सिंधुदुर्ग:
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ३६५ ग्रामपंचायत क्षेत्रे आणि ३ नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांमध्ये नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (ASSK) आयडी प्रदान करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली सहजरीत्या उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. या संदर्भातील अधिकृत जाहिरात २३ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना २९ जुलै २०२६ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेतच हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची माहिती २० ऑगस्ट २०२६ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर १ सप्टेंबर २०२६ रोजी प्राप्त हरकती आणि अपात्र अर्जांची छाननी केली जाईल. एखाद्या ठिकाणी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास उमेदवारांच्या मुलाखतीची तारीख स्वतंत्रपणे घोषित केली जाऊन अंतिम निवड यादी संकेतस्थळावर जाहीर केली जाईल.
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की अर्जाचा नमुना, आवश्यक अटी व शर्ती आणि कागदपत्रांची संपूर्ण माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर (sindhudurg.nic.in) उपलब्ध आहे. तसेच, निवड प्रक्रियेदरम्यान कोणत्याही उमेदवाराशी फोन अथवा ई-मेलद्वारे वैयक्तिक संपर्क साधला जाणार नसल्यामुळे सर्व अपडेट्ससाठी उमेदवारांनी संकेतस्थळावरच लक्ष ठेवावे. स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे.


