्त उड्डाणांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.
अवघ्या तासाभरात प्रवास; स्थानिक पर्यटनाला मिळणार चालना
नवी मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी) हा हवाई प्रवास सुरू झाल्यामुळे दोन्ही ठिकाणांमधील अंतर अवघ्या तासाभराचे राहणार आहे. मंत्रालयातील या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रामुख्याने कोकणच्या पर्यटन विकासाला आणि दळणवळणाला गती देण्यावर भर देण्यात आला. या नव्या विमानसेवेमुळे हवाई कनेक्टिव्हिटी वाढणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढेल. परिणामी, येथील स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि हॉटेल व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. या विमानसेवेच्या यशस्वी संचालनासाठी आणि तांत्रिक पूर्ततेसाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य, परवानग्या आणि आर्थिक पाठबळ देण्याचे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिले आहे.


