सावंतवाडी रोड (लोकनेते मधू दंडवते टर्मिनस) रेल्वे स्थानकावर राजधानी एक्सप्रेसला पुन्हा एकदा थांबा मिळाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही गाडी स्थानकात दाखल होताच, कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि स्थानिक रेल्वेप्रेमींनी तिचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. यावेळी रेल्वेची विधिवत पूजा करण्यात आली, तसेच गाडीच्या दोन्ही चालकांचा श्रीफळ, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित प्रवाशांना पेढे वाटून हा आनंदोत्सव मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी कोरोना काळातील अडचणींना उजाळा दिला. कोरोना काळात राजधानी आणि गरीब रथ एक्सप्रेसचा थांबा बंद करण्यात आला होता, मात्र संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता राजधानी एक्सप्रेससह गरीब रथ आणि मंगळूरू एक्सप्रेसचा थांबा पुन्हा मिळवण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली. या यशामागे मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या मोलाच्या मेहनतीचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच सावंतवाडी स्थानकाला ‘लोकनेते मधू दंडवते टर्मिनस’ हे नाव प्राप्त झाले असून, या नामासाजेसा प्रवाशांचा विकास व सुविधा भविष्यात येथे उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या स्वागताच्या सोहळ्याला संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडकर, ज्येष्ठ सल्लागार सुभाष शिरसाट, खजीनदार भूषण बांदिवडेकर यांच्यासह सिद्धेश सावंत, मिहीर गावडे, यश सावंत, संकेत सावंत, सरिता सावंत, प्रेरणा पोकळे, निधी धुरी, करण धुरी, श्री. तानावडे, तसेच मळगाव रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने रेल्वेप्रेमी उपस्थित होते.


