सामंतवाडी:
सावंतवाडी-कुडाळ रस्त्यावरील कोलगाव मियासाब दर्ग्या जवळ (समाधीजवळ) दुचाकी आणि स्विफ्ट कार यांच्यात भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण आणि तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आयुषी देसाई असे तरुणीचे नाव असून तिचा जागीच मृत्यू झाला, तर कार्तिक परब या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळच्या दिशेने जाणारी दुचाकी (क्रमांक GA 03 AB 7501) आणि सावंतवाडीच्या दिशेने येणारी स्विफ्ट कार (क्रमांक MH 07 AG 7801) यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघेही उडून रस्त्यावर फेकल गेले. अपघाताच्या तीव्रतेमुळे स्विफ्ट कार रस्त्याशेजारील गटारात जाऊन कोसळली आणि कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
घटनेनंतर स्थानिक नागरिक महेश बांदेकर, कृष्णा धुळपनावर आणि लाडू रायका यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचारास सुरुवात केली, मात्र उपचारादरम्यान कार्तिक परब यांची प्राणज्योत मालवली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर स्विफ्ट कारच्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार राऊत, पोलीस हवालदार सुरेश पाटील, पोलीस हवालदार धोत्रे आणि पोलीस कॉन्स्टेबल पवन परब करत आहेत.


