समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेसाठी ‘रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ पोलिसांच्या स्वाधीन

   Follow us on        

रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि विस्तीर्ण किनाऱ्यांवर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधोरेखित करत जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. समुद्रातील वाढत्या दुर्घटनांना आळा घालणे आणि बुडणाऱ्या व्यक्तींना तातडीने मदत पोहोचवणे या उद्देशाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून पाच आधुनिक ‘रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ खरेदी करण्यात आले असून, पालकमंत्र्यांच्या हस्ते ते जिल्हा पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

​”गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण” या नावीन्यपूर्ण योजनेचा भाग म्हणून हे आधुनिक जीवनरक्षक उपकरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. रत्नागिरीच्या निसर्गरम्य किनाऱ्यांवर वर्षभरात देश-विदेशातून लाखो पर्यटक भेट देत असतात. मात्र, समुद्राच्या पाण्याचा व भरती-ओहोटीचा अंदाज न येणे, तसेच पाण्याच्या वेगामुळे अनेकदा दुर्दैवी अपघात घडतात. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत तब्बल १४३ पर्यटकांचा व नागरिकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची गंभीर नोंद आहे. ही आपत्ती लक्षात घेऊन भविष्यातील संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्यात आली आहे.

​हे अत्याधुनिक ‘लाईफ सेव्हिंग’ रोबोटिक वॉटर क्राफ्ट जिल्ह्यातील सर्वाधिक गर्दी असणाऱ्या आणि संवेदनशील किनाऱ्यांवर तैनात केले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने गणपतीपुळे, दापोली (मुरुड-लाडघर पट्टा), गुहागर, आरे-वारे यांसारख्या प्रमुख पर्यटनस्थळांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी हे रोबोट्स २४ तास दक्ष राहून किनाऱ्यांची राखण करणार आहेत.

​समुद्रात आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या कोणत्याही व्यक्तीपर्यंत हे रोबोट्स अत्यंत प्रतिकूल आणि वादळी हवामानातही वेगाने पोहोचू शकतात. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची कार्यक्षमता पूर्वीपेक्षा दुप्पट होणार असून, कमीत कमी वेळेत बाधित व्यक्तीला सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणणे शक्य होणार आहे. यामुळे भविष्यात अनेक निष्पाप जीवांचे प्राण वाचण्यास मोठी मदत होणार आहे.

​या हस्तांतरण कार्यक्रमाला अनेक प्रमुख मान्यवर व अधिकारी उपस्थित होते. यामध्ये आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ आणि माजी आमदार संजय कदम आदी उपस्थित होते.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search