रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना घडली आहे. येथील खरवली आदिवासी वाडी येथे एका आईने आपल्या चार लहान मुलांना विषारी थंडपेय पाजल्यानंतर स्वतःही विषप्राशन केले. या दुर्दैवी आणि विदारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेत विषबाधेमुळे आईसह तिच्या दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला असून, इतर दोन मुलांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशा जाधव (वय २९) यांनी बाजारातून आणलेल्या थंडपेयामध्ये विषारी औषध मिसळले. त्यानंतर त्यांनी हे विषयुक्त थंडपेय आपल्या चार मुलांना पाजले आणि स्वतःही त्याचे प्राशन केले. काही वेळातच सर्वांची प्रकृती वेगाने बिघडू लागली. मुलांना व आईला उलट्या आणि अस्वस्थता जाणवू लागल्यानंतर शेजाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत सर्वांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान आशा जाधव यांच्यासह त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आशा जाधव (वय २९), नंदिनी जाधव (वय ७) आणि दुर्वा जाधव (वय ६) यांचा समावेश आहे.
या घटनेत इतर दोन मुलांचे प्राण वाचले असले तरी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. डॉक्टर या दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या आईने एवढे टोकाचे पाऊल का उचलले आणि या कौटुंबिक दुर्घटनेमागचे नेमके कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


