ठाणे:
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत ठाणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी इस्राईलमध्ये रोजगाराची एक मोठी आणि सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इस्राईलमध्ये ‘होम बेस्ड केअरगिव्हर’ (Home Based Caregiver) या क्षेत्रात तब्बल ५ हजार पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे यांनी केले आहे.
या भरतीसाठी उमेदवारांचे वय २५ ते ४५ वर्षे वयोगटात असणे आवश्यक असून, त्यांना इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणे गरजेचे आहे. पात्रतेसाठी उमेदवारांकडे घरगुती सहाय्यक सेवांसाठी भारतातील मान्यताप्राप्त नियामक संस्थेकडून प्रमाणित केलेला किमान १९० तासांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय मिडवाइफरी, नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट यांसारख्या आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार किंवा GD, ANM, GNM, B.Sc Nursing किंवा Post B.Sc Nursing यांपैकी कोणतीही शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार यासाठी पात्र मानले जातील.
या भरती प्रक्रियेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इस्राईलमधील या नोकरीसाठीची निवड प्रक्रिया आणि नियुक्ती पत्रांचे वाटप महाराष्ट्रातच होणार आहे. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय विमा (मेडिकल विमा), निवास (राहण्याची सोय) आणि भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, या नोकरीच्या माध्यमातून उमेदवारांना दरमहा १ लाख ६१ हजार रुपयांपर्यंत आकर्षक वेतन मिळण्याची संधी उपलब्ध आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करावी व अर्ज सादर करावा. या भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवारांनी ‘जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे’ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

