आंबोली: पावसाळी पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वीच पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या प्रसिद्ध आंबोली घाटातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक बातमी समोर आली आहे. आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आंबोली घाटातील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी अचानक दोन भलेमोठे दगड (दरड) कोसळले. मुख्य धबधब्यापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर घाटमाथ्यावरून हे दोन मोठे दगड अचानक खाली आले.
यातील एक भलामोठा दगड थेट मुख्य रस्त्यावरून घरंगळत खाली दरीत कोसळला, तर दुसऱ्या मोठ्या दगडाचे तुकडे होऊन ते रस्त्यावरच विखुरले. दगड थेट खाली दरीत गेल्यामुळे घाटातील संरक्षक कठडा आणि रॅलींग पूर्णपणे तुटली आहे. सुदैवाने ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी रस्त्यावरून कोणतेही वाहन जात नव्हते. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरातील वाहनचालक आणि पर्यटकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, या घटनेनंतरही आंबोली घाटातील धोका अद्याप कायम आहे. घाटाच्या माथ्यावर अजूनही असे अनेक मोठे दगड सैल अवस्थेत अडकलेले आहेत, जे कधीही खाली रस्त्यावर कोसळू शकतात. त्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यात घडणारा मोठा अनुचित प्रकार किंवा अपघात टाळण्यासाठी वनविभागाने या घटनेची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. घाटमाथ्यावरील धोकादायक ठरू शकणारे सैल दगड आधीच बाजूला करावेत आणि रस्त्यावरील पडलेले दगड हटवून वाहतूक सुरक्षित करावी, अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरातून केली जात आहे.


