सावंतवाडी:
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर नवीन व्यावसायिक थांबे मंजूर करण्यात आले आहेत. रेल्वे बोर्डाच्या मान्यतेनंतर प्रसिद्ध झालेल्या या निर्णयानुसार १२१३३/१२१३४ मुंबई सीएसएमटी – मंगळुरु जंक्शन एक्सप्रेस, १२४३२/१२४३१ हजरत निजामुद्दीन – त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस आणि १२२०१/१२२०२ लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – तिरुवनंतपुरम गरीब रथ एक्सप्रेस या गाड्या आता सावंतवाडी स्थानकावर थांबणार आहेत. सावंतवाडी परिसरातील प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीची दखल घेत हे थांबे देण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक आणि कोकणवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
रात्रीच्या वेळा आणि सार्वजनिक वाहतुकीचा अभाव ठरणार डोकेदुखी:
आनंदाची बाब ही असली तरी, मंजूर झालेल्या वेळापत्रकाचा बारकाईने अभ्यास केल्यास रात्रीच्या वेळेत थांबणाऱ्या गाड्या प्रवाशांसाठी मोठ्या गैरसोयीच्या ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सावंतवाडी स्थानक तळकोकणातील महत्वाचे स्थानक आहे. येथून प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या (footfall) पण खूप मोठी आहे. अजून गाड्यांना थांबा मिळाल्यास त्यामधे अजून मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. असे असले तरी या स्थानकाचे ठिकाण रात्रीच्या प्रवासासाठी काहीसे गैरसोयीचे आहे. सावंतवाडी शहर ते रेल्वे स्थानक या दरम्यान सुमारे ८ किलोमीटरचे अंतर आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दररोज सायंकाळी ७ वाजेनंतर ते सकाळी ६ वाजेपर्यंत या मार्गावर कोणतीही एसटी बस किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसते. यामध्ये विशेषतः १२२०१ एलटीटी – तिरुवनंतपुरम गरीब रथ एक्सप्रेस (मध्यरात्री ०२:०२ वा.), १२२०२ तिरुवनंतपुरम – एलटीटी गरीब रथ एक्सप्रेस (पहाटे ०३:२८ वा.) आणि १२१३४ मंगळुरु – सीएसएमटी एक्सप्रेस (रात्री ११:३० वा.) या गाड्या ऐन मध्यरात्री व पहाटे सावंतवाडीत येतात. सार्वजनिक बस नसल्यामुळे या वेळेत उतरणाऱ्या किंवा ट्रेन पकडण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.
रात्रीच्या वेळेत सावंतवाडी स्थानक परिसर आणि शहराकडे जाणाऱ्या निर्जन मार्गावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था (RPF आणि स्थानिक पोलीस बंदोबस्त) असणे अत्यंत गरजेचे बनले आहे. ऐन मध्यरात्री उतरणाऱ्या महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न यांमुळे ऐरणीवर आला आहे. याशिवाय, रात्रीच्या वेळी कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध नसल्याचा गैरफायदा घेऊन काही रिक्षा व्यावसायिक प्रवाशांकडून मनमानी आणि अवाजवी भाडे वसूल करण्याची दाट शक्यता आहे. या कारणाने प्रवासी या गाड्यांतून प्रवास करणे टाळण्याची शक्यता आहे.
थांबे टिकवून ठेवण्यासाठी तातडीने ‘या’ उपाययोजना करणे आवश्यक:
रेल्वे प्रशासनाने हे थांबे ५ महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर दिले असून, या कालावधीत मिळणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवरून (Patronage) व उत्पन्नावरून हे थांबे कायम ठेवायचे की रद्द करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात प्रवासी संख्या नसल्यास हे थांबे रद्द होण्याची दाट शक्यता आहे. हे थांबे कायम टिकवण्यासाठी आणि प्रवाशांची सोय होण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाने रात्रीच्या गाड्यांच्या वेळापत्रकानुसार सावंतवाडी शहरातून स्थानकासाठी विशेष कनेक्टिंग बस फेऱ्या सुरू कराव्यात.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTO) आणि रिक्षा संघटनांनी रात्रीच्या प्रवासासाठी अधिकृत दरपत्रक जाहीर करून ते स्थानक परिसरात लावावे. तसेच, स्थानक परिसर व मुख्य रस्त्यावर कडक आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या पहारा आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी), स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि प्रवाशांनी समन्वयाने काम केले तरच हे थांबे कायमस्वरूपी टिकून राहतील.


